पानीकम - श्री. संजय पवार

Submitted by चिनूक्स on 17 March, 2009 - 14:12

या मालिकेतील पहिलं पुस्तक आहे ग्रंथालीने प्रकाशित केलेले श्री. संजय पवार यांचं 'पानीकम'. १९९७ - २००२ या काळात श्री. पवार यांनी लिहिलेल्या स्फुटांचं हे संकलन. विद्रोही चळवळीशी अतिशय जवळचं नातं असणार्‍या श्री. पवार यांनी लिहिलेले हे लेख तात्कालिकपणाच्या मर्यादा ओलांडून सद्यस्थितीवर प्रखर भाष्य करतात. "'मॅनहोल'मधल्या जीवघेण्या गॅसमध्ये अपुर्‍या सोयीसुविधांसह आपल्या अनेक पिढ्या, पिढी'जात'पणे खर्ची घालणार्‍या बृहन्मुंबई महापालिकेच्या ज्ञात-अज्ञात स्वच्छता कामगारांना कृतज्ञतापूर्वक" अर्पण केलेल्या या लेखसंग्रहासाठी प्रा. अनंत भावे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना व संग्रहातील दोन लेख..

------------------------------------------------------------------------------------

प्रस्तावना

वर्तमानपत्रांत बातम्या असतात. माहितीपर स्फुटं असतात. अग्रलेख असतोच असतो. आणि असतात नियमित येणारी आणि वर्तमानपत्राची विशेष ओळख करून देत त्याचं विशेषखास व्यक्तिमत्त्व खुलवणारी सदरं.

मुंबईत १९८९ साली निघालं एक मराठी सायंदैनिक. मराठी वर्तमानपत्राच्या क्षेत्रातला हा भलताच अभिनव प्रयोग होता. मुंबईत इंग्रजी सायंदैनिकं होती. मराठी मात्र हे पहिलंच - 'आपलं महानगर'. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे साहस, आंदोलन, प्रयोगशीलता हे काही विशेष आहेत ते निखिल वागळे होते या सायंदैनिकाचे संपादक आणि मालक.

या आगळ्या-वागळ्या संपादकाला सतत साथ लाभली स्वतंत्र बाण्याच्या सुजाण सदरकारांची. दिलीप प्रभावळकर, संजय कर्‍हाडे, भरत दाभोळकर, राजदीप सरदेसाई, रत्नाकर मतकरी, कविता महाजन, चित्रा पालेकर, कमलाकर नाडकर्णी, अविनाश महातेकर, सुशील सुर्वे, मीना कर्णीक, अवधूत परळकर हे काही सदरकार 'आपलं महानगर'चे. यातलेच एक ठळक सदरकार - संजय पवार. त्यांच्या सदराचं नाव होतं 'पानीकम'. 'ग्रंथाली' प्रसिद्ध करत असलेला हा लेखसंग्रह आहे १९९७ ते २००२ या काळात 'आपलं महानगर'मध्ये आलेल्या निवडक स्फुटांचा.

आठ-दहा वर्षांमागचे हे लेख. दैनिकातले. प्रासंगिक. असे लेख पुष्कळदा जुनकट, बुरसट, शिळकट वाटतात. 'पानीकम' या प्रस्तुत पुस्तकातले संजय पवारांचे लेख 'तसे' वाटत नाहीत. काय असावं या 'आला मंतर-कोला कंतर'च कारण? तसं साधंच म्हणूया. एक तर, लेखविषय झालेल्या बहुसंख्य व्यक्ती आज हयात आहेत, कामात आहेत. आणि टीकाविषय झालेल्या त्यांच्या आणि एकूण मराठी माणसांच्या प्रवृत्ती? त्या तर जणू तहहयात आणि अधिकाधिक कामात आहेत. अशा व्यक्ती-प्रवृत्तींचं एक वाचनीय-प्रेक्षणीय दालनच उघडलेलं आढळेल वाचकांना या छोट्या पुस्तकात - पुन्हा पुन्हा भेट द्यावी असं हे दालन.

- 'बोंबिलवाडी' या खूप नवीन नाटकाला संपूर्ण डावलणारे महाराष्ट्र शासनाच्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेचे अन्यायी परीक्षक.

- 'संसद-उपनिषद' नावाचा रेखाटनसंग्रह काढणारे चित्रकार हुसेन आणि 'तिथे' मी काय बोलणार असा प्रश्न पडणार्‍या गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे राज्यसभेवर नियुक्त झालेले कलावंत आणि त्यांची भाकड कामगिरी.

