कहानी पूरी फ़िल्मी है

Submitted by विद्या भुतकर on 4 December, 2017 - 23:13

२०१० मध्ये ही पोस्ट लिहिली होती महिला दिनाच्या आसपास. एक स्त्री म्हणून अनेक ठिकाणी झगडावं लागलं होतं, त्यातली ही एक. आज पुन्हा एकदा आठवण झाली मोहनाची कथा वाचून म्हणून पोस्ट करत आहे.

मला ना नेहमी असं वाटतं की मी आयुष्यात खूप मारामारया केलेल्या आहेत आणि उगाचच मी खूप ग्रेट आहे असं वाटतं. तर या अश्या वाटण्यामुळेच मी जेव्हा प्रेग्नंट होते (गरोदर हा शब्द कसातरीच वाटतो ना?मी बाई वगैरे झाल्यासारखा... ) तेव्हा म्हटलं की जाऊ दे ना आता इतके ( सहा-सात वर्षे ... ) नोकरी केली थोडा आराम करावा. आणि Being a woman मी घरी राहू शकले. मुलांना नसते अशी सवलत? असो, मला काय? तर मी मस्त नऊ महिने घरी आराम केला आणि तो दिवस उजाडला डॉक्टरकडे जाण्याचा.मुलगी झाली. आई नंतर हसून सांगत होती की बाहेर बातमी कळल्यावर एकदम मला रडू आले तर दादा विचारत होते 'मुलगी झाली' म्हणून रडते आहेस का? आई म्हणे मी कशाला रडू त्याबद्दल. आपली पोरगी 'सुअखरूप सुटली' याचं समाधान होतं ते बहुतेक.

हॉस्पिटल मधून घरी येऊन २ दिवसही झाली नाहीत आणि मला आपण घरी राहिल्याचा पश्चात्ताप होऊ लागला. सानूचं सगळं करण्यातच दिवस जायचा आणि वाटू लागलं की माझं आयुष्यं संपलं. आता मी कधीच परत नोकरी करू शकणार नाही. कसं शक्य आहे? बरं सानूचा तरी काय दोष त्यात? ती कधी ओठी होणार आणि मग मी नोकरी करणार? आणि समजा २/३ वर्ष ब्रेक घेतला तर परत कोण मला विचारणार. सोबत आई दादा होते तोवर ठीक होतं तेही गेल्यावर घर खायला उठलं. बरं नवराही काही असा नाही की जो बायको घरी आहे म्हणून तिनेच स्वयंपाक करावा, मी काही करणार नाही असं म्हणेल. त्याला माझ्या अवस्थेची पुरेपूर कल्पना होती आणि तशी त्याने मला साथही दिली.

कसेबस ४ महिने झाले आणि मला वाटलं की आपण resume तरी बनवावा. लिहायला बसले आणि मी वर्षापूर्वी काय करत होते हेच आठवत नव्हतं. आणि ते आठवून काहीतरी फायनल व्हायला दोन महिने गेले. आता अमेरिकेत नोकरी मिळवण्याचे दोन-तीन प्रयत्न केले. पण मंदीमुळे, माझ्या गॅपमुळे काही कुठे झाले नाही. त्यातही दो-चार वेळा फोन आले तेव्हा सानू नेमका झोपेतून उठली आणि फोनवर बोलायचं का तिला घ्यायचं काही कळत नव्हतं. तेव्हा पहिल्यांदा अपराधी वाटलं की खरंच मी नोकरी करायची गरज आहे का? पण रात्र झाली की मनात विचार यायला लागायचे की मी किती दिवस अशी राहू. खरं सांगायचं तर २८ वर्षात अशी वेळच आली नवती की मी काहीच करत नाहीये. शाळा, कॉलेज मग लगेच एका महिन्यात नोकरी, की लगेच दुसरी नोकरी. माझं डोकं सैतानाचं घर झालं होतं. संदिपला ही कळलं होतं की काहीतरी करावं लागणार आहे.
मग आम्ही विचार केला की जाऊ दे इथे नाही मिळत नोकरी तर भारतात जाऊन प्रयत्न करू. असेही इकडे राहून बरेच वर्षे झाली होती. मला नोकरी मिळाली आणि मी सेट झाले की तोही इकडेनोकरी शोधून मग कायमचे इथेच राहायचे असा प्लॅन ठरला.

भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांची अवस्था तर माहीतच आहे. लोक कधीच ९ ते ६ काम करत नाहीत. उलट प्रत्येकाकडून जास्त कामाची अपेक्षा असते आणि त्यावरच तुमचे रेटींग ठरणार. म्हणजे मी ८-९ तासांत किती चांगले काम करते यापेक्षा मी किती तासा ऑफिसात थांबते यावर सर्व ठरतं. माझ्या प्रोफाइलसाठी तर ९-६ पेक्षाही जास्त काम करावं लागलं असतं. मग म्हणालो चला प्रोफाइल थोडा बदलून काहीतरी करू जिथे कमी ताण असेल. त्यासाठी अभ्यास सुरू केला. इकडे पुण्यात बहिणीने जिथे रेझुमे पाठवला होता तिथे काहीतरी हालचाल सुरू झाली होती> आणि चक्क मी जाण्याआधी माझा एक इण्टरव्हू फिक्स झाला होता. भारतात आले आणि सगळ्यांचे सानूला भेटून होईपर्यंत माझे २/३ ठिकाणी interviews झाले. पण खरंतर माझा आत्मविश्वास खूपच कमी झाला होता आणि तो कुणी एक शब्द झरी बोलला तर अजून ढासळत होता. त्यात आणि नको असलेल्या प्रोफाइलसाठी बोलायचे म्हणजे अजून कमी. संदीप माझ्यासोबत येऊन राहून परत गेला आणि माझी हिंमत कमी कमी होऊ लागली.

