योग ध्यानासाठी सायकलिंग ८: सातारा- कास पठार- सातारा

Submitted by मार्गी on 8 December, 2017 - 09:55

ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर

योग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई

योग ध्यानासाठी सायकलिंग ५: चौथा दिवस- वाई- महाबळेश्वर- वाई

योग ध्यानासाठी सायकलिंग ६: पाचवा दिवस- वाई- सातारा- सज्जनगड

योग ध्यानासाठी सायकलिंग ७: सहावा दिवस- सज्जनगड- ठोसेघर- सातारा

८: सातारा- कास पठार- सातारा

ह्या मोहीमेचा संबंध ध्यान- योगाशी कशा प्रकारे आहे, हे इथे वाचता येईल.

४ ऑक्टोबरची सकाळ. आज ह्या प्रवासाचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा! साता-यातील प्रसिद्ध कास पठार बघायचं आहे. महाराष्ट्रातलं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स! ह्या रोमँटीकेस्ट प्रवासातला हा सर्वोच्च बिंदू असणार! आजसुद्धा सुमारे ५२ किलोमीटर सायकल चालवेन आणि त्यात अर्ध्या रस्त्यावर चढ असेल आणि परत येताना उतार असेल.

साता-यातून निघाल्यावर लगेचच यवतेश्वर डोंगराचा घाट सुरू झाला. इथे एका जागेवर सज्जनगडाच्या बाजूचे डोंगरही दिसत आहेत. चढ चांगलाच आहे, पण आरामात जातोय. काहीच अडचण नाही आहे. साता-यामधील प्रसिद्ध मिलिटरी शाळेमधील ऑर्डर्स इथे ऐकू येत आहेत! खूप लोक मॉर्निंग वॉक करणारे दिसत आहेत. साता-याच्या पाच- सहा किलोमीटर पुढेही ते दिसत आहेत. एका ठिकाणी अतिशय उत्साहवर्धक दृश्य दिसलं- एक सायकलिस्ट एका जागी बसून ध्यान करत होता! हा तर ह्या योग- ध्यानासाठीच्या सायकलिंगचा रोल मॉडेल! त्यांच्याशी थोडं बोलायला गेलो, तर ते खरंच ध्यानमग्न असावेत! एक क्षण डोळे उघडून त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि परत डोळे मिटले! वा!

लवकरच ती जागा आली जिथे रस्त्याचा काही भाग खचला होता. बातम्यांमध्ये अगदी सांगत होते की, अर्धा रस्ता खचलाय. पण थोडाच भाग खचला होता. हिमालयात अशा रस्त्यांवरून खूप चाललोय, त्यामुळे इथून जाताना काहीच वाटलं नाही. पण ह्या तथा कथित खचलेल्या रस्त्यामुळे एक गोष्ट मस्त झालीय की, फक्त छोट्या गाड्याच रस्त्यावर येतील. म्हणजेच मला खूप मोठ्या प्रमाणात सुनसान रस्ता मिळणार! वा! यवतेश्वर डोंगर पार होता होता वातावरण अगदी मस्त झालंय. नजारे तर अद्भुत आहेतच. पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस नाही. थंडी हवा सुरू झाली! महाबळेश्वरमध्ये जे नव्हतं, ते इथे आहे. इतक्या सुंदर वातावरणात सायकल चालवतोय!

