मला मिळालेला पहिला नकार ! - प्रस्तावना

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2017 - 06:19

हो !! मला मिळालेला नकार ...
लग्नाचाच नकार !!

मी ऋन्मेष.
आडनाव नाही सांगत, त्याने जात कळते.
राहायला दक्षिण मुंबई, कामाला एमेनसी. एक गर्लफ्रेंड आहे, लग्न तिच्याशीच करायचे आहे.
हे जरी तुम्हाला माहीत असले तरी गेले काही दिवस लाईफमध्ये टेंशनच चालू आहे.
गर्लफ्रेंडबाबत एवढ्यात घरी कळवले नसल्याने आणि पुरेसे वय झाले असल्याने घरच्यांनी आपले कर्तव्य पार पाडायला सुरुवात केली आहे.
म्हणजे माझ्यासाठी मुलगी शोधायला घेतली आहे.
माझे आईबाबा अजून डिजिटल पॅरेंटस झाले नसल्याने त्यांचे शोधकाम पारंपारीक पद्धतीनेच चालू झालेय. जातीमध्ये आणि नात्यामध्ये काही मुली सांगून येत आहेत. तर काही मुलींना मी सांगितलो जात आहे.
उगाचच कांदेपोहेच्या सतरा पंगती उठायला नकोत म्हणून फोटो आणि बायोडाटा बघूनच मुली शॉर्टलिस्ट केल्या जात आहेत. खरे तर आतापर्यंत एकच मुलगी कशीबशी सर्वानुमते शॉर्टलिस्ट झाली होती. आणि नेमके तिनेच मला नकार दिला आहे.

तर झाले असे ........

........................

"उद्या मला बघायला मुलगी येणार आहे." एका रम्य संध्याकाळी गार्डनमध्ये पडल्यापडल्या हातात तिचा पाय घेत मी म्हणालो.

"बघायला? का? तू काय राष्ट्रीय पक्षी मोर आहेस का?" ईति गर्लफ्रेंड ... बहुतेक मला काय म्हणायचे होते हे तिच्यापर्यंत नेमके पोहोचले नव्हते.

"अग्ग लग्नासाठी बघायला येणार आहे"

"काय???"

"हो .."

"नालाय्यक !!!!!"

आणि मी तिचा पाय आणखी घट्ट पकडला. नालायक म्हणजे फारच चिडली असावी, ही तिची हाय्येस्ट लेव्हल ऑफ शिवी होती. याआधी फक्त दोनदाच दिली होती. एकदा जेव्हा माझ्या खिशात तिला सिगारेटचे पाकीट सापडले होते तेव्हा आणि दुसर्‍यांदा जेव्हा माझ्या गॅलरीत तिने तिच्या मैत्रीणीचा फोटो पाहिला होता तेव्हा. दोन्ही वेळा वेळीच गैरसमज दूर केले होते. यावेळी मात्र खरोखरच मला मुलगी बघायला येणार होती. आणि मुलगी मला बघणार म्हणजे मी सुद्धा तिला बघणार एवढे सायन्स तर तिच्याही शाळेत शिकवले होते. तसेच मी एखादी मुलगी बघितली की बघतच राहतो एवढे तर ती देखील मला ओळखून होती. त्यामुळे तिचा राग योग्यच होता.

"येतो मी. उद्याच तिला नकार कळवतो. नाहीतर तिचाच नकार मिळेल असे काहीतरी करतो. आता परवाच भेटू" असे बोलून मी तिचा पाय सोडला आणि तोच हात डोक्याला लावत तिथून काढता पाय घेतला.

तिचाच नकार मिळेल असे काहीतरी करतो असे म्हटले खरे.... पण ते शक्य नव्हते. मुलगी नात्यातूनच सांगून आलेली. लग्नाला नकार देताना तिने जर ते कारण घरी सांगितले असते तर फिरून पुन्हा माझ्याच अंगाशी आले असते. त्यामुळे असे काहीतरी कारण शोधणे गरजेचे होते जे तिने मला नकार देण्यास पुरेसे ठरावे पण त्याचवेळी जगाला मात्र ते क्षुल्लक वाटावे. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची नव्हती पण वाजवायची होती. गाजराची पुंगी वाजवायचीही होती आणि खायचीही होती. लग्नाचा लाडू खायचा होता पण उद्याचे कांदेपोहे मात्र पचवायचे नव्हते. एखाद्या फिल्मी सिच्युएशनला साजेसा असा तो दिवस उजाडला.

मुलीचे पहिले दर्शन होताच मी तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळले. मुलीच्या सौंदर्यात खोट काढावी अशी एकही गोष्ट नव्हती. पायाचे अंगठेही अगदी छान कळीदार नाजूक होते. एखाद्या सुंदर मुलीला अश्याप्रकारे न्याहाळण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. याआधी जिथे जिथे सौंदर्य आढळेल तिथे तिथे नजर खिळून राहायची. आता पळून जात होती. मुलगी धनुष्याची कमान ताणल्यासारखी गोड हसत होती आणि माझ्या कपाळावर तलवारीचे वार केल्यासारखे आठ्यांचे जाळे पसरत होते.