मी पुण्यात बहिणींसोबत राहत होते. त्या दोघीही माझ्याहून लहान आणि पुण्यातच नोकरी करतात. नोकरी शोधण्यासाठी तिथे राहून मग माझ्या interviewच्या वेळी कुणीतरी सानूला सांभाळायचे आणि मी जाऊन यायचे. एकूण ५/६ ठिकाणी जाऊन आले आणि मला परत सुखाची ओढ लागली. वाटलं जाऊ दे न कशाला हा सर्व व्याप. पुण्यात राहूनहई दोन महीने झाले होते. त्यात सानूला सांभाळायला संदीपची मदतही नसल्याने अजूनच हेक्टिक होत असे. बहिणी सर्व मदत तर करत होत्याच. पण मीच आई असूनही इतकी थकून जायचे की त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवणार. त्यात मग प्रत्येकाचा वाढलेला ताण, आम्ही सोबत राहूनही कित्येक वर्षे झाली होती त्यामुळे ती गॅप, यातून भांडणं तर व्हायचची. वाटायचं की आपण मनात मांडलेलं जग किती वेगळं होतं आणि परिस्थितीत किती अवघड.

बरं interview ला काही कॉल आले तरी त्यांना सांगितले की मी एक वर्षं काम करत नव्हते की बोलणं तिथेच संपायचं. काहीजण म्हणाले सहा महिने वगैरे ठीक आहे हो पण एक वर्षं खूप होतं. म्हणजे बाईने बाळंतही होऊ नये का? एकदा वाटलं आपण वेगळ्या प्रोफाइलसाठी कशाला नोकरी शोधायची? जे येतं, जे आवडतं ते करावं ना? मग पुन्हा उजळणी सुरू, पण मनाला एक उभारी मिळाली, जे आवडतं ते करण्यासाठी अभ्यअसाची.एकदा का मोठ्या कंपनीचा फोन आला की तुमचा कॉल आहे शनिवारी, या तिथे. मी रांगेत उभी राहून तिथे पोचले. त्या माणसाने मला एक टेक्निकल प्रश्न विचारला आणि मी संपून गेले. पुढचे १० मिनिट मी एकच उत्तर देते होते, I dont remember. तो जाताना मला म्हणाला 'Gap बराच झालेला दिसतोय. ' म्हटलं हम्म्म....

एकदा एक मजेशीर किस्साही झाला. एका कंपनीच्या walk-in interview ला गेले. ही २००० लोकांची रांग. म्हटलं आता कधी संपणार आपली ही पायपीट? जाऊ दे बाकीचे २००० होतेच ना? मी ही त्यातच. आता पहिला round बराच लवकर उरकला. त्यांनी मला थांबायला सांगितले. माझ्याशेजार एक गोड मुलगी बसली होती. म्हणाली मला पण थांबायला सांगितले आहे. बोलताना कळले की ती मुंबईला नोकरी करते आणि नवरा पुण्यात असतो. म्हणून इथे कडमडत आली होती दोन दिवसांसाठी. बिचारी शुक्रवारी ऑफिसकरून शनिवारी interview ला आली आता रविवारी परत जाऊन परत सोमवारी सुरू, तेही जोवर इकडे नोकरी मिळत नाही तोवर.आम्ही वाट पाहून तासेक झाला तिला म्हटलं बाई गं मी जरा जाऊनच येते माझे नाव पुकारले तर आल्यावर सांग मला. ती हो म्हणाली. मी धावत रेस्टरूमला जाऊन पळत परत आले. तिला विचारलं आला का माझा नंबर? नाही म्हणाली. परत तिने मला विचारलं, तुझं नाव ओळखीचं वाटतंय, तू blog लिहितेस का? म्हटलं हो, तर म्हणे अगं मी नेहमी वाचते मी तुझा blog. त्या क्षणी लई भारी वाटलं. अगदी कुणीतरी माझी स्वाक्षरी मागितल्यासारखं. And I didnt get the job but still I felt great. Happy असो.

त्यानंतर एका ठिकाणी बोलावणं आलं. हो, ते आल्याशिवाय आजकाल आतही येऊ देत नाही कुणी. कडमडत लवकर उठून ७ ची गाडी पकडून हिंजेवाडीला गेले. तिथे त्यांनी सांगितलं की interview घेणारे लोकच नाहीयेत तुझ्या प्रोफाइलसाठी आज तर नंतर या. आता शनिवारी सकाळी ९.३० ला हिंजेवाडीत काय करायचे. एका मैत्रिणीला फोन केला ती त्याच कंपनीत काम करते. तीम्हणे मी आज आलेलीच आहे कामाला, ये भेटायला. चला, ते तरी काम झालं. ३ महिन्यात एकदाही न भेटता आलेली मैत्रीण एकदाची भेटली मला. तिला पाहून गळाभेट घ्यायची इच्छा झाली पण आजूबाजूला पाहून आवरतं घेतलं. ती म्हणे तू तर काहीच बदलली नाहीयेस. मूल झाल्यानण्तर अशी compliment मिळाली की बायकांना अजून काय हवं? असो. तर तिला ना गालाला एक गाठ आली होती, म्हटलं काय झालं गं? तर म्हणाली अगं जायचं ही गाठ काढायला पण सुट्टीच मिळत नाहीये. तिचीही मुलगी एक वर्षाची असल्याने तिच्याही बऱ्याचं सुट्ट्या संपून गेल्या होत्या आणि कामही खूप आहे.एकतर ९.३० तास थांबायलाच लागतं, प्रवासाचे २ तास, मुलीसोबत राहायलाच मिळत नाही. म्हटलं असं करू नकोस जाऊन ये तब्येत महत्त्वाची. तिला भेटून मी घरी परत आले.

