नकी- संपूर्ण

Submitted by द्वादशांगुला on 19 January, 2018 - 04:39

नकी या कथेचे तीनही भाग वाचनाच्या सोयीसाठी एकत्र टाकत आहे.

नकी भाग -१

आज खरंतर पहिल्यांदाच तिने हे असे कपडे घातले होते. काय तर म्हणे झगा. पूर्वी ती जे मिळेल ते घालायची. गुंडाळायचीच म्हणा ना. दिवसभर तिच्या त्या दांडग्या टोळीत भटकायची. सुरक्षित वाटायचं तिला. ही पहाटे साखरझोपेत असली अन् बाकीचे हिला झोपेतच टाकून बगळ्याच्या किंवा छोट्या सावजाच्या शिकारीला गेले, तर कावरीबावरी व्हायची ती. दोन हात जमिनीवर टेकवत अस्वस्थ आवाज घशातून काढत त्या गुहेभर रांगायची. तोंडात मरतुकडं सावज घेऊन भाल्या आणि आख्खी टोळी गुहेत परतली, की ही रागात यायची. सगळ्यांवर आवाज चढवायची.तरीही कोणी दुर्लक्ष केलं की ओरबाडून काढायची भेटेल त्याला. चावे घ्यायची कानावर , पाठीवर , शेपटीवर. मग मन भरलं की कुठेतरी कोपर्यात बसून हाताने खुरडत बसयची. मग बक्कीला हिची दया यायची. आपल्या वाट्याचं मांस तिला देऊ करायची. मग काय स्वारी खूष !
बक्की पडली स्वभावाने कनवाळू. हिनेच तर तिला आणलं होतं या टोळीत. तीन वर्षांची होती तेव्हा ती. ही 'ती' म्हणजे नकी...... नकुशी....... कुठल्याशा पंधरा तोंडांना खाऊ घालणार्या यःकश्चित आदिवासी दांपत्याला नकोसं झालेलं अपत्य. तही दुर्दैवी कन्यारत्नच. नकी तीन वर्षं वाढली अशीच भार म्हणून. मग एके दिवशी बाप हिला फिरायला म्हणून दूरच्या पाड्यावर घेऊन गेला अन् तिथल्या निबिड अरण्यात हिला सोडून निघून गेला . नकीच्या पोटातले कावळे ओरडू लागलेले. रडून, ओरडून , हाका मारून हिचा घसाही कोरडा पडलेला. नकी एका झाडाखाली बसलेली. काळोख होत आला होता. चित्रविचित्र प्राण्यांच्या आवाजाने नकी घाबरली. इतक्यात कुठूनतरी बक्की अवतीर्ण झाली. होय बक्कीच. नकीनेच हिचं ठेवलेलं नाव. नकीच्या गावातली प्रेमळ बकीमावशी- बकुळामावशी तिला आठवायची म्हणून. हां , तर बक्कीला पाहून नकीची दातखिळच बसली!... हा अजस्त्र जबडा.... मजबूत अंग....... मोठाले पंजे.....उभे कान..... बापरे!!!!
नकीत उठायचेही त्राण शिल्लक नव्हते. घशातून आवाज फुटत नव्हता.
अरे....... पण आश्चर्यच.....!! बक्की हिला चाटायलाच लागलेली... नकीची भीती कुठल्याकुठे पळाली. ती हसायला लागली. इतक्यात तिच्या पोटातून गुडगुड आवाज आला. भुकेची जाणीव झाली तिला. मायाळू बक्कीलाही हे उमजलं. तिने नकीला आपल्यामागे यायचे इशारे दिले. जवळच्या ओढ्यापाशी तिला नेलं. उपाशी नकी पोटभर पाणी प्यायली. मग बक्कीनं तिला आपल्या गुहेत नेलं. छोट्या तोंडाची गुहा होती ती. आत मिट्ट काळोख होता. त्या काळोखात अनेक तीक्ष्ण डोळे चमकत होते. नकी घाबरली. बक्कीच्या शेपटीला पकडून चालू लागली. आतून गुरगुरण्याचा आवाज येत होता. अडखळत कशीबशी ती आत गेली. सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. नकी बक्कीच्या ऊबदार केसांत डोकं खुपसून झोपी गेली.
