'शापित जग' (लघु विज्ञानकथा) [दै. दिव्य मराठी, 'मधुरिमा' दिवाळी अंकामध्ये पूर्वप्रकाशित]

Submitted by Vaibhav Gilankar on 27 November, 2017 - 21:35

समोर हिरव्यागार डोंगरांची रांग... त्याच्यापुढे घनदाट झाडांची वर्दळ पसरलेली आहे.... पक्ष्यांचे थवेच्या थवे किलबिलाट करत जाताहेत.... एखादा थवा जातो न जातो, तोच दुसरा लगेच मनाला गुदगुल्या करणारा आधीपेक्षाही मधुर किलबिलाट करत जातो.... त्यांच्या किलबिलाटानेच सिद्ध होतं कि बाहेरचं वातावरण किती आल्हाददायक असेल...
असं वाटतं कि लगेच खिडकी उघडावी आणि बाहेरील वातावरणाचा मनसोक्त श्वास घेऊन आस्वाद घ्यावा...
पण नाही, तसं जर केलं तर उलट शरीर आतून जळायला लागेल, माझ्यासमोर तर हि फक्त खिडकी आहे, ती जर उघडली तर सत्यतेची जाणीव होईल, हा 'देखावा' निघून जाईल आणि त्या जागी धुळकट, राखाडी वातावरणातील अवाढव्य, राक्षसी इमारतींचे जंगल नजरेसमोर दिसेल!

मानवाने २०५५ पर्यंत पृथ्वीची नरकासमान अवस्था केली आणि या नरकात राहत असूनसुद्धा स्वर्गात असल्याचे भासवण्यासाठी या 'फसवे देखावे' दाखवणाऱ्या खिडक्या तयार केल्या.
"बाहेरील वातावरण आवडत नाही? मग आजच आपल्या घराला लावा abc कंपनीच्या 'व्हर्चुअल विंडोज' आणि पाहिजे ते दृश्य खिडक्यांवर पहा" अशा जाहिराती, आश्वासने दिली गेली आणि हळूहळू सगळे जण निर्लज्जपणे स्वतःचीच फसवणूक आनंदाने करून घेऊ लागले. माझं मत विचाराल तर ह्या खिडक्या दुसरं कोणतंही नाही तर फक्त माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताहेत. लहानपणी मी जी दृश्ये आई, बाबा, आजी, आजोबांसोबत प्रत्यक्ष पाहिली, ज्यांच्यामुळे मला जग सुंदर असल्याची शाश्वती मिळाली ती आजच्या या भेसूर जगात अशा कृत्रिम पद्धतीने पाहताना पाहून हृदयावरून बाभूळ फिरवल्यासारखे वाटते. हा काळ जगण्याच्या का लायक नाही याचे अजून एक कारण मिळते आणि कधी कधी तर असे वाटते की -
"भू! भू!! भू!", माझं विचार चक्र थांबलं, नजर पायापाशी गेली.

पायापाशी रॉनी घुटमळत होता, त्याच्या पाठीवर ९:०० ची वेळ चमकत होती... अरे हो! त्याची पायापाशी घुटमळण्याची, भुंकण्याची, खेळण्याची वेळ झालं होती नाही का! त्याच्या त्या धातूच्या चेहऱ्यावर लडिवाळपणाचे भाव आले होते, निळे डोळे (एल. इ. डी.) चमकत होते, तोंडातून कुत्रे जसे जीभ काढून श्वास घेते (आता ‘घेत होते’ असेच म्हणावे लागेल) तसा आवाज तो काढत होता. हा रॉनीसुद्धा या कृत्रिम जगाचाच एक सदस्य...
खिन्न होऊन मी सोफ्यावर बसलो, त्याला जवळ बोलावलं, तो आला आणि मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागलो. जिथे मऊ, उबदार फर जाणवायला हवे तिथे थंड, टणक धातू जाणवत होता; जिथे करुणा, प्रेम उत्पन्न झाले पाहिजे तिथे त्याच्या त्या धातूसारखेच थंड आणि रिकामे भाव निर्माण होत होते. मग मला एक आठवण आली... मी थोडा विचार केला आणि रॉनीची शेपटी पकडून जोरात पिरगाळली! एखादा खरा कुत्रा असता तर एव्हाना वेदनेने खूप तडफ़डला असता पण रॉनी? तो मघाचेच ते लडिवाळ भाव दाखवत माझ्याकडे बघत होता! त्याची शेपटी, त्याचं शरीर खरं नाही हे न समजायला मी काय मूर्ख नव्हतो, माझ्या या क्रियेमुळे होणारी त्याची प्रतिक्रिया मला पाहायची होती असेही नाही पण मनाला एक विशिष्ट (निर्दयी नव्हे!) भूक लागली होती, ती शमवण्याचाच हा प्रयत्न होता. माझी पकड अजून घट्ट होणार इतक्यात -
"वैभव!" मागून जोरात हाक ऐकू आली.
मोनिका भरा भरा माझ्या जवळ आली, मी तोपर्यंत रॉनीची शेपटी सोडली होती.
"रॉनी, गो चार्ज युवर सेल्फ!", जवळ येऊन मोनिकाने रोनीला कमांड दिली. रॉनी यंत्राला शोभेल अशा चालीत आतल्या खोलीत गेला.