परत रविवार एक कंपनी, मोठ्या रांगा आणि मी.... पण बहुदा तो दिवस वेगळाच होता. 'माझा' होता. चक्कं तिथे मुलींची वेगळी रांग होती (इथेही segregation Happy )आणि त्यामुळे माझा नंबर लवकर आला. interview सुरू झाला आणि मी सांगायला सुरुवात केली. इथे आल्यापासून पहिल्यांदा मला बरं वाटलं कारण मी जेव्हा सांगितलं की मी वर्षभर नोकरी करत नव्हते because I had a baby. तो माणूस म्हणाला its ok. 'ITS OK?' Happy मग पुढे सर्व सुरळित झालं. दुसरा round ही नीट झाला. They gave me an offer. I came home happy. पण अजून एका आठवड्यात ते कळवणार होते. माझं परतीचं तिकीट होतं आणि लवकर काही कळलं नाही तर मला जावं लागणार होतं. मी मग आईकडे जाऊन राहिले.त्या कंपनीकडून काही उत्तर येतं नव्हतं .मला येऊन ३-४ महीने झाले आणि अजूनही नोकरी मिळत नाही म्हटल्यावर काही भुवया उंचावल्याही की खरंच हिला नोकरी करायचीही आहे की नाही, इ. इ. आणि असाही मला एकटीला मारामारी करायचा कंटाळा आला होता. म्हटलं जाऊ दे, बाकी पोरी राहतातच ना घरी.आणि माझं जाणं जवळजवळ निश्चित झालं होतं.

पण आपण एक ठरवलं ना नियतीला दुसरंच करायचं असतं. I got the call........ Happy पहिल्यांदा नोकरी लागल्यावरही मला इतका आनंद झाला नव्हता जेव्हढा यावेळी झाला. मी परत जाण्याच्या फक्त ८ दिवस आधी हे सर्व घडलं. बऱ्याच लोकांना कळत नव्हतं की मला खरंच नोकरीची काय गरज होती. तेही नवरा परदेशात एकटा राहतोय आणि मी इकडे कशी राहतेय आणि मग कद्गी एकत्र राहणार, मुलीचं काय करणार, इ, इ. हेच सर्व प्रश्न मलाही पडले होते. पण स्वतःसाठी काहीतरी जिद्दीनं मिळवण्यात काय आनंद असतो ते ज्याचा त्यालाच माहीत.
या प्रोसेसमध्ये मला नवरा, सासरचे, घरचे सर्वांचा सपोर्ट मिळाला. ज्यांना तो मिळत नाही त्यांचं काय? काय माहीत. पण मला तरी नोकरी मिळाली होती. कुणाला वाटेल की चला मिळाली बाई हिला एकदाची नोकरी पण ही तर फक्त सुरुवात होती....पुढे कराव्या लागणाऱ्या कसरतींची. लहान मुलाला संभाळुन नोकरी करण्याची....

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असू दे हो... मोटीवेटिंग आहे हे.
विद्याजी, पुढे काय झाले, तुम्ही भारतात, यजमान अमेरिकेत.. तुम्ही अमेरिकेला कधी आणि कशा गेलात ते पण येऊ द्या.

अमा, तुमची कमेंट आली की भारी वाटते. Happy फक्त कळत नाही कुठल्या टोन मधे लिहिलेय.
सर्वांचे आभार.

ही ७ वर्षांपूर्वीची पोस्ट आहे. न बदल करता तशीच दिली आहे. मला वाटते की हा लेख माझ्यासारख्या लाखो जणींना लागू होतो. अगदी त्यातच दोन जणींचे मुद्दे लिहिले होते, एक जिला नवऱ्यासाठी गाव बदलावे लागत आहे आणि त्यासाठी नोकरी शोधत होती. आणि दुसरी जिला स्वास्थ ठीक नसताना साधे ट्रीटमेंट साठी जायलाही जमत नाहीये कामामुळे.
विशेषतः पहिल्या डिलिव्हरी नंतर एक वेगळीच मानसिक अवस्था असते त्यातून बाहेर पडून पुन्हा नोकरीला लागणे हे स्वतःला नव्याने शोधण्यासारखे आहे. स्वतःपेक्षा आपल्यावर अजून एका जीवाची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून सर्व प्लॅन करावे लागते. त्यात घर की नोकरी असा प्रश्न जास्त प्रामुख्याने उदभवतो.
राहता राहिली 'ग्रेट' वाटण्याची गोष्ट, आपण किती सामान्य आहोत हे मला क्षणोक्षणी जाणवत राहतं आजूबाजूला पाहिलं की. मग त्या सामान्य आयुष्यातल्या लढायाही सामान्यच असतात. म्हणून त्यांना कमी का लेखायचं?

