हनम्या !

Submitted by विद्या भुतकर on 19 November, 2017 - 18:14

हनम्या उठला तर तांबडं फुटलं हुतं. दारात दोन कुत्री अंगावर चढून सकाळच्या पारीच सुरु झाल्याली. त्यांच्या केकाटन्यानंच जाग आल्याली. 'आरं हाड !' म्हणत त्यानं एक दगड हनला. पर त्यान्ला लईच जोर आल्याला. ती काय जाईनात. हनम्यानं त्यांचा नाद सोडला आन कांबरून उचलाय सुरुवात केली. घोंगड्याची वळकटी बांधून कोपऱ्यात लावली. गोधडीची शिस्तीत घडी केली. त्यावर उशी ठिवून दोन्ही एका कोनाड्यात ठेवलं. झोपेतच तंबाकूचा तोबरा भरून त्यानं लोटा हातात घेतला. परसाकडला जाऊन यीस्तवर उजाडलं हुतं.
परतीच्या रस्त्यावरच त्याला मामा दिसला. मामा म्हंजी त्याचाच मामा गावाच्या वेशीकडं जाताना दिसला.

"काय मामा, कुटं चाल्लासा इतक्या सकाळच्याला?", हनम्यानं इचारलं.

"लेकीकडं जातुया, लै दिस झालं नातवंडांना बघून बी.",मामा म्हनला.

"बरं या घरी सावकाश, परत आला की", हनम्या.

"व्हय येतु की, आता बस चा टायम झालाय.", मामा म्हनला आणि तडक चालाय लागला.

हनम्या कितीतरी येळ मामाकड बगत हुभा राह्यला. 'वय झालं मामाचं' त्यानं इचार केला. काळं पडल्या धोतराचा सोगा हातात धरून चाल्ला हुता. वयानं पाटीला कुबड आल्यालं.

किती येळा सांगितलं हनम्यानं,"मामा काटी घ्याची हातात, आता काय सोळावं लागलं न्हाय तुला.". पन ऐकल त्यो मामा कसला.
मामाचा इचार करताना त्याला त्याची लेक बी आटवली. आई झाली दोन पोरांची. अल्कीला करून घ्यायची हुती हनम्याला. पर त्याच्या आयला लै माज आपल्या पोराचा.

भावाला म्हनली, "घरातला तुझा हिस्सा बी दे तर तुझी पोरगी कर्तू."

मामा बी काय कमी चेंगट नव्हता. एका इधुराला करून दिली आपली लेक कमी पैशात पर 'भनीला हिस्सा देनार न्हाय' म्हनला.

मागनं हिरो होंडाचा मोटा हॉर्न पडला आन हनम्या जाग्याव आला. घरापाशी आला तर निस्ता पसारा पडल्याला. त्यानं खराटा घिऊन दारासमूरचा कचरा लोटला. कालची भांडी बी तशीच भाईर पडल्याली. ती इसळून घेतली घमेल्यातल्या पान्यानं आणि भांड्यांची टोपली घिऊन तो घरात शिरला. खोलीच्या मोजून दोन खिडक्या त्यानं उगडल्या. डिचकीभर पानी गरम करून घेतलं, बादलीत घालून मोरीत अंगावर पानी वतून घेतलं. माय पडलेलीच हुती. म्हातारीला उजेडानं तिला जाग आली.

"च्या कर्तुस का जरा?" तिनं झोपेतंच इचारलं.

"ठिवतू की, तू उठ तरी. दूध घिऊन येतो. ", हनम्या म्हनला. कालचा धुतलेला पायजमा सुकलाच नव्हता. त्यानं हाप पॅन्ट घातली.

म्हातारीनं जीव खाऊन हात खाली टेकला आन धडपडत उठली. तिच्या पातळाचा सोगा निगालेला. कसाबसा तो धरत तिनं मोरी गाटली. म्हातारीला चालवत नव्हतं मग तशीच बसून राह्यली हनम्याला हाक मारत. हनम्यानं घरी यिऊन म्हातारीला बगितलं तसा घाबरलाच.

