मी झोपलेली आहे...

Submitted by मुग्धमानसी on 13 December, 2017 - 01:59

मी मीरा.

साधारण मध्यमवयीन, मध्यमवर्गीय, मध्यम बांधा, मध्यम वर्ण, मध्यम उंची, मध्यम राहणीमान... वगैरे वगैरे. थोडक्यात कुठल्याच बाबतीत कुठलंच टोक गाठण्याचा अट्टाहास नाही माझा. आता याहून जास्त स्वत:विषयी काय काय सांगावं म्हणजे मी जे सांगणार आहे ते सांगणारी कोण याचा अंदाज वाचणार्याला - म्हणजे तुम्हाला - येईल? मुळात असा अंदाज आलाच नाही तर काय बिघडतं....? तरी पण सांगतेच...

हं पण माझं आडनाव वगैरे काही मी सांगणार नाही. आडनावं मला आवडत नाहीत.
मी कुठल्या शहरात राहते त्याने काहीच फरक पडत नाही. माझ्या शिक्षणाचा आणि नोकरीचा या कथानकाशी (आणि खरंतर परस्परांशीही) काहीही सबंध नाही.

मी स्त्री आहे... हे तर पहिल्याच वाक्यात आलं की!

बाकी फुटकळ निरुपद्रवी माहिती म्हणजे मी विवाहित आहे, दोन मुलांची आई आहे, ’चांगल्या घरातील’ (का काय म्हणतात ते...) आहे आणि हो... ’कुटुंबवत्सल’ आहे. (हा शब्द फार आवडतो मला. ’कुटुंबवत्सल’ हा शब्द सहसा पुरुषांच्या बाबतीत वापरतात. ते स्वत:ची ओळख सांगताना किंवा कुणीतरी त्यांची ओळख सांगताना. बाईनं कुटुंबवत्सल असणं ही काही ’बातमी’ नाही. तरिही मला माझी ही ओळख महत्त्वाची वाटते. मी स्वत:ला स्वत:ची अशी ओळख बरेचदा करून देते. छान वाटतं.) ’माझा स्वभाव’ वगैरे क्लिष्ट गोष्टींमध्ये जाण्यात खरंतर काही अर्थ नाही. पण अभय मला ’कॉम्प्लिकेटेड’ म्हणतो. खरंतर ’भंजाळलेली’ असं म्हणतो. कुठलाही सल्ला वगैरे विचारायला तो कधीच चुकुनही माझ्याकडे येत नाही. म्हणजे पुर्वी यायचा... पण त्याचे प्रश्न माझ्या उत्तरांपुढे अगदिच बाळबोध वाटू लागतात नंतर नंतर, हे माझं मलाही लक्षात आलंच. त्याला याच्या विरुद्ध लक्षात आलं. त्यामुळे मग मलाही त्यानं मला काहिही न विचारणं, न सांगणं बरंच वाटू लागलं. त्यामुळे एक मात्र झालं.... आम्ही सहसा एकमेकांशी कामाव्यतिरिक्त फारसे काही बोलत नाही. आणि आमची व्यावसायिक क्षेत्रेही वेगवेगळी असल्यामुळे त्या निमित्तानेही बोलणे फारसे होत नाही. आमची मैत्री वगैरे तर नाहीच नाही.

बाकी माझी आई मला ’विचित्र’ म्हणते कधीकधी. आई असल्याने अगदिच स्पष्ट बोलू शकते ती इतकंच. पण गोची अशी की ’आई’ असल्यानेच अपत्याविषयीच्या काही गोष्टी तिच्या तिलाच स्पष्टपणे मान्य होत नाहीत. मान्य नसतातच. म्हणजे मान्य करायच्याच नसतात. त्यामुळे ’विचित्र’ पेक्षा जास्त गंभीर विशेषण तिला माझ्या बाबतीत सुचत नाही. म्हणजे खरंतर त्याहून गंभीर काही आहे असंच तिला वाटत नाही. हे गमतीशीर आहे. मी सुद्धा एक आई आहेच.
माझी मुलं लौकिकार्थानं लहान आहेत त्यामुळे त्यांचीही माझ्याविषयी काही स्वतंत्र (ठाम) मतं असतील हे मला जरा अशक्य वाटतं. (तसं ते नसेलही कदाचित).
प्रणव म्हणतो मी एक ’अति-वैचारीक बाधा झालेलं भूत आहे.’ गंमत म्हणजे तोही काही कुठल्या सजीव प्रकारात येतो असं मला वाटत नाही. ते असो. पण त्याचं हे मत... का कोण जाणे, मला इथे मुद्दाम नमुद करण्याएवढं महत्त्वाचं वाटतं.