"वैभव, काय झालं? तू बरा तर आहेस ना? रॉनीशी असले भयंकर प्रकार का करत होतास?.."मोनिकाने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. पण मी तिच्याकडे नाही, त्या 'खिडकीकडे' पाहत होतो. आता तिथे समुद्रकिनाऱ्याच्या देखावा दिसत होता, समुद्राच्या लाटांचेही आवाज येत होते पण त्याचा माझ्या मनावर काडीचाही परिणाम होत नव्हता. मी मोनिकाला म्हणालो, "मोनिका, बस माझ्याशेजारी". ती माझ्याशेजारी बसली. मग मी तिला विचारलं, "तुला जाणून घ्यायचंय ना कि मी आता रॉनीशी असा का वागलो ते?"
"हो मला जाणून घ्यायचंय", मोनिका म्हणाली.
"ऐक तर मग", मी सांगू लागलो,
"मी जेव्हा लहान होतो म्हणजे अंदाजे १०-११ वर्षांचा असतानाची गोष्ट. आम्ही नुकतेच आमच्या नवीन घरी राहायला गेलो होतो. तेव्हा आमच्या घराच्या आसपास पहिले काही वर्षं खूप कमी वस्ती होती आणि अशा कमी वस्तीत एकटेपणाच्या भीतीमुळेच आम्हाला घरात एक पाळीव कुत्रा असायला हवा असे वाटू लागले. त्या परिसरातल्या एका भटक्या कुत्रीने आमच्या घराच्याच व्हरांड्याला लागून काही पिलांना जन्म दिला. आम्ही त्याच्यातील एकाला घरात ठेवले आणि त्याचे नाव ठेवले 'टॉमी'.
टॉमीला अगदी जीवापाड प्रेम करून वाढवले. इतर लोक कदाचित त्यांच्या पाळीव प्राण्याला एक पाळीव प्राणी समजूनच वाढवतील पण आम्ही टॉमीला फक्त आमचा एक आयुष्याचा भाग म्हणूनच वाढवलं आणि त्यामुळेच टॉमीला कधीही माणसांची भीती वाटली नाही, कारण तो स्वतःला माणसांमधलाच एक समजू लागला होता. त्याचीच लक्षणे त्याच्या वर्तनात सुद्धा दिसायची. उदाहरण द्यायचे म्हटले तर आपण आपल्या घरातल्या समवयीन किंवा लहानग्या सदस्यांवर रागवतो, ओरडतो पण आपल्या आई, बाबांशी आपण कधीच उद्धट बोलत नाही, वागत नाही त्याचप्रमाणे टॉमी इतका माणसाळलेला होता कि तो मला आणि माझ्या दादाला त्याच्याच वयाचा समजायचा आणि कधी कधी तो आमच्यावरही गुरगुरायचा, भुंकायचा पण तो माझ्या आईवर किंवा बाबांवर कधीही साधे गुरगुरला सुद्धा नाही कारण त्याच्या डोळ्यातच आई, बाबांसाठी एक आदर दिसत असे.
आता आज मी रॉनीसोबत जे केलं ते करण्याचं कारण सांगतो, एकदा माझा पाय चुकून टॉमीच्या शेपटीवर पडला आणि टॉमी मला चिडून चावला होता आणि त्याच घटनेनंतर काही दिवसांनी मी ५ दिवस गावाला जाऊन आलो होतो तेव्हा मी परत आल्याचे पाहून टॉमीने मला अत्यांनंदाने चाटायलाच सुरुवात केली होती!
रॉनीची आणि टॉमीची तुलना मनात केल्यावर आज मला त्या दोघांमधला फरक जाणवला,
एक असा जीव आहे जो माझं चुकल्यावर मला शिक्षाही करतो पण मी फक्त ५ दिवस न दिसल्यावर कासवीसही होतो आणि दुसरीकडे एक गुलाम जो आज मानवांनी फक्त करमणुकीसाठी त्या जीवाच्या जागी स्वीकारला आहे; ज्याला आपल्याशिवाय बैचेन होणं तर दूरच पण साधी स्वतःची रक्षण करण्याएवढी मर्जी सुद्धा नाही.
आजच्या या शरीरासोबत, मनानेही पांगळ्या होणाऱ्या जगात मी ते टॉमीसोबतचे आयुष्य फक्त ५ मिनिटांसाठी परत मिळवण्यासाठी अगदी काहीही करेन कारण थंड, निर्जीव गुलामापेक्षा मला माझ्यावर प्रेम करणारा, माझ्याशी खेळणारा आणि कधी कधी रागावणारा सोबतीच जास्त मूल्यवान वाटतो.
मोनिका, मी माझं हे दुःख तुला हजारदा सांगितलं असेल पण तू -"
मोनिकाकडे नजर गेली. तिच्या निर्जीव डोळ्यांमधले दिवे हळू हळू लुकलुकत होते आणि तिच्या कपाळावर अक्षरे उमटत होती,
'चार्जिंग... चार्जिंग... चार्जिंग...'

