माझं गाव ... माझं घर

Submitted by मनीमोहोर on 29 November, 2017 - 17:49

एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यांच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या भूप्रदेशावर म्हणजेच कोकणावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. त्यातल्या त्यात तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा तर निसर्ग सौंदर्याची खाणच आहे. या जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ... हो हो तोच.. हापूस साठी प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यात नाडण हे अगदी रुक्ष नाव असलेलं एक छोटसं गाव आहे . जगाचा नकाशा बघितला तर हे गाव म्हणजे एक अति सूक्ष्म टिंब . कोणाच्या खिजगणतीतही नसलेलं. अर्थात ते जगासाठी, आमच्या साठी ते सर्वस्व आहे . कारण ते आमचं गाव आहे . " जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरियसी" हे अगदी खरं आहे.

आता कोकण रेल्वे ने आरामात झोपून किंवा स्वतःच्या मोटारीने ही नऊ दहा तासात गावाला पोचता येते. पण साठ सत्तर वर्षांपूर्वी कोकणात जाणे म्हणजे दिव्य असे. माझे सासरे मुंबईहून गावाला पोचत दुसऱ्या दिवशी दिवेलागणीला . ते नेहमी पावसाळ्यातच गावाला जात असत. संध्याकाळची वेळ, दुशीकडे कमरे एवढ वाढलेलं गवत , लाईट नाही, मुंबईहून घरी न्यायला म्हणून कौतुकाने घेतलेल्या अनेक वस्तूमुळे वाढलेलं सामान अशा स्थितीत घर गाठणे म्हणजे कठीणच असे. बस स्टॉप वर दोन गडी कंदिल घेऊन हजर असत . तिथून पुढे दोन मैल चालत जावं लागे तेव्हा घर दिसत असे. माझ्या तिकडे राहणाऱ्या सासऱ्यांनी पूर्ण वाटभर कोणी रस्ता चुकू नये म्हणून खुणेचे दगड रचून ठेवले होते. त्यांच्या आधाराने गेलं तरच चकवा न लागता घरी पोचता येत असे.

मुंबई गोवा हायवे तळेऱ्याला सोडून मग पाटगाव फणसगव गाव मार्गे पन्नास एक किलोमीटर अंतरावर नाडण गाव आहे . किंवा कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन ला उतरून ही नाडणला जाता येतं. गाडीने गोवा हाय वे सोडला की लगेच ती प्राणवायूने पुरेपूर भरलेली ताजी हवा आपलं मन प्रसन्न करते. मे महिना असेल तर वाटेतल्या आंब्याच्या बागा, काजूची झाडं, करवंदाच्या जाळ्या, बहरलेली उक्षी, फुललेला पळस पांगारा, मंजुळ शीळ घालून आपलं स्वागत करणारे पण क्षणार्धातच दृष्टी आड होणारे अनेक प्रकारचे चिमुकले पक्षी , दोन बागांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला एका सरळ रेषेत घातलेले गडगे , आसमंतात भरून राहिलेला रानाचा म्हणून असतो तो खास वास हे सगळ आपल्याला आपण आता थोड्याच वेळात घरी पोचणार हे सारखं सांगत असतात तरी ही मन अधीर झाल्याने तो शेवटचा टप्पा संपता संपत नाहीये अस वाटत राहतं. पडेल, वाडा ही गाव मागे टाकत आपण अखेर नाडणात येउन पोचतो.

रस्ता गावातला

IMG_20171205_234143.jpg

घाटी

IMG_20171205_231142.jpg

गडगा

IMG_20171205_233522.jpg

करवंद

IMG_20170313_175505148.jpg

अंजन

IMG_20170313_175334363.jpg

गाडी थोडी उंचावर थांबते पण त्यामुळे उतरल्या उतरल्या आपल्याला परिसराचा एरियल व्ह्यू घेता येतो. आजूबाजूच्या हिरवाईत लपलेलं ते आमचं कौलारू घर कौतुकाने बघताना प्रवासाचा सगळा शिणवटा क्षणात नाहीसा होतो. “ काकू आली …… काकू आली” म्हणत मुलं घाटी चढून बॅग घ्यायला येतात. त्यांच्याबरोबर नवीन माणसाचं स्वागत करायला जॉनी असतोच. तो एकदा आपल्याला हुंगतो आणि मग आपल्या मागेपुढे करत राहतो ... आपलं स्वागत म्हणून. गोठ्यातून गाईचं हंबरण ऐकू येत. तिथे धार काढणारा गडी " वैनीनू , इलासा " म्हणून आपलं स्वागत करतो. अंगणात आलं की सैपाकघरात रटरटणाऱ्या कुळथाच्या पिठल्याचा घमघमाट आपल्या नाकात शिरतो तेंव्हा मात्र खरचं आलो आपण घरी ही भावना मनाच्या तळापर्यंत झिरपत जाते.

