लाईट(वीज) शिवाय ५ ते ६ दिवस

Submitted by आरू on 30 November, 2017 - 04:11

सूचना- या घटनेत कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.

रविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७. रात्री झोपताना जुना मोबाईल
स्वीच ऑफ करून चार्जिंगला ठेवला, ही तशी नेहमीची सवय. आमच्या इथल्या लाईटवर माझा विश्वास नाही म्हणून. तेव्हा नवीन मोबाईलची बॅटरी ९०% चार्ज होती, म्हणून तो तसाच ठेवला.

सोमवार, दि. २० नोव्हेंबर २०१७. सकाळी जाग आली तेव्हा समजलं की पहाटे कधीतरी लाईट गेली होती. म्हटलं असेल काही छोटा-मोठा प्रॉब्लेम. तसंही भारनियमनाची वेळ नाही थोड्यावेळाने येईल लाईट. नुसती अपेक्षा दुसरं काय.
दुसर्या दिवशी जुना मोबाईल स्वीच ऑफच होता. तशी त्याची गरजही नव्हती. त्या दिवशी नवीन मोबाईलवरती दृश्यम् ( अजय देवगणचा) बघितला. फॅन वगैरे नाही पण आधी अर्धा चित्रपट बघितला होता बरा वाटला म्हणून राहिलेला पण बघितला. झालं यात बॅटरी गेली नं ५०% च्या खाली. लाईट येण्याची अपेक्षा अजुनही होतीच. त्यात काॅल्स, व्हाटस्अप, माबो करण्यात बॅटरी अजूनच खालावत गेली. पूर्ण दिवस गेला लाईट मात्र आली नाही. त्या रात्री नवीन मोबाईल पण बंदच ठेवला मग.

मंगळवार, दि. २१ नोव्हेंबर २०१७. सकाळी मोबाईल ऑन केला, तोपर्यंत बॅटरी १५% वर आली होती. म्हणूनच मला अॅण्ड्राॅइड फोन अजिबात आवडत नाहीत. किती लवकर बॅटरी जाते त्याची आणि वरून उगाच हे अपडेट करा न् ते अपडेट करा. असो, आता घेतला तर घेतला काय करणार.
त्या दिवशी समजलं, सोमवारी पहाटे डी.पी.( ट्रान्सफार्मर) जळला म्हणून लाईट गेलीय. छान!!! अजून बघ दृश्यम् असं म्हणून स्वतःचाच राग आला. ट्रान्सफार्मरमध्येच बिघाड असल्याने इतक्यात लाईट येईल याची शाश्वती राहिली नाही. म्हणून त्याच दिवशी मोबाईल बाबांकडे दिला त्यांच्या ऑफिसात चार्ज करायला. बाबा संध्याकाळी घरी आले तेव्हा फोन ७८% चार्ज झाला होता. एक-दोन काॅल करण्यात 4% गेली. रात्री जुन्या फोनवरुन व्हाटस्अप वरती अर्धा तास घालवला, तिथे गेलंच पाहिजे असा काही नियम नाही पण सवय मग काय करणार? तशी त्याची बॅटरी लेवल बर्यापैकी होती म्हणून. यासाठी नवीन मोबाईल चालू ठेवला इंटरनेटसाठी, एवढ्यातच बॅटरी ७१% वरती आली होती. त्या रात्री झोपताना दोन्ही फोन बंदच केले.

बुधवार, दि. २२ नोव्हेंबर, २०१७. लाईट तर आलीच नाही पण त्यासाठी कुणी काही प्रयत्नही केला नाही. त्या दिवशी दोन्ही फोन जपूनच वापरले. नवीन फोनचा फक्त हॉटस्पॉट आणि कॉल्ससाठीच वापर केला.

गुरुवार दि. २३ नोव्हेंबर, २०१७. परिस्थिती आजूनही तीच. नाही म्हटलं तरी जुन्या फोनची बॅटरी ४०% तरी होती, तरीही त्या दिवशी बाबांकडे तो फोन दिला. जास्त काम असल्याने त्यांनी थोडा वेळच फोन चार्जवरती ठेवला, ८४% झाली होती बॅटरी. त्या रात्रीही व्हाटस्अप आणि माबोवरती जाणं झालंच, अर्थातच नवीन मोबाईलच्या नेटचा वापर होत होता. त्यामुळे त्याची प्रत्येक वेळी २%-३% नी बॅटरी कमी होत होती.

शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर, २०१७. जुन्या मोबाईलच्या बॅटरीची स्थिती चांगली असली तरी नवीनची बॅटरी बरीच घटली होती, म्हणून त्या दिवशी दिवसभरात दोन्ही फोन बंद करून ठेवले. कॉल करायचा असेल तेव्हा चालू करून कॉल झाला की लगेच बंद असा कार्यक्रम सुरू झाला होता. या फोन चालू- बंद करण्यात सुद्धा २% बॅटरी कमी होत होती, पण पर्याय नव्हता.
माबोकर अंबज्ञ यांनी यू ट्यूबवरील लिंक दिली, लाईट नसताना मोबाईल चार्ज कसा करायचा? त्याची चित्रफित होती ती. तो व्हिडिओ बघण्यात २% बॅटरी गेलीच. म्हटलं चला बसल्या-बसल्या प्रयोग करून बघायला हरकत नाही. व्हिडिओ बघताना नवीन चार्जर घ्यायचा का असा विचार मनात आला तोच धस्स् झालं, लगेचच नवीन चार्जरला प्रयोगांतून वगळण्यात आलं. मग जुना चार्जर, ब्लेड्स, काडीपेटीतील काड्या आणि घरात व्हिनेगर नाही म्हणून मीठाचं पाणी.( अशक्य आहे मी पण.) प्रयोग केला पण यशस्वी झाला नाही, काय माहित चार्जर खराब होता की मीठाचं पाणी नडलं. पण ठरवलंय कधीतरी नवीन चार्जर आणि व्हिनेगर आणून प्रयोग करून बघायचा, खात्री केली पाहिजे ते मूर्ख बनवतात की खरंच फोन चार्ज होतो ते.

शनिवार, दि. २५ नोव्हेंबर, २०१७. सकाळ पासून दोन्ही फोन बंद. नाही म्हणायला दोन-तीनदा चालू केले होते. तिकडे ट्रान्सफार्मरचं काम करत आहेत असं समजलं, पण लाईट येईल तेव्हा खरं असंच वाटलं. नवीन मोबाईल १३% आणि जुना ६२% इतका चार्ज असतात एकदाची लाईट आली आणि काय आनंद झाला म्हणून सांगू. नशीब चार्जिंगशिवाय मोबाईलवरती डब्बा है डब्बा असं म्हणायची वेळ आली नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग जुना चार्जर, ब्लेड्स, काडीपेटीतील काड्या आणि घरात व्हिनेगर नाही म्हणून मीठाचं पाणी.( अशक्य आहे मी पण.) प्रयोग केला पण यशस्वी झाला नाही, काय माहित चार्जर खराब होता की मीठाचं पाणी नडलं. पण ठरवलंय कधीतरी नवीन चार्जर आणि व्हिनेगर आणून प्रयोग करून बघायचा, खात्री केली पाहिजे ते मूर्ख बनवतात की खरंच फोन चार्ज होतो ते. >>>>>>
हा काय प्रकार आहे???? Uhoh

शीर्षक वाचुन ५-६ दिवस वीज नसताना काय काय हाल झाले बिचार्या लोकांचे म्हणुन वाचायला आले तर फक्त मोबाईल वापरण्याचेच हाल झालेले पाहुन आनंद झाला.

अच्छा अ‍ॅसिड बॅटरी तयार करण्याचा प्रयत्न आहे तर. जुना चार्जर / नवा चार्जर मुळे लक्षात नाही आले, त्याचा काय संबंध याच्याशी ते.
पवनपरी, मोबाईल बॅटरीचे व्होल्टेज साधारण ३.७ व्होल्ट्स असते. तिला चार्ज करायला किमान एवढे व्होल्ट्स देणारी बॅटरी लागेल जी अशी क्रूड एक्स्परीमेंटल बॅटरी देऊ शकणार नाही. तुम्हाला अशा खूप सार्‍या बॅटरीज बनवून त्या सिरीज मध्ये जोडाव्या लागतील, किती वोल्ट्स स्प्लाय मिळतो ते मोजून बघावे लागेल.. वगैरे... त्या पेक्षा ९ व्होल्ट्स बॅटरी वापरणारे चार्जर मिळतात. त्यात ९ व्होल्ट्चा सेल आणुन लावुन फोन चार्ज करता येईल.

सस्मित Lol . आजकाल फोन / लॅपटॉप चार्ज करणे हाच सर्वात महत्वाचा उपयोग आहे वीजेचा. नसेल लाईट (दिवे), नसेल पंखा तरी चालते.