पण माझं माझ्याविषयीचं मत या सगळ्याहून आणखी वेगळंच आहे. बर्याच बाबतीत विरूद्धही आहे. माझ्यामते मला बोलायला फार आवडतं. ’कुणाशी?’ हा प्रश्न उद्भवला की मी थोडी गडबडते एवढंच. जरा सविस्तर बोलायला लागले कुणाशी तर माझी मलाच समोरच्याच्या ’ऐकण्याच्या’ आणि ’समजण्याच्या’ पात्रतेवर शंका यायला लागते आणि मग मी आटोपतं घेते. आता यामुळे ’समजते कोण ही स्वत:ला?’ असं तुम्हाला वाटलं तर वाटू देत खरंच. माझी अजिबातच हरकत नाही.
पण मी माणूसघाणी वगैरे आहे की नाही यावर प्रत्यक्ष विचार करायला आजवर संधी मिळालेलीच नाही. कधीकधी असं वाटतं खरं की माणसांचं अजीर्ण झालंय... पण ते काही फार काळ टिकत नाही. टिकू शकण्याएवढा वेळ मिळतच नाही असं म्हणा हवंतर...

आता मला असंही वाटतंय की मी तुम्हाला बोर करतेय. पण तरिही मी निर्धास्त बोलू शकतेय कारण वाचन थांबवण्याचं नि:संदेह स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. शिवाय बोलणं/ लिहीणं थांबवणं माझ्या हातात नाहीये. तेच तर सांगतेय...

तर आत्ता या क्षणी... तुम्हाला खरं वाटणार नाही... पण मी झोपलेली आहे. त्यामुळे झोपलेली असताना हे जे काही मी लिहिते आहे, ते थोडंफार अस्ताव्यस्त, बेशिस्त, पसरलेलं आणि अॅरबसर्ड वाटणारच याची कल्पना आधीच देऊन ठेवते. उदाहरणार्थ वर बर्याच पात्रांची नावे येऊन गेलीत... पण त्यांचा परिचय पुढे कुठेतरी येईल. किंवा कदाचित येणारही नाही.
मुळात कुणीतरी हे वाचणार आहे असं उगाचच गृहीत धरून लिहिलेलं हे माझं पहिलंच लिखाण आहे. आणि हे असं मी गृहीत का धरतेय... ते इतर अनेक गोष्टींप्रमाणे मला माहित नाही. पण धरतेय हे खरं. आणि मी झोपलेली आहे हेही खरं. म्हणजे ’झोपेत’ नाही हं... चक्क ’झोपलेली’!
आता याला झोपलेली म्हणावं की कसं हाही खरंतर प्रश्नच आहे. म्हणजे डोळे मिटलेले आहेत माझे. डोक्याखाली उशी, अंगाखाली साधारण मध्यममऊ गादी, अंगावर पांघरूण असा सगळा जामानिमा व्यवस्थित आहे. फार गरम नाही, फार थंड नाही असं ’आल्हाददायक’ का काय म्हणतात तसलं वातावरण आहे. दुपारचा भक्क प्रकाश पडद्यांतून गाळून खोलीत पसरलेला बंद डोळ्यांनाही जाणवतोय. आणि बंद दारातून निसटून रांगत रांगत खोलीभर पसरणारा बाहेरचा दंगा, आरडाओरडा, हसणं आणि तुटक्या गप्पा सुद्धा कानांना स्पष्ट ऐकू येताहेत. हे एवढं सगळं मला चक्क स्पष्ट जाणवतंय, समजतंय, ऐकू येतंय याचा अर्थ खरंतर मी जागी आहे. झोपलेली नाही. पण तरिही मी याला झोपच म्हणणार. कारण हल्ली अशीच झोपते मी. झोपते तेंव्हा जागी असते आणि जागेपणी बहुदा झोपेत.... जाऊदे... हे फार गुंतागुंतीचं होतंय.

