थोडेसे गीतेबद्दल ...

Submitted by निमिष_सोनार on 3 January, 2018 - 07:59

अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे दोन लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे.
चूकभूल द्यावी घ्यावी! त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! - निमिष सोनार

* * * || लेख क्र १ || * * *

कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच "भगवदगीता" सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,

"कर्म कर पण ते करतांना फलाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे त्या फलाशी तू बांधला जाऊन तुला ते फळ भोगावे लागणार नाही! म्हणून फळाची अपेक्षा न करता युद्ध (करण्याचे कर्म) कर जे कोणत्याही क्षत्रियाचे कर्तव्य असते! कारण आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य करावेच लागते. त्याशिवाय आपला आत्मा ज्या शरीरात सध्या वास करत आहे त्या शरीराचा उदर निर्वाह तू कसा करणार?"

अर्जुन म्हणाला,

"पण युद्धाच्या कर्माने मी बांधलो नाही का जाणार? कितीही केले तरी कर्म आले की त्याचे फळ आलेच! आणि या युध्दात माझे नातेवाईक आणि अन्य लाखो लोक माझे हातून मारले जाऊन मला पाप नाही का लागणार?"

श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले,

"हे सगळे लोक विविध अविनाशी आत्मे आहेत, जे शरीर धारण करून समोर उभे राहिले आहेत. त्यांची येथे फक्त शरीरे मरतील, आत्मे नाही.

पण आत्मे मुक्त होतील. त्याची शरीरे मारण्याचे तुला पाप तेव्हाच लागेल जेव्हा तू युद्ध करताना युद्धाच्या फळावर नजर ठेऊन असशील जे चूक असेल. फळावर नजर म्हणजे उदाहरणार्थ - जिंकलास तर सुख आणि अहंकार, तसेच जर तू स्वतःचा काहीतरी स्वार्थ किंवा फायदा बघशील आणि आणखी जास्त जग जिंकण्याची इच्छा धरशील आणि हरलास तर दुःख आणि निराशा तुला घेरतील असा (फळाचा) विचार करत युद्ध करू नकोस!!

त्याऐवजी निष्काम भावनेने कर्म (युद्ध) कर.

मनात युद्धाच्या कोणत्याच भावी परिणामांची चिंता न करता तटस्थ भावनेने युद्ध कर, म्हणजे त्याच्या फळाच्या परिणामांपासून तू मुक्त राहशील!"

अर्जुन म्हणाला,

"पण काहीही केलं तरी कर्माने आपण बांधले जातो म्हणून त्यापेक्षा मी सगळे कर्म करणे यापुढे थांबवून, हे जग त्यागून सन्यास घेतला तर ते युद्ध करण्यापेक्षा चांगले नाही का होणार?"

श्रीकृष्ण म्हणाले,

"अरे पार्थ, असे तुझ्यासारखे धर्माच्या बाजूने असणारे लोक जेव्हा असा कर्म आणि संसार त्यागण्याचा विचार करतात तेव्हा मग दुर्योधनासारखे अधर्मी लोक आपले दुष्कर्म करायला मोकाट सुटतात!

तुझा कर्म त्यागण्याचा विचार म्हणजे जिभेला स्वाद घेऊ द्यायचा नाही म्हणून जेवणच करणे बंद करणाऱ्या माणसासारखे आहे. असा जेवण बंद करणारा माणूस जितके दिवस जेवण बंद करेल तितके दिवस त्याला मनात त्या स्वादाची आठवण पुन्हा पुन्हा जास्त तीव्रतेने येत राहील!!

म्हणजे न जेवताही स्वादाची इच्छा त्याला कर्म फलात बांधते आहे.
त्यापेक्षा त्या माणसाने स्वादाची इच्छाच मनातून नाहीशी केली तर?

त्याचप्रमाणे कर्म हे फळ निर्माण करतात म्हणून कर्मच करणे बंद करून टाकण्यापेक्षा कर्माच्या परिणामांच्या इच्छा (सकारात्मक किंवा नकारात्मक भावी फळाच्या अपेक्षा) मनातून नष्ट करणे योग्य नाही का?

