इसम - पाल

Submitted by बेफ़िकीर on 5 January, 2018 - 01:42

ट्रक पालला पोचला. ट्रकमध्ये इसम असल्याने इसमही पालला पोचला. आपण पालला पोचलो आहोत हे इसमला माहीत नव्हते. पालला एका बाजूला ट्रक थांबल्यावर इसम उडी टाकून खाली उतरला आणि ड्रायव्हरला भेटला आणि म्हणाला किती झाले. ड्रायव्हरला इसम आपल्या ट्रकमध्ये होता हेच माहीत नव्हते. त्यामुळे ड्रायव्हर अचंबीत झाला. ड्रायव्हरने विचारले कुठे बसला. इसम म्हणाला आलोक ढाब्याबाहेर. ड्रायव्हरने चाळीस रुपये मागीतले. इसमने वीस रुपये देऊ केले व म्हणाला की त्याने सांगितलेच नसते आणि उतरून पळून गेला असता तर ड्रायव्हरला काहीच मिळाले नसते त्यापेक्षा वीस रुपये बरे. ड्रायव्हरने वाद काढला. इसम ठाम राहिला. शेवटी ड्रायव्हरने मुद्याचा त्याग केला व इसमला जाऊ दिले. इसम मागे वळला आणि रस्त्यावर आला. पाहतो तर कार. येणारी सगळी माणसे पिवळी धमक! कोणाचे केस पिवळे, कोणाचे कपाळ पिवळे, कोणाचे कपडे पिवळे तर कोणी संपूर्ण पिवळे. आजूबाजूला सगळे पिवळेच होते. स्टॉलवरच्या खुर्च्याही पिवळ्या होत्या. गुरं, डुकरं, गाढवं, कावळे, बकर्‍या हे आपापल्या रंगाचे होते. माणसे तेवढी पिवळी होती. इसम चालू लागला. त्याला पिवळे व्हायची इच्छा नव्हती. पण सगळे पिवळे कसे हे समजत नव्हते. एका प्रचंड देवळात जायला गर्दी झाली होती. गर्दी विविधरंगी होती. पण येणारी माणसे पिवळी होती. इसमला समजले. माणसे आत जाऊन पिवळी होत आहेत. त्यामुळे त्याने आत जायचा विचार सोडला. पण त्याला तसे करता आले नाही. इसम रेट्यामुळे ढकलला गेला. खूप प्रयत्न करूनही इसम त्या गर्दीतून बाहेर पडू शकला नाही. इसमला दिसले. मुख्य इमारतीकडे जाण्याच्या वाटेवर काही कोनाडे असून त्यात देवांच्या लहान लहान मूर्ती घेऊन काही माणसे बसली आहेत व ती म्हणत आहेत की इथे दर्शन घेतल्याशिवाय तो आतला देव पावत नाही. त्यांचे ऐकून माणसे त्या देवांच्या मूर्तीवर डोके टेकायला धावत आहेत आणि तिथे सुट्टी नाणी पडत आहेत. इसमला हे पटले नाही. त्याने गर्दीतूनच आरडाओरडा केला की हा खोटेपणा आहे आणि ह्यांना पैसे हवे आहेत. जरा वेळ गर्दीत सन्नाटा पसरला. पण कोणा दोनचार जणांनी मागच्यामागेच इसमला ओढले आणि तिथून लांब एका भिंतीमागे नेले. ते तिघे होते. त्यातील एक इसमला दरडावू लागला. तू कोण, का घाण करतोस, आमचे संसार चालतात. इसम म्हणाला तुम्ही नुसते पैसे मागा, देव न पावण्याची भीती घालू नका. त्यावर त्याची गचांडी धरण्यात आली आणि धमकी देण्यात आली की तो पुन्हा तिथे येऊन ओरडला तर त्याला धोपटण्यात येईल. इसम अपमानित होऊन निघून गेला. अर्ध्या तासाने इसम रस्त्यावर एक पोते अंथरून बसला. त्यावर त्याने एक शेंदरी दगड आणि दोन जुनाट तस्वीरी ठेवल्या. गर्दीकडे बघत इसम ओरडू लागला. इथे पैसे टाकू नका, आतला देव कोपेल. फक्त डोकं टेका. गर्दीला काय, इसमसमोर झुंबड उडाली. वर फुकटात कृपा! थोडा तणावही निर्माण झाला. त्यातच कोणीतरी इसमचे न ऐकून तिथे नाणे टाकलेच. इसमने ते उचलून लांब भिरकावले. ते नाणे उचलायला दोन तीन पोरे धावली. इसमचे ते कृत्य पाहून काहींच्या मनात त्याच्याबद्दल आदर वाढला. इसमच्या अंगावर भंडारा उधळला गेला. क्षणार्धात इसम पिवळा धमक झाला. यळकोट यळकोटचा जल्लोष, जो आत होतच होता, तो बाहेरही सुरू झाला. इसम तारस्वरात ओरडत राहिला की इथे पैसे ठेवू नयेत, देव कोपेल. काही जण असेही होते की ज्यांना पैसे दिल्याशिवाय कृपा होतच नाही असे वाटत होते. ते शंकेने इसमकडे बघत पुढे जात होते. काही जण इसमची बडबड ऐकून हसत होते. काही जण भक्तिभावाने झुकत होते. पैसे ठेवायचे नाहीत म्हणून एकदोघांनी फुले वगैरे ठेवली. एकाने इसमला वडापाव आणून दिला. इसमने वडापाव खाल्ला. तेवढेच त्याचे जेवायचे पैसे वाचले. पण तेवढ्यात इसमला कोणीतरी बखोटीला धरून उचलले आणि बसलेल्याच अवस्थेत लांबवर नेले. इसम किंचाळत होता. ते पाहून थोडी गर्दी इसमच्या मागे धावली. मगाचचे तिघे इसमला एका निर्मनुष्य कोपर्‍यात नेऊन बदडू लागले. ते पाहून गर्दीतले काही बघे पुढे झाले व ते त्यांना आवरू लागले. इसम किंचाळू लागला की हे देवाच्या नावावर वाटेत बसून पैसे काढतात. पुन्हा थोडा तणाव निर्माण झाला. दोन गट पडू लागले. तिकडे देवासमोर होत असलेली रेटारेटी आता इकडे होऊ लागली. हा प्रकार निराळाच असल्याने आजूबाजूचेही इकडेच येऊ लागले. इसमला थोडा मारही बसला. पण दोन चार डोकी हेही म्हणू लागली की खंडोबाच्या नावाने लुटालूट चाललेली असते तिथे नेहमी. इसमला काही पाठीराखे मिळाले. इसमला धरणारे तिघे हळूहळू काढता पाय घेऊ लागले. भिकार्‍यांच्या भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडून काही पैसे घालवणार्‍या भाविकांचे पैसे वाचण्याची शक्यता निर्माण झाली. पिवळा धमक इसम पिवळ्या रंगाचा फायदा घेऊन गर्दीतून निसटला. अन्यथा त्याला बदडायला काहीजण टपून बसलेले आहेत हे त्याला माहीत होते. त्याने एक धावता पाचचाकी टेंपो पकडला. आपल्याला हा पिवळा रंग खंडोबामुळे लागला आणि म्हणून आपण वाचलो असे वाटून त्याने मागे देवळाकडे बघत हात जोडले. पण कच्चकन् त्याच्या मनात विचार आला. बाहेरचे छाटछुट भिकारी ह्या खंडोबाच्या नावावर खोटे बोलून पैसे कमवून संसार चालवतात तर स्वतः खंडोबा किती कमवत असेल. लांब जात असलेल्या कळसाकडे पाहताना इसमला त्याने निवडलेली दिशा धोकादायक आहे इतकेच जाणवले. त्यामुळे इसम थोडा विचारात पडला....

