कांताबाईची करामत

Submitted by मोहना on 2 January, 2018 - 20:57

ईशान आजारी पडला आणि कांताबाईचा जीव कासावीस झाला. तिने त्याच्याकडे जायचं निश्चित केलं आणि ईशानला आधीच लागणारी धाप आणखीनच वाढली.
"आई, हट्टीपणा करु नको. मी आता बरा आहे. तू एकटी कशी येणार?"
"मेल्या, इतं माजा जीव टांगनीला लागला आनि येऊ नगं म्हनतंस. लाजबिज हाय की नाय तुला. निगाले मी."
"निघाले काय? ते काय पुण्याची एस टी पकडून वडगाव बुद्रुक गाठायचं आहे का? काहीही." आजारपणामुळे ईशानच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. आता आई फोन ठेवणार नाही या कल्पनेनेच त्याच्या डोळ्यासमोर काळोख पसरला.
"करतो तुझ्या येण्याची व्यवस्था." आईचं बोलणं थांबवत त्याने फोन ठेवला तर बायको महिषासुरमर्दिनीसारखी समोर उभी. त्याने गपकन डोळे मिटले. या क्षणी तोफेला तोंड द्यायची अजिबात इच्छा नव्हती त्याला. ईशानची आई अर्धशिक्षित पण कर्तुत्ववान, बायको तापट, मुलगा तारुण्यात पदार्पण केलेला आणि मुलगी अर्ध्या चड्डीत (त्याच्या आईच्या मते) वावरणारी. आई आली की काय गोंधळ उडेल ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आलं. ईशानला त्याचे डोळे कायमचेच मिटल्यासारखे वाटले.

कुणाच्यातरी सोबतीने कांताबाईने सातासमुद्रापलीकडे झेप घेतली. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या छोट्याशा गावात तिने पाऊल टाकलं आणि हुरळलीच ती.
"आता काय मी परत न्हाई जात. हे आपल्या बुद्रुकवानीच हाय की. अंमल क्लीन हाये इतकंच. आनि पीपल कमी हायेत." वडगाव बुद्रुकला राहून जितकं इंग्रजी कानावर पडत होतं ते अमेरिकेत वापरायचंच असा कांताबाईचा पक्का निर्धार होता. ईशानला तिचं इंग्रजी बोलणं जाणवलं पण त्याच्या कानावर तप्त गोळा पडला तो तिच्या ’परत न्हाई जात’ ह्या वाक्याने. शानी, खरं तर तिचं नाव सानिका होतं पण ईशानची बायको झाल्यावर ती शानी झाली. तर, शानीचा चेहरा संतापाने लालेलाल झाला. ऐश्वर्याला, ईशानच्या लेकीला आता ’फुल्ल’ कपड्यात वावरायला लागणार म्हणून दडपण आलं. ईशानचा मुलगा मात्र नेहमीप्रमाणे खूश होता कारण तो स्वत:तच इतका गर्क होता की येऊ घातलेल्या संकटाची त्याला कल्पनाच नव्हती. कांताबाई धडाडीची. मनात आलं की धडकलीच ते करायला. त्यामुळेच तिच्या ’परत न्हाई जात’ या शब्दांनी ईशानचं धाबं दणाणलं.
"आई, गावातल्या शेताचं काय?" त्याने गुळमुळीत आवाजात विचारलं.
"त्येची चिंता तुला कस्यापाई?" ईशानच्या सोफ्यावर मांडी घालून कांताबाईने तंबाखू खाण्यासाठी चंची उघडली. शानीच्या नेत्रकटाक्षाकडे ईशानने दुर्लक्ष केलं.
"जीव ल्हान नगं करु. मी आलीच हाये तर जरा हितं बगून घेती कसी करत्यात श्येती ते. उपेग व्हईल त्येचा. आय बिजनेस वुमन्स." कांताबाईचं उसाचं शेत तर होतंच बरोबर भाज्या पिकवत होती ती मळ्यात, झालंच तर रोपं विकायची फुलझाडांची. अफाट ज्ञान होतं तिचं या विषयाचं."
"राहा गं तुला किती राहायचं ते." ईशान भावुक झाला. ईशानचे बाबा गेल्यावर कांताबाईनेच त्याला वाढवलं. ती म्हणते तशी खरंच ती ’बिझनेस वूमन’ होती. अभिमानाने ईशानचा ऊर भरुन आला.

