गैर कानूनी धावता संयुक्त रिव्यू : अचाट आणि अतर्क्य कथा कशी लिहावी?

Submitted by पायस on 8 November, 2017 - 15:56

गैर कानूनी अचाट आणि अतर्क्य सिनेमांच्या वाटेतला महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक दशकाची अचाटपणाची आपली वेगळी स्टाईल आहे आणि क्वचितच एखाद्या चित्रपटात एकापेक्षा जास्त स्टाईल्स बघायला मिळतात. गैर कानूनी तो चित्रपट आहे. या विशेषतेमुळे ही अचाट आणि अतर्क्य लेखकांची कार्यशाळा आहे असे म्हणणे योग्य ठरेल. ऐलान-ए-जंगप्रमाणेच हा रिव्यू क्राऊडसोर्स करत आहे. यात तुम्हाला हवी तशी भर घाला.

१) अमूर्त कल्पना आणि मूर्त कथा
अचाट लेखन करताना एक मुख्य अडचण असते की अनेकदा कथेमागची संकल्पना आणि तिचे मूर्त स्वरुप यांचे गुणोत्तर काय असावे? याच्यावर अनेक दिग्गजांनी वेगवेगळी उत्तरे शोधली आहेत पण कोणीही याचे उत्तर १:१ देत नाही. १:क्ष (क्ष > ०) गुणोत्तराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रामसेपट! गैर कानूनी मध्ये सुरुवातीच्या श्रेयनामावलीमध्ये स्टोरी आयडिया श्रीमती पुष्पा राज आणि स्टोरी प्रयाग राज अशी दोन वेगवेगळी नावे वाचून द्वित्त्ववादी कथानक असल्याचे कळते आणि त्यानुसार गुणोत्तर १:१ आहे. थोडक्यात एकही सीन वाया घालवलेला नाही, प्रत्येक सीन कथेला पुढे आणि पुढेच नेण्याकरता वापरला आहे. अचाट कथानक आणि पटकथा हे दोन स्वतंत्र पैलू असल्याचा दिग्दर्शकाचा द्वित्ववादी समज आहे.

२) नात्यांचा ग्राफ कनेक्टेड हवा
ग्राफ थिअरीमध्ये कनेक्टेड ग्राफ अशी एक संकल्पना आहे. कनेक्टेड ग्राफमध्ये कोणत्याही नोडपासून सुरुवात करून कोणत्याही नोडपर्यंत पोचता आले पाहिजे. अशा कनेक्टेड ग्राफचे सर्वोत्तम उदाहरण आपल्याला राज तिलक मध्ये बघायला मिळते पण गैर कानूनीही कमी नाही.

दलाल जूतावाला (कादर खान) आणि रॉबर्ट डिकॉस्टा (रणजीत) एकमेकांचे कम-दुश्मन (हे नंतर समजावले जाईल) आहेत. दलाल नावाप्रमाणेच चपला-बूटांमार्फत गैरकानूनी धंदा करतो आणि डिकॉस्टा गैरकानूनी पद्धतीने कंपाऊंडरचा डॉक्टर झाला आहे. जूतावालाची बायको (आशालता) नुकतीच प्रसूत झाली असून त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. यावर जूतावाला चिडलेला पाहून नर्सला आश्चर्य वाटते. जूतावालाच्या सासर्‍यांनी अट घातलेली असते की जर दलालला मुलगा झाला तरच त्याला इस्टेट मिळेल. आता इथे पहिले अपत्यच मुलगा पाहिजे अशी अट नाही पण जूतावालाचा बहुधा आशालतावर भरवसा नसावा, कदाचित हे ठसवण्यासाठीच तिला प्रसूत झाल्या झाल्या स्ट्रेचरवर कुठे तरी नेले जाते. मग जूतावाला डिकॉस्टाच्या मदतीने मुलांची अदलाबदली करवतो आणि मदत करणार्‍या त्या नर्सला मारतो. बदललेला मुलगा असतो इन्स्पेक्टर कपिल खन्नाचा (शशी कपूर). कपिल खन्नाने आपल्या मुलाला पाहिलेले असते त्यामुळे नर्सच्या चुकून गडबड झाली या बहाण्यावर तो विश्वास ठेवत नाही. पण त्याची बायको (रोहिणी हट्टंगडी) हाय खाऊन वर जाते. हा मुलगा कादर खानकडे ओम नारायण नावाने वाढतो आणि त्याचा गोविंदा होतो.