- 'आम्ही स्त्रिया' या दिवाळी अंकात 'युक्रांद ते शिवसेना' या आपल्या प्रवासाचा आत्मसमर्थनी आलेख काढताना शिवसेनेला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार्‍या नीलम गोर्‍हे (आणि इतर वाटांनी असा प्रवास करणारे आणखी कोण कोण).

- एकाच दिवशी तीन नाटकांचे मिळून पाच प्रयोग हा पोकळ विक्रम आणि तो करणारे विक्रमवीर प्रशांत दामले.

- सतत निसरडी भूमिका घेणारे थोर मराठी लेखक विजय तेंडुलकर आणि त्यांची तळी उताविळीनं उचलणारी विद्रोही चळवळ.

- सिंथेसायझरवर आग पाखडणारे बेसून नौशाद आणि सिंथेसायझरचा बंदोबस्त करतो म्हणणारे बेताल बाळासाहेब ठाकरे.

- एकेकाळी आग ओकणारी आणि आता पुरती विझलेली दलित चळवळ.

- ऐंशीनंतरच्या उपक्रमशील मराठी रंगभूमीचं भान हरवलेल्या आणि म्हणून आजच्या रंगकर्मींमध्ये 'तशी' कळकळ दिसत नाही असं म्हणणार्‍या कांगावखोर विजया मेहता.

हे लेख वाचताना असं सारखं जाणवेल की बेगडीपणा, ढोंगबाजी, कांगावखोरी याबद्दल लेखकाला चीड आहे; ही चीड तामसी आहे; आणि ती 'पानीकम', जळजळीत शब्दांत आवेगीपणानं व्यक्त झाली आहे. हां, पण म्हणून हे लेखन सवयखोरीनं चिडचीड आणि हडहड करणारं आणि बिनबुडाचं आहे, असं नका मानू. 'पानीकम'मधल्या सगळ्या स्फुटांना वेचक, मार्मिक तपशीलांचा बिनतोड तर्काचा आणि तारतम्याचं भान ठेवणार्‍या मूल्यविवेकाचा भक्कम आधार आहे.

मग या नावाप्रमाणे पानीकम पुस्तकात भेटते राज्यसभीतील नियुक्ती गंभीरपणे सांभाळताना 'नाहीरें'च्या वतीने आवाज उठवणारी बॉलिवूडची नटी शबाना आझमी.

भेटतो, विधानपरिषदेत राज्यातल्या शेतीची अनुभवी चिकित्सा करणारा कवी ना. धों. महानोर.

भेटतो, राजकारण्यांच्या पाठराखणीनं का होईना, पण भटक्याविमुक्तांचं भलं भलं करणारा सातारकर, 'उपरा'कार लक्ष्मण माने.

भेटतो, आजच्या वास्तवाचं अस्सल असं 'अधांतर' हे नाटक लिहिणारा जयंत पवार.

भेटतं, यशस्वीपणे पार पडलेलं व्यापक ग्रामस्वच्छता अभियान.

येणेप्रमाणे या पुस्तकात सर्वसामान्यपणे ओळखीच्या झालेल्या विविध व्यक्ती-प्रवृत्तींचे वेगवेगळे कोपरे उजळलेले आढळतील. कारण अलिकडच्या आणि आजच्या मराठी मुलुखातील सामाजिक आणि सांस्कृतिक चलनवलनाचा वेध घेणारी नजर सदरकार संजय पवारकडे आहे.

तो चित्रकार आहे, नाटककार, कथा-पटकथाकार आहे. दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे. आणि या विविधांगी व्यक्तिमत्त्वानं रंगलेल्या वेधक शैलीत बोलणारं हे पुस्तक वाचकांचं रंजन तर करीलच पण उद्बोधनसुद्धा.

कोणत्याही पाणीदार किंवा पानीकम सदरानं आणखी काय हो करायचं असतं ?

- अनंत भावे

------------------------------------------------------------------------------------

धीरूभाई गेले तेव्हाची गोष्ट.....

दिवस पावसाळी असले तरी आसमंत एका वेगळ्या सूर्यास्तानं झाकोळून आला होता.. अनेकांच्या चेहर्‍यावरून तरी तसं वाटत होतं. अपवाद फक्त एक- आमचा दोस्त. त्याच्या चेहर्‍यावर ना उदासी होती ना मनात कुठला शोक. एक नॅचरल अस्वस्थता मात्र त्याच्या हालचालीतून पाझरत होती, धीरूभाई गेले तेव्हा...