आता तुम्ही विचाराल जर मी झोपलेली आहे, तर हे लिहितंय कोण? आणि कसं? हा प्रश्न बरोबर आहे. खरंतर मलाही पडलेला आहे. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलंय. तुम्हीही तेच करा. कारण जर मी स्वप्नात लिहीत असेन तर तुम्ही ते वाचणार कसं? मी काही तुमच्या स्वप्नात येऊ शकत नाही कारण तुम्ही मला ओळखत नाही. म्हणजे... वर दिलेल्या ओळखीवरून तुम्हाला माझी कल्पना वगैरे करावी लागेल... ते जमेलही... पण च्यायला एवढे कष्ट कोण घेणार? आणि एवढं काय अडलंय तुमचंही?
तर थोडक्यात... असल्या मूलभूत फुटकळ प्रश्नांकडे सोयिस्कर दुर्लक्ष करू. ते शक्य आहे, आणि फायद्याचंही. काही क्लिष्ट समिक्षकांना खोलात जावंसं वाटतंच असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.

तर...
मी झोपलेली असले तरी माझा मेंदू व्यवस्थित कार्यरत आहे. मी विचार करतेय आणि ते सुस्पष्ट जाणवतंय मला. झोपलेली असल्यामुळे अर्थातच मी एकटी आहे. शांत आहे. हे फार बरं वाटतंय. आपल्या आपल्या मेंदूची घरघर अशी एरवी कधी ऐकली जात नाही. नाही म्हणायला बाहेर बराच दंगा चाललाय. सगळे जागेयत. अशावेळी मी झोपलेली हे खरंतर अचाटच.
आजूबाजूला प्रचंड माजलेल्या गल्बल्यात मी इतकी विलक्षण शांत हेही भयंकर अचाट.

बाहेर फार गोंधळ चाललाय.
देवळाच्या शांत भव्य मंडपात वार्याचा झोत अचानकपणे शिरावा आणि त्याच्या घुमणार्या मस्तीखोर अस्तित्वानं त्या मंडपाच्या घुमटाशी टांगलेल्या भव्य झुंबराच्या सगळ्या काचेच्या लोलकांनी एकच कल्ला करावा... तसा गोंधळ!
वार्याच्या धसमुसळ्या मस्तीला अंगभर सामावून घेता घेता त्या झुंबरातल्या एका लोलकाने संधी साधल्याप्रमाणे झुंबरासोबतच्या त्या अखंड टांगलेपणातून स्वत:ची सहज मुक्तता करून घ्यावी आणि स्वत:ला त्या वार्याच्या झोताच्या हवाली करून टाकावं...! पण वार्याला तरी कुठे पेलतंय ते लोलकाचं स्वतंत्र जडत्व? वार्याचा सगळा धसमुसळेपणा आणि ताकद अधांतरी असलेल्यांना बेभान करण्यापुरती... त्या बेभानपणात स्वत:च्या अधांतराचाही आधार गमावलेल्यांना तो काय आधार देणार? त्यांना तो वार्यावरच सोडणार!
वार्यानं वार्यावर सोडलेला तो लोलक मग कुणीतरी लादलेल्या चुकार गुरुत्वाकर्षणानं पहिल्यांदाच खेचल्याप्रमाणं देवळाच्या फरशीवर आदळतो आणि... खळ्ळ्ळ्ळ!!
अचानक प्रचंड गल्बला. "श्श्शीSSS काय हे..." खुर्च्या पटापट सरकल्याचे आवाज.. "मीरा अगं उठ! चहा सांडेल अंगावर..."
टेबलाच्या पायाशी ख्ळ्ळकन् पडून फुटलेला कप आणि माझ्या मांडीवर ओघळत कातडीला चिकटत जाळत जाणारा कढत गरम स्पर्श... मी तट्कन् दचकले. पाय किंचित झाडले. पण लगेच लक्षात आलंच की मी झोपलेली आहे. सुरक्षित आहे. मी डोळे उघडले नाहीत.
"कुणी सांडला रे चहा?"
प्रणवचा हा असा जमेल त्या सार्वजनिक ठिकाणी चहा, पाणी, सरबत जे काही द्रवरूप असेल ते पालथं करून सगळीकडे धांदल उडवून देण्याचा अजब गुणधर्म आहे. पण त्यानंच हात खेचून बाजूला केलं मला. मांडीवरून पायांवर जळजळीत उष्ण जाणीव. आणि मनगटावर घट्ट रुतलेली बोटे. त्याची.
"सॉरी... तुझा ड्रेस खराब झाला."
मी गडबडीने पाहिलं. हो की.... आज नेमका पांढरा शुभ्र ड्रेस घालून आलेले मी. त्यावरची लाल जर्द केशराची फुले उष्ण पिवळ्या मातकट जाळाने कोमेजून गेलीत अगदी. मला रागच आला खरंतर! पण.....