असे कर्म केल्याने त्याचे फळ निर्माण झाले तरी ते भोगण्यापासून तू मुक्त असशील, म्हणजे ते तुला भोगावे लागणार नाही! त्या कर्मफळाच्या पाप पुण्यापासून तू मुक्त राहशील!"

पण अर्जुनाने आणखी एक शंका उपस्थित केली,

"पण माधव, आपली संस्कृती दया आणि करुणा शिकवते. हे सगळे अधर्मी आत्मे अज्ञानात आहेत. ते अज्ञान असे की सर्व सृष्टी व्यापून उरलेल्या परमात्म्याचे आपण अंश आहोत हे त्याना ज्ञात नाही आणि अधर्म करून आपण परमात्म्याला विसरून त्याचेपासून दूर जात आहोत हे त्यांचे लक्षात सुद्धा येत नाही आहे! मग अशांना मारण्यापेक्षा त्याचे अज्ञान दूर करून त्याचेवर दया दाखवणे योग्य नाही का?"

यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले,

"या सगळ्यांनी तुझ्यासोबतच शिक्षण घेतले आहे, त्यांनाही तुझ्यासोबत हे वेदज्ञान मिळाले आहे (आत्मा परमात्मा याबद्दल). त्यामुळे असे समजू नकोस की ते अज्ञानात आहेत! त्यांना सगळे ठाऊक आहे! म्हणजे ज्ञानी असूनही मुद्दाम अधर्म करत राहणाऱ्यांना दंड देणे हीच एक प्रकारची त्यांना दाखवलेली दया आहे.

लक्षात ठेव - तीन गुणांच्या कमी अधिक मिश्रणाने व्यक्ती बनतो.

"तामसिक" म्हणजे कोणतेही ज्ञान मुद्दाम दुर्लक्षित करून अविचाराने कृत्य करत राहाणे जसे की दुर्योधन, दुःशासन वगैरे.

"सात्विक" म्हणजे हे सगळे वैदिक ज्ञान अंगिकारून त्याप्रमाणे धर्माच्या मार्गावर चालणारे लोक जसा तू, युधिष्ठिर वगैरे.

आणि कळत असून वळत नसणारे मधले लोकं म्हणजे "रजासिक" जसा की कर्ण!

यांचे सगळ्यांचे अज्ञान पुन्हा दूर करण्याची वेळ आता कधीच निघून गेली आहे.
आता युद्ध करून त्यांना दंड दिल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे मी स्वतः परमात्मा म्हणजे भगवंत तूला सांगतो आहे.

तेव्हा हे अर्जुना, युद्ध कर!"

(वरील संवाद स्टार प्लस वरील 2013 साली गाजलेल्या महाभारतातील गीतेच्या उपदेशावर आधारित आहे)

* * * || लेख क्र २ || * * *

गीतेबद्दल थोडेसे ... - निमिष सोनार

यापूर्वी अनेक विद्वानांनी गीतेवर छान भाष्ये केली आहेत. माझ्यासारख्या सामान्य माणसाला गीता पूर्णपणे समजणे आणि ती मी तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगणे अशक्य गोष्ट आहे. पण मला वाचून जेवढे काही आणि जसे काही थोडेफार समजले आहे, उमगले आहे ते मी तुमच्यापुढे मांडतो आहे. हा लेख वाचल्यानंतर भगवदगीता वाचण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली तर माझ्या लेखाचा उद्देश्य सफल झाला असे मी समजेन.
चूक भूल द्यावी घ्यावी.

भगवंतानी सांगितलेल्या गीतेनुसार पुनर्जन्माला मान्यता असून, मागील जन्माचे काही कर्म ज्यांचे फळ त्या जन्मात मिळाले नव्हते ते प्रारब्ध बनून या जन्मात सोबत येते. त्यालाच आपण नशीब म्हणतो. आपल्या मागील जन्माच्या कर्माच्या प्रारब्धा नुसारच आपला जन्म कुठे आणि कुणाच्या पोटी व्हावा हे ठरत असते.

मानव तीन वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतो.

त्यापैकी काही कर्म याच जन्मात लगेच फळ देतात.
काही कर्म याच जन्मात पण काही काळानंतर फळ देतात.
तर काही कर्म पुढील मानव जन्म मिळेपर्यंत (अनेक प्राण्यांच्या योनीतून तसेच स्वर्ग नरक यातून काही कर्म भोगून झाल्यावर उरलेले) तुमचे प्रारब्ध बनून तुमच्या सोबत पुढच्या मानव जन्मापर्यंत येतात.