इकडे कपिलने हार मानलेली नसते. तो डिकॉस्टाविरुद्ध पिंचू कपूर न्यायाधीश असलेल्या कोर्टात जातो. पण सबूत नसल्याने डिकॉस्टा सुटतो. कपिल मग सबूत गोळा करण्यासाठी आझम खान (रजनीकांत) ला जेलमधून बाहेर काढतो. आझम खान तिजोर्‍या उघडण्यात भलताच तरबेज असतो. सबूत घेऊन तो पळणार एवढ्यात दलाल आणि डिकॉस्टा त्याला मारतात. त्याचा मुलगा अकबर खान मोठा होऊन इतर काही होणे शक्य नसल्याने रजनीकांत होतो आणि त्याच्यावर डिकॉस्टाच्या मुलीचा, रिटाचा (किमी काटकर) जीव जडतो.

इथे जूतावालाच्या मुलीचे काय करावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. मग पिंचू कपूर तिला सांभाळण्याची जबाबदारी बंतोवर (अरुणा इराणी) टाकतो आणि त्या बदल्यात कपिलने तिला ₹५००/महिना द्यावे असे सांगतो. बंतोचा नवरा नथुलाल (सत्येन कप्पू) आझम खानच्या खुनाचा आळ स्वतःवर घेतो, त्या बदल्यात त्याला जूतावाला ₹१०००० आगाऊ आणि ₹१०००० सुटल्यानंतर द्यावेत असे ठरते. त्यासोबतच बंतोला ₹५०० ची लॉटरी पण लागते. जिच्यामुळे आपल्याला इतका धनलाभ झाले तिचे नाव लक्ष्मी ठेवावे असा विचार करून ती जूतावालाच्या मुलीचे नाव लक्ष्मी ठेवते. काही अनाकलनीय कारणाने म्हणा वा दैवी हस्तक्षेपामुळे म्हणा, कादर खान व आशालताची मुलगी असूनही मोठी झाल्यावर ती श्रीदेवी होते आणि गोविंदासोबत गाणी म्हणते.

३) रजनीकांतचे सीन्स कसे लिहावेत?
अशा सिनेमात काही हुकमी एक्के असतात. या सिनेमाचा हुकमी एक्का रजनीकांत आहे. बरं एक सोडून दोन रजनीकांत आहेत. पण प्रि-बाबा रजनी असल्याने तो अभेद्य नाही त्यामुळे याचे सीन्स जपून लिहिणे गरजेचे आहे. उदा.

आझम खानची एंट्री
डिकॉस्टा कपिलच्या तोंडावर फिदी फिदी हसून निघून जातो. कपिल आझम खानकडे मदत मागायला जाईल अशी शंका जूतावाला उपस्थित करतो. यावर डिकॉस्टा त्याला सांगतो की आझम खान जेलमध्ये आहे. कट टू जेल. आझम कोठडीच्या आत बसल्या बसल्या कोठडीचे दार उघडून कपिलला आत येण्याची परवानगी देतो.

अकबर खानची एंट्री
जूतावाला आणि डिकॉस्टात झालेल्या किरकोळ वादावादीचे पर्यवसन जूतावालाने डॉ. रिटा डिकॉस्टा (बाप नकली असला तरी पोरगी अस्सल डॉक्टर झालेली दाखवली आहे) च्या मागे गुंड पाठवतो. किमी काटकर नेहमीप्रमाणेच काटकसरी पेहराव करून चाललेली असते जेव्हा ते गुंड तिला गाठतात. तिला धरल्यानंतर हा संवाद

गुंड : घबराओ मत रानी, अरे हम तो तुम्हारे आशिक है
रिटा : तुम मेरे आशिक नही तुम मेरे गुलाम हो
गुंड : गुलाम?
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : गुलाम
किल्वरचा गुलाम हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो आणि गोल चक्कर मारून परत रजनीकांतकडे येतो.
गुंड : गुलाम नही रानी हम तो तुम्हारे बादशहा हैं
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : बादशहा
बदामचा बादशहा हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो आणि गोल चक्कर मारून परत रजनीकांतकडे येतो.
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : और बादशहा के उपर एक्का होता है
इस्पिकचा एक्का हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो, रजनीकांत खदाखदा हसतो.
गुंड : कौन है? बाहर निकल!
एक्का रजनीच्या हातात परत येतो.
रजनीकांत - ये से इक्का और ये से अकबर खान, अभी आता हूं मेरी जान
पुढची धुलाई याची देही याची डोळा बघण्याची गोष्ट आहे - https://youtu.be/lJvOeoF8xro?t=43m41s