आमचं नाडण हे एक अगदी लहान जेमतेम दोन अडीच हजार वस्ती असलेलं खेडं आहे. गावात दुकान म्हणाल तर चहा पावडर, साखर ,तेल अशाच गोष्टी मिळतील एवढच मोठं. शाळा आहे फक्त सातवी पर्यंत . परंतु अलीकडे झालेल्या वाडातर पुलामुळे ते देवगडशी जोडलं गेलं आहे. डॉक्टर, शाळा कॉलेज, दुकान, खरेदी सगळ्यासाठी देवगड.

दोन टेकड्यांच्या उतारावर ते वसलं आहे. आणि मधून वहातो एक व्हाळ म्हणजे ओढा. घरं सगळी व्हाळाच्या जवळ पासच आहेत .याचे कारण व्हाळाच्या जवळच्या विहिरीनाच पाणी लागतं . जस जसे वर जाल तसं पाणी दुर्मिळ होत जातं आणि त्यामुळे साहजिकच तिथे मनुष्य वस्ती ही नाही . त्यातल्या त्यात सधन लोकांची घरं नॅचरली व्हाळापासून थोडी वर पण फार वर ही नाही अशा लोकेशन ला आहेत. गरीब वस्ती सहाजिकच व्हाळापासून अगदी जवळ आहे. पावसाळ्यात अशा घरांना कायमच पुराचा धोका असतो.

गाव टेकडीच्या उतारावर असल्याने गावात सगळीकडेच खाली गेलं की व्हाळ आणि वर गेलं की टेकडी माथा असं चित्र आहे. खालती व्हाळाजवळ माड पोफळी आणि वरती आंब्या फणसाची झाडं असं प्रत्येकाच्याच आवारात असल्याने चारी बाजूने फक्त हिरवाईच दिसते आम्हाला. कोकणात टेकड्या चढण्यासाठी दगडाच्या पायऱ्यांचा जिना केलेला असतो. ह्याच त्या कोकणातल्या घाट्या. एकदा खाली किंवा वर जाणं ही आपल्या फिटनेस ची टेस्टच असते. मे महिन्यात कामवाल्या बायका आंब्यांची भली मोठी ओझी एक घाटी चढून आणि एक उतरून रस्त्यापर्यंत आणतात तेव्हा त्यांच्या बद्दल खूप वाईट वाटत. श्रमपरिहर म्हणून त्यांना ताक, सरबत, गूळ - पाणी असं दिलं जात . पण आमच्या काही बागा इतक्या आडनीड्या ठिकाणी आहेत की तिथे गाडी जाणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. बाजारात आपण तयार आंबे विकत घेतो तेव्हा अशा गोष्टींची कल्पना ही नसते आपल्याला.

माझे आजे सासरे नाडणालाच माती विकण्याचा व्यवसाय करीत असत. तिथे त्या काळी तो कितीसा चालत असेल ही शंकाच आहे . पण त्यांच्याकडे दूरदृष्टी होती आणि ते प्रयोगशील ही होते. आमच्याच पडीक असलेल्या जमिनीत त्यांनी काबाडकष्ट करून आंब्याची कलमं लावली . त्यांच्या हयातीत त्यांना जरी फळ चाखायला मिळाली नाहीत तरी आज त्यांची पंतवंड त्याची फळ चाखत आहेत. शंभर सव्वाशे वर्षापूर्वी लावलेली ती कलम आज ही भरपूर धरतात. काही कलमं इतकी विस्तारली आहेत की मूळ झाड शोधावं लागतं आणि काही इतकी उंच झाली आहेत की उंच शिडी लावल्या शिवाय त्यावर चढताच येत नाही.