मी हताश झालो.
" - पण तू माझं दुःख नुसतं ऐकण्यापलीकडे काय करू शकते? शेवटी तूलाही त्याचसाठी तर बनवले आहे.."
मी भरल्या डोळ्यांनी परत 'खिडकीकडे' नजर टाकली.
देखावा बदलला होता.
दिसत होता खेळणारा एक लहान मुलगा….
.......आणि त्याच्यासोबत बागडणारे एक गोंडस कुत्र्याचे पिलू....

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Vaibhav Gilankar जी आपणास दुखवण्याचा उद्देश नव्हता ...मला एक गंमत वाटते की आजही २०२५ साली मंगळावर वसाहती करण्याची दिवास्वप्ने बघणारे महा(मूर्ख्)पुरुष वास्तवाशी थोडीतरी नाळ जोडून विचार करतील का? हे वाक्य मी जनरली वापरले होते. अ‍ॅलॉन मस्क चे स्पेसेक्स रॉकेट सातत्याने अपयशी ठरत आहे त्याचा सन्दर्भ जोडून पहा ...

दुसरे म्हणजे ही कथा समान्तर विश्वात घडते असा उल्लेख आपण आपल्या कथेत केलेला आढळला नाही .
फॅन्टसी असली तरी ती कालसुसंगत असावी. आणि ती याच पॄथ्वीवरील असावी , अन्य समान्तर विश्वातील नव्हे , अशी सर्वसाधारण समजूत असते . (Unless specifically mentioned otherwise)
विज्ञान तन्त्रज्ञानाची प्रगती होते हे मान्य , पण त्या वेगालाही काही नियम / मर्यादा असतात ह्याचे भान ठेवावे एवढीच अपेक्षा !

Mandar Katre,
या गोष्टी समांतर विश्वात घडताहेत असा उल्लेख करण्याची गरजच नाहीये कारण मी पहिलेच सांगितले की या कथांचेच एक स्वतंत्र fictional universe असते. त्यामुळे त्या आपल्याच जगाशी संबंधित आहेत असे गृहीत धरण्याची गरजच नाही. मी आवेगाने कमेंट दिल्याबद्दल माफी असावी, तुमचा दृष्टिकोन मला पटला नाही एवढेच.

Pages