तरही - जगाला तू हवी आहेस बहुधा

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 December, 2017 - 12:24

ओळीसाठी बेफिजींचे आभार मानून ...

उगवणारा रवी आहेस बहुधा
जगाला तू हवी आहेस बहुधा

किती देशील हिसडे दावणीला ?
सवय कर ना ... नवी आहेस बहुधा

समर्पक शब्द जो सुचवून जातो
निसर्गा तू कवी आहेस बहुधा

मनाची खिळखिळी करतोस पाने
विचारा, वाळवी आहेस बहुधा !

लुटारून्ना जुमानेना जराही
कफल्लक-नागवी आहेस बहुधा

उतारी राखतो हातात अपुल्या
भिडू तू अनुभवी आहेस बहुधा

म्हणेना जग तुला बाजारबसवी
निरामय जान्हवी आहेस बहुधा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users