"काय झालं गं. ", त्यानं इचारलं.

"काय हुनार? त्यो बोलवत न्हाय तंवर बसायचं हितंच. ", म्हातारीला जीव नकुसा झालेला.

तिला हाताला धरून आनला अन तिच्या हातरुणात ठेवत, 'गप पड' म्हनला.

धुतलेल्या भांड्यातनं त्यानं च्याचं भांडं काडलं. त्याचा बुडाशी राह्यलेला साबन बगून पुन्हा धुतलं. त्या भांडयावरचा काळा थर बगून त्याला लै वैताग यायचा पर किती बी घासलं तरी काय निगत नव्हता. त्यानं स्टो पेटिवला. च्या ठिवून त्यानं भाजीची निवडाय घेतली. टोपलीतला लसून सोलून टेचला, मिरच्या तोडल्या, म्हातारीला च्या दिऊन कसंतरी भाजीचं काम पन उरकलं. पावसानं वैताग आनलेला हनम्याला. लौकर उरकून मेंढरं घिऊन शेतात जायचं हुतं त्याला. त्यानं चार भाकरी थापल्या. म्हातारीचं ताट तिच्या शेजारी ठिवलं, पान्याचा तांब्या बी ठिवला. एका कागदात आपल्या भाकरी भाजी घालून गुंडाळून घेतल्या. डोक्यावर गोनपाट टाकलं आन निघाला.

"येतो गं म्हातारे" म्हनत त्यानं पायतान चढवली.
भायीर येताच शेजारच्या गाडीनं त्याच्या पॅंटीवर चिकल उडिवला. हनम्यान चार शिव्या हानल्या. चिक्लाचा लागलेला डाग बगून त्याचा संताप झाला. परत घरात जाऊन त्यानं वल्ला पायजमा घातला. त्याला लै राग त्या पायजम्याच्या. म्हाताऱ्याचा हुता ना. परत भाईर जाऊन म्हशीला सोडलं, मेंढरं बरुबर घितली आन हाकाय लागला. शाळीला चाल्याली पोरं हुंदडत हुती. मधीच एकानं म्हशीला हात लावला, तसा हनम्या चिडला.

"आरं जा की मुकाट्यानं. लाथ बसली की कळल मग.", हनम्या वराडला तशी पोरं खिदळत पळून गेली.

रस्ता पावसानं वल्ला झाल्येला. बगल तिकडं चिकुल निस्ता. हनम्याला पाऊस नकुसा व्हायचा. चिकचिक, भरलेली कापडं , डास, माशा, सगळीकडं घान निस्ती. हनम्यानं मेंढरं शेताकडं वळवली. एकरभर जागा त्याची. बापानं तेव्ढंच काय ते मागं सोडलेलं. मेंढरं बांधावर सोडून कडंकडंनं शेतात घुसला. चिकलानं भरल्यालं पायतान हातात घिऊन मऊ मातीतनं कोपऱ्याव आला. पाटाच्या पान्यात पायतान साफ केलं. बायका भुईमुगातलं तण काढत बसल्या हुत्या. त्यानं नजर फिरवली आन तिथंच दगडाव बस्तान टिकवलं.

"काय म्हणतेंय मावशे? लेकीला नाय आनलं आज? ",हनम्यानं बाजूला नजर टाकत इचारलं.

"तिला घरीच ठिवून आलोय. कंबर दुखतीया म्हनं तिची. तिच्यासारक्या तर्न्यानी असं म्हनल्याव आम्ही म्हाताऱ्यांनी कुटं जायचं?", मावशी दमली खुरपं चालवून.

हनम्याला तिच्या पोरीची गोरी, नाजूक कम्बर आठवली. खुरप्यानं गवत काडता काडता चार वेळा ती पदर सारका करायची. तरी पोट, कंबर दिसायचीच.