पंधरा मिनिटांच्या कौटुंबिक गावगप्पांनंतर आम्हाला एकांतात जायची संधी मिळाली,
आणि भीतभीतच मी तिला वेगळे काहीच न सुचल्याने पहिलाच प्रश्न विचारला, "तू किंवा तुमच्या घरचे कोणी मायबोलीवर आहे का ग्ग?"

"काय आहे हे मायबोली?"

"........" मी शांतच.

"व्हॉटसप फेसबूकसारखे अ‍ॅप आहे का?" तिचे तर्क लढवणे सुरू झाले.
झाली पंचाईत, उगाच काय आहे हे शोधायला गेली तर जमले माझे लग्न. तसे लग्न करायचे नव्हतेच. पण तिने लग्नाला नकार द्यायचे हे कारण घरी समजले असते तर सर्वात पहिले माझा लॅपटॉप फुटला असता आणि त्यानंतर ईंटरनेट कटला असता.

"अग्ग नाही ग्ग, मी विचारले तुमच्या घरी मायबोलीमध्ये, म्हणजे मराठी मध्ये बोलतात का?" मी सारवासारव मोडमध्ये.

"अय्या, घरी कश्याला ईंग्लिश फाडू?" तिची अय्या बोलायची स्टाईल सेम माझ्यासारखीच होती. आमचे खूप जमणार असे पहिल्यांदाच वाटले. पण लगेच स्वत:ला सावरले. आपल्यासाठी ही भेट फक्त औपचारीकता आहे आणि आपली एक गर्लफ्रेंड आहे याची मनाला आठवण करून दिली.

ती पुढे म्हणाली, "आईला मॉम नाही तर मम्मी बोलणारे आहोत आम्ही. घरी फक्त मराठीतच" .. तिचे हे मातृभाषा आणि मम्मी द आईवरचे प्रेम बघून माझे आईज पाणावले.

"मी घरीही मराठी आणि बाहेरही मराठीच. मला ईंग्लिश नाही जमत" तिचा नकार मिळवण्यासाठीचा मी माझा पहिला पत्ता फेकला.

पण ती ढिम्मच!

"तुला जमते का चांगले ईंग्लिश?" मी विषय पुढे वाढवला.

"हो तर, म्हणजे काय. मी फादर डिसोझाची आहे"

"पण तुझे फादर तर.. म्हणजे तू तर.. हनमंतरावकाकांची मुलगी आहेस ना?" मी कळून सवरून आगाऊपणा करू लागलो.

"ए स्टुssपिड, माझ्या स्कूलचे नाव आहे ते"

"ओह, सॉरी. पण मला ईंग्लिश जमत नाही हे तुमच्या फादर डिसोझांना चालेल का?"

"हा हा, यू आर सो फनी. पण फादर नाहीयेत आता. फादर डिसोझा म्हणजे ग्रेट माणूस होते, असे फादर मिळायला नशीब लागते, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त ......." पुढे जवळपास दहा पंधरा मिनिटे फादर कौतुक सोहळा चालू होता. तो का चालू होता, त्याचा माझ्याशी काय संबंध, आमच्या आजच्या भेटीशी त्याचे काय घेणेदेने, काहीच समजत नव्हते.

"बाय द वे, तू कोणत्या शाळेत होतास?"

"मीss.. मी संत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालय, मराठी माध्यम.. गाडगेबाबा हे ग्रॅण्डफादर होते. ते सुद्धा आता नाहीयेत. थोडेसे गूगल केले तर समजेल त्यांच्याबद्दल... पण ते सोड, तू सांग ना. मला नाही जमत ईंग्लिश, तुला चालेल का?"

"मी शिकवेन ना... आई विल टिच यू" ... फादर कन्या आताच शिकवायला सुरुवात करतेय की काय असे वाटले. माझा पहिला ईंग्लिशचा वार खाली गेला होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगाच सगळे पाट्या टाकतात म्हणून आपणपण टाकल्याच पाहिजेत असे नाही
Submitted by अॅमी on 29 November, 2017 - 09:16
>>>
वेल सेड ॲमी.घरचे माझ्या गळ्यात बांधायची घाई करतायत.पण आर्थिक बाबतीत माझे मलाच सुधरत नाही तर लोकाच्या पोरीचं आयुष्य कशाला दावणीला बांधायचे.?

"उद्या मला बघायला मुलगी येणार आहे."........

माझ्या माहितीप्रमाणे मुलगा आणि मुलाकडचे लोक मुलीकडे जातात ना? मुलगी पाहायला???

