एक अपघात व काही प्रश्न

Submitted by बेफ़िकीर on 7 December, 2017 - 05:07

मित्राच्या मुलाचा लहानसा अपघात झाला. तो सकाळी दुचाकीवरून क्लासला चाललेला होता. पूर्ण उजाडलेले नव्हते. एका अरुंद रस्त्यावर समोरून लांबून एक गाडी आली व अंधार असल्याने त्या गाडीवाल्याने मोठा लाईट लावला. त्या प्रकाशझोतामुळे मित्राच्या मुलाने स्वतःची दुचाकी जरा बाजूला घेतली. तेवढ्यात एका सोसायटीच्या गेटमधून ए पंचाहत्तर वर्षांचे वॉचमन गृहस्थ कानांना हेडफोन लावून बाहेर पडले व तरातरा चालत रस्त्यात आले. त्यांना हा मुलगा धडकला व पडला. त्याने हेल्मेट घातलेले होते. तसेही त्याला किरकोळ खरचटण्यापलीकडे काही झाले नाही. म्हातार्‍या वॉचमनना मात्र तीन फ्रॅक्चर्स झाली. बाकी ती मोठा लाईट लावणारी गाडी तिथे थांबलीच नाही. सोसायटीतील धावून आलेल्या लोकांनी कोणताही धाकदपटशा न करता मुलाला व वॉचमन काकांना धीर दिला व मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलणे करून घेतले व त्यांना त्या स्थळी बोलावले.

माझा मित्र त्वरीत तिकडे धावला. त्याने घाबरलेल्या आपल्या मुलाला क्लासला जायला रिक्षा करून दिली. त्यानंतर वॉचमन काकांचा मुलगा आला. तोही फार काही अरेरावी वगैरे करतच नव्हता. त्याचे म्हणणे इतकेच की त्याच्या वडिलांचा संपूर्ण खर्च माझ्या मित्राने करावा. माझ्या मित्राचे म्हणणे असे की थोडी थोडी चूक दोघांची आहे तेव्हा खर्च विभागला जावा. बाकी पोलिसांत तक्रार करण्याची आवश्यकता नसून आपापसात मिटण्याचे दोन्हीकडून ठरले.

आता त्यातल्यात्यात साध्यासुध्या हॉस्पीटलला नेले तर एक मेजा फ्रॅक्चर आणि दोन लहान फ्रॅक्चर्स असल्याचे समजले. तेथील डॉक्टरांनी सर्जरी करायला लागेल असे सांगितले. चोवीस तास निरिक्षण करून मग सर्जरी करायचे ठरले. दरम्यान काकांचे वय ७५ असल्याने इतर सर्व चाचण्याही करून घेतल्या गेल्या. त्यांना फक्त थोडा उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे त्यांचा मुलगा म्हणाला.

दुसर्‍या दिवशी सर्जरी जिथे करायची ठरली होती ते हॉस्पीटल निराळेच होते कारण ह्या हॉस्पीटलमध्ये ती सोय नव्हती. हे डॉक्टर त्या दुसर्‍या हॉस्पीटलशी निगडीत होते व स्वतःच सर्जरी करणार होते. त्यानुसार संध्याकाळी पेशंटला त्या दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

त्या दुसर्‍या हॉस्पीटलच्या बाहेर एक मोठा बोर्ड होता व त्यावर लिहिले होते की केशरी व पिवळे रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात काय काय मिळू शकते. त्या यादीत अपघाती केसेस व फ्रॅक्चर / सर्जरी हे सर्व होते. ती राजीव गांधी योजना होती.

आत गेल्यावर चौकशी केल्यावर समजले की ह्या पेशंटला राजीव गांधी योजना लागू होणार नाही. कारण विचारल्यावर सांगण्यात आले की ते आधीच ठरवावे लागते. त्यावर आम्ही म्हणालो की आधीच तर ठरवत आहोत आम्ही! त्यावर एक अतिशय तुसडेपणाने वागणारी ज्युनियर डॉक्टर म्हणाली की ह्यांना राजीव गांधी योजना लागू होते का नाही हे बघायचे असेल तर उद्या सकाळपर्यंत आम्ही ह्यांना नुसते ठेवून घेणार. काही ट्रीटमेन्ट देणार नाही. त्यांना मधेच काही झाले तर आमची जबाबदारी नाही. तुम्ही उद्या सकाळी राजीव गांधी योजनेच्या काऊंटरवरील माणसाला भेटून काय ते ठरवा. ती पुढे असेही म्हणाली की जे डॉक्टर सर्जरी करणार आहेत त्यांचाही राजीव गांधी योजनेत रुग्णाला अ‍ॅडमीट करायला विरोध आहे.

