विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी- भाग ४

Submitted by सिम्बा on 12 December, 2017 - 05:14

विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी- भाग 3

चार महिन्या नंतर

गेल्या चार महिन्यात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले होते,

त्या दिवशीच्या भावनिक नाट्यानंतर सकीना आणि शोभा मधले नाते पूर्णपणे बदलले होते. त्यातला “गरज पूर्ण करणारी मैत्रीण” हा भाव जाऊन भावनिक ओलावा आला होता. कित्येक वेळा शोभा सकीनाला तिच्या पूर्वीच्या दिवसांबद्दल सांगत बसे आणि कुठेही जजमेंटल न होणाऱ्या श्रोत्याची भूमिका सकीना चोख निभावे. सकीनाच्या आग्रहावरून शोभा एकदा मानसोपचारतज्ञाकडे सुद्धा जाऊन आली. त्यांनी तिला काही औषधे आणि झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या.शोभाला रात्री आता शांत झोप लागू लागली.तिच्या अभ्यासात आता नियमितता आली होती. मौसी सुद्धा हल्ली सकीनाबरोबर बरी वागत होती. पूर्ण चार महिने नजर ठेऊनही मागच्या जिन्यातून जाताना कोणीही न दिसल्याने पक्याचा पहारा सुद्धा थोडा ढिला झाला होता.

...आणि तशातच तो दिवस उजाडला.

गेला आठवडा शोभासाठी फार धावपळीचा गेला होते. युनिवर्सिटीच्या सोशल-सायन्स च्या नवीन कोर्स ला तिने अडमिशन घेतली होती. फिल्डवर्क करताना तिची खूप धावपळ होत होती, गेले काही दिवस औषधांच्या वेळा पाळणे तिला खरंच जड जात होते.

बऱ्याच दिवसांनी आज ती घरीच होती, सकीना पार्लर ला गेल्यावर ,दुपारी कंटाळा आला म्हणून तिने सहज टीव्ही सुरु केला. कुठल्यातरी बी ग्रेड पिक्चर मधला बलात्काराचा सीन चालू होता. पडद्यावर चालु असणारा प्रसंग पाहून ती हळू हळू धुमसू लागली, डोक्यात जणू स्फोट होत होते. जखमेवरची खपली कोणीतरी खसकन ओढून काढतय आणि त्या जखमेवर बोट दाबून धरतंय असे तिला वाटले. बेचैन वाघिणीसारखी ती येरझार्या घालू लागली. एक मन तिला परत बाहेर पडायला सांगत होते, तर दुसरे मन थोपवत होते. सकीनाला परत मेकअप करायला सांगणे, म्हणजे त्यांच्यामध्ये तयार झालेले बंध कायमचे तोडणे हे तिला माहित होते.दाराबाहेर असणारा पक्याचा पहारा चुकवून निसटणे हि गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये हे हि तिला ठाऊक होते. पबमधले लाईट्स, कोंदट वातावरण तिला खुणावू लागले, व्यसनाधीन माणसासारखा जाऊन तिने laptop सुरु केला. हेडफोन लाऊन ती वेगवेगळ्या क्लिप्स ऐकू लागली, एका मागोमाग एक फोटो पाहू लागली. नशा केलेल्या माणसा सारखी ती सुन्न होऊन बसली होती.
संध्याकाळ ढळता ढळता ती परत शांत झाली. तिचा निर्णय झाला होता.

रात्री सकीना घरी आली तेव्हा शोभा शॉवर मध्ये होती.

सकीनाचे जेवण होईपर्यंत मौसी ला सांगून तिने कॉफी मागवली. सकीनाच्या मगमध्ये हुशारीने तिने आपली अर्धी झोपेची गोळी टाकली, आणि छान गप्पा मारत दोघी कॉफी प्यायल्या. औषधाने असर दाखवायला सुरवात केली आणि दहा पंधरा मिनिटात सकीना गाढ झोपली.

शोभा उठली, इतके दिवस सकीना सोबत राहून ती मेकअप ची बेसिक टेक्निक्स शिकली होती. तिने भरभर मेकअप करायला सुरवात केली, आज पहिल्यांदीच ती आपल्या खऱ्या चेहऱ्याने बाहेर पडणार होती. मेकअप झाल्यावर ती कपडे चढवू लागली.पुरुषाचे लक्ष चेहऱ्याकडे वळूच नये इतका रिव्हीलिंग ड्रेस तिने निवडला होता. सगळ्यात शेवटी तिचा विश्वासू साथी तिने वेस्टband मध्ये खोचला.