अरे व्वा ! नविन धागा...
किती ती बैटरीची काटकसर !
प्रयोग सक्सेस झाला असता तर धाग्याचं नाव वीजनिर्मीत्ती ठेवता आलं असतं!

अच्छा अ‍ॅसिड बॅटरी तयार करण्याचा प्रयत्न आहे तर. जुना चार्जर / नवा चार्जर मुळे लक्षात नाही आले, त्याचा काय संबंध याच्याशी ते.>>> चार्जर कट करायला लागणार ना मग नवीन का घेणार ना?

च्रप्स, लहान गाव आहे. नाव नाही सांगत.

सस्मित, थंडीचे दिवस आहेत म्हणून पंखा, कूलरची जास्त गरज वाटली नाही. भाज्या रोज आणल्या फ्रिजचीही अडचण जाणवली नाही. अंगणात सौरऊर्जेवर चालणारा दिवा आहे मग घरातच तेलाचे दिवे, मेणबत्ती लावली गेली. आता माणूस एक वेळ उपाशी राहिल पण मोबाईल लागतोच प्रत्येकाला.

हो वीजनिर्मिती ती पण मीठाच्या पाण्यावर. Lol

मानव पृथ्वीकर, च्रप्स, विक्षिप्त मुलगा, सस्मित, सायू आणि राहुल सगळ्यांचे आभार. Happy

शीर्षक वाचुन ५-६ दिवस वीज नसताना काय काय हाल झाले बिचार्या लोकांचे म्हणुन वाचायला आले तर फक्त मोबाईल वापरण्याचेच हाल झालेले पाहुन आनंद झाला>> Happy

यावरून आमच्या ( खेडे)गावात मी लहान असताना एकदा १७ दिवस वीज गेली होती ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे, त्याची आठवण झाली. सुदैवाने तेव्हा पाणीपुरवठा विजेवर अवलंबून नव्हता. तेव्हा आम्हाला हळूहळू सवय झाली होती वीज नसण्याची.

जेव्हा स्मार्टफोनची बॅटरी डाऊन होत आली असेल तेव्हा सेटिंग मध्ये जाऊन बेसिक फोनचे function चालू करायचे. कॉल्स आणि sms चालू राहतात.

फोन भरपूर म्हणजे भरपूर जगतो

5 6 दिवस लाईट नाही तरी मोबाईलव्यतिरिक्त इतर काहीही हाल झाले नाहीत हे वाचुन बरे वाटले. आमच्या इथे आधी पाणी गुल होईल. आणि पाणी नाही म्हटले की बाकी सगळे ठप्प...

चार्जर कट करायला लागणार ना मग नवीन का घेणार ना?>>>
फक्त USB cable लागेल कट करायला. करु नका तसे, कापल्यावर आणि फोनला केबल लावल्यावर, जर दोन स्ट्रीप्ड वायर्स एकमेकाना टच झाल्या, किंवा ब्लेड्स्ना वायर जोड्ली असताना ते ब्लेड्स काडीपेटीतून निसटुन टच झाले तर फोनची बॅटरीचे शॉर्ट सर्कीट होईल, तापेल लगेच, फोन खराब होईल.

साधनाताई, लाईट असो नसो आमच्याकडे पिण्याची पाण्याचं हाल आहे लोकांचं, आमच्या घरी शेजारच्या गावातून फिल्टरच्या पाण्याचा जार येतो. सांडपाण्याचा काही त्रास नाही त्याची मोटर नदीवरील ट्रान्सफार्मरला जोडलेली आहे.

ओके मानव पृथ्वीकर, तसंही ब्लेडची भिती वाटत होती.

अतरंगी, शोधते आता बेसिक फोन मोड.
सगळ्यांना धन्यवाद Happy

असले रिस्की प्रयोग घरी करत जाऊ नका. फोनच्या बॅटरीज खतरनाक रित्या फुटू शकतात. तुम्हाला किंवा आप्तांना इजा होऊ शकते.
जर फ्रिक्वेंटली जर पावर कट होते आणि एवढ्या जास्त प्रमाणात तर इन्व्हर्टर घ्यायचा विचार नक्की करा. सब खुष रहेंगे... Happy

शीर्षक वाचुन ५-६ दिवस वीज नसताना काय काय हाल झाले बिचार्या लोकांचे म्हणुन वाचायला आले तर फक्त मोबाईल वापरण्याचेच हाल झालेले पाहुन आनंद झाला. >> मला चिडचिड झाली. फ्रिज मधलं अन्न खराब होइल, ५-६ दिवस मिक्सर , अक्वागार्ड, मायक्रोवेव्ह नसताना जेवण खाण , चहा मॅनेज करावे लागेल, बिल्डिंगमधे पाण्यासाठी पंप असेल आणि त्याला जनरेटर नसेल तर ती पंचाईत. हे सर्व काहीच नाही अन नुस्त्या मोबाइल फोनच्या बॅटरीची चिंता ? त्यावरही काही महत्वाचे बिझनेस डील्स, पेशंटचे फोन असलं काहि नाही. नुसतं व्हॉट्स अ‍ॅप वर टाइम पास .