अहो खरेच कौतुक आहे तुम्ही किती सर्व करता संसार रनिंग मुले नोकरी व इतर कला, रनिन्ग. एकदम सर्व करणे व उत्साह कायम ठेवणे फार अवघड आहे. लिहीत रहा. मी एकेकाळी ४३ इंटर्व्यू दिले होते. तसेच बीपी एल टीव्हीच्या कंपनीत वॉक इन ला गेले तर बायकांना हा सेल्स चा स्लॉट ओपन नाही असे आउट राइट सांगितले. तिथे मी भांडण केले होते. मग तसे जाहिरातीत का नाही दिले म्हणून . ते दिवस आठवले तुमची धावपळ वाचून. आय होप थिम्ग्स आर ग्रेट नाउ.

तेही नवरा परदेशात एकटा राहतोय आणि मी इकडे कशी राहतेय आणि मग कद्गी एकत्र राहणार, मुलीचं काय करणार, इ, इ. हेच सर्व प्रश्न मलाही पडले होते. पण स्वतःसाठी काहीतरी जिद्दीनं मिळवण्यात काय आनंद असतो ते ज्याचा त्यालाच माहीत. >> १०० % खरं. मी सुद्धा ह्या सगळ्या प्रोससमधून गेले आहे. लग्न करून अमेरिकेत आल्यावर मोठ्या कष्टाने नोकरी आणि एच१ व्हिसा मिळाला. नविन नोकरीत जरा स्थिरस्थावर होतेय तोच प्रेग्नंसी. मुलगी झाल्यावर तिला सांभाळायला आई आणि सासुबाई आलटून पलटून ६/६ महिने राहिल्या. त्यामुळे मुलीची पहिली २ वर्ष मजेत गेली. मग तिला डे-केअर मधे ठेवायला सुरूवात केली आणि तिच्या न संपणार्‍या आजारपणाने अगदी दमून गेलो आम्ही दोघही. थोडे दिवस भारतात जाऊन रहायचा पर्याय आम्हीही निवडला. म्हणजे नवरा इकडे आणि मी आणि मुलगी भारतात. माझ्या अमेरिकन कंपनीने मला भारतात transfer दिली. पण एच१ व्हिसा वर पाणी सोडायला लागलं. मग भारतात राहून ६ महिने नोकरी केली. मुलीला सांभाळायची उत्तम सोय झाल्याने नोकरी पण निर्विघ्न सुरू होती.
पण नवर्‍याला काही transfer मिळेना. आणि नोकरी सोडून यायची त्याची तयारी नव्हती. मग मी आणि मुलगी परत आलो अमेरिकत. मुलीला डे-केअर मधे ठेवायची माझी तयारी नव्हती. मग सरळ २ वर्ष break घेतला. नंतर एच४ EAD चा रूल आला आणि मुलीची ही full day शाळा सुरू झाली. परत नोकरी शोधली. २ वर्षाच्या break नंतर परत मिळेल की नाही नोकरी अशी धास्ती वाटत होती.
मला पण अनेकांनी fake resume बनवायचे सल्ले दिले. पण तसलं काहीही न करता, २-३ महिने चिकाटीने प्रयत्न केल्यावर नोकरी मिळाली. आता सगळ छान सुरळीत चालू आहे.
आई झाल्यावर परत करियर वर focus करणं challenging असतं खरं. पण हळू हळू जमतं. मुल ५-६ वर्षाच झाल्यावर तर तुम्ही अगदी पहिल्यासारखेच झोकून देऊन काम करू शकता. वयपरत्वे आणि मुलाला मोठं करताना अनेक situations निभावून नेल्या असल्यामुळे थोडीफार maturity आल्यासारखं वाटतं. त्याचा पण कामामधे चांगला उपयोग होतो.

माझ्या अमेरिकन कंपनीने मला भारतात transfer दिली. पण एच१ व्हिसा वर पाणी सोडायला लागलं.
>>> सोहा.. एकदा तुम्हाला h1 मिळला आणि तुम्ही त्यावर काम करत असाल तर जरी तुम्ही भारतात परत गेलात, 1 इयर ब्रेक घेतलात काहीही असेल, तुम्ही h1 कॅप exempt असता.
साध्या शब्दात सांगायचे तर जेंव्हा तुम्ही परत अमेरिकेला गेलात, कोणीपन तुमचा h1 फाईल करू शकतो. तुम्हाला लॉटरी अँप्लिकेबल नसते.
खूप लोकांना हे माहीत नसते म्हणून सांगत आहे.

धन्यवाद च्रप्स. मला माहित होता हा h1 चा नियम. पण माझ्या job profile ला h1 sponsorship मिळायला तसा त्रासच होतो. त्यामुळे २ वर्ष break घेतला असताना फार प्रयत्न नाही केला h1 sponsorship असलेला जॉब शोधायचा. शिवाय मगाशी म्हटलं तसं. मुलीला डे केअर मधे ठेवायची माझी तयारी नव्हती. तो माझा अगदी personal choice होता.
आनंदाची बाब ही की २ वर्षाच्या ब्रेकनंतर जेव्हा जॉब शोधायला सुरुवात केली तेव्हा मी ब्रेक का घेतला ह्याचं अगदी खरं कारण बहुतेक interviews मधे सांगितलं आणि interview घेणार्‍या लोकांनी त्याबद्दल अजिबात नापसंती दर्शविली नाही.