इथे माझा अल्पविराम, पुढचा रिव्यू प्रतिसादांत लिहितो

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सगळ्यांना Happy रिव्यू पुढे नेऊया

६) नेचर ऑर नर्चर?
एकदा का तुम्ही कनेक्टेड ग्राफ + बिछडना पर्याय निवडलात की तुम्हाला हिरो/हिरवीणीला लहानाचे मोठे होतानाची कॅरेक्टर डेव्हलपमेंट करणे भाग आहे. इथे आपल्याला दुसरा मोठा प्रश्न सोडवावा लागतो - नेचर की नर्चर? खून का रिश्ता की परवरीश? एका चांगल्या प्रश्नाप्रमाणेच याचे एकच बरोबर उत्तर नाही. तुम्हाला हवे ते उत्तर तुम्ही निवडू शकता. फक्त त्यानुसार येणारी वेगवेगळी बंधने तुमच्या कथानकाने पाळणे आवश्यक आहे. गैर कानूनीमधल्या द्वैतवादामुळे या दोन्ही पैलूंनाही स्वतंत्रपणे हाताळले आहे.
नोंद : अधिक अभ्यासाअंती ज्याचे इतके दिवस अस्मादिक द्वित्ववाद असे भाषांतर करत होते, तोच द्वैतवाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इथून पुढे द्वैतवाद ही संज्ञा प्रयुक्त होईल.

(अ) नेचर : अकबर खान आणि रिटा डिकॉस्टा
रजनीकांत व किमी काटकरची जोडी ही नेचरच्या अंगाने जाते. रजनीकांतच्या बाबतीत नेचरचा ओव्हरडोस आहे. त्याचा तोंडवळा, चपळता, स्वभाव, कानूनविषयी असलेला एक नैसर्गिक तुसडेपणा, रणजीतच्या तिजोर्‍या उघडण्याचे कसब हे सर्व अनुवंशाने त्याच्याकडे आले आहे. किंबहुना वरती चित्रगुप्ताने जनुके लिहिताना टर्मिनलमध्ये "cp aazam_khan.dna akbar_khan.dna" अशी कमांड रन केली असावी असा आमचा कयास आहे.

रिटाची केस थोडी अधिक काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे. तिचे बंधुराज टोनी डिकॉस्टा (तेज सप्रू) पूर्णपणे रणजीतचे गुण घेऊन जन्माला आलेले आढळतात. अशावेळी पहिल्या १० मिनिटातल्या ब्रिलियंस मध्ये दिग्दर्शक एक छोटासा क्लू सोडतो. जूतावाला डिकॉस्टाला धमकावतो की जर त्याने जूतावालाची मदत केली नाही तर तो जाऊन ज्यूलीला सांगेल की डिकॉस्टा खरा डॉक्टर नाही. थोडक्यात ज्यूलीबाई (यांचे दर्शन होत नाही) पापभीरू प्रवृत्तीच्या असाव्यात. तसेच हॉस्पिटलचे नाव जे.डी. हॉस्पिटल का हेही तिथेच स्पष्ट होते. रणजीतही या धमकीला घाबरतो म्हणजे त्याच्यात किमान ज्यूलीबाईंविषयी काही ममत्व असावे. हे ममत्व व पापभीरूपणा काटकसरीपणा केल्याने फक्त काटकसरी ताईंकडे आला आहे, टोनीमध्ये नव्हे. तसेच जेव्हा रणजीत तिला जूतावाल्याच्या फॅक्टरीज् साठी गोविंदाबरोबर प्रेमाचे नाटक करायला सांगतो तेव्हा ती "ये से येकमेव ये से अकबर खान" च्या प्रेमात पडते.