"सविताबाई बी नाय का आज?", हनम्या.

"तिला बी ताप आलाय म्हनं. कसलं डोंबलाचं ताप? हिचं काय वय झालं व्हय? तुमच्याइतकी तर आसल की? ", मावशी म्हनली.

"तुमचं किती झालं म्हनायचं?", मावशी.

"झालं की चाळीसच्या वर दोन-चार झाली असतील.",हनम्यानं हिसाब केला.

"लै वाईट झालं बाईचं. पन्नाशीचा बी नसंल पाव्हना? असा हुब्या हुब्या गचकला.", मावशी इचारच करत हुती. हनम्याला कवापासनं वाटत हुतं तिला इचारावं रातीचं पन हिम्मत झाली नाही. त्यात रात्रीचं म्हातारीला सोडून कसं जानार?

"म्हातारी काय म्हनती?", मावशीनं इचारलं.

"हाय जित्ती, त्यो कधी बोलवतुय याची वाट बघत.", हनम्या.

"व्हय, लै वय झालं तिचं. एकंद नातवंड बघावं अशी लै इच्छा म्हातारीची....", मावशी म्हनली.

"आता नावंच 'हनमंत' ठिवल्यावर काय व्हायचं?", हनम्या हसत बोल्ला. त्याचं पिवळं दात एकदम भायीर आलं.

"या जन्मात काय लगीन जमायचं न्हाय आता. मागील त्ये समदच मिळतंय व्हय मानसाला? मला बी लई काय काय पाहिज्ये हुतं. ", हनम्या म्हनला.

"पन तुमी लई काळजी करता म्हातारीची. इतकं कोन करत न्हाय आजच्या कलीयुगात.", मावशी.

"काय करनार? तिनं जनम दिलाय तर कराय लागनारच. दुसरं कोन हाय तिला तरी?", हनम्या म्हनला.
मग त्यानं तंबाकू हातात चुरली, चुन्याचा टवका लावला. चिमूटभर मावशीला दिली आन उरलेला तोबरा भरून बसून राह्यला. मावशीबी कामाला लागली. भुईमूग तरारला हुता. यंदाला पाऊस बी बरा झालाय. 'चार पैसं आलं तर दोन नवी कापडं घ्यायची' हनम्यानं ठरवलं. दुपार झाली तसं हनम्या उटला.

"चल मावश्ये जरा मेंढरं फिरवून आंतु. उद्याच्याला येतु पैसं घिऊन. जरा हात हालवा बिगीबिगी. ", म्हनत चालाय लागला.

बांधाकडनं शेत वलांडत मेंढरं घिऊन फिरत राह्यला. रस्त्यात कुनी कुनी भेटलं त्याची चवकशी करत राह्यला. आबाच्या शेताव आबा दिसल्यावं हनम्याला बरं वाटलं. आबाची पोरं शेतात हुंदडत हुती. त्यातलं एक 'काका' करत पळत आलं.
"काय रं शाळा न्हाय का तुम्हास्नी?", हनम्यानं इचारलं.

"न्हाय, आज दांडी. ", पोरगं नाकातला शिंबुड हातानं पुसत बोललं. हनम्यानं दोन बोटांत पोराचं नाक पकडून जोरात शिंकारलं, शिंबुड शेतात फेकून हात आपल्या सदऱ्याला पुसला. पोरगं परत चिकलात पाय तुडवाय गेलं. हनम्यानं परत तोंड वाकडं केलं. आबा डोक्यावर गवताची थप्पी घेऊन आला.

"काय रं, कुटं निगाला?", आबा.

"असाच आलु भेटाय. गळती थांबली का घराची?", हनम्या.

"व्हय, रातच्याला वरनं ताडपत्री टाकली तवा कुटं थांबलं पानी.", आबा बोलला.