दुसर्या दिवशी उजाडलं होतं. नकी डोळे चोळत उठली. तिला आजूबाजूला कुबट उग्र वास येत होता. गुहेत कोणी नव्हतं. ती उठली. कालच्या ओढ्यापाशी गेली नि पोटभर पाणी प्यायली. तिची भूक पुन्हा चाळवली गेली होती. ती गुहेत परतली. गुहेत बर्यापैकी उजेड आला होता. आजूबाजूला कापडाचे तुकडे, रंगीबेरंगी पंख,कसलासा रबराचा तुकडा, असे काहीबाही पसरले होते. इतक्यात तिला कुं कुं ऊ असा बारका आवाज आला. ती आवाजाचा कानोसा घेऊन शोधू लागली. तिला गुहेच्या मागच्या आतल्या बाजूला नऊ-दहा छोटी इवलीशी पिल्लं अन् एक रानटी कुत्री दिसली. अरेच्चा! ही तर कालचीच कुत्री ! नकी ओळखीचं हसली. ती हळूहळू जवळ सरकली, तशी कुत्री गुरगुरली आधी, पण मग सरावली. नकीने चाचरत तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी ती कुत्री निश्चिंत झाली. तिला चाटू लागली. नकीचं लक्ष त्या पिलांकडे गेलं . काय गोंडस पिल्लं होती ती! एकमेकांना खेटून झोपलेली...... अधूनमधून वळवळणारी....... कुं कुं ऊ करणारी.......नुकतेच आलेले बारीक केस......... बंद डोळे......हलताना थरथरणारी.......किती गोड.! एकदोघं दूध पित होती, त्चाम त्चाम आवाज करत. मग नकीची भूक वाढली अन् तीही कुत्रीचं दूध पिऊ लागली....तेव्हाच तिनं त्या कुत्रीला नाव ठेवलं बक्की..!!
नकी आता त्या कुत्र्यांमध्ये मस्त रूळली होती. हो नाही करता करता सर्वांनी तिला आपलं मानलं होतं. भाल्या, बिट्ट्या, मन्या,चंद, डूरू, पिमी, नीनी,भुरी, ढेरू सर्वांनीच .अन् पिल्लंही मोठी झाली होती पिल्लांचही शेपूट हलायचं नाही तिच्याशिवाय.... माणसांपेक्षा प्राणीच भूतदया दाखवतात हे खरं ....... ते तिला खायला आणून देत. तीही ओळखीची फळं, कंदमूळं खाई. तिला भाजलेल्या मांसाची सवय. पण हल्ली ती कच्चं मांस खाऊ लागली होती.. छोटेछोटे प्राणी पकडू लागली होती. तिला ओढ्यात एक मोठं कापड सापडलं होतं. त्यात ती मासे पकडी.या सर्वांना ते खाऊ घालताना तिचा ऊर भरून येई. सर्वांबरोबर ती हिंडे, फिरे, खाई,मस्ती दंगा करायची. भांडायचीसुद्धा ........मग भाल्या नाहीतर बक्की हलकेच भुंकायचे अन् चावायचे...तिला या सार्यांचा स्वभाव कळू लागला होता.........