(ब) नर्चर : गोविंदा आणि श्रीदेवी
गोविंदाचे वडील पोलिस कमिशनर असले तरी त्याच्यात त्यांचे एकही गुण आलेले दिसत नाहीत. गैरकानूनी धंद्याच्या पैशावर वाढलेल्या गोविंदाचा डान्स त्या काळचे कमाल सोफिस्टिकेशन - बप्पी लाहिरीच्या गाण्यांवर मिथुन स्टाईल डिस्को - दर्शवतो (या गाण्यांविषयी एक स्वतंत्र सेक्शन लागेल). (४-क) मध्ये लिहिलेल्या अल्गोरिदमनुसार गैर कानूनी कामे करण्यात त्याला कसलेही किल्मिष वाटत नाही. तसेच वर नमूद केल्याप्रमाणे जेव्हा किमीला नाटक करण्याबद्दल सांगितले जाते तेव्हा कादर खानने सांगितल्याप्रमाणे गोविंदाही तिच्यासोबत नाटक करणार असतो. तिथे त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. तसेच ते नाटक करता करता इतर मुलींसोबत फ्लर्ट करण्याचा नॉन-सेन्सिकल प्रकार जूतावाल्याच्या परवरीशमुळेच होऊ शकतो.
नोंद : इथे एक सॉलिड मेटा आहे. या पॉईंटपर्यंत शशी कपूर इन्स्पेक्टरचा कमिशनर झालेला असतो. गोविंदा त्या पोरींसोबत फ्लर्ट करताना बिनदिक्कत खोटे(?) बोलतो की तो कमिशनरचा मुलगा आहे, जेव्हा त्याच्या आणि किमीच्या मते तो जूतावालाचा मुलगा असतो पण प्रत्यक्षात तो कमिशनरचाच मुलगा आहे (!!)

श्रीदेवीची केस या सगळ्यात ट्रॅजिक आणि गुंतागुंतीची आहे. तिच्यानुसार तिचे परवरीशवाले आई-वडील अरुणा इराणी-सत्येन कप्पू. सत्येन कप्पू १८ वर्षे जेलमध्येच असतो. अरुणा इराणीच्या परवरीशनुसार ती भुरटेगिरी करायला शिकते. पण तिच्या मते तिचे खरे वडील शशी कपूर असतात ज्याला ती दर कोर्टाच्या सुनावणीनंतर जाऊन स्वतःला मुलगी म्हणून स्वीकारण्याची विनंती करत असते आणि तो दर वेळी कंटाळा न येऊ देता नाकारत असतो. बरं तिच्यात काही चांगूलपणाही दाखवला आहे - हिरवीण असल्याने हे करणे भाग आहे. तिचे खरे वडील जूतावाला त्याच्याच भाषेत "मैं इतना कमीना थोडेही हूं, मै तो इससे भी ज्यादा कमीना हूं" असतात. आशालता स्वभावाने चांगली दाखवली असली तरी ती भोळसट चांगली आहे तर शशी कपूरप्रमाणे श्रीदेवी नैतिक चांगली पण फाने लिहिलेल्या टाईपची ब्रिलियंट चोर दाखवली आहे पण ती अल्गोरिदम फॉलो करत नाही. तर वाचकहो, याला म्हणतात कॉम्प्लेक्स कॅरेक्टर लिहिणे Proud Proud

एकंदरीत काय, तर जर कनेक्टेड ग्राफ निवडला असेल तर परवरीशच्या वाटेवर कॉम्प्लिकेशन्सच्या काट्यांना सामोरे जायची तयारी असली पाहिजे.

किती दिवसांनी पायसा Lol ..

काही अनाकलनीय कारणाने म्हणा वा दैवी हस्तक्षेपामुळे म्हणा, कादर खान व आशालताची मुलगी असूनही मोठी झाल्यावर ती श्रीदेवी होते >>> इथे खुप मोठ्ठ्याने हसली मी .. अरारारारा झालं..

७) रोमँटिक जोड्या कशा जुळवाव्यात?
कथानक अचाट व अतर्क्य लिहायचे असल्याने इथे आपल्याला कलात्मक स्तरावर जाऊन भूमिकांना न्याय वगैरे देणे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे लेखकाला मुकाटपणे हिरो हिरवीण जोड्या जुळवणे भाग आहे. किंबहुना यामुळेच जर जोडी जुळत नसेल तर तो/ती मरणार हे फिक्स! जर वेगळे काही करण्याची खूपच हौस असेल तर त्यातल्या त्यात इतकेच करता येते की एकापेक्षा अधिक जोड्या जुळवून त्यातली एखादी जोडी मृत्युदेवतेस स्वाहा करावी. गेल्या पानावर सुचवला गेलेला जलजला या वाटेने जातो - धर्मेंद्र जगवायचा असल्याने रति अग्निहोत्री मेल्यावरही त्याच्या नशिबी अनिता राज बांधली जाते तर काटकसरी ताईंना सोबत म्हणून शॉटगन सिन्हाही ढगात जातात.