दुसर्‍या दिवशी सकाळी कांताबाई बाहेर पडली. गावासारखंच. भल्या पहाटे उठायचं आणि फिरायला बाहेर पडायचं. ईशानने निक्षून एकटं कुठे जायचं नाही सांगितलं होतं पण पहाटे पाच वाजता ढोरागत झोपलेली सगळी. तिने गुपचूप दार उघडलं. कुठे जायचं ते ठाऊक नव्हतं. पण जसं जाऊ तसं परत येऊ इतकी खूणगाठ मनाशी बांधत ती फिरत राहिली. प्रत्येकाच्या घरासमोरच्या बागेतल्या फुलझाडांच्या ती प्रेमातच पडत होती. मग हळूहळू तिला माणसंही दिसायला लागली. एकजात सगळी तांदळाच्या पिठासारखी पांढरी धोप. त्यांच्या रंगाचं तिला कौतुक वाटतंय तोपर्यंत रंग बदलला. काळी, पांढरी, तपकिरी... किती रंग ते माणसांचे. तिला अमेरिका एकदम फुलपाखरासारखी वाटायला लागली. तासभर छान गेला कांताबाईचा.

कांताबाई घरी परत आली तरी घरातली अजून झोपलेलीच.
"च्या करती रं. उट. उसीरापावेतो स्लीप बरी नाय बाबांनो. उटा" ती जोरात म्हणाली. निदान शानी तरी उठेल म्हणून तिने थोडावेळ वाट पाहिली. पण सारं शांत होतं. चहा ठेवायला भांडं काढलं आणि ती अचंबित झाली.
"काय बाय तरी हे आक्रित. तिगासाठी च्या इतक्या मोट्या टोपात करायचा." जाडजूड पातेल्याकडे ती कौतुकाने पाहत राहिली. ईशान आळस देत आला तशी तिने उत्साहाने चहा त्याच्यापुढे ठेवला.
"वाक करुन आली रं मी."
"वाक?" ईशानला आई काय म्हणतेय ते समजेना.
"अरं म्हंजी पिरायला जाऊन आले. वाकच म्हनत्यात ना तुज्या विंग्रजीत?" ईशानच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.
"ऐकून ऐकून यायला लागलंय विग्रंजी. गावाकडं विंग्रजीची फॅसनच आलीये. सगली विंग्रजी बोलत्यात. मला बी येतं वाइच. आलेच हाये इतं तर बोलून बगीन म्हन्ती. कसं?" कांताबाई उत्साहाने म्हणाली.
"कुणाशी बोलणार आहेस तू इंग्रजीत?" ईशानने दचकून विचारलं.
"लई रंगीबेरंगी लोकं दिसली आज वाकला गेले व्हते तवा. उद्या बोलनार हाय मी तेंच्यासी."
"रंगीबेरंगी?" एव्हाना शानी पण संभाषणात समाविष्ट झाली.
"लई येगयेगल्या रंगाची बाई मानसं दिसली. पांढरी धोप, काली, तपकिरी म्हनून रंगीबेरंगी. आनि आज झाडं आनूया आपन. तुज्या बागत काई म्हंजी काई नाय." ईशानने मान डोलवली, शानीने नाराजीने उडवली पण कांताबाईची मागणी पुरी झाली नाही. तीन - चार दिवस वाट पाहून झाडं आली नाहीत. कार्यतत्पर कांताबाईनेच कामाला लागायचं ठरवलं. तरातरा चालत ती कोपर्‍यावरच्या घरात गेली. तिथे गेले दोन दिवस ती रस्त्यावर ठेवलेली झाडं पाहत होती. त्यातलं एक झाड तिने उचललं. तेवढ्यात आतून कुणीतरी धावत आलं.
"एक्स्युज मी." कांताबाई त्याच्या आवाजाने धास्तावली. हातातलं झाड घट्ट पकडून ती तशीच उभी राहिली.
"पुट इट डाऊन. दॅटस माईन. आय अॲम प्लॅनिग टू प्लॅन्ट इट टुडे."
"वाइच विग्लिस बाबा, वाइच विग्लिस. यू विग्लिस...लांब आनि विमानावानी फास्ट." तिने त्या माणसाला समजवायचा प्रयत्न केला. त्याने तिच्या हातातलं झाड घेतलं आणि हाताने, तोंडाने तो ते झाड त्याचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत राहिला.
"रस्ता ना, झाड ऑन रस्ता म्हनून ते माय, माय." हाताने आधी कांताबाईने रस्ता दाखवला. मग त्याच्या हातातलं झाड घेऊन ती म्हणाली
"दिस... मी कॉल झाड." तिने ते झाड रस्त्यावर ठेवलं. मग ती पुन्हा म्हणाली.