"बरं झालं निदान झोपशील तर गप.", हनम्या.

"व्हय, तुजं बराय बग, बायका पोरं नाय कोन तरास द्याय. हिथं बायकोनं जीव नकुसा केला छत दुरुस्त करंस्तवर.", आबा बोलला.

हनम्यानं फकस्त मान हलवली.

बोलत बोलत दोगांनी एका ठिकानी बसून डबा खाल्ला. त्यानं आबाच्या शेतातनं पावटा, मिरच्या निवडून टोपलीत भरून घेतल्या आन घरच्या रस्त्याला निगाला. मधीच एका लोंढ्याजवळ तर्नी पोरं-पोरी दिसली. धबधब्यात भिजून निगल्याली. चालून हनम्याच्या पायाचं तुकडं पडल्यालं. त्यानं म्हशीला खुटीला बांधलं आन शिरप्याच्या टपरीचा दगड पकडला. 'च्या दे रं जरा', म्हनत हनम्या त्या भिजल्याला पोरींकडं बगाय लागला.

"काय म्हून भिजत असतील रं?", त्यानं शिरप्याला इचारलं.

"कुनास ठावं. पर आपलं पोट चालतंय न्हवं. गप आपला च्या द्यायचा, कनीस द्यायचं, पैकं घ्यायचं.", शिरप्या त्या पोरांकडं बगत बोलला.
मेंढराकडं डोळा ठेवत हनम्यानं च्या घितला आन तिथंच बसून राह्यला. ढग भरून आलं तसं हनम्या उटला. मेंढरं, म्हशीला हाकत घराकडं चाल्ला. घरात घुसून त्यानं पयला बलब लावला, हात पाय घासून धुतलं, देवाला दिवा पेटिवला. म्हातारी पडूनच हुती. तिच्याकर्ता च्या केला. तिचं दुपारलं ताट धुतलं आन पुना सैपाकाला लागला. म्हातारीला ताट केलं. कसंबसं उटून तिनं चार घास खाल्लं.

"मामा भेट्ल्याला सकाळी.", हणम्यानं म्हातारीला वरडून सांगितलं.

"काय म्हनला?", म्हातारी.

"अल्कीकड निगालेला. नातवांना भेटाया. ", हनम्या.

"लेकीची लय वड त्याला. पन पैका ज्यादा प्यारा त्याला. न्हाईच दिला त्येनं शेवटी हिस्सा. मग म्या पन त्येचीच भन हाय. ", म्हातारी.

"आता परत बोलाय लाव नगंस मला. समद्या जगाची पोरं झाली. पर तुज्या हट्टापाई मी असा बसलूया. तुज्यामुळंच झालंय समदं. आता एकटाच मरायचो मी.", हनम्या चिडला. म्हातारी गप बसली.

हनम्यानं बी मुकाट जेवन उरकलं. भांडी टोपल्यात घालून भाईर ठिवली आन बारक्या रेडिओवर बातम्या ऐकत बसला. रात झाली तसा हनम्यान दिवा ईजवला. डोळं मिटलं पर झोप लागंना. मावशीची पोरगी, सविता, त्या भिजलल्या पोरी सगळ्या डोक्यात यायल्या. त्यानं कूस बदलली पर झोप लागंना.

तवर म्हातारीनं हाक मारली, "हनम्या, हनम्या ".

हनम्याला लै राग आल्येला म्हातारीचा. ती हाका मारतच राह्यली.

हनम्या उठला रागानं,'मरत बी न्हाय एकदाची. काय सुक म्हनून न्हायच नशिबात.'.

"आलो आलो वरडू नगंस आता" बोलत तिच्याकडं गेला.