भाग 2

नकी तिच्या या जिवलग टोळीत फार रमली होती. आजकाल ती सकाळी लवकरच उठे. दूरच्या हिरव्या डोंगरापाशी लालेलाल झालं , की नकी चार पायांवर चालत पहिले ओढ्यापाशी जाऊन तोंड पाण्यात बुचकळायची आणि पोटभर पाणी प्यायची. अशातच वाळूत बसलेल्या उनाड पाखरांच्या अंगावर धावत जात त्यांना उडवायची. कुठलंसं धीट कीडं अंगावर बसलं की गुरगुरायची. त्याला झटकत गपदिशी मटकवायची. पाण्यात मासोळ्यांशी खेळत बसायची. मग कंटाळा आला की स्वतःलाच चाटत बसायची. पाय म्हणून लोप पावलेले हात, पाय, चाटून स्वच्छ करायची. आपल्याला शेपूट नाही याचं तिला फार अप्रूप वाटे. आपल्याला शेपूट हलवून इतरांसारखा आनंद व्यक्त करता येत नाही, याचं वैषम्यही वाटे . मग ती उगाचच कंबर हलवायची, इतर आनंदात असताना.
ती झुंजूमुंजू झाल्यावर बाहेर आलेली दिसली, की एखादं लबाड , तिचा लळा लागलेलं पिलू तिच्यामागे यायचं. तिला वासाने आणि वाटेवरच्या पानांच्या आवाजाने याची चाहूल लागली, की ती झपकन मागे वळायची. हाताच्या बोटांनी, नखांनी माती खुरडायची. तिला खेळण्याच्या आवेशात पाहिलं की ते पिलू आणखी मस्तीत यायचं. तिच्या जवळ उड्या मारत धावत येऊन आपल्या शिवशिवणार्या इवल्या दातांनी तिच्या कोपराजवळ चावायचं. मग नकी उंऊ ... करत त्याची मानेची केसाळ कातडी दातांत पकडत त्याला उचलून परत गुफेत नेऊन सोडायची. त्याला चाटायची.
नंतर थोडा सूर्य वर कलला, की शिकारीहून रात्री उशीरा आलेले भाल्या , बिट्टया, बक्की , चंदू अंग ताणत, आळोखेपिळोखे देत उठायचे. बक्कीचं ऊंकारणं ऐकून पिल्लं तिच्यापाशी गेली की पिलांना बक्कीच्या स्वाधीन करून नकी तळ्यापाशी जायची. तिचं मोठं कापड थोडं आत टाकायची अन् ते वाहून जाऊ नये म्हणून कोपर्याला दगड लावायची. मग परत गुफेत जाऊन मोठ्या कुत्र्यांनी रात्री आणलेलं मांस खायची. थोडी टंगळमंगळ करून बक्कीच्या पोटाशी झोपुन जायची. बक्कीच्या चाटण्याने तिला छान झोप लागायची. मग पिल्लांच्या चावण्याने, तिच्या अंगावर खेळण्याने तिची झोपमोड व्हायची.चिडून ती पिलांना चावायची. दूर करायची.
मग सूर्य कलायला लागला की ती तळ्यावर जाऊन मासे आणायची. ते सर्वांना खाऊ घालायची. पिल्लं लुडबुड करू लागली, की त्यांनाही मांस मांस द्यायची. तीही एक दोन मासे गटकवायची . तोडायला न जमलेले काटे कोपर्याशी मातीत पुरून ठेवायची. कधीमधी चंदूला खायला द्यायची. तरी पोट न भरल्यास कसलीशी पानं ,कंदमूळं शोधून खायची. मग मस्तपैकी ताणून द्यायची. मध्यरात्री जेव्हा मोठी कुत्री शिकारीला जायची तेव्हा ही उठून पिलं सांभाळायची . त्यांची उं ऊं आवाज करत, हलत होणारी झोप कौतुकाने बघत त्यांना कुशीत घेऊन गाढ झोपी जायची. शिकारीसोबत मोठी कुत्री कधी परत आली, हे तिच्या गावातही नसायचे.