हळु हळु रस्ता आणखी निर्जन भागातून जातोय. मध्ये मध्ये काही हॉटेल व रेसॉर्ट होते. त्यानंतर तर काहीच नाही! पण आता मला नाश्ता करायचा आहे. हवं तसं हॉटेल मिळत नाहीय. एका बाजूला उरमोडी नदीवरचं धरण दिसतंय तर दुसरीकडे आणखी एक दरी व डोंग़र. म्हणजे हा रस्ता आता धारेवरून पुढे जाईल, दोन्हीकडे व्हॅली दिसेल! बराच वेळाने काही हॉटेल आले, पण ते सगळे हाय फाय होते. त्यामुळे पुढे गेलो. लवकरच साधसं हॉटेल मिळेल आणि मिळालं. इथे दोन वडे व चहा- बिस्किट नाश्ता केला. सकाळपासून दिड तासांत सुमारे पंधरा किलोमीटर आलोय. इथून कास पठार दहा- अकरा किलोमीटर सेल. चढ असल्यामुळे जास्त वेळ लागतोय, पण येताना कव्हर होईल. नजा-यांबद्दल कसं‌ सांगू! ही झलक पाहा!

कास पठार जवळ येतंय तसे नजारे आणखीनच सुंदर होत आहेत. थंड वातावरण आहे. हा भाग सुद्धा १००० मीटर पेक्षा जास्त उंचीवर आहे. त्याबरोबरच अतिशय मस्त रस्ता आणि किरकोळ ट्रॅफिक! आता ह्याचं वर्णन शब्दांमध्ये जास्त करत नाही.

दीवाना हुआ बादल सावन की घटा छाई
यह देख के दिल झूमा ली प्यार ने अंगडाई
दिल आज ख़ुशी से पागल है
ऐ जान ए वफ़ा तुम खूब मिले

कास पठारामध्ये पर्यटक शुल्क शंभर रूपये होतं, पण सायकल बघून माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. इथे बघण्यासारखं व फिरण्यासारखं तर खूप आहे. आणि खरी फुलं तर ह्या व्हॅलीमध्ये आत पायी फिरूनच बघता येतात. पण मला परत जाऊन कामसुद्धा करायचं आहे. त्यामुळे फक्त रस्त्यावर दिसणारी फुलंच बघितली. थोडं पुढे जाऊन कास तलावावर गेलो. मध्ये मध्ये तीव्र चढ व उतार आहेत. कास पठारावर पोहचलो तेव्हा वाटलं की, ह्या पूर्ण मोहीमेचा हाच परमोच्च बिंदू आहे! वेळ कमी असल्याने लगेचच परत फिरलो. पण वाटेत दिसणा-या सुंदर फुलांनी सारखं थांबून फोटो घ्यायला भाग पाडलं. काही सुंदर फुलं रस्त्यावरही दिसली. कष्टपूर्वक तिथून पुढे निघालो. जाताना चढावामुळे २५ किलोमीटरला तीन तास लागले होते, परत जाताना हेच अंतर दिड तासांमध्ये पूर्ण झालं आणि अकरापर्यंत मी साता-यामध्ये पोहचलो. पण काय जबरदस्त दृश्ये होती! आजचा दिवस ह्या रोमँटीकेस्ट प्रवासातला परम रोमँटिकेस्ट होता!

ये रात ये खामोशी, ये ख्व़ाब से नज़ारें
जुगनू हैं या जमीं पर उतरे हुए हैं तारें
बेख़ाब मेरी आँखे, मदहोश है ज़माना
मौसम है आशिकाना…

आता फक्त एकच बघायचं राहिलं आहे- अजिंक्यतारा किल्ला! उद्या तो बघून परत जाईन. पण सातारा बघताना हेच वाटतंय सारखं- ये सातारा वो तारा हर तारा! देखो जिधर भी लगे है प्यारा! अब बाकी रहा सिर्फ अजिंक्यतारा!


यवतेश्वरवरून दिसणारं सातारा शहर आणि अजिंक्यतारा


आज एकूण ५१ किलोमीटर सायकल चालवली व चढ ११४१ मीटर होता.

पुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग ९ (अंतिम): अजिंक्यतारा किल्ला व परत

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत- www.niranjan-vichar.blogspot.in

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.. इतक्या वेळा जाउनही कास राहिलच..
अजिंक्यतारा मात्र दर भेटीत ठरलेलाच.. वृत्तांत लिहा.. छान लिहीता शिवाय फोटो पहायला मिळतात.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!