मातोश्रींनी / किंवा जे कोणी रिस्पॉन्सिबल असतील त्यांनी जेवणाखाणाचे आणि पाण्याचे कसे मॅनेज केले ते लिहा. फोनचे चार्जिंग कुठल्याही मित्र मैत्रिणीच्या घरी जाउन किंवा कॉलेजात / ऑफिसात करता येते. त्यात एवढे दळण दळायचे काय कारण ?

योकु, थँक्स concern साठी.
मेधाताई, तुमची चिडचिड झाली म्हणून माफ करा. आम्ही बनवलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवत नाही फक्त भाज्या आणि पाणी त्यात हिवाळा असल्याने पाणी पण नाही ठेवत. मायक्रोवेव्ह आमच्याकडे नाहीये. चहा गॅस वरती बनवला जातो. बिल्डींग नाही आमचं सेपरेट घर आहे. पेशंटचे फोन यायला मला आधी डॉक्टर व्हावं लागेल पण ते आता शक्य नाही. मी आर्टची आहे हो स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय. त्यामुळे कुणाला ऑफिसात जाणार? लाईट असली तरी आम्ही रोज लागणारा शेंगदाण्याचा कूट उखळातच करतो. मिक्सरची गरज पडणारया गोष्टी आम्ही टाळल्या इतक्या दिवस. पाण्याचं मी वरती सांगितलं आहे. थोडासा टाईमपास करायला जातोच ना इकडे तिकडे? सहज म्हणून इथे लिहायचा प्रयत्न करतेय.

लाईट जर दोन चार दिवस नसेल तर फक्त मोबाईल चे हाल होतात.
दोन वर्षापुर्वी भारतात (पुण्यात) आलो होतो तेव्हा पण आमच्या सोसायटीला वीज देणारा टान्सफॉर्मर जळाला होता तेव्हा पण तीन दिवस लाईट न्हवती . त्यावेळी पण फक्त मोबाईल/ कम्प्युटर हा एकच प्रोब्लेम होता. बायकोने आणि मुलाने कुणाला तरी मोबाईल ऑफिस मधुन चार्ज करुन आणायला सांगितला. मी फोन दिवसातले २२ तास बंद ठेउन ४ दिवस चालवला , लाईट आली तेव्हा ३०% चार्ज बाकी होता.
बिल्डिंगमधे पाण्यासाठी पंप ला डिझेल जनरेटर आहे. त्यामुळे पाण्याचा ईश्यु न्हवता.
फ्रिझ मध्ये जास्त सामान नसतेच. सगळे फ्रेश खल्ले जाते, लाईट येणार नाही म्हटल्यावर जे खराब होईल ते आधी संपवले.
रोज सकाळी लागेल तेवढे दुध आणुन दर ८ तासाला गरम केले.
जेवण खाण, चहा सगळे गॅस वर केले जाते . अक्वागार्ड, मायक्रोवेव्ह हे सगळे भारताबाहेर असताना. ईकडे नळाला जे पाणी येते ते गाळुन पितो. मिक्सर चालु नसला तरी खलबत्ता , वरवंटा आहे, त्यावेळेस कामाला आला.
लिफ्ट बंद असल्याने तीन मजले चढा- उतार केल्याने व्यायाम झाला. वरिष्ठ मंडळीनी घरी राहाणे पसंत केले.
आमच्या मुलाना अभ्यास न्हवता पण ज्याना होता त्यानी अंधार पडायचा आधी अभ्यास करुन घेतला. काट्र्न चॅनल, मोबाईल गेम नसल्याने मुलाना पण अभ्यासाला भरपुर वेळ मिळाला आणि मुले खेळायला चक्क मैदानात.
टी व्ही सिरियल न बघितल्याने डोक्याला ताप कमी झाला.
लाईट नसल्याने तीन दिवस सोसायटीच्या लोकाशी भरपुर गप्पा झाल्या, ओळखी वाढल्या. नाहीतर आजकाल शेजारी कोण राहत ते माहित नसते.
चार दिवासानी लाईट आल्यावर परत आपले रुटीन चालु.