आज पहिल्यांदाच तिला तयार होताना ती झिंग, ती किक जाणवत नव्हती. निव्वळ सवयीने ती तयार झाली. सकीनाचा बुरखा अंगात चढवला आणि स्कूटीची किल्ली घेऊन ती दारापाशी आली. पीप होल मधून तिला समोर पक्याची रिकामी खाट दिसली. हळूच दार उघडून तिने कानोसा घेतला आणि घराबाहेर पडली. जिन्यावरून दबक्या पावलांनी ती खाली आली आणि स्कूटी ढकलत घरापासून दूर नेली. पुरेशी दूर आल्यावर तिने स्कूटी चालू केली आणि अंधार कापत ती सुसाट निघाली.

नाक्यावर बाईक वर बसून पान खाणाऱ्या पक्याला ओळखीचा बुरखा ओळखीच्या स्कूटीवर जाताना दिसला, ४ महिने नजर ठेऊन सुद्धा अशी ऐनवेळेला माती खाल्ल्याबद्दल त्याने स्वत:ला चार शिव्या हासडल्या, आणि आपल्या मोटारसायकल वर बसून त्याने स्कूटीचा पाठलाग सुरु केला.

स्कूटी थेट बांद्र्याला एका सप्त तारांकित हॉटेल पुढे उभी राहिली, या हॉटेलमध्ये मुंबई मधला एक फेमस डिस्को सुद्धा होता. सुरक्षित अंतर ठेऊन नजर ठेवणाऱ्या पक्याला बुरख्यातून एक टंच पोरगी बाहेर आलेली दिसली. तो बावचळला, हि सकीना तर नक्की नव्हती, शोभनाला तर कधी बाहेर पडलेली त्याने पहिले नव्हते, मग च्यायला हि पोरगी कोण? त्याने तिकडेच उभे राहून पुढे नजर ठेवायचं ठरवलं. तो गुपचूप हॉटेलच्या पार्किंग मध्ये शिरला आणि गाड्यांच्या आडून हॉटेलच्या प्रवेशद्वारावर लक्ष ठेऊन उभा राहिला, यावेळी परत एकदा माती खायची त्याची इच्छा नव्हती

शुब्बू ने दारावरच्या बाउन्सर ला स्माईल देत आत जाण्यासाठी अवजड दरवाजा लोटला, आणि पलीकडे असणारा एक बेसावध माणूस धडपडला.

“oh, I am so sorry, did I hurt you? शुब्बूने पुढे होत त्या माणसाचे हात हातात घेतले. अंधुक उजेडात जेमतेम त्याची बाह्यरेषा दिसत होती. पण तशातही त्याची भरपूर उंची, रुंद खांदे आणि दाढी या गोष्टी तिने नोटीस केल्या. त्याने घातलेला कोट त्या वातावरणात पूर्णपणे विसंवादी वाटत होता.

“ its all right , I should have taken care. Thanks,” त्याने हात सोडवून घेत म्हंटले, एका हाताने तो त्याचे दुखरे कपाळ दाबत होता.

“leaving so early handsome?? Night is still young...” शुब्बूने त्याला घोळात घ्यायचा प्रयत्न सुरु केला.

“ah… no, thanks, feeling kind of out of place here”, त्याने दाराच्या दिशेने पाऊल वळवले

“come on, just one drink.. give me company, I promise I will reciprocate”, शुब्बूने त्याचा हात ओढून आपल्या कमरेभोवती लपेटला आणि त्याला ओढत आत घेऊन गेली.

बार काउंटर जवळ उजेडात आल्यावर तिने त्याला न्याहाळून पहिले, पस्तिशीचे वय असेल, फिकट निळी जीन्स आणि डार्क कोट घातला होता. सहा फुटाच्या आसपास उंची, घातलेल्या कोटामधून सुद्धा मजबूत अंगकाठी लक्षात येत होती. गव्हाळ वर्ण, आणि रेखीव, हसरा चेहरा, किंचित अस्ताव्यस्त झालेली दाढी, दाढीत मध्येच दिसणारे काही रुपेरी केस, डोक्यावर वाढलेले भरपूर केस. पण सगळ्यात तिला आवडले ते त्याचे काळेभोर,समोरच्याला आश्वस्त करणारे डोळे आणि स्थिर, स्वच्छ नजर.
ती दचकली, त्याला न्याहाळण्यात ती इतकी दंग झाली होती ,कि तो तिच्याकडे रोखून पाहात आहे याची तिला जाणीव सुद्धा झाली नाही,अचानक त्याच्या रोखून बघण्याची जाणीव तिला झाली आणि तिनी त्याच्यावरची नजर हटवली.