’धप्प’!!! काहीतरी जोरदार आपटल्याचा आवाज आला. मागोमाग भोकाड पसरून रडण्याचा प्रचंड आवाज. हा माझा धाकटा लेक. फार मस्ती करतो. चांगलाच धडपडलेला दिसतोय....
मागोमाग खूप सारे आवाज, धावपळ... ’काय झालं... काय झालं... हात् रे... कुणी बाऊ केला... काई नाई काई नाई....’
मला डोळे उघडावेसे वाटताहेत. बाहेर जावंसं वाटतंय. फार लागलं असेल का याला?
पण मी डोळे उघडले नाहीत. उठले नाही. जागची जराही हलले सुद्धा नाही. कारण मी झोपलेले आहे. झोपेत हे असे आवाज ऐकू येत नाहीत. मी गाढ झोपलेले आहे. आणि बाहेरच्या सगळ्यांना हे माहितीये. माझं डोकं दुखतंय म्हणून मगाशीच मी झोपायला आत आलेय. शिवाय धाकट्याला सांभाळायला ते सगळेजण मिळून पुरेसे आहेत. एवढ्यावरनं काही मी कुटुंबवत्सल नाही हे सिद्ध होत नाही.

मी पुन्हा शांत झोपून गेले. शांततेवर विचार केला गेला पाहिजे. मी विचार करू लागले. कूस बदलली.
__________________________________________

पांढर्याशुभ्र फेसाळणार्या समुद्राच्या रंगाचा ड्रेस हवा होता मला. अगदी तस्साच. पायघोळ. नाहीच मिळाला.
मग मी वाळूच्या रंगाचा ड्रेस निवडला. तो अंगभर घालून वाळूत पाय मुडपून बसले. आता मला सगळ्यातून अलगद निसटून जाता येईल... वाळूसारखंच... असं वाटायला लागलं. समोर आडदांड पसरलेल्या समुद्राला आता माझ्यात शिरताच येणार नाही! तो लाख भिजवील मला... पण मी ओली होणार नाही. मीही त्याच्यात भिनणार नाही कधी. एकमेकांना बिलगलेले आम्ही कधीही एकत्र असणार नाही! मी त्याच्याकडे खुनशी निर्विकारपणे बघत राहीन आणि त्याच्यालेखी मी अस्तित्वातच नसल्यासारखी! मुर्तिमंत दुर्लक्ष! माझ्या मेंदूत धुमसणारा अनादी, अनंत राग!

पुन्हा धाड्कन आवाज. दरवाजा उघडल्याचा. मग पुन्हा लावल्याचा. मग बाथरूमचे दार उघडल्याचा. मग तेही लावल्याचा.

काही माणसांना त्यांच्याकडून रोजच्या वावरण्यात खूप सार्या आवाजांची निर्मिती झाली नाही तर आपले अस्तित्व चक्क नाकारले... किंवा बाद केले जाईल अशी भिती वाटत असणार. अभय त्यातला एक. हा माणूस माझा नवरा आहे. तो वाईट आहे असं मत करून घेऊ नका हं. आत्ता मला त्याचा भयानक राग आलाय इतकंच. कारण त्यानं माझी झोपमोड केलीये. तो नेहमीच माझी झोपमोड करतो.

आता इतके मोठे आवाज लागोपाठ झाल्यावर गाढ झोपलेलं कुणीही जागं होणारच म्हणून मीही डोळे उघडले. उठून बसले. उठल्या उठल्या पहिली गोष्ट काय जाणवली असेल तर ती ही की मला प्रचंड झोप येतेय. अवघडे.... असं म्हणत मी पुन्हा पडले. डोळे मिटले.