प्रश्न पैशांचा होता. सुमारे पंचाऐशी हजार रुपये खर्च येणार म्हंटल्यावर काही सवलत मिळते का हे बघणे नक्कीच योग्य होते. पेशंटच्य अमुलाचे म्हणणे काहीच नव्हते. तो म्हणत होता की ती योजना त्याच्या वडिलांना लागू होत असेल तर त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे द्यायला तो तयार आहेच. दरम्यान त्या सर्जरीवाल्या डॉक्टरांना समजले की आम्ही असा विचार करत आहोत. त्यांचा त्या तुसड्या मुलीकडे फोन आला त्यावर मी त्यांच्याशी बोललो. राजीव गांधी योजना ह्या पेशंटला लागू होईल की नाही हे बघणे दूरच राहिले, मुळात ते म्हणाले की ते त्यात काहीही सहकार्य करणार नाहीत. तीन, चार वेळा कारण विचारल्यावर त्यांनी खरे कारण सांगितले की राजीव गांधी योजनेतील सर्जरी ते करत नाहीत. हे सांगताना त्यांनी अतिशय वैतागलेला आणि चिडलेला स्वर वापरला. त्यावरून हा काहीतरी पैशांबाबतचा प्रश्न असणार इतके आम्हाला कळले. एखादा डॉक्टर जेव्हा म्हणतो की ;असे असे असेल तर तुमचे तुम्ही पाहा हं'तेव्हा त्यातील गर्भित धमकी एखाद्या सामान्य माणसाला बिचकवायला पुरेशी असते. आम्ही आपले 'नाही नाही, थेट तुमच्या मतानुसारच ऑपरेशन करू'असे बोलून टाकले आणि मोकळे झालो. हे पाहून त्या तुसड्या मुलीला आणखीनच चेव आला. पण आम्ही मुळातच मान्य केलेले असल्याने आम्ही तिच्याकडे दुर्लक्षच केले.

त्यानंतर काही कारणारे तेथील अ‍ॅडमिन हेडशी विस्तृत बोलणे झाले त्यात असे समजले की डॉक्टरांनी त्यांनाच फोन करून एकुण खर्च किती होईल हे विचारले होते. त्यावर त्या दोघांमध्ये पाच दिवसांचा स्टे, भूलतज्ञाची फी आणि सर्जरी हे मिळून पासष्ट हजार रुपयांचे पॅकेज ठरल्याचे समजले. औषधे वगैरे सुमारे पंधरा हजार रुपयांची वेगळी! शिवाय ह्या पेशंटला मल्टिपल फ्रॅक्चर्स असल्याने राजीव गांधी योजना लागूच होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

शेवटी त्यांच्या नियमाप्रमाणे निम्मे, म्हणजे साडे बत्तीस हजार मित्राने भरले. दरम्यानच्या काळात आलेला प्रत्येक लहानसहान खर्च (अँब्युलन्स, एक्स रे, टेस्ट्स इत्यादी) मित्रानेच केलेला होता. पेशंटच्या मुलाने खिशात हातही घातला नाही. बिल समोर आले की तो मित्राला म्हणत असे 'जरा हे सेटल करून टाका, ते सेटल करून टाका'! शिवाय घरच्या अडचणी सांगत होता की त्याला दोन भाऊ आहेत पण त्यांच्याशी त्याचे संबंध विशेष नाहीत. त्याची आई केव्हाच वारलेली आहे. म्हातार्‍या वडिलांचे करायला कोणतीच सून तयार होईल असे वाटत नाही. त्यांचे करणार कोण, वगैरे! ह्या माणसाकडे एक टूरिस्ट कार आहे आणि त्याने ती एका कंपनीला काँट्रॅक्टवर दिलेली आहे.

हे सगळे बघून काही प्रश्न पडले आहेत.

१. समोरचा माणूस खर्च करायला तयार आहे हे ठीक आहे. पण आपलेही वडील आहेत हे बघता किमान काही खर्च करायला मुलाने तयार व्हायला नको का? समजा हा माझा मित्र धाकदपटशा दाखवणारा असता तर त्या माणसाने वडिलांचे काय केले असते? त्याच्या उलट, तो माणूस अरेरावी करणारा असता तर मित्रावर काय परिस्थिती आली असती?