क्रमशः आहे का? तुमचा पुढील प्रवास जाणून घ्यायला आवडेल.. तसंच मायबोलीवर एखादा ग्रुप आहे का मॉम्स रिटर्न टू वर्क असा? आपले अनुभव लोक तिथे एका ठिकाणी लिहीत राहिले तर आमच्यासारख्या सध्या सुपात असलेल्या लोकांना प्रेरणा मिळेल..

तेव्हा याचा पुढचा भाग लिहायचा होता पण नोकरी मिळाल्यावर इतकी बिझी झाले की पुढे दोन वर्षं काहीच लिहिले नाही. आता वाटतं लिहायला हवं होतं. कारण तेव्हाच्या या सर्व छोट्या लढाया पुढे वाचायला छान वाटतं. पुढे सांगायचं तर, घरात मी आणि माझ्या बहिणी आमचे नोकऱ्यांचे वेळ पुढे मागे करुन मुलीला घरी सांभाळू लागलो. थोडे दिवस आई गावाहून आमच्यासोबत राहायला आली. पण खूप धावपळ होत होती. मी नोकरी, घरी आल्यावर सांभाळणे वगैरे मध्ये खूप दमून जात होते. एक गोष्ट चांगली होती की ऑफिसला गेल्यावर पूर्वी जो आत्मविश्वास हरवला होता तो हळूहळू परत आला. आईला वडिलांच्या तब्येतीमुळे गावी परत जावं लागलं. तेव्हा सासूबाई ३ आठवडे राहिल्या. आता यात पाहिलं तर बरीचशी मदत केली तीही बायकांनीच, निदान प्रायमरी हेल्पर म्हणून त्याच होत्या. भाऊ, वडील, नवरा सासरे हे सर्व लागेल तरच मदतीला. असो.

एकूणच सपोर्ट सिस्टीम होती तरीही सर्व एका मुलाच्या भोवती फिरणं अवघड होतं. मधेच मुलीचा पहिला वाढदिवस झाला. आणि म्हटलं आता एखादं डे-केअर बघावं. माझ्या ऑफिसच्या दारातच मला डे केअर मिळालं. ते होतंही चांगलं पण मुलगी सारखी आजारी पडू लागली. त्यात नवीन नोकरीत कमी सुट्ट्या. खूप धावपळ झाली. शेवटी नवऱ्याला म्हटलं की काय करायचं तू येणार की मी? तर त्याच्याच कंपनीत मॅनेजर नी एक जागा आहे म्हणून सांगितलं. तिथे रिझ्युम पाठवला. त्यांनी फोनवरुन ४ इंटरव्ह्यू घेतले. त्यांनी ऑफरही दिली. पण मी नवऱ्याला एकच अट घातली. शिकागो मध्ये घराजवळच एक तेलगू बाई राहायची ती मुलांना घरी सांभाळायची.
तिच्याकडे फक्त अजून एक मुलगी फक्त यायची. तिने जर मुलीला सांभाळायला होकार दिला तरच येणार असं सांगितलं. तिने होकार दिला आणि मी शिकागोला परत आले, एकूण ८ महिन्यांनी!

पुढे मुलगी घरगुती सांभाळण्याने तब्येतीनेही सुधारली. आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये नोकरीला लागलो आणि ऑफिस घरापासून फक्त ५ मिनिटं होतं. पुढे दोन वर्षं खूपच व्यवस्थित चाललं, दुसरा मुलगा होईपर्यंत. यावेळी मी नोकरी सोडली नाही. पूर्णवेळ नोकरी केली, तीन महिन्यांतच पुन्हा ऑफिसला जायला लागले. त्याचे किस्से अजून वेगळे आहेत. दोन मुलं ३ वर्षाखाली, दोघांची नोकरी आणि मदतीला कुणीही नाही. असो. एकूण काय, हे सगळं सोपं नव्हतं, अजूनही नाहीये. मुलगा वर्षाचा होण्याआधी रनिंग सुरु केलं. Happy ती गोष्ट पोस्ट केली होतीच.

अमा, तुम्ही म्हणालात ना सर्व कसं जमतं? मुलं लहान असताना इतकी धावपळ केली आहे की आता हे सर्व त्यामानाने जरा सोपं वाटत आहे. असो. ही कसरत चालूच राहणार. पण आपल्याला काय हवं हे माहित असलं ना की ते नक्की मिळतंच किंवा सर्व संकटांना सामोरं जाण्याचं बळ येतंच.

कुणी पुरुष ही पोस्ट वाचत असतील तर ते आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतील किंवा कुणाला थोडं बळ हवं असेल आणि ते मिळालं, तर या पोस्टचे सार्थक झाले असे वाटेल.

विद्या.