देशाच्या हृदयाचे ठोके गेले अकरा दिवस मंदावणार्‍या त्या महान उद्योगसम्राटाचं अंत्यदर्शन तरी घ्यावं म्हणून आम्ही निघालो सी-विंडच्या दिशेनं, कर्जबाजारी परळ, लालबाग, चिंचपोकळी, करीरोड, लोअरपरळ, डिलाईल रोड, सातरस्ता अशा वसाहती पार करत. धीरूभाई गेले तेव्हा...

कफ परेडच्या जवळ येताच शोकाकुल वातावरणातही आल्हाददायी मोकळ्या हवेचं अस्तित्व नाकारता आलं नाही... आणि वातानुकूल चार पायांच्या गर्दीत आमचे मानवी चार पाय विसंगत असले तरी आम्ही पुढे रेटतच राहिलो, सी विंडच्या दिशेनं. धीरूभाई गेले तेव्हा...

'लग्नासाठी सूट शिवावा तसे मयतासाठी पांढरे कपडे शिवून ठेवतात काय?' आमच्या मित्रानं दबल्या आवाजात, पण थोड्याशा रागानंच हा प्रश्न विचारला त्या गर्दीत!
सोबतच्या गर्दीतल्या एकानं चमकून बघितलं आणि स्वतःशीच हसत पुढे गेला. गेल्या अकरा दिवसांत कुठल्या पेपरात अथवा चॅनलवर त्याचा चेहरा पाहिला नसल्याची उजळणी करत, मित्राचा हात किंचित दाबत आम्ही पुढे सरकलो. धीरूभाई गेले तेव्हा...

'का चाललोय आपण त्याच्या अंत्यदर्शनाला?' मित्रानं आमच्या हेतूला पुन्हा सवाल केला. '५०० रुपयांचे ६५००० कोटी करणार्‍या माणसाचं कर्तृत्व, महापालिका शाळांना संगणक देण्याचं, स्वतःच्या जन्मगावी शाळा बांधण्याचं दातृत्व.. रंकातून राव होण्याची महत्त्वाकांक्षा... याला अखेरचे प्रणाम, वंदन किंवा श्रद्धांजली म्हण..'

'५०० रुपयांचे ६५००० कोटी सरळ मार्गानं झाले? मग याच सरळमार्गानं माझ्या बापाचा बेसिक १३० रिटायर होताना ३२० वरच का स्थिरावला? आणि श्रीमंत पालिका म्हणवताना.. मग भडवे हो, जकात, कर वेळच्या वेळी वसूल करा.. महसूल वाढवा, पैसे खायचं कमी करा.. म्हणजे भांडवलदारांच्या पैशांवर गरिबांच्या पोरांना शिकावं लागणार नाही आणि त्याच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी प्रार्थनाही नाही कराव्या लागणार...' मित्राचा स्वर पुन्हा तापला... पण आता अधिक पुढे आलो तशी तंदुरुस्त शरीरांचीच गर्दी वाढलेली. त्यात मित्राचा आवाज कुठल्या कुठे चेपला गेला. धीरूभाई गेले तेव्हा...

व्यवसाय म्हटलं की थोडं काळंगोरं असणारच, पण त्यातून वाट काढून भांडवलवृद्धी ही यशस्वी उद्योजकता! आमच्याकडं तिरस्कारानं बघून मित्र त्या गर्दीतच थबकला. त्याला पुढे ढकलला, तसा त्याचा आवाज फुटला, 'नियमांना वाकवून, अधिकार्‍यांना जेवायला घालून, मंत्र्यांना सलाम करून, धोरणंच बदलून आपल्या रोटीवर तूप वाढून घेण्यात कसली आलीय यशस्विता? यांच्यासाठी धोरणं बदलतात, कायदे बदलतात. बँकांच्या मर्यादा वाढतात.. निर्यातीचे बंध ढिले होतात.

'तिकडे साला आमच्या बापानं घर घेतलं तर बँकांनी त्याची पत 'धा' वेळा चेक केली... तुम्ही आता साठीकडे आलात, रिटायर होणार तेव्हा काही आणखी जमीनजुमला असेल तर गहाण ठेवा या नव्या घराशिवाय!' पोराबाळांकडे बघून बापानं गावचा जमिनीचा दोन एकरांचा तुकडा गहाण ठेवण्यासाठी सचोटीनं प्रयत्न केला तर तलाठ्यानं त्याला दोन वेळा हॉस्पिटलचा रस्ता दाखवला... हवालदिल बापाला बघून मी लग्नाची अंगठी मोडून तलाठ्याला जेवायला घातलं... उभी हयात सचोटीत घालवलेला आमचा बाप नव्या घरात पुरता सटपटून दोघांच्या आधारानंच आला... दहिसरला!