भारतात कोण अकवागार्ड, फ्रिज, मायक्रोवेव्ह वापरतो गावाकडे. अमेरिकेतली गोष्ट नाहीय.

परी... काही प्रतिसाद इग्नोर करायला शिक.. असले उचकवणारे प्रतिसाद टाकून नवीन लेखकांना नाउमेद करून नंतर माबोवर आजकाल चांगले लेखन का येत नाही याच्यावर चर्चा करनारे खूप सापडतील. काही लोक हेच मोटिव्ह घेऊन येतात उचकऊन टाईमपास व्हावा म्हणून.

हायला एवढे दिवस वीज गॉन.. आणि कोणाला चालू करायचे काहीच पडले नव्हते? अवघड आहे..
पवनपरी कुठे राहता आपण?
पुढच्या वेळी अश्या प्रसंगी आमच्याकडे आपले स्वागत आहे.. आमची मुंबईत तीन घरे आहेत हे ऐकून ठाऊक असेलच. लोडशेडिंगची झंजटच नाही Happy

ऋन्मेश, स्वागतासाठी धन्यवाद. सध्या मु. पो. लहानसं गाव असलं तरी मुंबई माझ्यासाठी नवीन नाहीये. आमचीही घरं आहेत मुंबईत. Happy

पवनपरी परिक्षेची तयारी सुरु आहे तर त्या दिवसात एकदा तरी रात्री म्युनिसिपाल्टीच्या दिव्याखाली जाउन थोडा अभ्यास करुन यायचा ना.
पुढे जाउन नातवांना सांगायला छान गोष्ट मिळाली असती. Proud

असले रिस्की प्रयोग घरी करत जाऊ नका. फोनच्या बॅटरीज खतरनाक रित्या फुटू शकतात. तुम्हाला किंवा आप्तांना इजा होऊ शकते.......

एखाद्या प्रयोगात रिस्क (धोका) आहे म्हणून तो प्रयोगच न करणे योग्य नाही. शाळेतील काही प्रयोगातही धोके असतातच. (आम्हाला इ. ७ वी मध्ये 'सोडीअम' धातू पाण्यात टाकला की 'हायड्रोजन' वायू आणि 'sodium hydroxide' तयार होते, हा प्रयोग होता. तो प्रयोग दाखवताना आमच्या बाईंनी सोडीअम जास्त टाकला, त्यामुळे जास्त 'हायड्रोजन' वायू तयार होऊन वक्रनलीकेच्या तोंडाशी पेटती काडी नेताच मोठ्ठा स्फोट झाला होता! आता हा प्रयोग त्यांनी दाखवलाच नसता तर 'हायड्रोजन' वायू पेट घेताना कसा स्फोट होतो, हे कळले असते का?) त्यापेक्षा त्या प्रयोगात नेमके काय धोके आहेत व ते कसे टाळता येतील हा विचार महत्वाचा!

या केसमध्ये वायर short झाल्या तर बॅटरी फुटण्याचा संभव आहे, पण हे केव्हा होईल? तर फोनमधील वीज बाहेर येत असेल तर. जर फोनमधील विजेला बाहेर येण्यापासून रोखले तर वायर short झाल्यावरसुद्धा बॅटरी फुटण्याची शक्यता नाही. आता हे कसे करता येईल? तर त्याच वायरला मध्ये एखादा Diode लावला तर बाहेरील वीज फोनमध्ये जाईल पण फोनमधील वीज बाहेर येणार नाही. (पवनपरी या आर्ट च्या विद्यार्थिनी असल्याने त्यांच्या माहितीसाठी: Diode हे एक इलेक्ट्रॉनिक component आहे, जे one way gate प्रमाणे कार्य करते.)

अर्थात हे प्रयोग म्हणूनच ठीक आहे, वरचेवर वीज जात असल्यास इन्व्हर्टर बसवणेच योग्य. तसेच आपल्या घरी सोलार पॅनेल (अंगणातील सौरउर्जेवर चालणारा दिवा) असल्यास त्याचे कनेक्शन इन्व्हर्टरच्या बॅटरीस दिल्यास ग्रीड पावर कमी लागेल.

diode_1244.jpg

आता हा प्रयोग त्यांनी दाखवलाच नसता तर 'हायड्रोजन' वायू पेट घेताना कसा स्फोट होतो, हे कळले असते का?
>>> अशक्य हसलो..

Pages