“I like cock…tail..” शुब्बूने आपला हातखंडा खेळ सुरु केला.

तो लहान मुलासारखा खुदकन हसला, तिला हलकेच टप्पल मारत म्हणाला “naughty girl, let me make a drink for you.” पुढे वाकून तो बारटेंडर बरोबर काहीतरी कुजबुजला. बारटेंडर मान हलवत बाजूला झाला ,हा काउंटर मागे गेला, सराईता सारखे त्याने वेगवेगळी juices, ड्रिंक्स एकत्र केली, तिच्या कडे बघत बघत तो cocktail शेकर हलवत होता. मिक्सिंग पूर्ण झाल्यावर त्याने शेकर बारटेंडर कडे दिला आणि ड्रिंक सर्व्ह करायला सांगितले.

दोघांनी आपआपले ग्लास चीअर्स करून भिडवले, आणि शुब्बू च्या तोंडून शब्द बाहेर पडले, “ hi, I am Shobhna,” एक खेळकर स्माईल देऊन तो म्हणाला “ glad to meet you shobhna, परीक्षित here”.

पुढे शोभना दर वाक्या आड काहीतरी हिंट देऊन विषय आपल्याला हवा तिकडे वळवायचा प्रयत्न करत होती, आणि परीक्षित तितक्याच सहजपणे हसत विषय बदलत होता. बोलता बोलता त्याची बरीच माहिती तिला कळत गेली, गेली १०-१५ वर्षे तो अमेरिकेत होता, तिकडच्या प्रख्यात विद्यापीठात सायकोलॉजी शिकवत होता, विद्यार्थीदशेत त्याने बारटेंडर चे काम सुद्धा केले होते.

अचानक तो म्हणाला “ इकडे खूप आवाज आहे, तू माझ्या घरी का येत नाहीस.माझ्याकडे या विषयावर खूप इंटरेस्टिंग बुक कलेक्शन आहे. आपल्याला नीट बोलता येईल”.
तो पर्यंत दोघांचीही २- २ ड्रिंक्स संपली होती. शोभना चे डोके किंचित हल्लक होऊ लागले होते. पण त्याही परिस्थितीत त्याची घरी येण्याची ऑफर ऐकून तिच्या मनातील नागिणीने परत फणा वर काढला.

“साले.. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी पुरुष काही बदलत नाहीत, आता घेऊन जाईल हा कोणत्यातरी हॉटेलात निर्लज्जपणे... आता तू आहेस आणि मी आहे...,” तिच्या मनात स्वगत सुरु झाले.

दोघे डिस्क मधून बाहेर यायला निघाले, त्याने मोबाईल वरून फोन करून आपली गाडी मागवली.
हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचेपर्यंत काळी BMW त्यांची वाट पहात होती.शोभना आणि परीक्षित मागच्या सीट वर बसले. लांबून पक्या हे सारे पाहत होता, दरम्यात कावेरीला फोन करून घरी काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेतला होता , हि मुलगी शोभनाच आहे या बद्दल त्याची खात्री झाली होती. आता फक्त या गाडीचा पाठलाग करायचा आणि संधी मिळताच त्या पोराला हाणायचा, शोभनाला गाडीवर घालायचे आणि थेट दादा समोर उभे करायचे असा त्याने पक्का प्लान बनवून टाकला

हॉटेलच्या ड्राईव्ह वे मधून त्यांची गाडी बाहेर पडली, पक्या थोडे अंतर ठेऊन तिचा पाठलाग करु लागाला, आणि अचानक त्याला जाणवले अजून २ मोटरसायकल्स कायम त्या गाडी बरोबर चालत आहेत. त्या बाईक्सवरची माणसे पाहूनतरी ती सीध्या धंद्यात असतील असे त्याला वाटले नाही.हा काहीतरी मोठा गेम चालू होता, ,कोणत्यातरी सिग्नलपाशी गाडीवर हल्ला करायचा प्लान त्याने पूर्ण माहिती मिळेपर्यंत सोडून द्यायचे ठरवले.