गैर कानूनीमध्येही काहीसा असा प्रकार असला तरी सिनेमाभर मुख्य फोकस असलेल्या जोडीची, गोविंदा-श्रीदेवीची कहाणी सरधोपट मार्गाने जाते. रोमँटिक जोड्या जुळवण्याचे अनंत मार्ग असल्याने इथे लेखकासमोर प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी निर्माण होतो. कथेत कधीतरी धाग्याच्या सुरुवातीच्या सीनप्रमाणे हिरोने हिरवीणीसाठी फाईट करणे आणि ती जिंकणे अनिवार्य आहे. जर हिरो ब्रॉन्स ओव्हर ब्रेन्स प्रकारचा असेल आणि हिरवीण शोभेची बाहुली असेल तर बाकी काही करायची आवश्यकता नाही, हिरवीणीच्या इज्जत वाचवण्याचा सीन लिहावा आणि हिरवीण हिरोच्या प्रेमात पडणार म्हणजे पडणार! गोविंदाचा ओम नारायण मात्र फाईट मास्टर नाही. त्याच्याच शब्दात तो "म्युझिक पे लहराने वाला, खूबसूरत नजर आने वाला, मन को बहलाने वाला, और कुंवारी लडकियों को बेवकूफ बनाने वाला" आहे. त्यात समोर असलेली श्रीदेवीही शोभेची बाहुली दाखवलेली नाही. त्यामुळे रजनीकांत-किमीला वापरलेली स्ट्रॅटेजी इथे वापरता येत नाही.

त्यामुळे गोविंदा-श्रीदेवीच्या बाबतीत "हिरो हिरवीण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात" ही हिकमत लढवली आहे. सर्वप्रथम श्रीदेवी शाळकरी मुलीचा पोशाख करून कादर खान-गोविंदाच्या गाडीखाली येते. प्रत्यक्षात तिला काहीही झालेले नसतानाही ती मोठा अपघात झाल्याचे नाटक करते. मग मध्येच शुद्धीत आल्याचे दाखवून ती कादर खानला आपण मुकी व बहिरी असल्याचे भासवते पण चाणाक्ष गोविंदा ते खोटे असल्याचे ताडतो पण गप्प राहतो. मग ती कादर खानचे घड्याळ आणि ₹५०० घेऊन पसार होते, तर गोविंदा तिला स्वतःहून ₹५०० देतो. इथे झाला प्रथम परिचय!

आता हिरवीणीलाही प्रेमात पडायला काही कारण दिले पाहिजे. तर श्रीदेवी एका अतर्क्य कारणामुळे मुजरेवाली बनून रणजीत-कादर खानने मिळून दिलेल्या पार्टीत जाते (हे कारण भयंकर अचाट आहे. नंतर कव्हर करतो किंवा इतर एक्सपर्ट्सने भाष्य करावे). ती तिथेही चोरी करते. इथे डिकॉस्टांचे कुलदीपक टोनी सोबत अनंत काळचा साईड व्हिलन शिव रिंदानीला घेऊन श्रीदेवीवर तो माल परत घेण्याकरिता हल्ला करतात, अर्थातच तो हल्ला तेवढ्यापुरता सीमित नसतो. मग गोविंदा येऊन तिला वाचवतो. याने हिरवीणीला वाचा फोडण्यात हिरोला यश मिळाले असले तरी इथे ते पुरेसे नाही - नेसेसरी बट नॉट सफिशिअंट! ती त्याच्या डोळ्यात तिखटाची पूड फेकून पळते.

मग नाटक करण्याची पाळी गोविंदाची असते. तो डोळ्यांवर काळा चष्मा आणि हातात काठी असे आंधळा झाल्याचे बेमालूम सोंग वठवतो. ते दोघे टोनीची बाईक चोरून पळतात आणि तो त्यांचा सायकलवर पाठलाग करतो. श्रीदेवीला रस्त्यात अचानक विजू खोटेच दिसतो. ती त्याला आपण आपल्या आंधळ्या नवर्‍यासोबत चाललो असून मागचा सायकलवाला इज्जत लूटने की कोशिश कर रहा आहे अशी थाप मारते. या सिनेमाचा घाऊक स्वरुपात फसवला जाणारा इसम असल्याने विजू खोटेही लगेच फसतो आणि टोनीला पकडून नेतो. मग गोविंदा आणि श्रीदेवी न जाणे कोणत्या रोडवर जातात. त्या रोडवर समोरच्या पाण्याच्या टँकरमधून गळणार्‍या पाण्यामुळे चिखल झालेला असतो ज्याच्या घसरून ते पडतात. इथे गोविंदा आपण आंधळा नसल्याची कबूली देतो जेणेकरून श्रीदेवीला लटका राग दाखवायची संधी मिळावी. या संधीचा फायदा घेऊन अखेर त्याला तिच्यासोबत ड्युएट गाण्यावर नाचण्याचे परमिट मिळते आणि पर्यायाने प्रेमाचे लायसेन्स मिळते.