चारच दिवस घर डोळे भरून पाहिलं नि पाचव्या दिवशी गेला.
हा असाच पावसात गेला.. लाकडं आणखी भिजू नये म्हणून मयताचा पास देणार्‍याला चहाला पाच रुपये दिले. सचोटी, प्रामाणिकपण, नैतिकता यांची आयमाय निजवून यांची समृद्धी बहरते, तर यांच्या मयतीला महासागर आणि आमच्या बापाच्या मयतीला पाचवा माणूस लाकडंवाला...' मित्राच्या डोळ्यांत पाणी साठायला लागल्यावर त्याच्या बापाचा चेहरा आठवून आमच्याही डोळ्यांत पाणी तरळलं. दुसर्‍या दिवशी एका पेपरात.. सामान्य लोकांनाही अश्रू आवरत नव्हते असं वाचलं. धीरूभाई गेले तेव्हा...

अमिताभ, अमरसिंह, शरद पवार, राहुल बजाज, रतन टाटा, करिश्मा कपूर, मुलायमसिंग, नवे उपपंतप्रधान, अडवाणी, मुख्यमंत्री आणखी कोण कोण आम्ही सामान्य जन.

'सगळ्या करबुडव्या नि काळ्या पैशेवाल्यांचं संमेलनच दिसतंय! परवानगी असती तर दाऊद, छोटा शकील नि राजनपण आले असते नि यांच्यासारखं राजकीय, औद्योगिक वैर विसरून शोकयात्रेत सामील झाले असते!' अत्यंत छद्मीपणानं मित्र म्हणाला तेव्हा रेबॅन घातलेला इन्स्पेक्टर ताठ नजरेनं दहा मिनिटं आमच्यावरचं लक्ष ठेवून होता. धीरूभाई गेले तेव्हा...

मित्राची अशी शेरेबाजी त्या शोकाकूल वातावरणात आणखी ताण निर्माण करण्यापूर्वीच मी त्याला वेगळ्या मार्गानं थेट चंदनवाडीजवळ आणलं... तिथली गर्दी पाहून मित्र म्हणाला, 'फरसाणाचा स्टॉल लावायला हरकत नव्हती!' आम्ही डोळ्यानंच शांत राहण्याची विनंती मित्राला केली. त्यावर उसळून मित्र म्हणाला, 'डोळे काय दाखवतोस? माझ्याकडे पाच पैशांचे शेअर नाहीत त्याचे. भ्रष्टाचारावर नाक वर करून बोलणार्‍या जोगळेकर, सहस्रबुद्धे, लेलेंना हा असला आडमार्गानं कमावलेला पैसा चालतो, त्यांना दाखव डोळे. शेवटी, साला ज्यांचा इतिहास बायको जुगारात लावण्याचा त्यांचा वर्तमान शेअर बाजारात तेजीत आला तर नवल काय?' मित्र एकूणातच थांबायला तयार नव्हता. आम्ही म्हटलं अरे, त्यांचा आत्मा अजून पंचतत्त्वात विलीन व्हायचाय, तोपर्यंत तरी... 'तू घाबरू नको... पंचतत्त्वात विलीन होण्यासाठी कुणाला सलाम करायला लागला तरी ते करतीलच की आणि मघाशी सेनापती म्हणाले त्याप्रमाणे ते प्रखर हिंदुत्ववादी असतील तर स्वर्गाचे समभागही अखिल हिंदूंसाठी लवकर खुलेही करतील.' मित्राची ही टकळी चालू असताना चंदनवाडीच्या दारातून धीरूभाईंचं कलेवर आत नेलं. मोजक्या व्यक्तींना आत घेऊन दार बंदही झालं. त्यामुळे आमचं बोलणं दाराबाहेरच राहिलं चंदनवाडीच्या, धीरूभाई गेले तेव्हा...