आजचं वातावरण ढगळ होतं. प्रसन्नताच नव्हती मुळी . रोज पहाटे लवकर उठणारी नकी आज सुर्य डोक्यावर आल्यावर उठली . कशीतरी पाणी पिऊन येऊन परत येऊन उगाच कालची पुरलेली हाडं उकरून चघळत बसली. पिलांना चाटत बसली. तीही आज मरगळलेलीच वाटत होती. भयाण वाटावी अशी शांतता होती. वारा सुटला होता. वेळ सरतच नसल्यासारखं वाटत होतं.स्तब्ध होतं सारं. अखेर संध्याकाळ झाली. मिट्ट काळोख झाला. पण आजची रात्र अनपेक्षित वळण घेऊन काळरात्र होऊन जाईल, ळअसं तिला वाटलही नव्हतं.....
मिट्ट अंधारलं होतं. अमावस्या असावी बहुतेक. चमकणार्या डोळ्यांव्यतिरिक्त तिला काही दिसत नव्हतं. अचानक काहीतरी जाणवलं. बक्की , भाल्या सावध झाले होते. काही तरी अनपेक्षित असल्याचा वास नकीच्या तीक्ष्ण झालेल्या घ्राणेंद्रियांना थोड्या वेळाने पक्का जाणवला होतापिल्लं उठून वळवळत होती. त्यांनाही काही जाणवले असावे. आता कसलासा वेगळाच गंध तीव्र झाला होता. वातावरण स्तब्ध झालं होतं. सर्व मोठी कुत्री वेगळीच आक्रमक भुंकत होती.नकी घाबरली होती. बक्की , भाल्या, चंदू, बिट्ट्या , मन्या,चंदू, पिमी गुफेच्या तोंडाजवळ गेले होते.
बापरे!! बाहेर मोठ्ठाले चमकते आठ -दहा डोळे दिसत होते...! ती धूडं नक्कीच अजस्त्र, भयानक असावीत..... त्या अनोळखी प्राण्यांच्या आणि नकीच्या टोळीच्या कुत्र्यांच्या गुरगुरण्याचा आवाज आसमंतात भरून गेला होता.आता नक्कीच काहीतरी भयानक होणार होते. ..
इतक्यात धडपडीचा ,केकाटण्याचा , ओरबाडण्याचा , गुरगुरण्याचा, एकत्र आवाज आला . बक्की च्या आकांताने केकाटण्याचाही आवाज आला. नकीच्या इवल्याशा ह्रदयात धडकी भरली. नंतर मारामारीची धुमश्चक्री. नकी बधीर झाली होती. काही न करण्यापलिकडे तिच्या हातात काही नव्हते. पिल्लांना फुरगंटून थरथरत बसली होती ती हताशपणे. काही तास उलटले. प्रकाशाची कवडसं मुद्दाम गुफेत शिरत होती , नकीला सत्य दाखवायला. ती बाहेरची धूडं गायब झाली होती. नकीच्या दोस्तांनी पराक्रमाची शर्थ केली होती त्यांना हाकलवायला.
भाल्याचा कान फाटला होता. रक्त गळत होतं. तो मातीत लोळून ती जखम शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अंगावरही लहानमोठ्या जखमा होत्या. एकंदर चांगलंच ओरबाडून काढलं होतं त्याला.चंदूचा जबडा लोंबकळत होता. तीक्ष्ण पंजांनी ओरबाडलेलं होतं. बाकी सर्वांची हीच तर्हा होती. रक्त सांडलं होतं सगळीकडे.पण नकीची नजर बक्कीला शोधत होती.
गुफेच्या दारापाशी बक्की पडली होती. पिल्लं, सर्व कुत्री बक्कीपाशी होती. तिचं शव विद्रूप झालं होतं. ओरबाडलं होतं तिला. तिची लोंबकळती शेपटी, जबडा, कातडी...... नकीला आपल्या जिवलग मैत्रिणीचं हे रूप पाहवेच ना. बक्कीनं नकीसाठी,पिलांसाठी आपला जीव गमावला होता. नकी तिच्या शवाशेजारी बसून राहिली. बाकी कुत्र्यांनी दुर्लक्ष केलं. हे काही नकीला रूचलं नाही.
काही तास उलटले. ही कुत्री बक्कीच्या जवळ आली होती. नकीला काही कळायच्या आतच त्यांनी ते बक्कीचं विदीर्ण शव खायला सुरूवात केली!
....
नकीने फार अडवलं, पण तिला चक्क ढकलून दिलं भाल्याने!!
नक्की रडत रडतच तळ्याकडे धावली..... तिला या कुत्र्यांचा प्रथमच एवढा किळस आला होता...... ती जवळ जवळ तीन-चार वर्षांनी दोन पायांवर धावली होती..........
नकी-३ (अंतिम भाग)