"रस्ता, झाड. झाड ऑन रस्ता" तोंडाने एकच गोष्ट आळवत, उजव्या हाताने स्वत:च्या छातीवर थोपटत ती झाड ऑन रस्ता म्हनून माय, माय करत राहिली. वडगाव बुद्रुक मध्ये ऐकलेलं इंग्रजी कांताबाई नाट्यपूर्ण आविष्कारांसकट पणाला लावत होती. बराचवेळ झाड या हातातून त्या हातात जात राहिलं. अखेर चायनीज माणूस झाड छातीशी कवटाळत रस्त्याच्या कडेवर बसलाच. कांताबाई पण त्याच्या बाजूला बसली. आता झाडावरुन तिचं लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेलं.
"यू स्वेटर विनते?" स्वेटर विणण्याच्या खाणाखुणा त्याला समजेनात तसं तिने त्याला उभं केलं. त्याच्या अंगावरच्या जॅकेटला ती हात लावत राहिली. तो मागे झाला तसं तिने जॅकेटला हात लावणं थांबवलं.
"आय नो हर्ट. जॅकेट आऊट" स्वत:चं जॅकेट काढत असल्याचे हावभाव कांताबाईने केले. त्याने मुकाट्याने आपल्या अंगावरचं जॅकेट काढलं. मग कांताबाईने थंडीने कुडकुडण्याचा आविर्भाव केला आणि पुन्हा त्याला जॅकेट चढवलं.
"ओ, यू मीन जॅकेट" जॉनने कोडं सोडवल्यासारखी आनंदाने उडी मारली.
"नो, नो" तिने पुढे होत त्या जॅकेटवरची वुल हाताने कुरवाळली.
"स्वेटर" तो आनंदाने किंचाळला. जॉनबुवाला अमेरिकेत आल्यापासून इतकं पेचात कुणी पाडलं नव्हतं. कांताबाईचा प्रत्येक शब्द म्हणजे कोडं होतं आणि ते कोडं सोडविण्याचा आनंद विलक्षण होता.
"येस, येस" कांताबाईही त्याच्याइतक्याच आनंदाने चित्कारली. स्वत:ला इंग्रजी येतं आणि ते समोरच्याला समजतं हा द्विगुणित झालेला आनंद कांताबाईच्या किंचाळीत होता. जॉन थोडासा दचकला पण तेवढ्यात तिने डोळे मिचकावत, बारीक करत त्याच्या डोळ्यांना हात लावला.
"ओ, आय गॉट इट नाऊ. यू आर टॉकींग अबाऊट नेपाली गाय. नॉट मी. यू मस्ट हॅव सीन देम ऑन इंडियाज साईडवॉक, सेलिंग स्वेटर्स." कांताबाई जॉनचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होती. पण त्याचं इंग्रजी बुद्रुक शैलीतलं नव्हतं. तरीही समजल्यासारख्या माना हलवत जिवणी या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरवून ती प्रसन्नवदनाने त्याच्याकडे पाहत होती. पण गाय म्हटल्यावर तिला धक्का बसला.
"गाय? अमेरिका हाय बाबा ही. इतं गायी नाय उंडारत. यू चल बुद्रुक. आय दाखव इंडियन गाय, गायी, गायी... " त्याच्या पाठीवर हात फिरवला तिने. ईशानशीच गप्पा मारतोय असं वाटत होतं कांताबाईला. जॉनपण खूश होता. दोघांनाही अर्थ कळत नसला तरी कानावर पडणार्‍या आवाजाचं अप्रूप होतं. इतक्या पहाटे कुणीतरी बोलायला सापडणं कठीणच होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय समजलं नाही तरी एकमेकांच्या सोबतीने, आवाजाने दोघंही खूश होते.
"अमेरिका लई भारी. तुमच्याकडलं टोप बी मोटं आनि जड." कांताबाईने खाणाखुणा करत त्याला सांगितलं.
"यू लई बॉरी. लाईक माय मॉम." तो कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. कांताबाईला चेव चढला. तिने झाडांबद्दल त्याला बरीच माहिती दिली. त्याला काही कळलं नाही तरी त्याने तिचा हात हातात घेतला. तिने पण त्याचा हात तिच्या हृदयावर ठेवला आणि तो तिथे आहे हे त्याला पटवलं. घरी परत जाताना जॉनबाबाच्या हातात दोन झाडं आणि तिच्या हातात मावतील तितकी झाडं होती.