म्हातारी वरडतंच हुती. हनम्याचा राग डोस्क्यात गेला आन त्यानं तिचं नरडंच धरलं.
"गप बस की." म्हनत हात गल्यावर पकडला. म्हातारीचा जीव घाबरला. तिनं त्याच्या हातावर हात धरला पन जोर लागंना. तिचं पाय लटपटलं. 'हनम्या' म्हातारीनं परत बारीक हाक मारली. तिच्या डोळ्यांत पानी आल्यालं. हनम्या जाग्याव आला, त्यानं हात मोकळा केला. म्हातारीनं जोराचा शवास घितला.

"पानी दे रं मला. यम आला हुता वाटतं. सुटलोच असतो आज.", म्हातारी म्हनली.
हनम्याचं डोस्क जरा थंड झालं. त्यानं तिला पानी दिलं. तिचं डोळं पुसलं. तिला कांबरून घातलं आन परत जाग्याव जाऊन पडला.
'वाचली आज म्हातारी' म्हनत हनम्यानं पुना मुश्किलीनं डोळं मिटलं. हळूहळू डोळ्यावं झापड याय लागली.
पुना अल्की समोर आली, तिचं हासनं दिसलं , तिचं बोलनं आटवलं, आन पुना त्याचा हात पायजम्यात गेला.
हनम्याचा आजचा दीस तरी संपला हुता.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा चांगली लिहीलीय. पण हणम्याचे वाईट वाटले. त्याच्या आईने जमीन मागायला नको होती, पुढे मागे सुनेला मिळालाच असता वडलोपार्जीत हिस्सा. उगाच दोघेही एकटे पडले. कथा आहे शेवटी, पण वास्तवातही असे घडते कधी कधी.

सुंदर कथा!

हि कथा लिहिताना तुमच्या मनात काय चालू होते?
कथेतील पात्रांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे...कथा लिहिताना, लेखक कधी-कधी आपल्याच पात्रांवर नकळतपणे वर्चस्व प्रस्थापित करतो (असे होणे "चूक कि बरोबर" हा मुद्दा इथे नाही) पण ह्या गोष्टीत असे घडले नाही. हनम्या, त्याची माय, त्याच्या मामाने, फक्त दोन-दोन वाक्यांच्या उल्लेखातच आपापली कथा व व्यथा मांडली. Reading between the lines, आपल्याला तर अल्कीची सुद्धा एक वेगळी गोष्ट डोळ्यासमोर येईल & which could make a perfect spin-off for this story!
खूप, खूप छान! Happy writing Happy

@विद्या, हा गावरान बाज पण छान जमतो की तुला. ह्या प्रकारची कथा (आणि अखेरच्या काही वाक्यातील व्यथा Wink ) उत्तम हाताळली आहेस. कथेचा तोल कोठेही ढळला नाही. पुन्हा या ढंगात कधीतरी एखादी फक्कड कथा येऊ दे अशी. पुलेशु.

सर्वांचे खूप आभार. गेले काही महिने ही गोष्ट डोक्यात होती. ती आली ते काही फोटोमुळे. मग त्या फोटोवरून बनलेल्या गोष्टीतून पुन्हा तेच चित्र लोकांच्या डोळ्यांसमोर उभे राहील का? असा विचार डोक्यात आला. तो प्रत्यक्षात यायला बराच वेळ गेला. तुमच्या प्रतिक्रिया पाहून थोडा सफल झालाय असे वाटले.
काढलेले दोन फोटो इथे देत आहे. Happy
WhatsApp Image 2017-10-27 at 11.55.40 AM.jpegWhatsApp Image 2017-10-27 at 11.55.39 AM.jpeg

विद्या .

गावरान भाषेतल्या कथांना माझा पास असतो, पण विद्याची कथा म्हणुन सुरुवात केली आणि वाचत गेले. छान लिहिली आहे. खुपच आवडली. फोटो फार मस्त आहेत.

Khup chan

पण विद्याची कथा म्हणुन सुरुवात केली आणि वाचत गेले. >> किती छान. Happy Special thanks. Lol
Thank you all so much. Happy

Vidya.

Pages