"उतर खाली. चालत जाउ थोडे लांब. झोप जाईल तुझी..." म्हणत प्रणव कारचा माझ्याबाजूचा दरवाजा उघडण्यासाठी माझ्या अंगावर किंचित रेलतो... त्याचे श्वास ऐकू येतात....

बाथरूमचं दार उघडल्याचा आणि बंद केल्याचा पुन्हा आवाज. मी पुन्हा उठून बसले. झोपावंसं वाटतंय.
"मीरा... उठलीस तू?"
मला जळजळीत म्हणतात तसा कटाक्ष टाकावासा वाटला अभयकडे.
मग मी डोळे अजून थोडावेळ घट्ट बंद करून पाहिले. मग डोळे मोठ्ठे उघडले. तोंडावर दोन्ही तळहात खसाखसा घासले. फ्रेश वाटेना.
"झोपायला आलीयेस का इथे? चल आता बाहेर. समुद्रावर जाउयात सगळ्यांसोबत."
अरे हो... आम्ही ’कौटुंबिक’ सहलीसाठी आलोय हा महत्त्वाचा संदर्भ सांगायचा राहिलेला तो या निमित्तानं आठवला. खरंतर मलाही आत्ताच आठवला.

_____________________________________________

समुद्र जीव घेतो.
भणभण खारट वारा आणि वाळू...! जवळ येणारा, आला आला वाटतानाच पुन्हा दूर जाणारा... तरिही तिथेच आणि तसाच युगानुयुगे अवाढव्य लोळत पडलेला... कुठेतरी लांबच्या रेषेवर सुर्याला गिळून लख्ख तांबडा होणारा समुद्र...! त्याची सततची गंभीर मेंदूभर घुमत राहणारी कुजबूज...
संध्याकाळच्या समुद्रासारखं जीवघेणं या जगात दुसरं काहिही नाही. कुणीही नाही.

मला समुद्र विलक्षण वाटतो.
मला समुद्र अज्जिबात आवडत नाही.

मी फारच केविलवाणी झालेय. अर्धमेली म्हणाना...
खरंतर मी मुलांसोबत खेळतेय. धाकट्याला कडेवर घेऊन गुडघाभर पाण्यात उभं राहून त्याला समुद्राची गंमत दाखवतेय. माझी थोरली लेक तिच्या बाबासोबत थोडी पुढे जाऊन तिथली समुद्राची गंमत मला ओरडून सांगतेय. मागे किनार्यावर वाळूत बसलेले मुलांचे आजी-आजोबा आमचं सुखी आनंदी चौकोनी कुटुंब कौतुकानं बघताहेत. आम्ही सगळेच हसतो आहोत. आनंदात आहोत.

खरंतर मीही खूप आनंदात आहे.
खरंतर मी फार कासावीस झालेय.
समुद्र जीव घेतो.

त्यांनी मला सावध केलं होतं.
मला सांगितलं गेलं होतं तुझ्यासारख्या माणसांबद्दल.
तुझ्यासारखी माणसं... समुद्राच्या निळ्याशार खोल ओल्या जिवंत डोळ्यांची! लख्ख आरपार सुंदर साजिर्या मनाची! वार्याच्या झुळझुळ कोवळ्या स्पर्शाची!
माणसं... शहार्याची!
सांगितलं गेलं होतं मला की अशी माणसं अवचित भेटतात. डोळ्यांतूनच ओळखता येतात. जसं ओळखलं मी तुला! आणि तरिही फसले.
अश्या माणसांपासून लांब रहा - असं बजावून सांगण्यात आलं होतं. कारण अश्या माणसांचं जीवघेणं व्यसन जडतं.
दारूपेक्षा... कुठल्याही अमली पदार्थांपेक्षा भयंकर व्यसन!
त्यांचा अंमल... तुमच्या शरिरावर, मेंदूवर, मनावर, संपूर्ण अस्तित्वावर! तुम्ही तुमचे रहात नाही.
मीही आता माझी राहिलेले नाही.
पण आता मला माझ्यात माझे असे काही ठेवायचेही नाही.
मला कळकळीने सांगण्यात आलं होतं की सर्वस्व गमावण्याचा... रिकामे होण्याचा असा जीवघेणा धोका पत्करू नकोस!
पण मला ना... धोके पत्करायला आवडतात! खरंच!
कारण जाग आली की संपलं सगळं. झोपलेले असतो आपण तोवर जगून घ्यायचं. सगळं भोगून घ्यायचं.
- हे ’मी’ सांगणारे त्यांना.