लवकर लवकर मुलं मोठी कर गं. Happy मग जरा निवांत. << अनु, सॉरी पण हे वाक्य वाचुन एक्दम हसायला आल. युट्युब चा व्हिडीओ स्पीड वाढवुन बघतो तस वाट्ल :प

आमच्या आईआजींनीही हेच केले... कोणाची मदत नसताना.. नोकरी करून (अर्थात नोकरी शिक्षिकेची असल्याचे ५-६ तासच होती). शिवाय घरात धुणे-भांडीशिवाय, पापड कुरडया सर्व प्रकारची वाळवणे, मसाले, घरचे शिवण, विणकाम इ.इ. आणि हे कधीही कोणाला सांगितले नाही,, आम्ही जे पाहिले ते लिहीले..
आम्हीही (म्हणजे तिसरी पिढी ) - फुल टाईम ९ तासाची नोकरी घरकाम, मुले वाढविणे वजा धु.भां.पा.कु.शि.वि.म. करतोच.. त्यात विशेष काही नाही... घरघरकी कहानी आहे. बाईची नोकरी अनेक ठिकाणी चैन नसून गरज आहे.. घर-बाहेरची कामे आता पुरुषवर्ग करायला लागलाय.. चौथ्या पिढीत परिस्थिती अजून सुधारेल असे वाटते. Happy
तुम्ही जे काय केलेय, करत आहेत, चांगलेच आहे, कौतुकास्पद आहे.. पण डोळे उघडून आजुबाजुला तुम्ही पहात नाही का हो?? म्हण्जे आपणच ग्रेट असे जे तुम्हाला वाटते.. ( दुस-या परिच्छेदात सुरवातीच्या वाक्यात लिहीले आहे ) असे वाटते कमी होईल. Happy

अदिती,
तसंच करावं वाटतं कधीकधी Happy
खास करुन बेबी सिटिंग रिलेटेड प्रचंड इश्युज आणि हपिसात करियर पुढे न्यायची सरव्हायवल ची गरज दोन्ही एकत्र येतं तेव्हा..
(दुसरं कारण म्हणजे मुलं मोठी झाल्यावर त्यांच्याशी एक जाणता ह्युमन बिइंग म्हणून तर्कशुद्धपणे वाद घालता येतो.(जिंकता येतो असं म्हणत नाहीये मी.))

पण आपल्याला काय हवं हे माहित असलं ना की ते नक्की मिळतंच किंवा सर्व संकटांना सामोरं जाण्याचं बळ येतंच.>> बीन देअर डन दॅट. विथ अनदर पेरेंट अँड सपोर्ट सिस्टिम इन द पिक्चर ऑल्सो देअर आर सो मेनी इशूज असे वाटते.
खूप स्त्रियांची कार्य शक्ती ही तारेवरची कस रत करण्यात वाया जाते. आता माझा माझ्या कामावर इतका जास्त फोकस आहे की दुसरे काही विचारच येत नाहीत डोक्यात. रिअली गोल्डन पिरीअड वर्क वाइज. करिअर ओरिएंटेड बायकांने एग्ज फ्रीज करून पस्तिशीनंतर बाळे होउ द्यावीत. जेव्हा तुलनेने कमी धावपळ असते व फुल टाइम नॅनी अफोर्ड करू शकतो. ( लाइक द एक्स याहू बॉस/ शेरील सँड बर्ग ) किंवा मग मुले मोठी होई परेन्त फक्त पैसे
मिळवण्यावर कॉन्स ट्रेट करून. मग ती सुटी झाली की करीअर वर फोकस करावे. शेरील सँड बर्ग म्हणते तसे
यू रिअली कॅन हॅव इट ऑल बट नॉट अ‍ॅट द सेम टाइम. पण आर्थिक स्वातंत्र्य लग्न संसारापेक्षा नक्की महत्वाचे आहे. क्रिएटिव्ह सँट्सिफँक्षन तर अमूल्य. मुलांना सुखी आनंदी क्रिएटिव्ह आणि मस्त दमात खर्च करू शकेल अशी आई आवड्ते. चीअर्स.

आधी मला तुमचे मनमोकळे लिखाण आवडत होते, आताही आवडते. पण अनघा म्हणते तसाही सूर आजकाल जाणवायला लागलाय तुमच्या लेखनात. स्वतःची मुले सांभाळणे सोपे असु शकते/ अवघड असु शकते. पण मागे ओळख झालेल्या एका तामिळ काकुंनी मुंबईत नोकरी करता करता आजारी सासु, स्वतःची दोन मुले आणी बहिणीचा एक मुलगा असे सर्वांचे केले. पण त्या जेव्हा हे मला सांगत होत्या तेव्हा त्यांच्या बोलण्यात कुठेही अहंगंड नाही जाणवला कधी.

पण डोळे उघडून आजुबाजुला तुम्ही पहात नाही का हो?? म्हण्जे आपणच ग्रेट असे जे तुम्हाला वाटते.. ( दुस-या परिच्छेदात सुरवातीच्या वाक्यात लिहीले आहे ) असे वाटते कमी होईल. >> +१. खासकरून निम्न वर्गातल्या स्त्रियांचं अख्ख कुटुंबच त्यांच्यावर अवलंबून असतं.

===
करिअर ओरिएंटेड बायकांने एग्ज फ्रीज करून पस्तिशीनंतर बाळे होउ द्यावीत. जेव्हा तुलनेने कमी धावपळ असते व फुल टाइम नॅनी अफोर्ड करू शकतो. ( लाइक द एक्स याहू बॉस/ शेरील सँड बर्ग ) किंवा मग मुले मोठी होई परेन्त फक्त पैसे
मिळवण्यावर कॉन्स ट्रेट करून. मग ती सुटी झाली की करीअर वर फोकस करावे. >> किंवा करिअर चालू व्हायच्या आधीच मुलं जन्माला घालून आपल्या किंवा मुलांच्या बापाच्या आईवडलांकडे सांभाळायला देऊन टाकावीत.