थोड्या वेळानं दरवाजाजवळ गडबड पाहिली म्हणून पुढे गेलो तर भरत शहा आत जाण्यास धडपडत होता आणि स्वर्गाचं दार बंद झाल्यासारखा खजिल झाला तो. शुचितेतं राजकारण करणारे काही धावले त्याच्या मदतीला, पण दार कुणी उघडलं नाही... तेव्हा आमचा हात सोडून मित्र पुढे गेला नि भरत शहाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, 'आताच रंकाचा राव झालेला माणूस आता गेलाय. रावाचे रंक झालेल्यांसाठी कदाचित वेगळी शिफ्ट असेल, भरतभाई!'

गीतेतल्या अर्जुनासारखा भरत शहा, कृष्णाच्या अवतारात आमचा दोस्त आणि जागच्या जागी सद्गती पावलेलो आम्ही. धीरूभाई गेले तेव्हा...!

(१३ जुलै २००२)

------------------------------------------------------------------------------------

राजकारण्यांची मस्ती आपण उतरवणार की नाही?

आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, निवडून आल्यावर वर्ष-दोन वर्षांत आपल्या कार्याचे अहवाल प्रसिद्ध करत असतात. त्यात रस्त्यांचं डांबरीकरण, सुलभ शौचालयांची निर्मिती, चौक सुशोभीकरण, पुतळे उभारणी, रस्ते नामकरण, क्वचित उड्डाणपूल, कालवे, मोर्‍या दुरुस्ती, रुग्णाला मुख्यमंत्रीनिधीतून शस्त्रक्रियेसाठी मदत अशा काहीशा नीरस नोंदी नि खर्चाच्या आकडेवार्‍या असतात. आम्हाला वाटतं, या अहवालांना कादंबरी अथवा रहस्यकथेचं मूल्य येऊ शकेल किंवा आत्मचरित्राचंही!

या अहवाल-कम कादंबरी-कम रहस्यकथा-कम आत्मचरित्रात एकदा आमदार म्हणून, खासदार अथवा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर, स्वत:च्या बदलत जाणार्‍या आयुष्याबद्दल त्यांनी लिहायला हवं. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता रातोरात 'साहेब' कसा होतो? लाखो, कोटी रुपयांची 'बंडलं' पाहिल्यावर पहिली प्रतिक्रिया काय झाली? जाहीरपणे राजकीय विरोधक म्हणून ज्यांची वस्त्रं उतरवतो त्यांच्याशी खासगीत स्थावर, जंगम मालमत्ता वाढवण्यासंदर्भात आणि खेळतं भांडवल कुठे आणि कसं खेळवत ठेवावं याचे धडे, शिकवणी कशी घेतो याचीही वर्णनं रोचक ठरतील. स्वपक्षातील विरोधकाला संपवण्यासाठी विरोधी पक्ष, पत्रकार, पोलिस यांना 'फिलर' कसे पाठवायचे, त्याबदल्यात मिळणारे मोबदले कशा स्वरूपातले असतात याची महितीही रंजक असेल.

ही अशी कार्यअहवालकम ललित पुस्तकं आपण मतदार प्रसंगी पैसे खर्च करून घेऊ. त्यावरची समीक्षणं वाचू. त्यातल्या एखाद्या पुस्तकाला एखादा पुरस्कार मिळाला तर त्या समारंभालाही आवर्जून जाऊ आणि विकत घेतलेल्या पुस्तकावर मा. लोकप्रतिनिधीची स्वाक्षरीही घेऊ. पुढे कदाचित, तो एखाद्या साहित्यसंमेलनाचा अध्यक्षही होईल! कारण मतपत्रिकेवर शिक्का मारून ती पेटीत टाकली की आपलं काम, जबाबदारी, कर्तव्य जे काय असतं ते आपल्या लेखी संपतं! मग इतके दिवस आपल्या दारावर मताची भीक मागणारा तो निवडून येताच साहेब होतो. नंतर सतत आपल्याला त्याच्या दारात जायला लागतं, त्याच्या दालनात खेटे घालावे लागतात. त्याचे सचिव, चमचे यांच्या ओळखीपाळखी काढाव्या लागतात. साहेब झोपलेत, दौर्‍यावर आहेत, मीटिंगमध्ये आहेत अशी उत्तरं ऐकावी लागतात. एवढ्या अडथळ्यांतून भेट झालीच तर जागरणानं तारवटलेले, किंवा मख्ख चेहर्‍यानं ऐकणारे, अथवा कपाळावर आठी ठेवून 'बरं बरं' किंवा सारखं हसत 'करतो, बघतो' म्हणणारे साहेब आपण परिश्रमपूर्वक तयार केलेले निवेदनअर्ज, लग्नात मिळालेलं अहेराचं पाकीट नवर्‍यानं बाजूच्या करवलीकडे सोपवावं तेवढ्याच यांत्रिकपणे कुणा सचिवाकडे सोपवतात!

