एक अपघात व काही प्रश्न

Submitted by बेफ़िकीर on 7 December, 2017 - 05:07

मित्राच्या मुलाचा लहानसा अपघात झाला. तो सकाळी दुचाकीवरून क्लासला चाललेला होता. पूर्ण उजाडलेले नव्हते. एका अरुंद रस्त्यावर समोरून लांबून एक गाडी आली व अंधार असल्याने त्या गाडीवाल्याने मोठा लाईट लावला. त्या प्रकाशझोतामुळे मित्राच्या मुलाने स्वतःची दुचाकी जरा बाजूला घेतली. तेवढ्यात एका सोसायटीच्या गेटमधून ए पंचाहत्तर वर्षांचे वॉचमन गृहस्थ कानांना हेडफोन लावून बाहेर पडले व तरातरा चालत रस्त्यात आले. त्यांना हा मुलगा धडकला व पडला. त्याने हेल्मेट घातलेले होते. तसेही त्याला किरकोळ खरचटण्यापलीकडे काही झाले नाही. म्हातार्‍या वॉचमनना मात्र तीन फ्रॅक्चर्स झाली. बाकी ती मोठा लाईट लावणारी गाडी तिथे थांबलीच नाही. सोसायटीतील धावून आलेल्या लोकांनी कोणताही धाकदपटशा न करता मुलाला व वॉचमन काकांना धीर दिला व मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलणे करून घेतले व त्यांना त्या स्थळी बोलावले.

माझा मित्र त्वरीत तिकडे धावला. त्याने घाबरलेल्या आपल्या मुलाला क्लासला जायला रिक्षा करून दिली. त्यानंतर वॉचमन काकांचा मुलगा आला. तोही फार काही अरेरावी वगैरे करतच नव्हता. त्याचे म्हणणे इतकेच की त्याच्या वडिलांचा संपूर्ण खर्च माझ्या मित्राने करावा. माझ्या मित्राचे म्हणणे असे की थोडी थोडी चूक दोघांची आहे तेव्हा खर्च विभागला जावा. बाकी पोलिसांत तक्रार करण्याची आवश्यकता नसून आपापसात मिटण्याचे दोन्हीकडून ठरले.

आता त्यातल्यात्यात साध्यासुध्या हॉस्पीटलला नेले तर एक मेजा फ्रॅक्चर आणि दोन लहान फ्रॅक्चर्स असल्याचे समजले. तेथील डॉक्टरांनी सर्जरी करायला लागेल असे सांगितले. चोवीस तास निरिक्षण करून मग सर्जरी करायचे ठरले. दरम्यान काकांचे वय ७५ असल्याने इतर सर्व चाचण्याही करून घेतल्या गेल्या. त्यांना फक्त थोडा उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे त्यांचा मुलगा म्हणाला.

दुसर्‍या दिवशी सर्जरी जिथे करायची ठरली होती ते हॉस्पीटल निराळेच होते कारण ह्या हॉस्पीटलमध्ये ती सोय नव्हती. हे डॉक्टर त्या दुसर्‍या हॉस्पीटलशी निगडीत होते व स्वतःच सर्जरी करणार होते. त्यानुसार संध्याकाळी पेशंटला त्या दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

त्या दुसर्‍या हॉस्पीटलच्या बाहेर एक मोठा बोर्ड होता व त्यावर लिहिले होते की केशरी व पिवळे रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात काय काय मिळू शकते. त्या यादीत अपघाती केसेस व फ्रॅक्चर / सर्जरी हे सर्व होते. ती राजीव गांधी योजना होती.