२. आपल्याकडे असलेल्या योजना ह्या नक्की कितपत उपयुक्त असतील ह्याची एक चुणुक बघायला मिळाली की काय असे वाटले. मागेही एकदा एका गरीब नर्सचा मुलगा हडपसरच्या नोबल हॉस्पीटलमध्ये भरती झाला तेव्हाही राजीव गांधी योजना लागूच होऊ शकलेली नव्हती. ही व अशा काही योजना लागू होण्यासाठीच्या पात्रता बर्‍याच क्लिष्ट आहेत. शैक्षणिक क्षेत्रात असलेली सावित्रीबाई फुले ही योजना म्हणजे आनंदच आहे. स्कॉलरशिपचे पैसे येतच नाहीत आणि आले तरी चार पाच वर्षांनी येतात म्हणे! तोवर मुलीचे पुढचे सगळे शिक्षण संपलेले असते व लग्नही झालेले असते.

३. घरातील माणसांचा विमा उतरवणे ही एक किमान बाब आजही इतकी अपरिचित आणि दुर्लक्षणीय का असावी?

४. डॉक्टर लोकांमध्ये असलेल्या व्यावसायिकता आणि सेवाभाव ह्यांचे संतुलन धोकादायक दिशेला झुकत असावे का? मध्यंतरी 'कट प्रॅक्टिस'वर बरेच छापून आलेले होते. पैसा मिळावाच, पण वागणूक आणि भाषाशैलीही पैसाकेंद्रीत होत आहे का, असे वाटते. दरवर्षी पोत्याने ओतल्या जाणार्‍या डॉक्टरांची संख्या आणि स्पर्धा ही कारणे आहेत का?

==========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यामते या योजनेनुसार रुग्णावर झालेला खर्च शासनाकडून वसूल करण्यात डॉक्टर/हॉस्पीटल यांना फार खेटे घालावे लागत असतील, म्हणून हॉस्पीटल अश्या पेशंटवर ह्या योजनेनुसार उपचार करायला टाळत असतील.

राजीव गांधी योजना सगळ्याच हॉस्पीटलात लागू असते की काही विशिष्ट हॉस्पीटलातच?
मेडिक्लेममध्ये जशी नेटवर्क हॉस्पीटलांची यादी मिळते, तशी या योजनेशी संलग्न हॉस्पीटलांची यादी मिळू शकते काय?

बाकी ७५ वर्षे वय असताना त्या काकांना अशी नोकरी करावी लागणे म्हणजे दुर्दैवच Sad

अनेक सोसायट्या अश्या वृद्धांना पैसे वाचवण्यासाठी वॉचमन म्हणून नोकरीवर ठेवतात. जर रात्री अपरात्री दरोडा पडला तर त्या दरोडेखोरांनी हे वयोवृद्ध काय सामना करणार? त्यात त्यांच्या जिवाचे बरे वाईट झाले तर कोण जबाबदार?
मागे दिवेआगरला सोन्याच्या गणपतीची चोरी झाली तेव्हा पहार्‍यावर ठेवलेल्या वृद्ध माणसाचा मृत्यू झाला होता.

पण राजीव गांधी योजने अंतर्गत जे काही उपचार होतात त्याचा खर्च ही योजना चालवणारे उचलतात की. आमच्या ओळखीत असे एक हृदयाचे ऑपरेशन ( अँजीओप्लास्टी ) झालेय की. हे लोक ( रागा योजना) हॉस्पिटल मध्ये प्रत्यक्ष येऊन बघतात की खरेच ऑपरेशन झालेय की नाही. पैसेही तेच भरतात. म्हणजे जो काही उपचाराचा खर्च ठरला असेल तो किंवा त्यातले ७५ टक्क्याच्यावर .

दुसरे म्हणजे ते डॉक जर रागा योजना वापरु पहात नव्हते तर मग दुसर्‍या डॉक कडे का गेले नाहीत?

आणी सर्वात महत्वाचे म्हणजे वॉचमन काकांचे वय ७५ किंवा ७५+ आहे, मग कानात हेडफोन घालुन फॅशनगिरी का केली? की ऐकु येत नसावे म्हणून कानाचे यंत्र होते का ते? की नक्कीच हेडफोन? आणी हेडफोन असेल तर या वयात रस्त्यावर घालुन कशाला? कारण याच वयात उलट ऐकण्याची क्षमता कमी होत जाते. आता तो पोरगा बाईक वर होता म्हणून ठीक आहे. त्याच्या जागी एखादी मोठी चारचाकी असती तर काय झाले असते?