आपल्या अशा 'बोळवणी'ला, आपण साहेब भेटले, ते करतो म्हणाले, त्यांनी तिथल्या तिथे फोन केला, सही केली, चहा दिला अशा छोट्या छोट्या समाधानानं सम्मानित करून घेतो.

आपल्यापैकी कुणालाच-कधी असं वाटत नाही की, या लोकप्रतिनिधीच्या घरी आणि कार्यालयात ताठ मानेनं जावं, त्याच्या सचिवाला म्हणावं - झोपलेत तर उठव त्यांना. म्हणावं, पटकन आवरा नि आमचा प्रश्न ऐका आणि त्यावर काय कारवाई करताय ते सांगा! सचिव किंवा स्वत: साहेब वेळ नाही म्हणाले तर आवाजात जरब आणून - मतं मागताना, पदयात्रा काढून घरोघरी जाताना वेळ होता? म्हातार्‍याच्या पाया पड, सुवासिनींकडून ओवाळून घे, छोट्या मुलांचे मुके घे हे करायला वेळ होता ना? आमच्या मतावर निवडून आलेला तू आमचा सेवक, प्रतिनिधी आहेस म्हणावं. यू आर आन्सरेबल टू मी... असं खड्या आवाजात आपण त्यांना का ऐकवत नाही? प्रचार करताना तुझे कार्यकर्ते दहा वेळा घरी येऊन जायचे ना? मग माझ्या तक्रारीचं काय झालं हे सांगायलाही त्यांना माझ्या घरी पाठव. पत्रकांची रद्दी पाठवायचास तशी आमच्या पत्रांची उत्तरं दे. निवडून आल्यावर तुला जी कवचकुंडलं मिळाली आहेत ती आमच्यामुळे. तेव्हा आम्हाला याचकासारखं वागवायचं नाही, हे ठासून सांगायला हवं.

आपली ही कर्तव्य, हे हक्क आपण विसरून जातो आणि म्हणूनच राजकारण्यांच्या अंगावरची चरबी वाढते आणि त्यांची कातडी गेंड्याची होते. मग सुरेश जैनसारखा माणूस या पक्षातून त्या पक्षात जात सतरा वेळा राजीनामे नि पंधरा वेळा निवडणुका आपल्या पैशांतून लढवतो. एका माणासाच्या लहरीपायी सरकारी यंत्रणेचा एवढा वापर आणि पैसा वाया घालवला जातो. कारण मतदानावर बहिष्कार घालून, रिकाम्या पेट्यांचा नजराणा देऊन आपण त्यांना घरी बसवत नाही. मागे, शरद पवार खासदार झाले. मग त्यांना राज्याच्या राजकारणात यायचं होतं. म्हणून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. बारामतीत पुन्हा निवडणुका झाल्या. कुणाच्या जीवावर या उड्या मारतात हे? घटनेत अपवाद म्हणून केलेल्या गोष्टी हे राजकारणी नियमाप्रमाणे वापरताहेत. तिकडे गोव्यात स्वत: फोडाफोडी करून बनवलेलं पर्रीकर सरकार पुन्हा 'फुटणार' म्हणताच पर्रीकर विधानसभा बरखास्तीची शिफारस करतात. राज्यपाल सही करतात नि राजकीय सोयीसाठी निवडणुका होतात!