आत गेल्यावर चौकशी केल्यावर समजले की ह्या पेशंटला राजीव गांधी योजना लागू होणार नाही. कारण विचारल्यावर सांगण्यात आले की ते आधीच ठरवावे लागते. त्यावर आम्ही म्हणालो की आधीच तर ठरवत आहोत आम्ही! त्यावर एक अतिशय तुसडेपणाने वागणारी ज्युनियर डॉक्टर म्हणाली की ह्यांना राजीव गांधी योजना लागू होते का नाही हे बघायचे असेल तर उद्या सकाळपर्यंत आम्ही ह्यांना नुसते ठेवून घेणार. काही ट्रीटमेन्ट देणार नाही. त्यांना मधेच काही झाले तर आमची जबाबदारी नाही. तुम्ही उद्या सकाळी राजीव गांधी योजनेच्या काऊंटरवरील माणसाला भेटून काय ते ठरवा. ती पुढे असेही म्हणाली की जे डॉक्टर सर्जरी करणार आहेत त्यांचाही राजीव गांधी योजनेत रुग्णाला अ‍ॅडमीट करायला विरोध आहे.

प्रश्न पैशांचा होता. सुमारे पंचाऐशी हजार रुपये खर्च येणार म्हंटल्यावर काही सवलत मिळते का हे बघणे नक्कीच योग्य होते. पेशंटच्य अमुलाचे म्हणणे काहीच नव्हते. तो म्हणत होता की ती योजना त्याच्या वडिलांना लागू होत असेल तर त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे द्यायला तो तयार आहेच. दरम्यान त्या सर्जरीवाल्या डॉक्टरांना समजले की आम्ही असा विचार करत आहोत. त्यांचा त्या तुसड्या मुलीकडे फोन आला त्यावर मी त्यांच्याशी बोललो. राजीव गांधी योजना ह्या पेशंटला लागू होईल की नाही हे बघणे दूरच राहिले, मुळात ते म्हणाले की ते त्यात काहीही सहकार्य करणार नाहीत. तीन, चार वेळा कारण विचारल्यावर त्यांनी खरे कारण सांगितले की राजीव गांधी योजनेतील सर्जरी ते करत नाहीत. हे सांगताना त्यांनी अतिशय वैतागलेला आणि चिडलेला स्वर वापरला. त्यावरून हा काहीतरी पैशांबाबतचा प्रश्न असणार इतके आम्हाला कळले. एखादा डॉक्टर जेव्हा म्हणतो की ;असे असे असेल तर तुमचे तुम्ही पाहा हं'तेव्हा त्यातील गर्भित धमकी एखाद्या सामान्य माणसाला बिचकवायला पुरेशी असते. आम्ही आपले 'नाही नाही, थेट तुमच्या मतानुसारच ऑपरेशन करू'असे बोलून टाकले आणि मोकळे झालो. हे पाहून त्या तुसड्या मुलीला आणखीनच चेव आला. पण आम्ही मुळातच मान्य केलेले असल्याने आम्ही तिच्याकडे दुर्लक्षच केले.

त्यानंतर काही कारणारे तेथील अ‍ॅडमिन हेडशी विस्तृत बोलणे झाले त्यात असे समजले की डॉक्टरांनी त्यांनाच फोन करून एकुण खर्च किती होईल हे विचारले होते. त्यावर त्या दोघांमध्ये पाच दिवसांचा स्टे, भूलतज्ञाची फी आणि सर्जरी हे मिळून पासष्ट हजार रुपयांचे पॅकेज ठरल्याचे समजले. औषधे वगैरे सुमारे पंधरा हजार रुपयांची वेगळी! शिवाय ह्या पेशंटला मल्टिपल फ्रॅक्चर्स असल्याने राजीव गांधी योजना लागूच होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

शेवटी त्यांच्या नियमाप्रमाणे निम्मे, म्हणजे साडे बत्तीस हजार मित्राने भरले. दरम्यानच्या काळात आलेला प्रत्येक लहानसहान खर्च (अँब्युलन्स, एक्स रे, टेस्ट्स इत्यादी) मित्रानेच केलेला होता. पेशंटच्या मुलाने खिशात हातही घातला नाही. बिल समोर आले की तो मित्राला म्हणत असे 'जरा हे सेटल करून टाका, ते सेटल करून टाका'! शिवाय घरच्या अडचणी सांगत होता की त्याला दोन भाऊ आहेत पण त्यांच्याशी त्याचे संबंध विशेष नाहीत. त्याची आई केव्हाच वारलेली आहे. म्हातार्‍या वडिलांचे करायला कोणतीच सून तयार होईल असे वाटत नाही. त्यांचे करणार कोण, वगैरे! ह्या माणसाकडे एक टूरिस्ट कार आहे आणि त्याने ती एका कंपनीला काँट्रॅक्टवर दिलेली आहे.