आपला मित्र सेटलमेंट करायच्या मागे का लागला होता?
मी सांगतो,मुलावर गुन्हा दाखल होऊन त्याचे करीअर डाऊन होईल म्हणूनच ना! हे त्या म्हातर्याच्या मुलालाही माहीत होते ,म्हणून त्याने तुमच्या मित्राला पैशासाठी पिळला.
बरं ,आपल्या मित्राच्या मुलाची बाईक कीती सीसी आहे आणि तो काय स्पिडने चालवत होता हे खाजगीत त्याला विचारा.उत्तर मिळेल.
राहीला प्रश्न डॉक्टरांच्या नैतिकतेचा तर ती नैतिकता कुठल्याच व्यवसायात राहीली नाही आहे.मनगटशाहीचा वापर करुन प्रश्न सुटत असेल तर सोडवावा या मतापर्यंत मी आलो आहे.आमच्या सातार्यात एका खाजगी डॉक्टर ने असाच माज करुन एकाला अव्वाच्या सव्वा बिल लावले होते,एव्हढे बिल कसे आले असे विचारल्यावर उर्मट उत्तरे आली.पेशंटने थेट राजेंना फोन लावला,संध्याकाळी राजेंनी भेट दिल्यावर डॉक्टर साहेब "व्यवस्थीत" लाईनवर आले आणि "योग्य" बिल लावले.
झुंडशाहीच्या विरोधात काही करता येत नसेल तर सरळ झुंडशाहीतच सामिल व्हावे .

माझ्यामते या योजनेनुसार रुग्णावर झालेला खर्च शासनाकडून वसूल करण्यात डॉक्टर/हॉस्पीटल यांना फार खेटे घालावे लागत असतील, म्हणून हॉस्पीटल अश्या पेशंटवर ह्या योजनेनुसार उपचार करायला टाळत असतील. >> > मलाही तसेच वाटते. आणि सरकारचे सर्जरीचे रेट डॉक्टरच्या अपेक्षेपेक्षा खुप कमी असतिल.

२ लाख रुपयाचा प्रधान मंत्री अपघात विमा चे प्रिमियम वर्षाला १२ रुपये आहे. लोक १२ रुपये भरु शकत नाही का?
ह्या विमाचे undertaking New India Assurance कडे आहे. जर पोलिस कंप्लेट केली असती तर हा अपघात म्हणुन विमा मिळाला असता. माझा रेग्युलर प्रिमियम भरुन New India Assurance चे क्लेम वेळेवर मिळाले होते. प्रधान मंत्री अपघात विमा मध्ये पण सरकारी कंपनी असल्याने वेळेवर सेटल करत असतिल असे वाटते.

65 का किती हजारांवर भागले हे नशीब समजा आणि विषय सोडून टाका. त्या आजोबांचे काही बरेवाईट झाले असते तर मुलावर मनुष्यवधाचा खटला झाला असता. पोलीस complaint केली असती तर क्लास-कॉलेज सगळं सोडून पोलीस चे खेटे घालावे लागले असते. दरवेळेस काही सरकारी कागदपत्र apply करताना ever been इन पोलिस complaint ला हो उत्तर द्यावे लागले असते. मग किती कसून तपासणी दरवेळेस झाली असती!

ओळखीत दोन लोकांचे असे झालेले आहे -एकजण स्वतः पूर्णपणे अधू झालाय एक हात, एक पाय आणि चेहरा वाकडा. समोरचा दुर्दैवाने गेला म्हणून 10 वर्ष कोर्टकचेरी.
दुसरा फक्त हात फ्रॅक्टर झाला पण समोरच्याने पोलीस complaint केली म्हणून पुढच्या आठवड्यात परदेशी जाणार होता उचच शिक्षणासाठी ते सगळं सोडून घरात बसलाय.

त्या प्रकाशझोतामुळे मित्राच्या मुलाने स्वतःची दुचाकी जरा बाजूला घेतली. तेवढ्यात एका सोसायटीच्या गेटमधून ए पंचाहत्तर वर्षांचे वॉचमन गृहस्थ कानांना हेडफोन लावून बाहेर पडले व तरातरा चालत रस्त्यात आले. त्यांना हा मुलगा धडकला व पडला.
>>>> अशी कशी बाजूला घेतली की ठोकला? आणि चूक दोघांची कशी आहे? टोटल चूक या मुलाची आहे. ब्रेक नाही मारू शकला, नक्कीच high स्पीड असणार.

