रोहित (Greater Flamingo) आणि मोठा बगळा (Great Egret)

Submitted by उनाड पप्पू on 26 November, 2017 - 02:36

२०१६ च्या जानेवारीमधली गोष्ट. प्रकाशचित्रणासाठी कुठेतरी जावे असे सतत वाटत होते. पण वेळ मिळत नव्हता आणि ठिकाण ठरत नव्हते. अशातच शिवडीला फ्लेमिंगो येतात ही माहिती मिळाली. आणि एक दिवस जाण्याचे ठरवले. पक्षी प्रकाशचित्रणाची काहीच पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे नेमकी काय तयारी करायची याची काहीच कल्पना नव्हती. नाही म्हणायला अबुधाबी मध्ये Al-Wathba wetland reserve येथे फ्लेमिंगोचे प्रकाशचित्रण करायला गेलो होतो, तेवढाच काय तो अनुभव.
बस Google Earth वरून जागा पाहून घेतली आणि कॅमेरा बॅग, ट्रायपॉड उचलले आणि अगदी पहाटे ४.३० ला घर सोडले एकटाच... Google Earth वरून जी जागा पहिली होती तिथे पोहोचलो तरी अजून अंधार होता. अचानक कुत्रे भुंकू लागले आणि त्यांच्या आवाजाने बाजूच्या झोपडी वजा खोलीतून खड्या आवाजात विचारणा झाली... "कोण आहे रे?"... मी अंधारात स्तब्ध उभा राहिलो. खरे तर त्या ठिकाणी अशी काही विचारणा होईल असा अंदाज नव्हताच. समोर खाडीचा भाग दिसत होता. म्हणजेच मी इच्छित स्थळाच्या अगदी जवळ होतो. मी काहीही उत्तर न देता पुढे चालू लागलो. आणि कुत्र्यांचे भुंकणे वाढले तसा मघाशी विचारणा करणारा आवाज कोणाचा होता हे कळून चुकले. ती एक पोलीस चौकी होती आणि डोळे चोळत हवालदार काका बाहेर आले. पुन्हा प्रश्न विचारला गेला. एवढ्यात माझा धीर चेपला होता.. मग काकांना सांगितले कोण आहे? कुठून आणि कशासाठी आलोय..
त्यांनी सांगितले कि इकडे पुढे प्रवेश निषिद्ध आहे. फ्लेमिंगो पाहायचे तर शिवडी जेट्टीच्या बाजूला जावे लागेल. आणि मी अंधारात पोहोचलो होतो शिवडी किल्ल्याच्या विरुद्ध बाजूला. काकांना कसे जायचे वगैरे विचारून आणि त्यांची झोपमोड केल्याची मनापासून माफी मागून (हो... तेवढे तर केलेच पाहिजे होते.. नाहीतर भलत्या वेळी भलत्या संकटात सापडण्याची भीती...).. माझा मोर्चा जेट्टीच्या दिशेने वळवला.
जेट्टी वर पोहोचलो... आत्ता बरेच उजाडले होते.. पण पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. समोर दूरपर्यंत पाणीच पाणी दिसत होते. अगदी जेट्टीला टेकलेले, पण एक फ्लेमिंगो दिसेल तर शपथ.. मी विचारात पडलो. ठिकाण तर बरोबर आहे. मग असे झाले कसे? कुठे गेले फ्लेमिंगो. पण आत्ता एवढ्या लांब एवढ्या सकाळी येऊन असेच कसे परत जाणार.. म्हणून मग कॅमेरा काढला. सूर्यनारायण पूर्वेच्या क्षितिजावर हजेरी लावत होते. त्यांचे फोटोसेशन केले आणि परत निघालो. आत्ता जेट्टीवर थोडीफार वर्दळ सुरु झाली होती. तिथेच अजून एक पोलीस चौकी होती. इथले काका बऱ्यापैकी जागे झालेले दिसत होते. त्यांना फ्लेमिंगो बद्दल विचारले .. काका अपेक्षेपेक्षा बरेच प्रेमळ निघाले...म्हणाले " अरे काय राजा तू.. आत्ता भरती आहे. फ्लेमिंगो आत्ता नाही दिसणार एवढ्या पाण्यात. भरती ओहोटीचे वेळापत्रक बघायचे आणि मग यायचे की..."..
"हो काका.. चुकलेच माझे..." इति मी.
खरं तर ही माहिती काढायची असते हे माझ्या गावीच नव्हते.. lesson learned… (आणि याच साठी हे सर्व सांगण्याचा उद्देश... ट्रेक, पक्षीनिरीक्षण किंवा इतर कोणत्याही ठिकाणी भटकंतीसाठी जाताना सर्व तयारीनिशी जावे..)
आत्ता काय पुन्हा सर्व तयारी करून येण्याशिवाय पर्याय नव्हताच.. एका बाजूला झुडुपातून पांढऱ्या रंगाचे काही पक्षी हालचाल करताना दिसत होते... जाता जाता यांचे तरी फोटो काढू म्हणून मग कॅमेरा सरसावून जमेल तितके जवळ जाऊन फोटो काढले.. आणि पठयांनी मनसोक्त प्रकाशचित्रण करु दिले..
हाच तो.. मोठा बगळा (Great Egret)
लांबी : जवळपास ९० ते १०० सेंमी
आकार : लांडोरीपेक्षा मोठा
ओळख : पांढराशुभ्र, सडपातळ, पाय काळपट, चोच पिवळी, विणीच्या हंगामात पाय लालसर, चोच काळी होते व पाठीवर सुंदर पिसे धारण करतात. चोच व डोळ्यांमधील त्वचा विणीच्या हंगामात निळी होते, इतर वेळेस ती हिरवट असते. जबड्याची काळी रेष डोळ्याच्या मागेपर्यंत जाते. मान लांब असल्याने इंग्रजी "S" अक्षराचा आकार येतो.
अधिवास : दलदलीचे प्रदेश, तलाव, नद्या
खाद्य : मासे, बेडूक इ.
(माहितीचा स्रोत : डॉ. राजू कसंबे यांचे महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी हे पुस्तक.)

