नकी-२

Submitted by द्वादशांगुला on 5 January, 2018 - 14:21

भाग 2

नकी भाग -१ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा https://www.maayboli.com/node/64829

नकी तिच्या या जिवलग टोळीत फार रमली होती. आजकाल ती सकाळी लवकरच उठे. दूरच्या हिरव्या डोंगरापाशी लालेलाल झालं , की नकी चार पायांवर चालत पहिले ओढ्यापाशी जाऊन तोंड पाण्यात बुचकळायची आणि पोटभर पाणी प्यायची. अशातच वाळूत बसलेल्या उनाड पाखरांच्या अंगावर धावत जात त्यांना उडवायची. कुठलंसं धीट कीडं अंगावर बसलं की गुरगुरायची. त्याला झटकत गपदिशी मटकवायची. पाण्यात मासोळ्यांशी खेळत बसायची. मग कंटाळा आला की स्वतःलाच चाटत बसायची. पाय म्हणून लोप पावलेले हात, पाय, चाटून स्वच्छ करायची. आपल्याला शेपूट नाही याचं तिला फार अप्रूप वाटे. आपल्याला शेपूट हलवून इतरांसारखा आनंद व्यक्त करता येत नाही, याचं वैषम्यही वाटे . मग ती उगाचच कंबर हलवायची, इतर आनंदात असताना.
ती झुंजूमुंजू झाल्यावर बाहेर आलेली दिसली, की एखादं लबाड , तिचा लळा लागलेलं पिलू तिच्यामागे यायचं. तिला वासाने आणि वाटेवरच्या पानांच्या आवाजाने याची चाहूल लागली, की ती झपकन मागे वळायची. हाताच्या बोटांनी, नखांनी माती खुरडायची. तिला खेळण्याच्या आवेशात पाहिलं की ते पिलू आणखी मस्तीत यायचं. तिच्या जवळ उड्या मारत धावत येऊन आपल्या शिवशिवणार्या इवल्या दातांनी तिच्या कोपराजवळ चावायचं. मग नकी उंऊ ... करत त्याची मानेची केसाळ कातडी दातांत पकडत त्याला उचलून परत गुफेत नेऊन सोडायची. त्याला चाटायची.

नंतर थोडा सूर्य वर कलला, की शिकारीहून रात्री उशीरा आलेले भाल्या , बिट्टया, बक्की , चंदू अंग ताणत, आळोखेपिळोखे देत उठायचे. बक्कीचं ऊंकारणं ऐकून पिल्लं तिच्यापाशी गेली की पिलांना बक्कीच्या स्वाधीन करून नकी तळ्यापाशी जायची. तिचं मोठं कापड थोडं आत टाकायची अन् ते वाहून जाऊ नये म्हणून कोपर्याला दगड लावायची. मग परत गुफेत जाऊन मोठ्या कुत्र्यांनी रात्री आणलेलं मांस खायची. थोडी टंगळमंगळ करून बक्कीच्या पोटाशी झोपुन जायची. बक्कीच्या चाटण्याने तिला छान झोप लागायची. मग पिल्लांच्या चावण्याने, तिच्या अंगावर खेळण्याने तिची झोपमोड व्हायची.चिडून ती पिलांना चावायची. दूर करायची.

मग सूर्य कलायला लागला की ती तळ्यावर जाऊन मासे आणायची. ते सर्वांना खाऊ घालायची. पिल्लं लुडबुड करू लागली, की त्यांनाही मांस मांस द्यायची. तीही एक दोन मासे गटकवायची . तोडायला न जमलेले काटे कोपर्याशी मातीत पुरून ठेवायची. कधीमधी चंदूला खायला द्यायची. तरी पोट न भरल्यास कसलीशी पानं ,कंदमूळं शोधून खायची. मग मस्तपैकी ताणून द्यायची. मध्यरात्री जेव्हा मोठी कुत्री शिकारीला जायची तेव्हा ही उठून पिलं सांभाळायची . त्यांची उं ऊं आवाज करत, हलत होणारी झोप कौतुकाने बघत त्यांना कुशीत घेऊन गाढ झोपी जायची. शिकारीसोबत मोठी कुत्री कधी परत आली, हे तिच्या गावातही नसायचे.

आजचं वातावरण ढगळ होतं. प्रसन्नताच नव्हती मुळी . रोज पहाटे लवकर उठणारी नकी आज सुर्य डोक्यावर आल्यावर उठली . कशीतरी पाणी पिऊन येऊन परत येऊन उगाच कालची पुरलेली हाडं उकरून चघळत बसली. पिलांना चाटत बसली. तीही आज मरगळलेलीच वाटत होती. भयाण वाटावी अशी शांतता होती. वारा सुटला होता. वेळ सरतच नसल्यासारखं वाटत होतं.स्तब्ध होतं सारं. अखेर संध्याकाळ झाली. मिट्ट काळोख झाला. पण आजची रात्र अनपेक्षित वळण घेऊन काळरात्र होऊन जाईल, ळअसं तिला वाटलही नव्हतं.....