अर्थात ते मागच्या जन्मीचे कर्म आपल्याला आठवत नाहीत म्हणुन त्याचे फळ या जन्मी मिळाल्यावर आपण आश्चर्यचकीत होतो की, आपल्यासोबत इतके टोकाचे चांगले/वाईट का घडले? पूर्ण गीता वाचल्यास आणखी यासारख्या आणि इतर अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

येथे एक लक्षात घ्या: भगवान किंवा भगवंत किंवा परमेश्वर हे समानार्थी शब्द आहेत.
परम + ईश्वर = सुपर गॉड जे सगळ्या देव देवतांचे बॉस असतात. भगवंत!!

परमेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेतील काही श्लोकात सांगतात की, परमेश्वर म्हणजे ते स्वतः आणि इतर देव देवता यात फरक आहे.

इतर देव देवता यांना तुम्ही काहीही मागाल (नवस, वरदान वगैरे) तरीही ते देव देवता तुमच्या मागील जन्माच्या चांगल्या कर्माच्या शिल्लक असलेल्या (संचित) नुसारच फक्त तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाध्य असतात.

बॅलंस नसेल तर कितीही पूजा करा काहीच उपयोग होत नाही.

जसे बॅंकेतील जमा असलेले पैसे आपण थोडे थोडे वापरले तर जास्त कालावधीसाठी पुरतात आणि एकदम रक्कम काढून घेतली तर तेवढ्यापुरता फायदा होतो पण नंतर च्या काळासाठी रक्कम रहात नाही! अगदी तसेच!!

"भगवंतांच्या मर्जीविरूध्द कोणतेही देव देवता कोणाही मानवाला वरदान देऊ शकत नाहीत", असे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गीतेत एका श्लोकाद्वरे सांगितले आहे.

देव देवतांची "पूजा" केली जाते आणि ती आपल्या काहीतरी "भौतिक इच्छांची पूर्ती" करण्यासाठी असते पण भगवंतांची मात्र "भक्ती" केली जाते किंवा नामस्मरण केले जाते ते आपली "अंतिम अध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी"!

देव देवतांच्या पूजेसंदर्भात असलेल्या मंत्रांचे, जापाचे स्थळ काळा विषयी काही नियम असतात पण भगवंतांचे नाव मात्र कुणीही कधीही आणि केव्हाही घेऊ शकतो. त्याला कोणतेही बंधने नाहीत.

भगवंत या ब्रम्हांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत असतात. तसेच ते प्रत्येक सजीव प्राणीमात्रात आणि मनुष्यात परमात्म्याच्या रुपात स्थित असतात. तेच देव देवतांच्या शरीरात सुध्दा परमात्मा रूपाने वास करतात.

प्रत्येक सजीवात एक आत्मा (भगवंतांचे अलिप्त आणि स्वतंत्र रूप) आणि एक परमात्मा (भगवंतांचे रूप) असतात.

भगवंताचे नामस्मरण करून आणि भक्ती करून आपण काहीही मागू नये. फक्त त्याला विनंती करावी की आपल्या आत्म्याची जन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि विविध योनीतून फिरत राहण्याच्या चक्रापासून सुटका करावी. यालाच "आत्म्याची मुक्ती" असे म्हणतात. मुक्ती म्हणजे आत्म्याची अशी स्थिती ज्यात तो आत्मा पुढे कोणतेही शरीर धारण करण्यास बाध्य होत नाही आणि तो आत्मा परमधामात किंवा वैकुंठात भगवंतांच्या सान्निध्यात कायम रहायला जातो पण त्याचे स्वतंत्र अस्तित्व मात्र कायम रहाते.

यावर कुणी सहज प्रश्न विचारेल की शेवटी आपण भगवंताला सुध्दा काहीतरी मागतोच आहे (जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका आणि आत्म्याची मुक्ती) मग हे मागणे देव देवतांना मागितलेल्या गोष्टींसारखेच नाही का झाले? मग फरक काय राहिला?