सूर्यनारायणाचे दर्शन
(प्रचि-१)
C16A5858.jpg

झुडपातून अचानक प्रकटलेला हा बगळा
(प्रचि-२)
C16A5904.jpg

(प्रचि-३)
C16A5905.jpg

(प्रचि-४)
C16A5921.jpg

(प्रचि-५)
C16A5941.jpg

(प्रचि-६)
C16A5946.jpg

(प्रचि-७)
C16A5958.jpg

पोटपूजेकरता भटकंती सुरु...
(प्रचि-८)
C16A5963.jpg

(प्रचि-९)
C16A5992.jpg

(प्रचि-१०)
C16A5994.jpg

(प्रचि-११)
C16A6002.jpg

छे बाबा.... अजून ही काही सापडेना.
(प्रचि-१२)
C16A6576.jpg

आपण दोघे भाऊ भाऊ... जोडीने मिळून मासे पकडू ...
(प्रचि-१३)
C16A6636.jpg

इथे काही नाही... चला दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहू..
(प्रचि-१४)
C16A6828.jpg

(प्रचि-१५)
C16A6835.jpg

शेवटी पकडलाच...
(प्रचि-१६)
C16A6870.jpg

(प्रचि-१७)
C16A6875.jpg

(प्रचि-१८)
C16A6876.jpg

(प्रचि-१९)
C16A6883.jpg

(प्रचि-२०)
C16A6905.jpg

यानंतर काही दिवसांनी पूर्ण माहिती काढून तयारीनिशी खास फ्लेमिंगो पाहायला गेलोच.
(प्रचि-२१)
C16A6928.jpg

(प्रचि-२२)
C16A6929.jpg

(प्रचि-२३)
C16A6931.jpg

(प्रचि-२४)
C16A6932.jpg

(प्रचि-२५)
C16A6934.jpg

Group content visibility: 
Use group defaults

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद....
@साधना..>>> हो.. अगदी.. म्हणजे पहाटेच्या वेळी गेले तर पार अगदी माहुल पर्यंतचा परिसर अतिशय रम्य दिसतो..

Flamingo म्हणजे अग्निपंख ना? >>> अग्निपंख म्हणजे खरेतर Phoenix . पण जालावर लोक रोहीतला अग्निपंख संबोधताना दीसत आहे