पण आर्थिक स्वातंत्र्य लग्न संसारापेक्षा नक्की महत्वाचे आहे. >> +७८६

कहानी फिल्मी है??
फिल्मी नाही ह्यात काहीच. ही कहानी बर्‍याच बायकाची आहे. मीही आहे त्यात. माझी बहिणही. माझी आई, सासु, जाउबाई अशा आजुबाजुच्या बर्‍याच
स्त्रीयांची.
कमी अधिक फरकाने सेमच.

किंवा करिअर चालू व्हायच्या आधीच मुलं जन्माला घालून आपल्या किंवा मुलांच्या बापाच्या आईवडलांकडे सांभाळायला देऊन टाकावीत.>> असहमत. मुले होणे व ती वाढवणे हे दोन्ही फार आनंददायक अनुभव आहेत. व दे एन्रिच यू अ‍ॅज अ पर्सन. याचा करीअर मध्ये प अण नक्की उपयोग होतो. स्वभावातली फ्लेक्झिबिलिटी वाढते. नवे नवे सोलुशन्स शोधता येतात. आहे त्यात कसे जमवायचे हे ट्रेनिंग होते. इट इज अ वन्स इन अ लाइफ टाइम एक्स्पिरीअन्स. आपली मुले आई बापांनी का संभाळा वीत. हे अनैसर्गिक आहे. कोणतेही प्राणी झाडे असे वागत नाहीत.

तेच करि अरचे. चांगल्या करिअर मध्ये स स्थिरावणे व पुढे जाणे ह्यातही फार आनंद आहे जस्ट डोंट कंबाइन टू फेजेस.

जस्ट डोंट कंबाइन टू फेजेस >> आमच्या आईचे असेही उदाहरण आहे. आम्ही लहान असताना ती नोकरी करत असतानाच आधी बीए, मग बीएड , नंतर एमे झाली.. Happy अवांतर: एमेत मराठवाडा विद्यापीठात ती सर्वप्रथम आली होती. Happy

कहानी फिल्मी है?? फिल्मी नाही ह्यात काहीच. >> हे टायटलही ७ वर्षापूर्वी लिहिले होते आणि
आपणच ग्रेट असे जे तुम्हाला वाटते.>> तेही ७ वर्षापूर्वी लिहिले होते. त्यावेळी जे वाटले ते लिहिले.

ही कहानी बर्‍याच बायकाची आहे. मीही आहे त्यात. माझी बहिणही. माझी आई, सासु, जाउबाई अशा आजुबाजुच्या बर्‍याच स्त्रीयांची.
कमी अधिक फरकाने सेमच.>> एकदम बरोबर आहे. फक्त ती लिहिली जातेच असं नाही. माझ्या आजुबाजूल मी खुप जणी पाहिल्या आहेत निर्निराळ्ञा त्रासातून जाताना. माझ्या पोस्टवरुन मी काहीच न पाहता हे लिहिलं आहे किंवा त्या ग्रेट; नाहीत असा तर्क काढला असेल तर तो पूर्न चुकीचा आहे. माझ्या बाबतीत मला पूर्ण साथ होती घरुन. बाकीच्याना ती मिळतही नाही. त्यांना तर अजुन त्रास होतो. तोही पाहिला. "तुला नोकरी हवी असेल तर तुझी घरची कामे करुन मग कर" असे सांगणारे आणि काडीचीही मदत न कराणारे लोकही पाहिले आहेत. गरीब घरातून त्रास सहन करत, मुलांच्या-स्वतःच्य तब्येत्कडे दुल्र्क्श होत असताना नाईलाजाने घरकाम करणार्याही पाहिल्या आहेत. त्यांना तर घरी राहण्याची इच्छा असली तरी तसे करता येत नाही.
असो.
सर्व 'जणीं'च्या कमेन्टवाचून जाण्वतय की तुम्ही, मी आणि आपल्यासारख्या ज्या या त्रासातून जातात त्यांना हे सहन करावेच लागते तर मीच कशाला बाऊ करत आहे. आणि स्वतःच आपल्या किन्वा इतर स्त्रियांबाबत असे वाटून घेणे ही अतिशय दुर्दौवाची बाब आहे. मला वाटतं होत असलेला त्रास, सन्घर्ष समोर मांडला पाहीजे, त्यात इतरांनीही समजुन घेतलं पाहिजे आणि तशीच साथ दिली पाहीजे.
'मी त्रास सहन केला, मग तुही कर, किंवा तुलाही करावा लागला तर त्या विषेश काय?' हा विचार अतिशय दु:खदायक आहे.
या पोस्टमधून अशा तर्कांची अपेक्षा नव्हती.

'मी त्रास सहन केला, मग तुही कर, किंवा तुलाही करावा लागला तर त्या विषेश काय?' हा विचार अतिशय दु:खदायक आहे.

>> याला मात्र अनुमोदन !!!

'मी त्रास सहन केला, मग तुही कर, किंवा तुलाही करावा लागला तर त्या विषेश काय?' हा विचार अतिशय दु:खदायक आहे. >>>>>> +111111

किंवा करिअर चालू व्हायच्या आधीच मुलं जन्माला घालून आपल्या किंवा मुलांच्या बापाच्या आईवडलांकडे सांभाळायला देऊन टाकावीत. >>>> अगदीच भयानक विचार आहे .