संध्याकाळी दिवस मावळताना सोनेरी वाळूवरून समुद्राला समांतर चालताना हरखून जायला होत होतं. सगळं कसं उत्कट... हळवं... सुंदर वगैरे. बेभान झाले होते. खचून गेले होते.
मागून येऊन नकळत सोबत आलेल्या अभयचा हात मी आधार शोधल्याप्रमाणे का धरला?
माझं हे अगदी वैयक्तिक निसटणं मी अभयला सावरू द्यायला नको होतं...! मला निसटायचं होतं... मला निसटायचं आहे.
मग मी वाळूतच चक्क आडवी झाले. उबदार मऊ हुळहुळणारी गादी. खारटसर मुलायम दमट भिरभिर पांघरूण. निसरडी बुळबुळीत अलवार झोप.

मी माझी अगदी वैयक्तिक डायरी प्रणवला वाचायला का दिली?
____________________________________________

कुठल्यातरी अमंगळाला भिऊन अंग चोरून चालल्यागत मी त्या भिंतींपासून अंतर ठेऊन चालत होते. ते वासे, ते कोपरे... तिथला इंचन् इंच माझ्या चांगल्याच ओळखीचा. पण त्या ओळखीचे मला किंवा त्यालाही काही भूषण नाही. गरज नाही. त्या वाश्यांना घरपण नाही. मला माणूसपण नाही.
मी कोपर्या कोपर्यांतून अशीच सरकत राहते. कधी सरपटत, रांगत... कधी चालत, धावत... मी शोधत राहते दार... एखादी खिडकी... ज्यातून मला सशरीर निसटता येईल. बाहेर पडता येईल.
या बंदीस्त कोंदट वास्तूला माझा आणि मला हिचा विटाळ असह्य होण्याआधी... मला इथून निघून जायला हवे. मला दार सापडायलाच हवे.
पण भिंती चाचपाव्या लागतील...
कोरड्याठण्ण भेगाळ उष्ण भिंती. यांच्यातून ओल झरून युगे लोटली. कधीतरी एखादी तरी सर या बेरड भिंतींत मुरली असती तर त्या अद्न्यात पुण्यात्म्याला बीजरुपानं इथं अवतार घेऊन स्वत:च्या घट्ट मुळांनी हे पोकळ वासे फोडून मला मुक्त करण्याची संधी मिळाली असती. या वास्तूलाही स्वत:चा पाया किती ठिसूळ आहे हे लक्षात आले असते कदाचित... जर एखादे वादळ फिरकले असते इथे तर.... पण बाहेरच्या जगात बहूदा आता ऋतूचक्र थांबून गेले आहे. ऋतूंनीही इथे पाठ फिरविली असावी. आता बहूदा उरले आहे ते फक्त उष्ण राठ बेढब उन्ह! तिन्ही त्रिकाळ! भगभगणारे. जाळणारे. आत आणि बाहेर.
माझी थरथरती घामेजली बोटे मी विलक्षण साशंकतेने भिंतीवर टेकवते आणि... अस्वस्थ बेढब गचाळ बेशिस्त आणि कळकट अवतारातला तो वास्तूपुरूष पुन्हा अवतरून ढोंगी विनम्रतेनं मला माझी जागा दाखवून देतो. या भिंतींना दारं-खिडक्याच नसल्याचं मोठ्या शांतपणे तो मला सांगतो आणि अंतर्धान पावण्या आधी पुन्हा तसेच अचकट-विचकट हसण्याचे तो अजिबात विसरत नाही. माझा संताप मस्तक फोडून बाहेर येईल एवढा! माझी बोटे त्याचे नरडे आवळण्यासाठी शिवशिवतात. त्याने ल्यालेल्या नवरत्नांना सडून गिचका झालेल्या अन्नाचा आंबट वास येत राहतो. माझ्या मेंदूत न मावणारी घृणा... मी डोके गच्च हातात धरून स्वत:ला गदागदा हलवू लागले....