आमच्या वठारात म्हणजे वाडीत चार पाच घरं जवळ जवळ आहेत. त्यामुळे शेजाऱ्यांची सोबत आम्हाला सगळ्यानाच मिळते जी गावाकडे आवश्यकच असते. पूर्वेकडे ज्यांचं घर आहे ते उगवते म्हणून आणि आमचं घर पश्चिमेला असल्याने सहाजिकच आम्ही मावळते म्हणून ओळखले जातो. आमचं हे घर ही माझ्या आजे सासऱ्यांनी स्वतःच्या हातानी बांधलं आहे, कोणा ही गवंड्याची किंवा सुताराची मदत न घेता. आमच्या घराजवळची घाटी ही त्यांनी स्वतःच बांधली आहे . त्यामुळे त्या घाटीचं आम्हाला जरा जास्तच कौतुक. आज शंभर सव्व्वाशे वर्ष झाली तरी तशीच मजबूत आहे . एक दगड हलला नाहीये. असो. घराची रचना ओटी, पडवी, माजघर, सैपाकघर आणि परसदार अशी आहे. आता मातीच्या भिंती जाऊन सिमेंटच्या आल्या आहेत, जमिनीला ही फरशा बसवल्या गेल्या आहेत . घराचं पाखं थोडं अधिक उंच केलं गेलं आहे . नळीची कौलं जाऊन मंगलोरी कौलं घातली गेली आहेत. कालानुरूप गरजेचे असणारे इतर ही अनेक बदल झाले आहेत. पण ते सगळे मूळ घर आहे तसेच ठेऊन .

वाढणाऱ्या कुटुंबाला रहातं मूळ घर कमी पडत होतं म्हणून मूळ घराच्या खालच्या लेव्हलला एक माडी बांधली आहे . मूळ घराची लेव्हल आणि खालच्या माडीची लेव्हल एकच असल्याने मूळ घर आणि माडी याना जोडणारा एक छोटासा पूल बांधला आहे. त्यामुळे माडी मूळ घरा पासून वेगळी न राहता मूळ घराचाच एक भाग बनली आहे.

घर किती ही चांगलं असलं तरी घराला शोभा येते ती माणसांमुळे. आज त्या घरात पंधरा माणसं अगदी गुण्या गोविंदाने राहत आहेत. कोकणात खरं तर घरांना नावं बिव नसतात शहरात बंगल्याना असतात तशी. परंतु मध्यंतरी आमच्याच घरातल्या एक शाळकरी मुलाने शाळेतल्या हस्तव्यवसायाचा भाग म्हणून घराची पाटी तयार केली होती. आमच्या घराचं " गोकुळ " हे नाव सर्वार्थाने सार्थ करणारी ती पाटी आम्ही अभिमानाने घरावर लावली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वा, अप्रतिम.

नाडण बद्दलचं तुमचं प्रेम, घर, माणसे, आजूबाजूचा परिसर ह्याबद्दलची तुमची कृतज्ञता, माया शब्दाशब्दातून ओसंडते. लकी आहात हेमाताई, तुम्हाला गावचा सहवास अधून मधून वारंवार मिळतो आणि तुमची माणसे पण लकी ज्यांच्याबद्दल तुम्ही लिहिता एवढं. डोळे भरून आले माझे.

नवऱ्याला जरूर वाचायला देईन, तो जास्त रिलेट होईल आणि सासूबाई जुन्या काळचा बोटीचा प्रवास, कसं जायला लागायचं फणश्यापर्यंत मुंबईहून ते बऱ्याचदा सांगतात त्यामुळे खूप रिलेट केला तो प्रवास.

दुशीकडे हा शब्द खास त्याच मातीतला, सासुबाईंच्या तोंडी नेहेमी असतो.

वाडातर पुल हे खरंच वरदान आहे आता. नवरा दहावीत होता तेव्हा देवगडला परीक्षा होती तेव्हा कोणाकडे तरी राहायला लागलं होतं. आता फणश्यातून मुलं रोज कॉलेजला जातात येतात. नवरा आठवी ते दहावी पण फणश्याहून वाड्यात शाळेत जायचा रोज आणि तेही बहुतेकदा चालत. आठवीत वाड्यातल्या वेलणकरांकडे राहिला होता पण नववी, दहावी ला फणश्याहून जायचा रोज. बस विजयदुर्गहून यायची पण लिमिटेड असायची, कधी चालू असायची तेव्हा बसने, पावसाळ्यात बस बंद तेव्हा चालत.