याचे उत्तर असे आहे की प्रत्येक आत्म्याची या भौतिक जगतातून मुक्ती व्हावी आणि तो आत्मा कायम भगवंताकडे राहण्यास यावा ही मुळात भगवंतांचीच इच्छा असून यात आपण भगवंतांकडे मानव जन्मातील भौतिक इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीची मागणी करत नाही आहोत. म्हणूनच या इच्छेला अध्यात्मिक इच्छा म्हणतात जी भगवंत (परमेश्वर) पूर्ण करतात.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष नुसार मानव जन्माचा अंतिम उद्देश्य मुक्ती हाच आहे (अध्यात्मिक इच्छा).
आत्मा मुक्ती मिळवून कायम भगवंताकडे जाणे यालाच आपण "आत्मा हा परमात्म्यात विलीन झाला" असे म्हणतो!

याउलट इतर देव देवतांना मागितलेल्या इच्छा या अध्यात्मिक नसून भौतिक प्रकारच्या असतात ज्या कर्म फळ यांची साखळी निर्माण करून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या योनीच्या रूपात आपल्याला भौतिक जगात जन्म घ्यायला भाग पाडतात.

कृष्ण सांगतात की आपला आत्मा सनातन असतो, तो कधीही मरत नाही, एकतर तो मुक्त होतो किंवा अनंतपणे आपल्या कर्मानुसार विविध शरीर प्राप्त करत जातो.

म्हणून भगवंत म्हणतात की -

"जर जन्म मरणाच्या 84 लक्ष्य योनीच्या अनंत सुरु असणाऱ्या चक्रात अडकायचेे असले तर देव देवतांची पूजा करा आणि त्या चक्रातून सुटका हवी असेल तर भगवंतांची "भक्ती" करा. नामस्मरण करा. त्याला काहीही भौतिक इच्छा मागू नका!"

आता प्रश्न पडतो की मनुष्य भगवंताचा अंश आहे आणि भगवंत परमात्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरात रहात असतात मग तो वेगवेगळी चांगली वाईट कर्मे का करतो?

याचे उत्तर गीतेनुसर असे देता येईल की -

"कोणत्याही मनुष्यावर भगवंतांनी निर्माण केलेल्या रजो, तमो आणि सत्व या तीन गुणांचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव असतो. हे गुण देऊन भगवंतांनी मनुष्याला आंशिक स्वातंत्र्य बहाल केले आहे. यातील कोणताही गुण निवडून मनुष्य त्याला पाहिजे तसा वागू शकतो. भगवंत त्यात हस्तक्षेप करत नाहीत. पण त्या वागण्यातून निर्माण होणाऱ्या कर्माच्या फलातून मात्र त्याची सुटका नाही. ते फळ केव्हा, कसे, कधी मिळेल हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मानवाला नाही. तसेच नमके कोणते कर्म चांगले (पुण्य) आणि कोणते वाईट (पाप) हे ठरवण्याचा अधिकार मानवाला नाही. कारण कोणतेही कर्म व्यक्तीसापेक्ष असते. जेव्हा मनुष्य वाईट वागत असतो तेव्हा परमात्मा (ज्याला आपण आपला आतला आवाज म्हणतो) आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतच असतो. आपण अनेकदा याचा अनुभव घेतला असेलच!"

थोडक्यात, या तीन गुणांच्या प्रभावामुळेच या भौतिक जगतात कोणताही मनुष्य चांगले वाईट कर्म करत असतो. इतर प्राण्यांना मात्र कर्माचे नियम लागू नसतात, म्हणूनच कोर्टात सुध्दा कायद्याने आपण माणसाला खाल्ल्याबद्दल वाघाला खुनाच्या शिक्षेखाली अटक करू शकत नाही!!

ब्रम्हा हे रजो गुणाचे, विष्णू हे सत्व गुणाचे आणि शंकर हे तमो गुणाचे प्रतिनिधी आहेत.

भगवंत वगळता इतर सर्व प्राणी, मनुष्य आणि देव देवता सुध्दा कर्माच्या नियमांनी बांधले आहेत कारण सर्व देव देवता सुध्दा तीन गुणांच्या प्रभावाखाली येतात.

