भारत द्वेषाची 'ना'पाक भिंत..!

Submitted by अँड. हरिदास on 26 December, 2017 - 04:07

भारत द्वेषाची 'ना'पाक भिंत..!

हेरगिरी प्रकरणीच्या कथित आरोपात पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक आणि नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची अखेर काल त्यांच्या कुटुंबियांशी भेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कुलभूषण जाधव यांच्या आई त्यांना भेटण्याची विनंती पाकिस्तानकडे करत होत्या, मात्र पाकिस्तान त्यांना भेटण्याची परवानगी देत नसल्याने त्यांच्या आई आणि पत्नीचा धीर खचला होता. मात्र शेवटी भारताने सतत केलेल्या मागणीपुढे व आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे पाकिस्तानला नमावे लागले. आणि, कुलभूषण यांच्या आई व पत्नीला पाकिस्तानला व्हिसा द्यावा लागला. काल तब्बल दीड वर्षानंतर जाधव कुटुंबीयांची भेट झाली. मात्र यावेळी भेट कमी आणि त्याचा देखावाच अधिक करण्यात आला. मानवतावादाचा विचार करूनच जाधव यांच्या कुटुंबियांना व्हिसा देण्यात येत असल्याचा ढोल पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने वाजवला. परंतु, प्रत्यक्षात या मानवतावादाच्या अडून एक अमानवीय राजकारण खेळल्या गेले. जाधव यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात पोहचल्या, त्यांना कुलभूषण जाधव यांची भेटही देण्यात आली मात्र ती दूरवरून आणि काचेच्या भिंतीपलीकडून. त्यांचे बोलणेही झाले पण ते इंटरकॉमवर. शिवाय ही भेट पाक अधिकाऱयांनी रेकॉर्ड केल्याचेही वृत्त आहे. याच पद्धतीने भेट घडवायची होती तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही अशी भेट होऊ शकली असती. पण, तसे केले असते तर पाकिस्तानला आपल्या उदारमतवादाचा देखावा करता आला नसता. अर्थात, पाक कितीही मानवतेच्या बाता मारत असला तरी त्याचा खरा चेहरा अंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा उघड झाला आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैनिक तेथील जनतेवर कसे अत्याचार करतात हे दाखविण्यासाठी पाकिस्तानने एका महिलेचा फोटो संयुक्त राष्ट्रसंघात दाखविला होता. मात्र तो फोटो काश्मीरमधील नसून पॅलेस्टाईनमधील असल्याचे उघड झाल्यानंतर पाकचे नाक कापल्या गेले. कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणातही पाकचा बनाव अनेकवेळा समोर आला आहे.

हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपांवरून भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक करून त्यांच्यावर लष्करी न्यायालयात तथाकथित खटला चालवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यादरम्यान भारताला साधी बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. कुलभूषण जाधव कोणत्या तुरुंगात आणि कशा अवस्थेत आहे याचीही कोणतीच कल्पना भारताला देण्यात आली नाही. भारताने विनंत्या केल्या. पण, पाकिस्थानकडून कोणतीच माहिती पुरवण्यात आली नाही. कदाचित पुरावे सिद्ध होऊ शकत नसतील व खोटेच असतील, तर सादर काय करायचे; ही पाकची समस्या असावी. त्यामुळेच जाधव यांच्या खटल्याबाबत संपूर्णपणे गोपनीयता राखली गेली. त्यानंतर अचानकपणे जाधव यांना दोषी ठरवून फाशी फर्मावण्यात आल्याची बातमी झळकली. वास्तविक, 1977 च्या व्हिएन्ना करारानुसार, अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला त्याच्या देशाकडून वकिली मदत घेता येते. परंतु कुलभूषण जाधव यांना अटक करण्यापासून त्यांना शिक्षा जाहीर करेपर्यंत पाकिस्तानने भारताची बाजू ऐकूनच घेतली नाही. जाधव हे भारतीय नागरिक आहेत. त्यांना पकडून त्यांच्यावर परस्पर खटला चालविण्याचा प्रकार व त्यांना भारतीय दूतावासातील अधिका-यांना भेटू न देणे किंवा भारताला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कच उपलब्ध होऊ न देण्याचा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय व मुख्यत: व्हिएन्ना संकेतांचा भंग होता. त्यामुळे भारताने या प्रकाराची आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. आणि पाकिस्तानचा इरादा उधळला गेला. नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांची फाशी स्थगित करत न्यायाच्या सगळ्या संकेतांना आणि परंपरांना काळे फासणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच फटकारले. पण यावरही पाकचा कांगावा सुरूच राहिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हा खटला चालविण्याचा अधिकारच नाही असा युक्तिवादही पाकने केला. मात्र, पाकिस्तानचे सर्व मुद्दे खोडून काढत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला नागडे केले.

जाधव यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेली भेट हासुद्धा याच दबावाचा परिमाण म्हटला पाहजे. कारण जाधव कुटुंबियांना अजून काही काळ भेट नाकारल्या गेली असती तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दबाव वाढला असता. तसेही काही दिवसात पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली बाजू मांडायची आहे. त्याठिकाणी भारताविरोधात गरळ ओकायला आणि आपण सभ्य असल्याचे दर्शवायला पाकिस्तनाला काहीतरी कारण हवे होते. त्यामुळेच हि भेट देण्यात आली. मुळात भारतद्वेषाने पाकिस्तानची मती भ्रष्ट झाली आहे. याच द्वेषातून दोन ती वेळा पाकने भरातविरोधात युद्ध पुकारली. पण, भारताशी सरळ युद्धात विजय मिळवू शकत नाही हे लक्षात आल्या नंतर पाकने दहशतवादाचा साहारा घेतला. धार्मिक कट्टरता वाद जोपासत दहशत वादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरु केले.. भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आतंकवाद्यांना रसद पुरविणे, त्यांचे रक्षण करणे असे काम पाक सुरवातीपासून करत आला आहे. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा सुद्धा पूर्वग्रहदूषितच आहे. काश्मीर कितीही अशांत झाले तरी विलग होत नाही आणि चार दशकांपूर्वी ‘पूर्व पाकिस्तान’ असलेला बांगलादेशही भारताशीच सलोखा वाढवतो.. ही पाकिस्तानची जळजळ कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा देण्यामागे आहे हे निश्चित. म्हणून तर बांगला देशसोबतच्या सहकार्य कराराची घोषणा भारताने केली त्याच दिवशी जाधव यांच्या फाशीचे वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर भारताला आता कटुनीतीचा वापर करून हा प्रश्न सोडवावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत या विषयाला अतिशय योग्य रित्या हातळले. त्यामुळेच जाधव यांची फाशी स्थगित होऊ शकली. त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. मात्र हा संघर्ष अजून संपलेला नाही.पाकिस्तान हे आपल्यासाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे, ते मुकाट सहन करून बरे होणार नाही. तद्वातच फक्त छाती चा आकार मोठा असूनही चालणार नाही.. कटुनीती आणि जशास तसे उत्तर देण्याची राजकारणविरहित क्षमता भारताच्या नेतृत्वाला ठेवावी लागले..!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

---२५% आहेत. >>> २५ % ??? हा हा हा. म्हणजे ३० कोटी . म्हणजे भारतातील प्रत्येक ४ पैकी १ , पाकिस्तानी हेर आहे.

पण लांगुलचालन सोडवेल तर ....///.... >>>>>>>> आता तुम्हाला मोदी देखील लांगुलचालन करतात असे वाटायला लागले. अहो भक्त चीडतील अशाने.

Pages