"ओय्... काय करतेयस?"
माझ्यापासून दोन फूट दूर बसून माझ्याकडे भित्र्या अविश्वासानं पाहणारा अभय. आणि धाप लागून घामेजून गेलेली मी.
माझी बोटे अजूनही शिवशिवणारी. संताप डोक्यांत धगधगणारा.
भेदरलेल्या अभयकडे बघून तशातही हसू आलं. मी हसले.
यानंतर मात्र त्यानं कधी मला अशी अर्धवट झोपेतून धसमुसळ्या घाईनं उठवलं तर जीवच घेणार मी त्याचा!
_____________________________________________

"मीरा, तुम्हा चौघांचा हा फोटो काय सुंदर आलाय गं...! फ्रेम करून लाव घरी. मस्त वाटेल." - आई म्हणाली आणि मी हसून प्रसन्न होऊन वगैरे ती दाखवत असलेला फोटो उत्सुकतेने बघू लागले. खरंच तो मागचा समुद्र किती साळसूद आणि भाबड्या तांबूस गुलाबी रंगाचा दिसतोय! त्याच्यासकट आम्ही सगळेच किती आनंदात हसताना... किती उत्साह...
कधी काढला हा फोटो?

फोटो काढत असताना ज्याचा फोटो काढला जातोय तो प्रत्यक्ष हजर असावा लागतो ना तिथे? - हा काय प्रश्न झाला? मूर्ख.... बावळट...
पण तरिही मी विचारणारे हे प्रणवला. तो फोटोग्राफर आहे.
पण म्हणजे तो फोटोग्राफर आहे म्हणून नाही खरंतर... तो हजाम असता तरी मी हे त्यालाच विचारलं असतं. त्याला विचारलंच असतं. आणि त्याने सांगितलंही असतं. तो मला कधीही, काहीही समजावून देऊ शकतो. त्याच्यासमोर मी कितीही बावळट आणि मूर्ख होऊ शकते. ते आवडतं मला. नाहीतर एरवी क्षणभर... अगदी झोपेतही हुश्शार आणि सतर्क, विद्वान वगैरे असावंच लागतं. त्यातून वर कर्तव्यपरायण, कार्यतत्पर, आदर्श... वगैरे. ते तसं असणं कितीही भंपक असलं तरिही... ते भंपक आहे हे तुम्हाला माहीत असलं तरिही... कंटाळा येतो. खरंतर जिथं तुम्ही कितीही वेडगळ, खुळे, बालिश बनून वावरू शकता; आणि तसं वावरताना तुम्हाला अज्जिबात कसलाही किंतू मनात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... तीच जागा तुमची. तेच घर तुमचं.

पनाह मिल जाए रूह को जिस हथेलीपर... वहीं आशिंयॉ बनालो
के घर वही है... और पनाह भी...

त्या फोटोत मी स्वत:ला चार-चारदा नीट निरखून पाहिलं. सगळं ठीक आहे. माझे केस मोकळे आहेत. मी हसते आहे. छान आहे. मी छान आहे. म्हणजे खरंतर सगळंच छान आहे.
हा फोटो फ़्रेम करायलाच हवा.
_________________________________________

रात्र झालीय.
ही तर झोपायची हक्काची वेळ.
मुलं लवकर झोपलीयेत.
मुलं दमलीयेत. मीही दमलेय. अभय जागा आहे.
मी उदास झालेय. नक्की कशामुळे ते मला माहितीये. पण मी इथं ते सांगणं प्रशस्त नाही.
मी बिछान्यावर आडवी होताच झोपून गेले.
अभय माझ्या अंगावर हात टाकून माझ्या कानात कुजबुजतो - "मजा आली ना चार दिवस?"
"हं...."
त्याच्या कुजबुजण्याने कानात विचित्र आवाज येउन ते सहन न होऊन मी जराशी सरकते. त्याला जाणवू नये अशी.
"आपण दरवर्षी असं कुठंतरी जात जाऊ मुलांना घेऊन. कधी आपण दोघेच जाऊ."
"हो..."
"असा बदल बरा वाटतो. रूटीनच्या कामाला पुन्हा लागायला उत्साह येतो."
"हो... खरंय."
"छोटू अजून जरा मोठा झाला ना... की मुलांना आईबाबांकडे ठेऊन आपण दोघेच जाऊ दोन दिवस कुठेतरी फिरायला."
"....." - मला झोप येतेय.
"चालेल ना?"
"अं... हो चालेल." मी डोळे मिटलेत.
"कुठे जाउयात गं? ठरवून ठेव..."
"आपण... कुठेही... पण तिथे समुद्र असता कामा नये..." - मी झोपलेय. गाढ झोपलेय. पण अभय बोलतोय... मला ऐकू का येतंय? मी का बोलतेय?