एकूण 84 लक्ष्य योनीमध्ये देव देवता सुध्दा अंतर्भूत असतात.

मात्र भगवंत स्वतः (श्रीकृष्ण) मात्र त्रिगुणातीत आहेत म्हणजे या तीन गुणांच्या प्रभावापलीकडे आहेत.

मानवाला पुढे कोणताच जन्म मिळू नये यासाठी तीन गुणांचा आपल्यावरील प्रभाव नष्ट करावा लागतो. त्यासाठी भगवंतांनी एक मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे या मानव जन्मातील कर्मे अलिप्तपणे करावी म्हणजे फळाची अपेक्षा न करता! (मनाने अलिप्त किंवा विरक्त होऊन) तसेच सुखात आनंद आणि दुःखात शोक करू नये, म्हणजे तटस्थ राहावे!

पण फक्त हाच एकमेव मार्ग नाही. भगवंतांनी इतरही अनेक मार्ग सांगितले आहेत ज्याद्वारे आपण तटस्थपणे कर्म करू शकतो किंवा कर्मांचा त्याग करू शकतो आणि मुक्ती मिळवू शकतो. उदाहरणार्थ - भक्तीयोग!

हा आणि इतर सगळे मार्ग कोणते हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण गीता वाचणे योग्य होईल.

धन्यवाद!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर विवेचन..
आपण गीता अभ्यासक असल्याने एका शंकेचे निरसन करावे ही विनंती..
"जी बदलते ती ‘श्रद्धा’ आणि जो कायम असतो, तो ‘विश्वास’!" श्रद्धा ही कायम प्रवाही असते. आज आपली ज्यावर श्रद्धा आहे ती कायम राहीलच याची शास्वती नाही. कपडे बदलावे तसे लोक देव बदलताना दिसतात. अर्थात, परमेश्वर एकच आहे. कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती भक्तीच.. असा दावा यावर केला जातो. पण यामुळे श्रद्धा डळमळीत होत नाही का? गीतेत ही भक्तिमार्ग सांगितला आहे तो नेमका काय सांगतो? श्रद्धा जर बदलणारी असेल आणि विश्वास जर अटळ असेल तर देवावर आपण श्रद्धा ठेवावी की विश्वास??

देवांची "पूजा" करतात (काहीतरी मनाची "भौतिक" इच्छा पूर्ण करायला जसे: धन्वंतरी - चांगले आरोग्य दे, महालक्ष्मी - पैसा कमी पडू देऊ नको वगैरे) . अशी पूजा आपल्याला कर्म फळात बांधते. म्हणजे आपण देवाजवळ पूजा करून काहीतरी फळ मागतो आहे.

मात्र भगवंतांची "भक्ती" (कोणताही हेतू मनात न बाळगता) केली जाते. ती यासाठी की "जन्म मृत्यू" च्या चक्रातून सुटका व्हावी; म्हणजे आतापर्यंतचे सगळे कर्म फळ हे सध्याच्या जन्मात पूर्ण भोगून नवे कर्म या मानव जन्मात निर्माणच करायचे नाहीत, म्हणजे पुढे कोणताच जन्म नको मिळायला!

"भक्ती योग" हा जन्म मृत्यू च्या चक्रातून सुटण्यासाठी भगवंतांनी सांगितलेल्या अनके "योगांपैकी" एक आहे.
अजून अनेक मार्ग आहेत जसे - "निष्काम कर्मयोग!"

अतिशय सुन्दर विवेचन ...सहज सोप्या भाषेत!! Happy
निमेशजी, गीतेच्या प्रत्येक अध्यायातील मर्म असे सोप्या भाषेत सान्गता येइल तर सान्गा प्लिज!!

<<<पुर्वी सावट या नावाचा एक आयडी होता माबोवर, त्यांची आठवण आली. <<< एक्झॅक्टली! अश्विनीके पण छान चिन्तन मान्डायची 'त्या' धाग्यावर! Happy

>>अश्विनीके पण छान चिन्तन मान्डायची 'त्या' धाग्यावर!
तो धागा सापडू शकेल का ? मी प्रयत्न केला होता शोधायचा, पण Sad

निमिष_सोनार अतिशय सुंदर लेख आणि मी भगवद्गीता वाचली असल्यामुळे मला खरंच आनंद होतो की तुम्ही हे मौल्यवान ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं आहे!