देवकी, अपुर्णच आहे Happy
बाहुबली बिगिनिंग आणि कन्ल्यूजन असे आहे ते..

वि मुलगा, गेले ते दिवस. आता सोय बघितली जाते. मुलगी वाशीची होती. मला वाशीला जाऊन जिवाची काशी करायची नव्हती. तर ती ईथे आली. तेवढीच तिचीही जीवाची मुंबई झाली. आमची भेट झाल्यावर मी तिला राणीबागेत सोडून आलो.

वेगळा धागा होऊ शकतो पण माझे मत असे की अररेंज मारेज करायचे असेल तर मुलीनी 27 पासून सुरू केले पाहिजे. नंतर चांगली मुले राहत नाहीत अनलेस तुम्हाला 35 -40 पर्यंत ची मुले चालतील. माझी चुलत बहीण आहे आता 33 ची.. जेंव्हा स्थळे चालून येत होती तेंव्हा नकार देत गेली, आता तिला नकार मिळत आहेत. कोणी कितीही दाखवत असेल हॅप्पीली सिंगल, नक्की काय फील होतंय ते त्यांनाच माहीत असणार. जेंव्हा तुमच्या बरोबरचे एंगेजमेंट फोटोज टाकतात, नंतर लग्नाचे आणि बेबीज चे काहीतरी नक्कीच सलत असणार.
सेम वित मुले, चांगल्या मुली खूप कमी उरतात अररेंज मारेज मध्ये जर तुम्ही 35 वगैरे असाल तर...फुकटचा सल्ला देतो - लवकर करून टाका लग्न अक्कलशुन्य.

कोणी कितीही दाखवत असेल हॅप्पीली सिंगल, नक्की काय फील होतंय ते त्यांनाच माहीत असणार. >> हेच happily married लोकांबद्दलपण म्हणता येईल. की ते फक्त 'दाखवतायत'; नक्की काय फील होतंय ते त्यांनाच माहित.

जेंव्हा तुमच्या बरोबरचे एंगेजमेंट फोटोज टाकतात, नंतर लग्नाचे आणि बेबीज चे काहीतरी नक्कीच सलत असणार. >> हा हा किंवा happily single लोकांना बघून married ना सलत असेल. कुठे आपण दुपटी बदलण्यात आणि रांधा-वाढा मध्ये अडकलो...

वरची चर्चा वाचून एक जोक्स आठवला,

म्यारीड लोकं विचार करतात की सिंगल लोकांची मजा असते,
आणि सिंगल लोकं विचार करतात की म्यारीड लोकांची मजा असते..
दोघे आपापल्या जागी बरोबर असतात
कारण म्यारीड लोकं दिवसा विचार करतात तर सिंगल लोकं रात्री विचार करतात Happy

माझ्यासारख्या मुलांना अश्या क्षुल्लक कारणासाठी नकार देणारया तमाम मुलींना मला मायबोलीच्या माध्यमातून जाबच विचारायचा आहे > > ती पण कदाचित माबो वर असेल नि तिचा पण एखादा जातीबाहेरचा देशाबाहेर नातेवाईक असलेला बॉफ्रे असेल ज्याच्याबद्दल तिने घरी सांगितले नसेल अजून (नि ज्याच्या बरोबर जाऊन तिने तिच्या घरचा टीव्ही घरच्यांना त्याच्याबद्दल न सांगता घेतला असेल) त्यामूळे असेच काहितरी क्षुल्लक कारण सांगून तुला नकार दिला असेल बे Wink

देवा मी फुकट क्षुल्लक असे लिहिले, त्यामुळे लोकांना ते क्षुल्लकच वाटू लागलेय.
मला जरा दोन दिवस द्या, मी पुढच्या भागात लवकरच ते कारण लिहितो.
याच भागात लिहिले असते पण आधी जी प्रस्तावना लिहिलीय त्या पार्श्वभूमीवर त्यातील गंभीरपणा निघून गेला असता.. म्हणून थांबून वेगळ्या भागात लिहायचे ठरवले.

आमची भेट झाल्यावर मी तिला राणीबागेत सोडून आलो.
Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2017 - 20:38

अरे मुलगी होती का प्राणी होता राणीबागेत सोडायला?

ऋ संदर्भ जिथे तिथेच प्रश्न विचारायला हवा ना? तिकडे कसा विचारू?
बादवे मी तो दुसरा धागा वाचून मग इकडे आलो होतो. जाऊ द्या ना जो होता है अच्छे के लिये होता है.

हा हा
दुसरा भाग लिहिलाय का याचा?
लिंक द्या ना कोणीतरी.. काय लिहायचो लिहिलेले काही आठवत नाही आता

मस्त.
शिर्षक चावून
'पहला नकार, पहला खुमार' हे गाणं आठवलं.

Pages