"अगं ही झाडं कुठून आणलीस?" ईशान तिच्याबरोबरचा माणूस पाहून चांगलाच घाबरला.
"आय अॲम जॉन. ऑल दिज प्लॅन्टस फॉर युवर मॉम."
" हा कोपर्‍यावरच्या घरात राहतो. त्येच्या घरासमोर रस्त्यावर पडलेली झाडं. मी उचलली..." पुढचं ईशानने ऐकलं नाही.
"आय अॲम व्हेरी सॉरी जॉन. शी डिडंट नो दॅट इट बिलॉग्ज टू यू."
"नो, नो दॅटस फाइन. इट इज अ गिफ्ट फ्रॉम मी टू यूवर मॉम." शानी सासूकडे पाहतच राहिली. इतकी वर्ष या देशात राहून तिला कुणी घरापर्यंत पोचवायला आलं नव्हतं. झाडाबिडाची तर गोष्टच सोडा.
"खूप महाग आहे हे झाड. १०० डॉलर्स तरी किंमत असेल एकेका झाडाची." ती ईशानच्या कानाशी पुटपुटली. शानीला आयुष्यात पहिल्यांदा सासू आपल्याकडे आल्याचा आनंद झाला.
"युवर मॉम इज सो स्वीट." स्वीट ऐकलं आणि कांताबाई उत्साहाने उठली.
"शिरा, शिरा. मी शिरा. शिरा कुक." असं म्हणत जॉनच्या हाताला धरुन कांताबाईने त्याला घरात नेलं. ईशान, शानी मुकाट्याने त्या दोघांच्या मागे गेले. शानीने शिर्‍याचं सगळं साहित्य काढून दिलं. कांताबाईने एका बाजूला रवा भाजायला घेतला आणि जॉनला विचारलं.
"यू वडा?"
"वडा..." सगळेच गोंधळले.
"गोल, गोल...वडा गोल." शानीला पटकन कळलं.
"अहो, बटाटावडा म्हणतायत त्या." घरी आलेल्या पाहुण्याला शिरा आणि बटाटावडा खायला घालून कांताबाईने तृप्त केलं. त्या दोन तासात शेजारी असूनही आतापर्यंत जेवढ्या गप्पा झाल्या नसतील तेवढ्या ईशान, शानीने जॉनबरोबर आज पहिल्यांदा केल्या. कांताबाईला ’उद्या भेटू’ म्हणून घट्ट गळामिठी देत जॉन खूश होऊन परत गेला.

ईशानची मुलंही आजीचा करिश्मा पाहून खूश होती. ईशान - शानीच्या चेहर्‍यावर हास्य होतं. घरातलं वातावरण एकदम दिवाळीचं होऊन गेलं. दुपारी कांताबाईच्या हातच्या चविष्ट जेवणाची चव तोंडात रेंगाळत असतानाच दार वाजलं. ईशानने दार उघडलं.
"इज कांटाबाय होम?" स्वत:चं नाव ऐकल्यावर कांताबाईसकट सर्व बाहेर डोकावले.
"जॉन सेंट अस टू टेक हर अॲडव्हाईस अबाऊट प्लॅन्टस." दारासमोर गोळा झालेला घोळका आणि घोळक्याने कांताबाईला भेट म्हणून आणलेल्या झाडांकडे ईशानचं कुटुंब चकित होऊन पाहत राहिलं. कांताबाई पुढे झाली.
"ये ये...इन. आय बोलेन....माय नात - नातू हेल्प." आजीवर भाळलेली दोन्ही नातवंडं, तिच्या मराठीचं भाषांतर करणं जमणार नसलं तरी त्यात सामील झाली. सुहास्य मुद्रेने शानीने सारी झाडं स्वीकारली आणि अतिशय प्रेमाने सासुकडे पाहताना ’कांताबाईचा सल्ला’ नावाची ’कन्सल्टिंग फर्म’ उघडायचं स्वप्न तिच्या डोळ्यात तरळलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

aamachya eka mitrache baba ase anek jananshi bhasha na kalata maitri Karun hote.
Jevha te India madhe yayala nighale, tevha falvalyane fukaT faLe vagaire gift dili.

Amachi maataa kutre malakanshi maitri Karun hotee. sagale shwanpremi.
saman shile..

सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
अपर्णा <<< पुढे अजून लिहिणार का , त्यांच्यावर?>>> ही कांताबाई पूर्णपणे काल्पनिक होती त्यामुळे पुढे काही सुचलं तर लिहेन :-). पण अशा चायनीज कांताबाई पाहिल्या आहेत आजूबाजूला. झाडंवाल्या नाही पण तत्सम.
नानबा - हो, अशी माणसं आहेत पाहण्यात. बाहेरच्यांना त्यांच्या मिळून मिसळून वागण्याचं कौतुक वाटत असतं पण घरातले वैतागलेले असतात :-).

किल्ली धन्यवाद. Ajnab - कन्सल्टन्सी कशी चालू आहे असं काही सुचलेलं नाही. सुचलं तर नक्की लिहेन.