अँड. हरिदास, माझं स्वतःचं मत असं आहे की जर ती श्रद्धा बदलणारी असेल तर ती श्रद्धा नव्हे, आणि विश्वास हा फक्त काही काळापुरता राहतो अर्थात तुम्ही केलेल्या श्रद्धा आणि विश्वासाच्या व्याख्या मला विरुद्ध वाटतात. माझ्या मते श्रद्धा हि अटळ असते आणि विश्वास हा बदलणारा असतो,
उदा., समजा एखाद्या दिवशी तुम्हाला तुमच्या एका मित्राकडून संकटसमयी कसलीही मदत हवी आहे आणि जर त्याने ती मदत करायला विलंब केला तर कदाचित तुमच्या मनात त्याच्याबद्दल असणारा 'विश्वास' डगमगू शकतो पण जर त्याचवेळेस तुम्हाला अपेक्षित मदत मिळाली नाही तर तुम्ही परमेश्वराकडे खात्रीशीर प्रार्थना करू शकता कि आता तोच तुम्हाला यातून वाचवेल जरी तो परमेश्वर दिसत नसेल, ऐकू येत नसेल तरीही! यालाच 'श्रद्धा' म्हणतात. पण इथेच हे संपत नाही, तुम्ही ज्या विश्वासातून तुमच्या मित्राकडे मदत मागितली होती, ती मदत न मिळाल्याने तुमचा तुमच्या मित्रावरील विश्वास कायम उडून जाईल म्हणजेच तुम्ही पुढे कधीही त्याच्याकडे मदत मागणार नाही,
तसेच जर तुम्हाला योग्य वेळी परमेश्वराकडूनही मदत मिळाली नाही पण तरीही तुम्ही पुढच्या वेळेस निर्गुण निराकार परमेश्वराकडे मदत मागितली तर तीच खरी श्रद्धा असेल! अथवा तुम्ही असे ठरवले कि आता परमेश्वरही माझी मदत करत नाही तर त्याची प्रार्थना करून काय उपयोग तर तो निव्वळ स्वार्थी विश्वास असेल.
जसे बायबल मधेही येशू सांगतात की, "you can see me and therefore you believe, but blessed are those who don't and can't see yet still believe"
याचाच अर्थ तुम्ही परमेश्वरावर किंवा अगदी त्याच्या खालच्या देव देवतांवरसुद्धा संकटसमयी, अंधःकार डोळ्यांसमोर असतानादेखील 'श्रद्धाच' ठेवली पाहिजे. (कारण गीतेमध्येच भगवंत म्हणतात की सगळ्या देवतांकरवी भक्तांच्या भौतिक गरजा या प्रथम माझ्याच कडून पूर्ण होतात कारण सर्व भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींचा स्रोत मीच आहे).
विश्वास हा 'परमेश्वर मला जे अपेक्षित आहे तेच देईल' या अहंकारातून येऊ शकतो,
आणि श्रद्धा हि 'परमेश्वर माझा माता-पिता आहे, तो माझ्या भविष्यासाठी जे योग्य आहे तेच देईल' या भक्तीतून येते.
अर्थात, आपण परमेश्वर आणि देवांवर निरपेक्ष श्रद्धा ठेवावी. तुमची शंका खरंच चांगली होती.
This is my personal opinion so correct me if I'm wrong_/\_

आर्यातै, खरेच की, तुम्ही तो धागा वर आणलात तेव्हा मीच प्रतिसाद लिहिला होता की, आत्ता पाहिल्यावर आठवले. Happy

सॉरी निमिषजी, मला अध्यात्म अंगाने जाणाऱ्या विषयात गती नाही, त्यामुळे मी लेखाबद्दल काही लिहू शकत नाही

मात्र,
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे गीता आणि Rational Emotive Behavior Therapy (REBT) याबद्दल असणारे विवेचन सुद्धा गीते बद्दल एक वेगळा दृष्टिकोन देते.
ते मला पटले, आणि चक्क कळले सुद्धा.
जरूर वाचा "विषाद योग" शेवटची काही प्रकरणे.