"तुलाही वैताग येतो ना समुद्राचा? चिकट रेती आणि खारट अंग... कपडे खराब. तेवढ्यापुरती मजा येते पण..." अभय बोलतोय.

"मीरा, आपण ना एकदा रात्रीचे समुद्रावर जाऊ. पहाटेपर्यंत समुद्रावरच बसायचं. आकाशात चंद्र असला तर आणखीन छान. रात्रीचा नुस्ताच गुरगुरणारा फेसाळ चंदेरी समुद्र वेड लावतो. समुद्राला बोलू द्यायचं. आपण लहानासारखं नुसतं ऐकायचं. अश्या गप्पा झाल्या पाहीजेत बघ... माझ्या-तुझ्या. मीरा.... समुद्र जीव घेतो गं..."

"मीरा... ए मीरा... झोपू नकोस ना. तो गुलाबी नाईट ड्रेस घालून ये जा..." अभय कुजबुजतोय कानाशी. खांदे गदागदा हलवतोय. झोपमोड.
मस्तकात हजारो स्फोट.
वाळूच्या रंगाचा झुळझुळीत ड्रेस. तांबूस क्रूर रांगडा राकट समुद्र. बंद खोलीत तो थेंबाथेंबानं भरील आता. मी त्याच्यात भिजणार नाही. मी त्याच्यात विरघळणार नाही.
मी त्याची कुणीही नाही.
बाहेरून या भिंतींच्या आत झिरपणार्या अंतहीन उष्म्यानं या समुद्राची वाफ होईल का? त्या वाफेला तरी इथून बाहेर पडता येईल का? इथं या वाळवंटात पाऊस पडेल का? या रुक्ष कोरड्या भिंतीत एखादं बी रुजेल का?

हलकेच मानेखालची उशी काढली. मस्तकात उसळलेलं भयंकर उष्ण रक्तासारखं काहीतरी. लालबुंद कारंजी.
मी शांतपणे उशी अभयच्या तोंडावर दाबली. त्याचं बोलणं आता मला कळत नाही. आता ऐकूच येत नाही.
आता झोप पूर्ण झाल्याशिवाय जागायचंच नाही. अस्संच दाबून ठेवायचं. सगळं एकदा शांत झालं पाहिजे... संपूर्ण शांत. एक्कही आवाज नको. मग निवांत गाढ झोपायचं.

घाबरू नका. काहीच घडलेलं नाही. लक्षात आहे ना? मी तर झोपलेली आहे...
_______________________________

- मुग्धमानसी
________________________________

पूर्वप्रकाशित - 'माहेर' दिवाळी अंक, २०१६

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे ! डेंजर आहे एकदम. घाबरले ना मी.
खरंच, असं कसं जमतं लिहायला? असम्बद्ध नाही म्हणता येणार , तुकड्यात लिहिलंय, तरीही एकसंघ, विस्कळित तरीही बांधून ठेवणारं. भारी आहे.

विद्या.

दिवाळी अंकात वाचली होती.
गोष्ट अगदी ओढून घेते. कळते की नाही कळत? असं वाटतं. त्यामुळेच परतपरत वाचावी वाटते. लिहीत रहा.

खरंच, असं कसं जमतं लिहायला? असम्बद्ध नाही म्हणता येणार , तुकड्यात लिहिलंय, तरीही एकसंघ, विस्कळित तरीही बांधून ठेवणारं. भारी आहे.>>> same here!!

कळली नाही.
(कोणी समजावून सांगणे हा इतक्या सुंदर गोष्टीचा अपमान होईल).
पण आवडली