सूर्य मावळतीला आला होता. नकी अजून मुसमुसत होती. हुंदके देत होती. तिला काही सुचेनासं झालं होतं. तिला बक्कीचं असं अचानक जाणं सहन झालं नव्हतंच, पण त्यापेक्षाही कित्येक पटीने तिला धक्का बसला होता, तिच्या टोळीच्या वागण्याचा. बक्की -जिनं टोळीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही, तिचं गलितगात्र शव यांनी ओरबाडून खावं? नकीला घृणा वाटत होती या सार्यांची. परत त्या सार्यांची तोंडं बघायची इच्छाही नव्हती तिची. विमनस्क अवस्थेत ती शून्यात बघत बसली होती.

इतक्यात तिला कसलीशी चाहूल लागली. तिनं झपकन मागे वळून बघितलं. मागून भाल्या येत होता, त्याची शेपूट खाली टाकून. तेही दरवेळेसारखं तोंड उघडं ठेवून जिभ बाहेर कढत 'हॅ हॅ हॅ हॅ' आवाज न काढता. बहुधा वाईट वाटलं असावं त्याला. त्याच्या चालण्यावरून, देहबोलीवरून हेच जाणवत होतं. नकीशी फटकून वागलो ,याचं त्याला वाईट वाटत असावं. पण त्याची मनःस्थिती जाणून घ्यायला नकी कुठं तयार होती? त्याला पाहून नकीचं पित्त खवळलं. नकीच्या चेहर्यावर राग, तिरस्कारमिश्रित भाव होते. तिचा राग उफाळून आला होता. तिचे रापलेले मळकट गाल रागाने लाल झालेहोते. चिमुकल्या डोळ्यांत किंचित पाणी आणि समोरच्याला जणू खाक करून टाकेल एवढा विखार होता, पहिल्यांदाच. तिचे काळपट ओठ रागाने थरथरत होते. तिची वेड्यावाकड्या काळ्या पडलेल्या नखांसह बोटेही थरथरत होती .

तिला एवढ्या रागात पाहून भाल्या चक्रावलाच. तिने खाताना मध्येच लुडबुड केल्यास क्षणिक रागाने तिला ढकलणे काही भाल्यासाठी नवीन नव्हते. मात्र आजचे तिचे वागणे भाल्यासाठी पूर्णपणे नवीन व गोंधळात टाकणारे होते. नकी का रागावलीय हे त्याला कळेना.
भाल्यानं मान तिरकी केली. सावकाश चालत तिला न्याहाळत तो तिच्यापाशी गेला. तिचा थरथरणारा हात चाटू लागला. त्याच्या जिभेच्या ओल्या स्पर्शाने नकी भानावर आली. काही कळायच्या आत अचानक तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली,

"जाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"

तिचा मोठा आवाज शांतता चिरत गेला. आसपासच्या घरट्यातले पक्षी पंख फडफडत ओरडत उडाले. भाल्या तिच्या अचानक ओरडण्याने दचकला. चार पावलं मागे सरला. नकीचा श्वास वाढला होता. काही कळायच्या आतच तिने विरूद्ध दिशेने धाव घेतली, बहुधा कधीच परत न येण्यासाठी .............!

तसं पाहता त्या रानटी कुत्र्यांची बक्कीच्या शवाशी वागणुक पूर्णपणे नैसर्गिक होती. त्यांच्या जगात ती शम्य होती. पण नकीला कुठं कळत होतं हे? ती जरी त्या रानटी कुत्र्यांतली एक बनली होती, तरी होती माणूसच ना....!
●●●

ती गुहा, ते रान, तो अविश्वासानं तिच्याकडं बघणारा भाल्या , सारं सारं मागे पडलं होतं. नकीनं वेगळ्याच जंगलात प्रवेश केला होता. नकीला एक ओढा दिसला. भरपेट पाणी प्यायली ती. ताजंतवानं वाटलं तिला. मनातलं मळभ दूर केलं तिनं. राहायची तजवीज केली तिनं एका सुरक्षित वळचणीला. पोटातले कावळे कावकाव करू लागले तशी तिनं ओळखीची कंदमूळं हुडकून खाल्ली.