एका अरुंद रस्त्यावर समोरून लांबून एक गाडी आली व अंधार असल्याने त्या गाडीवाल्याने मोठा लाईट लावला. त्या प्रकाशझोतामुळे मित्राच्या मुलाने स्वतःची दुचाकी जरा बाजूला घेतली.
>>>>>>>>>>

या गाडीवाल्यालाही घेतला असता तर तीन हिस्से झाले असते.

माझ्यामते या योजनेनुसार रुग्णावर झालेला खर्च शासनाकडून वसूल करण्यात डॉक्टर/हॉस्पीटल यांना फार खेटे घालावे लागत असतील, म्हणून हॉस्पीटल अश्या पेशंटवर ह्या योजनेनुसार उपचार करायला टाळत असतील. >> >
माझा भाऊ या योजनेमध्ये जिल्हा समन्वयक पदावर आहे. त्याला याबाबत विचारलं तर म्हणाला कि शासनाकडून मिळनारे जे पॅकेज ठरलेले असते ते तुलनेने कमी असते म्हणून हॉस्पीटल तयार नसतात या योजनेअंतर्गत उपचार द्यायला

अशी कशी बाजूला घेतली की ठोकला? आणि चूक दोघांची कशी आहे? टोटल चूक या मुलाची आहे. ब्रेक नाही मारू शकला, नक्कीच high स्पीड असणार.>> अगदी बरोबर... चारचाकीच्या हेडलाईटमुळे डोळे दिपले हिपन पोराचीच चुकी.. वाहने न पाहता त्या वॉचमनने सरळ बाहेर पडणे हिपन त्या पोराचीच चुकी.. पूर्ण उजाडलेले नसताना त्या पोराने वाहने कदाचित कमी असतील या विचाराने दुचाकीने जाणे हिपन त्याचीच चुकी म्हणावी नाही का?
तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नसताना निव्वळ वर एका व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीवरून सरळ एखाद्याला कटघर्‍यात कसकाय उभं करु शकता च्रप्स ?

तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नसताना निव्वळ वर एका व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीवरून सरळ एखाद्याला कटघर्‍यात कसकाय उभं करु शकता च्रप्स ?
>>> बेफि नि सांगितलेल्या गोष्टीवरून हा निष्कर्ष आहे माझा. अर्थात त्यांनी नीट गोष्टी सांगितल्या नसतील तर नक्कीच आपण काही बोलू शकत नाही.
मुलाची चूक नसती तर त्याचे पिताश्री का तयार झाले असते खर्च करायला.
आणि तुम्हांला ही माहिती कोठून मिळाली की वॉचमन सरळ बाहेर आला रस्त्यावर. तुम्ही cctv फुटेज पाहिलाय का.
बेफिनि लिहिले आहे की मुलाने दुचाकी बाजूला घेतली म्हणजेच तो त्याच्या मार्गावर असता तर ठोकला नसता. याचाच अर्थ की वॉचमन रस्त्यावर नाही बाजूला होता आणि मुलाने गाडी त्याच्यावर घातली.

मुलाची चूक नसती तर त्याचे पिताश्री का तयार झाले असते खर्च करायला.>> वर तेच म्हटलय ना चुकी दोन्हीकडून झाली.. फक्त एकाला दोष देऊन कसं चालेल?

आणि तुम्हांला ही माहिती कोठून मिळाली की वॉचमन सरळ बाहेर आला रस्त्यावर. तुम्ही cctv फुटेज पाहिलाय का.>> आणि तुम्हाला हे कसे माहिती कि त्या पोराचीच पूर्ण चुकी होती?

बेफिनि लिहिले आहे की मुलाने दुचाकी बाजूला घेतली म्हणजेच तो त्याच्या मार्गावर असता तर ठोकला नसता.>> म्हणजे डोळ्यावर मोठ्ठा प्रकाश आल्यावरही स्वतःच्या मार्गानेच गाडी दामटवायची असं म्हणताय का तुम्ही?

अहो टीना ... त्या मुलाची चूक नसती तर त्यांचे फादर खर्च करायला तयार झाले असते का.
एक तर पादचाऱ्याला जाऊन धडकताय वर त्यालाच म्हणताय तुझी पण चूक आहे हे जरा जास्त नाही का.