मी त्रास सहन केला, मग तुही कर, किंवा तुलाही करावा लागला तर त्या विषेश काय?' हा विचार अतिशय दु:खदायक आहे.
या पोस्टमधून अशा तर्कांची अपेक्षा नव्हती.>>>> असले तर्क इथे कुणीच मांडलेले नाहीये. नुसत्या स्त्रियाच यातुन जात असतात असे नव्हे तर पुरुषही त्यातुन जात असतात. तुम्हाला निदान सुखाचे जीवन मिळाले होते ( तुमच्याकडुन तुमच्या जीवन साथीने नोकरीची अपेक्षाच ठेवली होती असे तर नाही ना? ) आई-सासु-बहिणी मदतीला होत्या. बर्‍याच जणांच्या तेही नशीबात नसते. पण ते कुणी बोलुन दाखवत नाही किंवा त्याचा बाऊ पण करत नाहीत.

आता तर परदेशात गेल्याने पुरुषांचा पण दृष्टीकोन बदललाय, तेही बायकांना/ आईला/ पत्नीला सगळ्या बाबतीत मदत करतात. तुमच्याच घरचे उदाहरण घ्या की. तुमच्या अहोंनी तुम्हाला मनमोकळे पणाने मदत केली. पण खरं सांगु का? स्त्रीयांनी ठाम आणी खंबीर असणे ही काळाची गरजच ठरलीय. त्यामुळे मी किंवा अनघा इथे दुसर्‍याने पण दु:खी असावे असे तर्क लढवत नाही आहोत. तर हे कष्ट आता जीवनाचा अविभाज्य घटक बनलेत हेच सांगायचा प्रयत्न करतोय. पण कदाचीत ते समजून घेतले जात नाहीयेत. आणी माझ्या पहाण्यात तर असे पुरुषही आहेत ( आमचे पूर्वीचे शेजारी - केटरर्स ) की जे त्यांच्या आईला लहानपणापासुन मदत करुन पापड शेवया बनवत होते ( हो चक्क बनवत होते ) आणी विकतही होते. हे पाहील्यामुळे का कोण जाणे मला आजही स्त्री पुरुष समानच वाटत आलेत.

असले तर्क इथे कुणीच मांडलेले नाहीये. >> +१

मला वाटतं होत असलेला त्रास, सन्घर्ष समोर मांडला पाहीजे, त्यात इतरांनीही समजुन घेतलं पाहिजे आणि तशीच साथ दिली पाहीजे. >> त्याच त्याच त्रासाबद्दल कितीजणांकडून आणि कितीदा ऐकायचं? काही पर्याय, सोल्युशन शोधणार आहात का त्याच्यावर?

अमा नी एक दिलाय, मी एक दिलाय, तुम्ही आणि इतर बायका करताय तेच तसंच करत राहु शकताच... असो...

आमच्या आईचे असेही उदाहरण आहे. आम्ही लहान असताना ती नोकरी करत असतानाच आधी बीए, मग बीएड , नंतर एमे झाली.. अवांतर: एमेत मराठवाडा विद्यापीठात ती सर्वप्रथम आली होती. >> अनघा सेम तू सेम माझ्या आईच . नोकरी करत असतानाच बीए, मग बीएड , नंतर एमे झाली . कान्हा मात्रेचाही फरक नाही आणि <<अवांतर: एमेत मराठवाडा विद्यापीठात ती सर्वप्रथम आली होती. >> तर माझी आई मुंबई विद्यापीठात पहिली आली मी चवथीतून पाचवीत गेले तेव्हा .

त्याच वर्षी मे महिन्यात आम्ही काश्मिरला गेलो होतो त्यामुळे इथल्या मराठी पेपर मधली बातमी आणि आईचा फोटो बघू शकलो नाही . पण घरी पोचल्यावर शेजाऱ्यांनी तो जपून ठेवलेला पेपर आणि बातमी वाचायला दिली आणि दार उघडताना घरात अभिनंदनाच्या पत्रांचा इतका ढीग पडला होता कि दार आत मध्ये उघडलेच जात नव्हतं . मी बारीकशी म्हणून एव्हढुच्या उघडलेल्या दारातून आत गेले . पत्रांचा ढीग बाजूला केला तेव्हा दार संपूर्ण उघडलं गेलं Happy

स्त्रीयांनी ठाम आणी खंबीर असणे ही काळाची गरजच ठरलीय. >> अगदी खरयं. पण कधी कधी इतक्या सगळ्या आघाड्यांवर लढताना खंबीर रहायला जमतचं असं नाही. अश्यावेळी आपल्यासारख्याच लढणार्‍या/ समस्या फेस करणार्‍या इतरजणी पण आहेत हे बघितल/ वाचलं की थोडं मानसिक बळ मिळतं. सुचेलते ह्यांनी वर सुचवल्याप्रमाणे, 'मॉम्स रिटर्न टु वर्क' असा एक ग्रुप सुरू करण्याची कल्पना चांगली आहे. आपल्या अनुभवांचा दुसर्‍या कुणाला फायदा झाला, त्यामुळे कुणाला मानसिक बळ मिळालं तर चांगलचं आहे.

Pages