सांभाराची (कोथिंबीरची) चटणी

Submitted by टीना on 25 November, 2017 - 04:56

नमस्कार लोक्स _/\_
बरेच दिवस झाले इथे काही लिहून.. काही पाकृ, काही आर्टवर्कचे धागे अस बरच काही खोळंबलय वेळ आणि मुडअभावी..

तर माझ्या बंगाली + ओरियावासी रुममेट (खोलीसोबतीन ?) कडुन कळलेली हि स्विट अँड शॉर्ट चटणीची पाकृ द्यावी म्हणुन हा पाकृप्रपंच..
इथल्या बर्‍याच सुगरणांना (सुगरणी/सुगरण म्हणजे निव्वळ बायाच ना? मग बाप्यांना काय म्हणायच? माझ्यापुरता हा युनिसेक्स शब्द काढला.. नेमका शब्द देऊन कुणी माझं भाषिक ज्ञान संपन्न करण्यास हातभार लावल्यास मी आपली आभारी असेल Lol ) हि चटणी कदाचित माहितीही असेल पण धागा दिसला नाही म्हणुन हा नवा धागा काढला.

आता हिवाळा आल्यावर पालेभाज्यांची बरसात सुरु होते.. त्यातही घराजवळचा भाजीवाला सोडून मंडईत भाजी आणायला जाण्याचा आम्हा तिघींनाही काय सोस म्हणुन मग बस नेहमीची कांदा, आलू, टमाट्याची खरेदी २०० ३०० रुपड्यांवर कधी घसरते ते बरेचदा कळत नाही आणि मग घरी आल्यावर फक्त एक वेळ जेवण बनवणार्‍या आमची हिला कापू कि तिला अस ठरवताना खुप फ्यॅफ्यॅ उडते..
तेव्हाच्या तेव्हा त्यातही सांभार निवडून ठेवलेला बरा म्हणुन तो निवडल्या जातो खरा पण एक वेळच्या भाजीत असा टाकून टाकून किती टाकणार म्हणुन ओघाने तो वाळणं.. ओला असेल आणि खरचटल्या गेला असेल तर खराब होऊन सडणं हे प्रकार शीतकपाट नसल्यामुळे मागोमाग येतातच..
यावेळी परत जीवाची मंडई करुन आलो आणि त्या सांभारच्या गड्डीला पाहून आवंढा गिळला तर, "अरे दिदी, हम घरमे इसकी चटणी भी बनाते है वो बनाये क्या?" अशी कल्पना + सल्ला + प्रेमळ सुचना वगैरे आल्यावर चटणीसारख्या पदार्थाला नाकारायचा प्रश्नच नव्हता.
आणि त्याचा परिपाक म्हणुन समोर आलेली हि हिरवाई इतकी चुम्मा लागेल याची मला खरचं आशा नव्हती..
असो नमनाला घडाभर झालच आहे तर पाकृ कडे वळूया..
बनवायला अतिशय सोप्पी आणि हाताशी असणारे साहित्य त्यामूळे माझ्याकडे अगदी हिट्ट झालाय हा प्रकार..

लागणारे साहित्य :
१. मुठभर निवडून धुतलेली + दांड्या असलेली कोथिंबीर
२. ६ ७ लसणाच्या पाकळ्या
३ . ३ ४ हिरव्या मिरच्या
४. चवीपुरतं मिठ
५. मिठाएवढीच जिरपूडं
६. लिंबू
७. जरासं पिण्याचं पाणी
८. चालु असलेला मिक्सर आणि मिक्सरच भांड (खास माझ्यासारख्या रुम्/पीजीवर राहणार्‍या माबोकरांकरीता याबरोबरच वीज नावाचं साहित्य(?) हे नवव्या क्रमांकावर टाकायचा मोह मी टाळतेय..)

क्रमवार कृती:
१. वरचं १ ते ५ पर्यंतच सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून गर्रक्कन दोन चारदा फिरवायचं..

२.सारखी पेस्ट होण्यासाठी थोडंस पाणी टाकुन परत एकदा फिरवायचं.