आणि डोळ्यावर प्रकाश आला तर ब्रेक मारून थांबावं तिथेच जागेवर, साईडला कशाला घातली. घतली तर घातली इतक्या जोरात की त्या काकांना 1 मेजर आणि 2 मायनर फ्रॅक्चर झाले आणि त्यांची चूक काय?

क्लास ला का जावे लागतेय?
दुसर्यानचा विचार न करता गाड्या वेगाने का जात आहेत?
क्लास घरापासून लांब का आहे? (कि आपण घर लांब घेतल आहे)?
काकांना काम का करावे लागतेय?
गजबजलेल्या ठिकाणीच का अंधार असतो ? (कालच संधयाकाळी क्लास + पेट्रोल पंप + लग्न कार्यालय + दवाखाने आणि ऊस वाहतूक असे सगळे एकत्र असणाऱ्या रस्तावर सगळे दिवे बंद असलेले पहिले)
रस्त्यावर बुलेट आणि SUV उभ्या करून गप्पा मारत का उभे असतात?

.
.
.

१. दोन चाकी वर जाताना डोळ्यामध्ये काहीतरी गेले आणि समोरच्या गाडीला धडक बसली ... काहीही नुकसान झाले नसताना १०,००० घेतले
२. चार चाकीला मागच्या चाकाला दोन चाकी वाला दारू पिऊन धडकला माझा टायर फुटला तरी त्याला भरपाई दिली
... मग दोन्ही गाड्या बंद करून सायकल घेतलीये

बेफिंना पडलेले प्रश्न वेगळे आहेत आणि लोकांना पडलेले प्रश्न वेगळेच आहेत Happy

1) आपल्यापैकी कोणीही प्रत्यक्षदर्शी नाहीये. खुद्द धागाकर्ताही नाहीये. त्यांनीही ऐकीव माहीतीवर अपघाताचे वर्णन रंगवले आहे.

2) बाईकस्वार बेफिंच्या मित्राचा मुलगा असल्याने लेखात त्याला सॉफ्ट कॉर्नर असण्याची शक्यता आहे. यात काही गैर नाही. हा हुमायुन नेचर आहे.

3) दोघांनी खर्च अर्धा केला म्हणजे दोघांचीही कमी जास्त प्रमाणात चुकी असावी म्हणूनच ते तसे वाद न घालता तयार झाले. असे गृहीत धरू शकतो.

4) तरी काकांबद्दल जास्त वाईट वाटतेय कारण आर्थिक फटका दोघांना अर्धा बसला. पण शारीरीक फटका एकट्या काकांनाच बसला.

5) राजीव गांधी योजनेनुसार उपचार झाले असते तर दोघांचे पैसे वाचले असते. पण जर उपचारही त्यानुसार हलक्या दर्जाचे झाले असते तर हा पुन्हा त्या काकांवरच अन्याय ठरला असता.

मुलाचे वय किती वर्षे होते?

गाडी चालवायचे लायसन्स होते का?

एमेलसी अर्थात मेडीको लीगल केस दाखल केली होती का? राजीव गांधी योजनेत बसले नाही कारण पोलिस तक्रार व कायदेशीर प्रक्रिया न होऊ देता प्रकरण दाबण्याचा प्रकार होता हे नक्की. अन्यथा वॉचमन लेव्हलच्या माणसाला राजीवगांधी लागू होणार नाही, हे शक्य नाही.

अन माझा इथला आधीचा प्रतिसाद नक्की कोणत्या कारणाने उडवलाय?

या लेखात कट प्रॅक्टिस वगैरे आणून डॉक्टरांची जनरलाईज्ड बदनामी करणे मायबोलीच्या व्यासपीठावरून चालते का?

मुलाची कायतरी सॉल्लीड चूक असल्याशिवाय इतकी नाटकं कोणीच सहन करत नाही. बेफिंकडे मित्राकडून आलेली एकतर्फी माहिती आहे. त्यात संपूर्ण सत्य नाही. सीसीटीवी फूटेज असेल तर कळेल कोण चूक कोण बरोबर....

आरारा यांचे मत विचारात घ्यावे.

{{{ 2) बाईकस्वार बेफिंच्या मित्राचा मुलगा असल्याने लेखात त्याला सॉफ्ट कॉर्नर असण्याची शक्यता आहे. यात काही गैर नाही. हा हुमायुन नेचर आहे. }}}

हा काय प्रकार आहे? बाबर नेचर, अकबर नेचर अशाही कॅटेगरीज् असतातत काय?

