"तो-शतशब्दकथा"

Submitted by आनंद. on 3 January, 2018 - 13:27

"तो-शतशब्दकथा"

"साह्यब्या सारा गाव पाण्यासाठी कासावीस झालाय, निट इचार कर.. असला मौका बारबार न्हाय." त्यानं म्हटलं तसा साहेबराव विचारांत गढला.
"आन् म्या हा म्हणलून् तू माव्हं काम नाय केलं म्हंजी?" साहेबराव मनाशी ठरवून बोलला.
"आसं व्हणार नाय. आमी दिल्या शब्दाला जागतू, गद्दारी करीत न्हाय कधीच." त्यानं सांगितलं.
"कोण पायजेल?" साहेबरावानं विचारलं.
"आप्पासाहेब."
"भाऊशिवाय दुसरा कोणबी चालन का?"
"नाय, ह्यो तुकडा आप्पाच्या नावावर हाय."
"काय करावं लागन?" साहेबरावानं विचारलं.
"पुनवेच्या दिवशी त्याच्यावरनं 'नारळ उतरून' विहीरीत टाक."

पौर्णिमेच्या रात्री आप्पाची मयत करून गाव निघून गेलान् त्याचवेळी,
शिवारातल्या पाण्यानं काठोकाठ भरलेल्या विहीरीतलं चंद्रबिंब हसत होतं.

शेकडो वर्षांपासूनची वरती येण्याची 'त्याची' इच्छा पुर्ण झाली होती.

-आनंद/०३.०१.१८

Group content visibility: 
Use group defaults