शेकाप, माकपसारखे ठोस विचारसरणी, कार्यक्रम, कार्यकर्त्यांचं जाळं असणारे पक्ष दुष्काळ, धरणग्रस्तांचं पुनर्वसन, कामगारविरोधी कायदे, खाजगीकरण, वेतनकपात इत्यादी मुद्द्यांवर दोन वर्षं मूग गिळून सत्ता भोगत राहिले किंवा फरफटत राहिले आणि एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा 'इश्यू' करत राज्यात अस्थिरता निर्माण करायला पुढे सरसावले! मग तटकरे राजीनामा काय देतात, त्यांना परत काय घेतात, ते परत राजीनामा काय देतात, दरम्यान, तीन अपक्षांना मंत्री काय करतात... या सगळ्या खेळात शपथविधी वगैरेवर जो खर्च होतो तो कुणाच्या खिशातून? राष्ट्रीय नेते म्हणवणार्‍या शरद पवारांच्या इनमिन ६० आमदारांतले चार आमदार फुटून युतीच्या नेत्यांना जाऊन मिळतात. युतीचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते जणू काही मोठा पराक्रम केल्याच्या थाटात आम्हाला एवढे मिळाले, तेवढे मिळाले सांगत राहतात. तुम्हाला येऊन मिळाले तर त्यांना दडवून का ठेवावं लागतं? एका पक्षाचे इंदूरला, दुसरे बंगलोरला. काय चाललंय काय? मातोश्री क्रीडा संकुलात पोलिसांऐवजी आपण मतदारांनी घुसून आमदारांची गचांडी धरून विचारायला पाहिजे - बोल, कशासाठी हा पक्षबदल, कशासाठी ही पळापळी? मतदारसंघात चल, मतदारांची सभा घे आणि तुझी भूमिका मांड! मुंडे, राणे, गडकरी, देशमुख, पाचपुते, पवार, आदिक कुणी असोत, त्यांना सांगायला हवं, आमदार आम्हा मतदारांच्या ताब्यात द्या. मतदारसंघात ये आणि बोल. राज्यपालांनाही आपण पत्र पाठवून विचारलं पाहिजे की, तटकरे असे कोण आहेत की ज्यांना चार वेळा आपण समारंभपूर्वक शपथ देत आहात? एखाद्या गुन्हेगाराला जसं सकृतदर्शनी दोषी धरल्यावर 'हजेरी' आवश्यक असते, विशिष्ट क्षेत्र सोडून हलता येत नाही, तसं लोकप्रतिनिधींना अशा परिस्थितीत मतदारसंघातच राहण्याचं बंधन का घालू नये? कुणाच्या पैशांवर जेवणावळी नि पंचतारांकित खलबतं चालतात? यांच्या पंचतारांकित बैठकी मोर्च्यानं जाऊन, उधळून यांना फरफटत चौकात आणून जाब विचारायला हवेत.

चाळीस वर्षांच्या काँग्रेसच्या सलग राजवटीनंतर जनता पक्ष, भाजप, तिसरी आघाडी, पुलोद, भाजपा-सेना युती सगळी सरकारं आपण पाहिली. सगळे पक्ष जोखून झाले. सत्तेच्या राजकारणात सगळे 'हमाम में सब नंगे'प्रमाणे नागडे आहेत.

राजकारणाशी आपला काय संबंध? असं म्हणून आपण यांच्या नंग्यानाचाला दरबारी नृत्याचा दर्जा दिलाय. आजवर भारतीय मतदारांनी 'मतपेटी'द्वारा आपला राग व्यक्त केलाय, पण सत्तेचे वाढते निलाजरे खेळ बघता मतदारांनी आता रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गानं राजकारण्यांचे कपडे उतरवून, त्यांच्या गेंड्याच्या कातडीवर न्याय्य हक्काचे चार आसूड ओढण्याची वेळ आलीय. अन्यथा लोकशाहीतले हे नवे सरंजामदार आपल्या पैशांवर सत्तेचे खेळ करत, स्वत:चे वाढदिवस, पोरांची लग्नं, जावयांचे व्यवसाय, पुतण्यांचे रॉक शो, सूनबाईंचे मेगा शो करतच राहतील.

(८ जून २००२)

------------------------------------------------------------------------------------

पुस्तकाचे नाव - पानीकम
लेखक - श्री. संजय पवार
प्रकाशक - ग्रंथाली
पृष्ठसंख्या - १०२

------------------------------------------------------------------------------------

पुस्तकातील निवडक भाग 'ग्रंथाली'च्या सौजन्याने
टंकलेखन सहाय्य - श्रद्धा द्रविड, अंशुमान सोवनी

हे पुस्तक आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17104

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनंत भाव्यांची प्रस्तावना जबरजस्त!

>> धीरूभाई गेले तेव्हाची गोष्ट.....
इथे भाताची परिक्षा करण्याची लायकी नाही,पण शिताने भूक वाढल्यासारखं झालं.
हे पुस्तक मायबोलीच्या दुकानात उपलब्ध होऊ शकेल का?

मृण्मयी,
हे पुस्तक लवकरच मायबोलीवर उपलब्ध होईल. दर महिन्याला काही पुस्तकांची ओळख या विभागात करून देण्याचा प्रयत्न आहे.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

"बृहन्मुंबई महापालिकेच्या ज्ञात-अज्ञात स्वच्छता कामगारांना कृतज्ञतापूर्वक" >>> चिन्मय, ह्या वाक्याने एकदमच लक्ष वेधले. ढोबळ मानाने लेखक आपली पुस्तके आपल्या आयुष्यातल्या अतिमहत्वाच्या व्यक्त्तींना किंवा प्रेरणास्थानांना समर्पित करतात. हे कृतज्ञता व्यक्त करणे खरोखर स्पृहणीय.
असे समर्पित करण्यामागे काही संदर्भ?