मस्त लिहिलयं..
गावात सगळीकडेच खाली गेलं की व्हाळ आणि वर गेलं की टेकडी माथा असं चित्र आहे.>>>
व्हाळ म्हणजे वाहत्या पाण्याचा पाट ना?

खूप छान नेहेमीप्रमाणे. दुशीकडे शब्द खासच... माझी काकूपण वापरायची (तुमच्या लेखातलया खास कोकणातल्या शब्दांची लिस्टच करायला हवी)

अप्रतिम लेखन.
आपल्या घराचं वर्णन वाचताना जणू एखाद निसर्गचित्रच पाहतोय कि काय असाच भास होत होता. सर्व गोष्टी अगदी तंतोतंत डोळ्यांसमोर प्रकट होऊ लागल्या.
खूपच छान...

खूप छान लिहिले आहे. नेहेमीप्रमाणेच. तुमची लिखाणाची शैली खूप छान आहे; डोळ्यासमोर अगदी चित्र उभे रहाते.

सुंदर लिहिलंय.
तुमचे वर्णन वाचून आम्ही आजोळी जायचो त्याची आठवण झाली.गोव्यापासून २ तासांच्या अंतरावर कळणे म्हणून गाव आहे.तिथे उतरून टपरीवजा हॉटेलात श्रमपरिहाराकरिता चहा आणि भजी खाऊन २-२.५ मैल चालत उगाडे म्हणून खेडे होते तिथे जायचे.आनच्या आइवडिलांचे कौतुक हातात सामान धरून चालायचे.कधी कळण्याला कोणी कुळवाडी भेटले तर सामान उचलून घ्यायचे.

ममो,
थोडेसे शुद्ध्लेखनाच्या चुका दुरुस्त कराल का?

अप्रतिम. आमचं कोकणातलं गाव डोळ्यासमोर उभं राहिलं. आमच्या ’मोसम’ ला पूर्वी अडीच मैल चालत जायला लागायचं खारेपाटणहून. तो अडीच मैलाचा प्रवास गड्याच्या खांद्यावर बसून व्हायचा. खांद्यावरुन न्याहाळलेलं मोसम आणि परिसर आठवत राहिला.

ममो नेहमी प्रमाणेच सुंदर वर्णन. तुमच्या नवीन लेखनाची वाट बघत होतो. अगदी डोळ्यासमोर उभे राहिले तुमचे घर. प्रचि टाकाल का?

कित्ती छान वर्णन ... तुम्ही खरंच लकी आहात हे निसर्गसौंदर्य अनुभवयाला मिळतंय... सगळे चित्र डोळ्यासमोर आले... जमले तर फोटो टाका प्लीज...

अफाट आणि अफलातून..... आज तर पोहोचवलेच मला गावाला Happy

त्यातल्या त्यात तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा तर निसर्ग सौंदर्याची खाणच आहे.
>>>>
+७८६
हा आमचाच जिल्हा.. आणि माझे आजोळ, आईचे गावही ईथलेच Happy

कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन ला उतरून
>>>
हा आमचाच तालुका Happy

व्हाळ म्हणजे ओढा.
>>>>
मामाच्या गावाला गेलो की घरचे बाथरूम सोडून आंघोळपाण्याला ईथेच Happy

चारी बाजूने फक्त हिरवाईच दिसते आम्हाला.
>>>>>>
माझे गावचे फोटो बघून माझे काही बिनकोकणी मित्र म्हणाले होते की कोकणात सगळीकडेच हिरवं हिरवं असते की तुमच्याकडेच काही स्पेशल आहे...
आता त्यांना काय सांगणार. अख्खा सिंधुदुर्गच पिकनिक स्पॉट आहे Happy

सर्वांचे खूप खूप आभार. सगळे प्रतिसाद खूप सुंदर.

अंजू, तुझा प्रतिसाद पहिलाच आणि तो ही इतका सुंदर. मस्तच लिहिलं आहेस.

देवकी, मोबाईल वरून टाईप केलं आहे त्यामुळे पट्कन लक्षात येत नाही . करते दुरुस्त.

मोहना, गावाचं नाव खूपच आवडलं आहे.

ऋ , किती सुंदर लिहिलं आहेस. खूप आवडलं.

खरं म्हणजे देवगड तालुक्याचा आपला एक बाज वेगळाच आहे कारण तो रत्नागिरी जिल्हा संपल्यावर आणि सिंधुदुर्ग जिल्हा सुरू झाल्यावर लगेच आहे.

Pages