नकी इथे रूळली होती. तिनं अजून कोणता प्राणी मारून खायला सुरूवात न केल्यामुळे या रानातल्या प्राण्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तरीही कोणी तिच्या मागे लागलं की लपून बसायची. कुत्र्यांत राहून तिचं नाक दूरचा वासही ओळखू शके. राहून राहून तिला बक्की,भाल्या, बिट्ट्या, मन्या,चंदू, डूरू, पिमी, नीनी,भुरी, ढेरू आणि गोंडस पिलावळीची आठवण यायची. रडत राहायची ती मग. परतीचा रस्ता तरी कुठं माहीत होता तिला..!!

एक दिवस खाणं शोधत असताना ती जरा लांब आली होती. नकीला अचानक एक अनोळखी वास स्पष्टपणे जाणवला. ती सावध झाली. ती अधिक हुंगू लागली. वासाच्या विरूद्ध दिशेने पळाली अन् एका दगडामागे लपून बसली. कुतूहलानं समोरची पायवाट न्याहळू लागली. थोड्याच वेळात काही नकीच्या दिशेने येणार्या आकृत्या तिच्या दृष्टिक्षेपात आल्या.

काही माणसं होती ती...! तो गिरीभ्रमण करायला आलेल्या १०-१२ लोकांचा ग्रुप होता . सोबत एक गाईडही होता. हसत- खिदळत , फोटो काढत ते चालत होते. गाईड मार्गदर्शन करत होता. इतक्यात नकी त्यातल्या कणाच्यातरी लक्षात आली

. ती व्यक्ती ओरडली, " हेऽय गाईज , सी दॅट....!!"

तो गाईड उद्गारला, " ए मोगली गर्ल......!! मी हीला इथे याआधी कधीच पाहिलं नाही....."

या लोकांच्या विक्षिप्त दिसण्यामुळे, प्रतिक्रियांमुळे नकी चुळबुळू लागली. गाईड एव्हाना पोलिसांना फोन लावत होता. हे लोक नकी काहीही करत नसल्याचे पाहून तिला हाका मारत होते, जवळ बोलवत होते.
तिला बिस्कीटांचं आमीष देत होते. नकी हळूहळू मागे सरकत होती. दात विचकत गुरगुरत होती. त्या लोकांनी फेकलेली बिस्कीटं, चपात्या, वेफर्स, चाॅकलेट काही ती खाईना. मग त्यातल्या कोणीतरी तिच्या दिशेला गावात विकत घेतलेला रानमेवा फेकला. तो तिनं हुंगला न् खाल्ला.

एवढ्याला पोलिसही आले होते सोबत एक रेस्क्यू टीम घेऊन. पहिल्यांदा तिला त्यांच्याकडची फळं खा घातली. त्यांनी नकीच्या नकळत तिला घेराव घातला. नकी घाबरली अन् पळू लागली. पण त्या फळांनी आपला असर लवकरच दाखवला होता. नकीला गुंगी येऊ लागली. ती लवकरच बेशुद्ध झाली.

तिला शुद्ध आली तेव्हा ऐका दवाखन्यात होती . तिला एका अनाथाश्रमात पाठवलं गेलं अन् मग कोणीतरी तिला दत्तक घेतलं. तिच्यात बरीच सुधारणा झाली होती. अखेर नकीला एक परिवार मिळाला होता, माणसातला.

●●●समाप्त●●●

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद आनंद दा Happy

शेवट का गुन्डाळलात.>>>>> ती पहिली कथा होती हो. आणि वर तेव्हा परीक्षेचं टेन्शन पण आलेलं. त्यात पटकन खरडली. म्हणून. शेवट बदलायचा विचार करते आहे.

@द्वादशांगुला, लेखनशैली छान आहे हा.
कथा वाचताना एकदम 'क्रूड' मधल्या छोट्याश्या मुलीची आठवण आली Lol
कीप इट् अप Happy

अक्की जी, आदिसिद्धी, अन्नू जी प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

कथा वाचताना एकदम 'क्रूड' मधल्या छोट्याश्या मुलीची आठवण आली >>>>>> मूव्हीचं नाव पहिल्यांदा ऐकतेय. हाॅलीवूडची आहे का?

आहे तशीच राहू देत... नको बदलूस ...
छान आहे... आवडली.... >>>>> बरं! Happy