दोन्ही लेख अगदीच भिडले. अतिशय स्तुत्य उपक्रम.
-----------------------
2b || !(2b)

चिनूक्स,
एकदम वाचनाची भूक चाळवली हे वाचुन.
हा उपक्रम सुरु केल्याबद्दल धन्यवाद. मायबोलीवर ही पुस्तकं विकली जाणार आहेत हे वाचुन हायस वाटले, नाहीतर नेहमी कितीतरी छान पुस्तकांची नुसती परीक्षणं वाचायची पण पुस्तकच वाचायला मिळत नाही असे आता होणार नाही.

चांगला उपक्रम. पुस्तकं मायबोलीवरुन उपलब्ध होणार हे तर अजून छान!

चांगला उपक्रम. वरचे दोन्ही लेख आवडले.
धन्यवाद रे चिनूक्स.

अरे फारच उत्तम उपक्रम सुरू केला आहेस. तुला, श्रद्धाला आणि अंशुमानला मनःपूर्वक धन्यवाद. वरची निवडही आवडली.

  ***
  तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||

  ह्म्म्म्म! चला आता मोठी मेजवानी मिळणार तर.. Happy

  *********************
  कंपून कंपूत सार्‍या कंप माझा कंपला... पुढच्या ओळी सुचल्यावर कंपीन!
  Wink Biggrin

  सुरेख! मेजवानी मिळेल आता.

  आणखी एक जागा मिळाली आता पडिक रहायला ;)... jokes apart खरच छान आहे हा उपक्रम..

  To the world you may be the one person, but for one you are the world !!!

  पुस्तक शोधते आता दुकानात.... अगदी वाचलंच पाहिजे..

  चिनुक्स धन्यवाद...

  *****&&&*****
  Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

  चिनूक्स, छान उपक्रम आहे. वाचायला पाहिजे हे पुस्तक.

  चिनुक्ष सुंदर उपक्रम.

  सुंदर उपक्रम.

  हे पुस्तक आता मिळवायलाच हव

  मायबोली हा सहीच प्रकार आहे. मी कालच सभासद झालो पण एक एक गोष्ट बघतोय तर एकदम भारावुन जायला होत आहे.

  उत्तम उपक्रम !

  परागकण

  धन्यवाद.... धन्यवाद !
  आता लवकरात लवकर हे पुस्तक मिळवल्याशिवाय चैन पडायचं नाही.
  श्रद्धा आणि अंशुमन -- पुस्तकातील मजकूर टायपायसाठी स्पेशल धन्स.
  -----------
  एकूणच हा उपक्रम खूप चांगला आहे. उत्तमोत्तम पुस्तकांची माहिती मिळेल.

  फारच उत्तम उपक्रम धन्यवाद, चिनूक्स, श्रद्धा आणि आंशुमन.

  अतिशय चांगला उपक्रम आहे.

  चिनुक्स..... कसल पुस्तकय! घेणार. नक्की घेणार... कारण वाचल्याशिवाय आता चैन पडणार नाही.
  तुझे, आणि तुझ्या टीमचे अनेक आभार, रे.

  चिनूक्स, उत्तम उपक्रम!!

  आमच्यासाठी मेजवानीच आहे ही..

  चिनुक्स, धन्यवाद.
  ---------------------------------------------------
  ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
  अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
  रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
  धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

  झकास उपक्रम!!!

  मायबोली फक्त भारताबाहेरच पुस्तके पाठवते का? भारतात दिल्लीला पाठवायची सोय आहे का?

  चिनुक्स मस्तच .. धीरुभाई गेले तेव्हा आणि प्रस्तावना वाचली. वाचायलाच हवं.
  तू, श्र आणि आर्फी तिघांना धन्यवाद.
  ~~~~~~~~~

  मंदार,
  सध्या तरी भारताबाहेरच ही सुविधा आहे.

  रमेश मंत्रींबद्दल आश्चर्यकारकपणे जवळजवळ काहीएक माहिती ईटरनेटवर उपलब्ध नाही.

  त्यांच्या निदान पुस्तकांची नावे कोणी मला कळवू शकेल का?

  आभार!

  Pages