या लेखात कट प्रॅक्टिस वगैरे आणून डॉक्टरांची जनरलाईज्ड बदनामी करणे मायबोलीच्या व्यासपीठावरून चालते का?>> मला पण हे पटले नाही. जवळच्या नातयातच अशी केस झाली पण मुलाच्या आई बापांनी पैसे ऑफर केले तरी ते घेतले गेले नाहीत. उलट ते नकोत असे पोलिसात डिक्लेअर केले. व मुलीन स्वतः खर्च केला आईच्या दुखापतीचा. अगदी सिमिलर घटना.

एक आहे की पंचाहत्तर वयाचा माणूस किती तरातरा चालेल. घरो घरीच्या उत्साही वयस्कर लोकांनी भल्या पहाटे उठून सेमी अंधारात फुले तोडायला, चालायला फिरायला बाहेर पडू नये. आजकाल असे अपघात फार होउ लागलेत.
ब्रेकफास्ट उरकून मग भर उजेडा त फिरायला जावे. म्हा तार पणी हाडे पण नाजूक झालेली असतात. फ्रॅकचरचा धोका जास्त आहे. माझ्या नात्यातल्या बाईंना तर हेड इंजरी झाली. व हाताला फ्रॅकचर. नशिबाने रिकव्ह री ऑन ट्रॅक आहे. पण घरच्यांना टेन्शन आहेच ना.

च्रप्स, ७५ वर्षाच्या म्हातार्‍याला धडक लागल्यावर फ्रॅक्चर होऊ शकतोच हो..
माझ्या ओळखीतल्या आज्जी बाथरुममधे पाय घसरून पडल्यावर त्यांना दोन फ्रॅक्चर झाले.. हे तर गाडी धडकण्याचा प्रकार आहे..

बाकी त्या म्हातार्‍याकडे पाहून चुकी असो नसो मदत करणारे लोक असु शकतात.. इथे तर पोराच्या करीअरचा प्रश्न येऊ शकत होता.. आणि कुणाला वाटल कि इतका खर्च येईल म्हणुन त्यामुळे तयार झाले असणार ते..

हा काय प्रकार आहे? बाबर नेचर, अकबर नेचर अशाही कॅटेगरीज् असतातत काय?
>>
प्रस्तुत प्रतिसादकाला असे चित्रविचित्र शब्द आपल्या प्रतिसादात टाकण्याची सवय आहे, जेणेकरुन आपल्यासारखे काही वाचक त्यावर काहीतरी प्रतिसाद देईल आणि मग तो त्यावर काहीही प्रतिसाद देऊन धागा हायजॅक करेल.
जनरली टॉल्क, वॉल्क असे शब्द तो वापरतच असतो.

असो, इथे २ मासे त्याच्या गळाला लागले आहेत, सो भोगा आपल्या कर्माची फळे Wink Biggrin

लोकांना काहीही प्रश्न पडतात. विषय काय आणि चूक कोणाची यावरच दंगा सुरु आहे.

एक घटना सांगतो, आमच्या ओळखीतली. एक मुलगी आणि तिची मैत्रिण पुण्यात पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या. तर त्यामुलीची गाडी होती आणि दोघी नोकरीवर एकाच ठिकाणी आणि त्यामुळे एकत्र जा ये करत असत. तर एकदा अशाच कामावर जात असताना समोर अचानक गाडी आल्याने ब्रेक दाबला आणि गाडी स्कीड झाली. फार वेगात नसल्याने गाडी धडकली नाही पण दोघी पडल्या. चालवणाऱ्या मुलीने हेल्मेट घातले होते त्यामुळे तिला मुका मार लागला, पायाला खरचटले इतकेच. आणि तिची मैत्रिण मागे बसलेली, तिने काही हेल्मेट घातले नव्हते, आणि नेमके तिचे डोके रस्त्यावर आपटले आणि दवाखान्यात भरती करावे लागले. त्यात बरीच कॉम्प्लिकेशन्स झाली, ब्लड क्लॉट आणि अजून काय काय. जोरदार खर्चिक झाले प्रकारण.

इतक्यावर थांबले नाही तर त्या मैत्रिणीच्या घरच्यांनी या मुलीवर केस ठोकली, निष्काळजीपणे गाडी चालवून अपघाताला कारणीभूत झाल्याबद्दल. पुढचे दीड वर्ष तारखा, वकील असले काय काय रामायण सुरु होते, शेवटी कधीतरी सेटलमेंट झाल्याचे कानावर आले.