३. शेवटी वाटीत काढून त्यात अर्धा लिंबु पिळायचा आणि मग जेवणाबरोबर ती वाटी सप्पा कराची.

आला गं बाई आला गं बाई आला गं..
आला आला आला आला ..
फोटो म्हणतेय मी.. शुद्ध मराठी बोलणार्‍यांच्या तोंडी येणारा हिंदीतला अद्रक नाई बरं..(त्यादिवशी कोणतरी कानाजवळ येऊन,"भय्या आला दो ना एक वाटा" असं म्हटल्यापासुन हे काही डोक्यातून जाईना माझं..असो)
तर हि चटणी एकंदर अशी दिसते..

 अधिक टिपा :
काहितरी लिहणार होती खरं पण विसरली..
खुप साधी, सरळ, सोपी लिहणार होती मी रेस्पी पण शेवटी अधे मधे आगाऊपना केलाच त्याबद्दल सारी...
अरे हो आठवलं; कृपा करुन त्या चटणीवर वरुन चिरलेला सांभार टाकायचा शहाणपणा करु नका हि विनंती.
कळावे लोभ असावा. नमस्कार _/\_.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Kothimbir,Pudina himi,aale ghaloon ashi chatani karate mi.ata lasoon jire ghaloon paahin

नेहमीप्रमाणेच मस्त! तुला तुझ्या सगळ्या कलाकारीसाठी वेळ आणि मूड दोन्ही भरपूर मिळो अशी शुभेच्छा! माबोवर धागा काढून रिपोर्ट देशीलच Happy

@टीना,
पाककृती लिहण्यासाठी कृपया 'पाककृती" हा प्रकार वापरावा. ("लेखनाचा धागा " नाही. ) "पाककृती" प्रकारामुळे एकतर वर्गीकरण सुलभ होते पण भविष्यातल्या पाककृतींशी निगडीत काही नवीन सोयीत हे लेखन दिसणार नाही.

मग बाप्यांना काय म्हणायच?
<<
त्यास्नी बल्लव म्हणत्याती.

@वेमा
कोथमेरची चटणी हापदार्थ पाकृ मध्येही ललीतच असल्याने एकडाव मापी द्या हे इनंती

ह्यात आलं ( तुमच्या भाषेत अद्रक) टाका जरा( बाकी सेम टू सेम तुमचे जिन्नस) आणि वाटा.
त्यात मासे घालून ठेवा. मस्त लागतात.
त्या चटणीत दही घाला आणि कोंबडी घाला मुरवत आणि भाजा.

सुचनेसाठी धन्यवाद वेबमास्तर..
खरतर मी नविन पाककृती ह्यावरच टिचकी मारली पण मलासुद्धा जुन्या पद्धतीचा ढाचा दिसला नाही. पाककृतीवर आणखी एक टिचकी मारावी लागते हे माहिती नव्हता आणि सरळ त्याखालील नविन धाग्यावर लिहित गेले. परत एकदा धन्यवाद..

आमच्यात कोथिंबीर, लसूण, थोडं सुकं खोबरं, थोडे भाजलेले दाणे किंवा दाण्याचं कूट, तिखट, मीठ हे सगळं उखळात कांडतात. भाकरीबरोबर खाताना वरून कच्च्या शेंगदाणा तेलाची धार घ्यायची. अगदीच लाडात आलात तर हिंग जीर्‍याची फोडणी. बरोबर झुणका, मसालेदार वांगं, भरीत, दही वगैरे. भाकरी शिळी असेल तर अजून मज्जा.

अंन्जू,

अहो पाकृ लिहिण्याचा आपला प्रांत नाही.

कृपा करुन त्या चटणीवर वरुन चिरलेला सांभार टाकायचा शहाणपणा करु नका हि विनंती.
हे नाही समजले.>> चटणी केल्यावर परत त्यावर तेच टाकल्याने ते कस लागणार.. कचर कचर दाताला...

सर्वांना धन्यवाद Happy

कृपा करुन त्या चटणीवर वरुन चिरलेला सांभार टाकायचा शहाणपणा करु नका हि विनंती.
हे नाही समजले.>>

तयार चटणीवर चिरुन कोथिंबिर टाकू नये