पंधरा मिनिटाच्या ड्राईव्हनंतर car एका एकमजली घरापुढे उभी राहिली. वॉचमनने घराचे गेट उघडले आणि गाडी आत गेली दोन्ही बाईक्स विरुद्ध फुटपाथवर थोड्या लांब थांबल्या. थोडे जवळ जाऊन पक्याने घरावरची पाटी वाचली “सुप्रिया कुरु” आता त्याच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला, त्याच्या डोक्यात चक्रे वेगाने फिरू लागली, त्याला कारणही तसेच होते.

सुप्रिया कुरु, हि सत्तरीच्या दशकातील बऱ्यापैकी नाव असणारी अभिनेत्री होती, करिअरची गाडी व्यवस्थित धावत असताना, तिचे नाव गणेश माळवदकर बरोबर जोडले गेले. गणेश माळवदकर हे मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील मोठे नाव, अक्ख्या मुंबईमध्ये याचे राज्य चालत असे. दारू, सोने, इलेक्ट्रोनिक्स च्या स्मगलिंग मध्ये भाईने बराच जम बसवला होता. सुप्रियाला झालेला मुलगा हा गणेश भाईपासून झालेला आहे अशी वदंता इंडस्ट्री मध्ये होती. पुढे सुप्रियाच्या करिअर ची गाडी उतरणीस लागली आणि ती मुलाला घेऊन परदेशी निघून गेली. तसेही ऐंशीच्या दशकात लग्न न झालेल्या बाईने मुल होऊ देणे हि समाजमान्य घटना नव्ह्तीच .

इकडे बदलत्या काळाप्रमाणे गणेश आता फिल्म प्रोडक्शन, रिअल इस्टेट वगैरे मोठ्या कामात हात घालु लागला होता, व्हाईट कॉलर धंद्यामध्ये असताना हातभट्टी, स्मगलिंग चे धंदे सांभाळणे त्याला अडचणीचे ठरू लागले, दादा सारख्या लहान गुंडांनी ते धंदे बळकावले. दादाने आपली सुरवात गणेश भाई कडेच केली होती, म्हणजे एका अर्थाने दादा गणेशभाई चा चेला होता आणि प्रतिस्पर्धी सुद्धा. इंडस्ट्री च्या शिरस्त्या प्रमाणे सुप्रिया आता चरित्र नायिका म्हणून पुनरागमन करत होती आणि त्या चित्रपटाचे निर्माते होते एम.गणेश

सुप्रिया कुरुच्या घरातील लोकांच्या संरक्षणासाठी गणेश भाईची लोक असणे अगदी नैसर्गिक गोष्ट होती.

शोभना आणि परिक्षितने घरात प्रवेश केला, प्रशस्त दिवाणखान्यातच्या कोपर्यात एक प्रौढ स्त्री काही तरी वाचत होती, तिला पाहताच परिक्षित पुढे गेला , “ मां, आप अभी तक सोयी नही? किती वेळा सांगितले आहे, माझ्यासाठी जगात बसू नकोस म्हणून”.

“ और मैने कितनी बार बताया, अगर देर होनी है तो फोन किया करो.” ती स्त्री म्हणाली बोलता बोलता तिचे लक्ष शोभनाकडे गेले आणि ती थबकली.

“mom, meet my friend, shobhna.” And “ shobhna, my mom” परीक्षितने ओळख करून दिली.
अचानक शोभनाला आपल्या कपड्यांची जाणीन झाली, आणि ती अवघडली. ऑफ शोल्डर ड्रेस चा गळा सारखा करायचा प्रयत्न करू लागली.

“its ok बेटा, समझती हुं मै, डिस्को मै कोई साडी पेहेनके थोडी जाता है?” सुप्रिया मंद स्मित करत म्हणाली. परीक्षित कडे वळत ती म्हणाली “ मी आता झोपायला जातेय, तुझीच वाट बघत बसले होते, आणि हो, रात्र खूप झालीये हिला ड्रायव्हर बरोबर एकटीला पाठवू नकोस, तू पण बरोबर जा,”
इतका मोठा झाला तरी आई ला वाटणारी मुलाची काळजी, त्यांच्यातील स्नेह, पूणर्पणे अनोळखी असणाऱ्या सुप्रियाची काळजी पाहून शोभना गलबलली. आईच्या आठवणी उसळी मारून वर येऊ लागल्या.