हे सगळे बघून काही प्रश्न पडले आहेत.

१. समोरचा माणूस खर्च करायला तयार आहे हे ठीक आहे. पण आपलेही वडील आहेत हे बघता किमान काही खर्च करायला मुलाने तयार व्हायला नको का? समजा हा माझा मित्र धाकदपटशा दाखवणारा असता तर त्या माणसाने वडिलांचे काय केले असते? त्याच्या उलट, तो माणूस अरेरावी करणारा असता तर मित्रावर काय परिस्थिती आली असती?

२. आपल्याकडे असलेल्या योजना ह्या नक्की कितपत उपयुक्त असतील ह्याची एक चुणुक बघायला मिळाली की काय असे वाटले. मागेही एकदा एका गरीब नर्सचा मुलगा हडपसरच्या नोबल हॉस्पीटलमध्ये भरती झाला तेव्हाही राजीव गांधी योजना लागूच होऊ शकलेली नव्हती. ही व अशा काही योजना लागू होण्यासाठीच्या पात्रता बर्‍याच क्लिष्ट आहेत. शैक्षणिक क्षेत्रात असलेली सावित्रीबाई फुले ही योजना म्हणजे आनंदच आहे. स्कॉलरशिपचे पैसे येतच नाहीत आणि आले तरी चार पाच वर्षांनी येतात म्हणे! तोवर मुलीचे पुढचे सगळे शिक्षण संपलेले असते व लग्नही झालेले असते.

३. घरातील माणसांचा विमा उतरवणे ही एक किमान बाब आजही इतकी अपरिचित आणि दुर्लक्षणीय का असावी?

४. डॉक्टर लोकांमध्ये असलेल्या व्यावसायिकता आणि सेवाभाव ह्यांचे संतुलन धोकादायक दिशेला झुकत असावे का? मध्यंतरी 'कट प्रॅक्टिस'वर बरेच छापून आलेले होते. पैसा मिळावाच, पण वागणूक आणि भाषाशैलीही पैसाकेंद्रीत होत आहे का, असे वाटते. दरवर्षी पोत्याने ओतल्या जाणार्‍या डॉक्टरांची संख्या आणि स्पर्धा ही कारणे आहेत का?

==========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते तिकडे एक वकील आहेत माझ्यामुळे फेमस होऊ घातलेले. तेवढे पुरेत. मला कशाला भरीस पडताय<<
>>आ.रा.रा. मला का खेचता इथे..

डॉक्टर आपल्या समाजातूनच येतात. त्यामुळे तुम्ही ज्या समाजात, ज्या गावात, ज्या शहरात राहतात तिथे बहुसंख्य लोक ज्या संस्कृतीला अनुसरून नांदत असतात तसे तुम्हाला डॉक्टर भेटतात. एवढे साधे आहे हे.

जर तुम्हाला बहुसंख्य अनुभव वाईट येत असतील तर तुम्ही राहत असलेला समाज बदला, गाव बदला, शहर बदला, देश बदला...

बदला म्हणजे सोडून जा.. एकट्याने बदल घडवण्याच्या भानगडीत पडू नका Happy

मला का खेचता इथे
<<
तुम्हाला नाही. वरचे राज नामक व्यक्तीचे प्रतिसाद वाचा. माबो अजून नवी आहे तुम्हाला.

>>मला का खेचता इथे
<<
तुम्हाला नाही. वरचे राज नामक व्यक्तीचे प्रतिसाद वाचा. माबो अजून नवी आहे तुम्हाला.
Submitted by आ.रा.रा. on 11 December, 2017 - 11:46<<

आँ! तरीच मला उचकि लागत होती मघाशी. माझी आठवण, मी या धाग्यावर पायधुळ न झाडताहि आली काय तुम्हाला?.. Lol

Pages