मिट्ट अंधारलं होतं. अमावस्या असावी बहुतेक. चमकणार्या डोळ्यांव्यतिरिक्त तिला काही दिसत नव्हतं. अचानक काहीतरी जाणवलं. बक्की , भाल्या सावध झाले होते. काही तरी अनपेक्षित असल्याचा वास नकीच्या तीक्ष्ण झालेल्या घ्राणेंद्रियांना थोड्या वेळाने पक्का जाणवला होतापिल्लं उठून वळवळत होती. त्यांनाही काही जाणवले असावे. आता कसलासा वेगळाच गंध तीव्र झाला होता. वातावरण स्तब्ध झालं होतं. सर्व मोठी कुत्री वेगळीच आक्रमक भुंकत होती.नकी घाबरली होती. बक्की , भाल्या, चंदू, बिट्ट्या , मन्या,चंदू, पिमी गुफेच्या तोंडाजवळ गेले होते.

बापरे!! बाहेर मोठ्ठाले चमकते आठ -दहा डोळे दिसत होते...! ती धूडं नक्कीच अजस्त्र, भयानक असावीत..... त्या अनोळखी प्राण्यांच्या आणि नकीच्या टोळीच्या कुत्र्यांच्या गुरगुरण्याचा आवाज आसमंतात भरून गेला होता.आता नक्कीच काहीतरी भयानक होणार होते. ..

इतक्यात धडपडीचा ,केकाटण्याचा , ओरबाडण्याचा , गुरगुरण्याचा, एकत्र आवाज आला . बक्की च्या आकांताने केकाटण्याचाही आवाज आला. नकीच्या इवल्याशा ह्रदयात धडकी भरली. नंतर मारामारीची धुमश्चक्री. नकी बधीर झाली होती. काही न करण्यापलिकडे तिच्या हातात काही नव्हते. पिल्लांना फुरगंटून थरथरत बसली होती ती हताशपणे. काही तास उलटले. प्रकाशाची कवडसं मुद्दाम गुफेत शिरत होती , नकीला सत्य दाखवायला. ती बाहेरची धूडं गायब झाली होती. नकीच्या दोस्तांनी पराक्रमाची शर्थ केली होती त्यांना हाकलवायला.

भाल्याचा कान फाटला होता. रक्त गळत होतं. तो मातीत लोळून ती जखम शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अंगावरही लहानमोठ्या जखमा होत्या. एकंदर चांगलंच ओरबाडून काढलं होतं त्याला.चंदूचा जबडा लोंबकळत होता. तीक्ष्ण पंजांनी ओरबाडलेलं होतं. बाकी सर्वांची हीच तर्हा होती. रक्त सांडलं होतं सगळीकडे.पण नकीची नजर बक्कीला शोधत होती.

गुफेच्या दारापाशी बक्की पडली होती. पिल्लं, सर्व कुत्री बक्कीपाशी होती. तिचं शव विद्रूप झालं होतं. ओरबाडलं होतं तिला. तिची लोंबकळती शेपटी, जबडा, कातडी...... नकीला आपल्या जिवलग मैत्रिणीचं हे रूप पाहवेच ना. बक्कीनं नकीसाठी,पिलांसाठी आपला जीव गमावला होता. नकी तिच्या शवाशेजारी बसून राहिली. बाकी कुत्र्यांनी दुर्लक्ष केलं. हे काही नकीला रूचलं नाही.

काही तास उलटले. ही कुत्री बक्कीच्या जवळ आली होती. नकीला काही कळायच्या आतच त्यांनी ते बक्कीचं विदीर्ण शव खायला सुरूवात केली!
....

नकीने फार अडवलं, पण तिला चक्क ढकलून दिलं भाल्याने!!

नक्की रडत रडतच तळ्याकडे धावली..... तिला या कुत्र्यांचा प्रथमच एवढा किळस आला होता...... ती जवळ जवळ तीन-चार वर्षांनी दोन पायांवर धावली होती..........

नकी-३अंतिम
https://www.maayboli.com/node/65063

नकी संपूर्ण
https://www.maayboli.com/node/65064

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद स्नेहनिल ,च्रप्स ,आदू ,आबासाहेब..

पुढील भाग (शेवटचा असेल) या शनिवारी टाकेन..

शनिदेवता प्रसन्न |