आता यात कुणाची चूक.

विचार करायला लावणारा लेख आहे.

घरातील माणसांचा विमा उतरवणे ही एक किमान बाब आजही इतकी अपरिचित आणि दुर्लक्षणीय का असावी? >> पुष्कळ वेळा विमा कंपन्यासुद्धा क्लेम केल्यानंतर विविध कारणे देऊन पैसे देण्याचे टाळतात असे ऐकले आहे.

यु.के. मधली जनता जरी एन.एच.एस. ला नावे ठेवत असली तरीही फ्री अ‍ॅट द पॉइंट ऑफ युज ह्याचा प्रचंड आधार असतो हे अजिबातच नाकारता येणार नाही.

लेख वाचुन दोन्ही बाजुंनी विचार करता आला.
मला वाटतं मुलगा ऐन करीयरच्या वयात असल्याने मित्र त्याच्याविरुध्ध काही घडु नये म्हणुन हे सहन करत असावेत.
ते ऑब्वियसच आहे.
आणि मित्राची आर्थिक परीस्थिती बर्यापैकी आहे हे बघुन काकांचा मुल्गा त्यांना खर्च करायला लावत असेल.
कारण ७५ वर्षाच्या वडीलांना वॉचमन चे नोकरी करावी लागतेय म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसावी.

बेफिकीर यांच्यासारख्या लेखकाकडून <मित्राच्या मुलाचा लहानसा अपघात झाला.> हे वाचून नवल वाटले.
तसंच ७५ वर्षांचे गृहस्थ किंवा वॉचमन (मुळात हे दोघे एकच असल्याचे नवल) जे कोणे होते त्यांनी कानाला हेडफोन लावला होता याचेही नवल वाटले. माझ्या पाहण्यात हेडफोन लावणारे कोणी पंच्याहत्तरीतले वृद्ध नाहीत तसंच वॉचमनही नाहीत. अर्थात माझं पाहण्यालाही मर्यादा आहेतच, त्यामुळे असं होतंच नसेल, असंही म्हणवत नाही. नवल वाटलं , इतकंच.

अरे वयस्कर लोकांना खूपदा रात्रीची झोप येत नाही. उगीच अध्याकडे डोळे लावून रात्र काढण्यापेक्षा हे बरे नाही का! माझे वडील 70 पर्यंत ठाणे- सीएसटी लोकल प्रवास आणि पुढे बलार्ड इस्टेट ला कामाला जायचे. रिटायरमेंट नंतर त्यांना करमायचे नाही. एक दोनदा चक्कर येऊन रस्त्यात पडल्यावर आणि blood thinners सुरू झाल्यावर, त्यांच ते काम आम्ही बंद करायला लावले. तेव्हा लोकांना असंच वाटलं असेल घरची परिस्थिती वाईट दिसते इतका म्हातारा माणूस इतकं अप-डाऊन करतो.
प्रवास बंद केल्यावर रोज वेगवेगळ्या बँकेत / पोस्टात जाऊन ते पासबुक अपडेट करुन घ्यायचे. त्यांचा रोजचा खर्च ते कॅश व्याज withdraw करून चालवायचे. सगळीकडे चालत फिरायचे नाहीतर बस. वृंदावन- टेंभी-जांभळी- गोखले रोड - राम मारुती - कोपरी -दगडी शाळा यातली 3 ठिकाण रोज.

पण म्हणून त्यांना घरांत मुसक्या बांधून नाही ना ठेवू शकत. शेवटी ज्याचं त्याच नशीब Sad म्हणूनच देव, प्रार्थना, भक्ती वै. Concept आल्या असतील. To keep your mind off unforseen and to have some belief that in such uncertainty, nothing bad can happen and everything good will Happy

आमच्या शेजारचे एक आजोबा हरवले Sad त्यांना वयपरत्वे विस्मरण व्हायला लागल्यावर, सून खिशात नाव, पत्ता ठेवायला लागली. ते काढून फेकायचे मी काय बालवाडीत आहे का म्हणून. एक दिवस हरवले. स्वातंत्र्य सैनिक होते. राजाबाई टॉवर वर भारताचा झेंडा फडकवला होता, इंग्रजांच्या राजवटीत कधीतरी. तुरुंगात गेले होते.

Pages