एका प्रशस्त जिन्याने ते वर गेले, परीक्षितने दिवे on केले, खोलीच्या मध्यभागी लावलेले झुंबर प्रकाशमान झाले. तो खालच्या सारखाच पण थोडा छोटा hall होता, एक भिंत पूर्णपणे पडद्यांनी झाकली होती, आणि उरलेल्या तीन भिंतींवर पुस्तकांनी खच्चून भरलेली कपाटे होती.

“माझी स्टडी” तो म्हणाला

स्टडी च्या एका बाजूला सोफे ठेवले होते. शोभना त्यातल्या एका सोफ्यावर बसली.

समोरच्या रस्तावर उभ्या असणाऱ्या पक्याला, वरच्या मजल्यावरच्या खोलीत दिवा लागल्याचे, खिडक्यांना जाड पडदे असूनही जाणवले.दादांची मुलगी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या मुलाच्या बेडरूम मध्ये आहे या विचाराने पक्याला घाम फुटला, काय वाट्टेल ते करून शोभनाला यातून काढले पाहिजे हे त्याला जाणवले. घरी दादांना फोन करून विचारायची सोय नव्हती, पहारा देण्यात ढिलाई केल्या बद्दल आधी पक्याची साले निघाली असती आणि नंतर त्या वणव्यात शोभना पण जळाली असती.

पक्याने हे सर्व आपल्या पातळीवर हाताळायचे ठरवले.

पुढचा भाग अंतिम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरा चाललीय कथा..
हा भाग चुकून ओरिजिनल आयडी लॉगिन ने टाकला गेला बहुतेक ☺️.. फॉर नेक्स्ट पार्ट..सिमबा/डोनाल्ड

मस्त जमलाय भाग. पण विशाल भारद्वाजचा संबंध अजूनही लक्षात नाही आला.

भारतातल्या चालूघडामोडी किंवा राजकारण ह्यात तुमचे काही काळ प्रतिसाद दिसले नाही की समजायचे काही तरी लेख /मुलाखत / गोष्ट लिहिण्याच्या तयारीत आहात... Happy
मागे असेच थोड्या काळ प्रतिसाद दिसले नव्हते तुमचे, तेंव्हाही एक मुलाखत लिहिली होतीत तुम्ही.

भारद्वाज जसं एखादी पुर्वीची कथा आजच्या काळात, आजचे संदर्भ घालून करतो तसं म्हणायचं आहे बहुतेक त्याला.
किंवा कंबरबॅचचा शेरलॉक किंवा फाफे मुव्ही.
सिम्बा, सुरुवातीला तू ही कथा कुठल्यातरी दुसऱ्या कथेवरून आजच्या संदर्भात लिहिली आहेस असं लिहिलेलंस. मला संदर्भ समजलेला नाही त्यामुळे ही कथा एक सेपेरेट कथा म्हणून वाचली. मला पण या कथेला न्याय देता येईल असं टायटल हवं असं वाटलं.
भारद्वाज संदर्भाची काही गरज वाटली नाही. तो ठेवायचा असेल तर मूळ टायटल आणि जोड टायटल म्हणून 'भारद्वाज स्पर्श' असलं काही ठेवू शकतोस Proud

कडक चालू आहे... आणि अंतिम भागाआधी उत्कंठापूर्ण वळणावर...
पहिल्या भागानंतर पुढचे तीन आज एकत्रच वाचले Happy

त्यांनी सुरुवातीला लिहिले होते की कोणत्या कथेवरून ही कल्पना सुचली ते. तीही कथा छान आहे, जरुर वाचा.
https://www.maayboli.com/node/64632
अर्थात ही कथा स्वतंत्रपणेही पाहिली तरी सुरेखच जमली आहे याला +१!

तिकडची कथा आताच वाचून आलोय.. मस्त आहे!
तुम्ही ईथे विशाल भारद्वाज लिहीत आहात, तिथे भन्सालीला बघून आलो Happy

परिक्षीतच आणलात Happy
इतकं छान लिहिलंय नी लिहीता येत नाही म्हणता!
आता शेवट कसा होतोय याबाबत फार उत्सुकता लागलीय.

ओह डोनाल्ड डक म्हणजे सिम्बा तुम्ही होय!!
तुम्हाला हे ही येतं माहीत नव्हतं.

मस्त चालू आहे!
काय महित का पण मला वाटतंय दुःखी शेवट असणार Sad