========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म. हे पण आवडलं. मला लागलेला अर्थ बरोबर आहे का यासाठी खुद्द तुमच्या किंवा इतर प्रतिसादांची वाट पाहिन.

छान लिहिलयं आणि पाली यात्रेच्या दिवशी तिकडून सातारहून पुण्याला येताना खुप सारी पिवळी लोकं दिसली त्यामुळे खुप रिलेट झाले.

एक पाहुणे ज्यांचे कुलदैवत आहे पालीचा खंडोबा, ते सांगत होते कि इतकी देणगी / दान मिळतयं पण देवस्थानंच्या इथे सुविधा अजिबात नाहीत.

इसम म्हणाला आलोक ढाब्याबाहेर>>> लोकेश ना ? की इसम ने थाप मारली ?

"बोका" सारखी वेगळी "इसम" ही उत्कंठावर्धक लेखमालिका सुरु केल्याबद्दल धन्यवाद.. इसम आवडतोय..

आधीच्या लेखाची लिन्क द्या ना या लेखात,
आणि आधीच्या लेखात या लेखाची लिन्क द्या,
म्हणजे वाचकांना लिन्कून लिन्कून वाचता येईल.

बोका" सारखी वेगळी "इसम" ही उत्कंठावर्धक लेखमालिका सुरु केल्याबद्दल धन्यवाद.. इसम आवडतोय..

>>> बोका नाही ही अन्या सारखी चालली आहे.