थोडक्यात काय तर ८० च्या सिनेमातला "म्युझिक पे लहराने वाला, खूबसूरत नजर आने वाला, मन को बहलाने वाला, और कुंवारी लडकियों को बेवकूफ बनाने वाला" हिरो असाल, तर प्रेमाचा भवसागर दुस्तर आहे.

काटकसरी ताईंना सोबत म्हणून शॉटगन सिन्हाही ढगात जातात.<<<< काटकसरी ताई गेल्यावर त्याला घोड्याच्या पाठीवर लादून एवढे जलजल्यातून सुखरूप बाहेर आणतात आणि बाहेर आल्यावर मान टाकतो तो! घोड्याची सगळी मेहनत वाया..

असो. जलजल्याबद्दल नंतर विचार करूया.

अख्खा लेख (अ‍ॅक्ट) आणि त्याचं प्रतिसादांमधून केलेल रसग्रहण (सेक्शन्स, सब-सेक्शन्स, रुल्स , सब-रुल्स वगैरे) सगळंच म-हा-न आहे !
पायस जी आपले पाय कुठे आहेत जरा दाखवा Happy _/\_

अर्थातच तो हल्ला तेवढ्यापुरता सीमित नसतो. >> या इथे लेखकाने बिट्वीन द लाईन्सचा जो काही कमाल वापर केलेला आहे त्याकडे मी समस्त वाचकांचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते. त्याचबरोबर लेखकाचे अभिनंदन. फ़ारसा फापटपसारा न करता (!) असंच इतर महत्त्वाच्या बाबींवर लक्ष वेधणं त्यांनी सुरू ठेवावं.

पायस... Biggrin
ते तेव्हढं मुजरा करण्या साठी जाण्याचं कारणही कळू देत!
"मग गोविंदा आणि श्रीदेवी न जाणे कोणत्या रोडवर जातात."...हे वाचून खूप हसले. ह्या असल्या आयडिया कुणाच्या मनात येतात तरी कशा...आणि ते कथानकात प्रत्यक्षात आणतात तरी कशा....? म्हणजे नक्की खरेच कसं चालत असेल या लेखकांचं डोकं?

>>
ते तेव्हढं मुजरा करण्या साठी जाण्याचं कारणही कळू देत!>>>
म्हणजे काय होतं बरं का,
गोविंदा आणि कदारखान ला चुना लावून, किशोरवयीन श्रीदेवी, पाठीला दप्तर लावून बागडत तिच्या बस्ती मध्ये येते,
जरीची साडी आणि गळ्यात एखादा नेकलेस आशा गरिबांच्या पेहेरवातील तिची आई, अरुणा इराणी तिला शाबासकी देते, आणि पटापट जेवून घे म्हणते,
इकडे श्रीदेवी कॅज्युअली आपल्या बापाची चौकशी करते,(हो बाप कुठे गेला ? असेच विचारते)
आई तिला सांगते बाप दारू प्यायला लागल्या पासून ऑफलाईन झालाय,
श्री- तसा तो पहिल्या पासूनच ऑफलाईन होता
इराणी- हो पण पूर्वी तो फक्त दारू प्यायचा, आता तो चमेली बाईच्या कोठ्यावर नाच पाहायला जातो,

कट टू कोठा
मोठ्या हॉल मध्ये 2 3 झुंबरे लावून चमेली बाई, अनारकली सारखे कपडे घालून नाचत आहे, हीचा बाप हाताला गजरे गुंडाळून दारू पितोय, बहुदा स्पेशल बैठक असावी, एकटाच गिर्हाईक दिसतो,
श्री बाई येतात, आणि चमेली बरोबर नाच करू लागतात, बापाला दारू चढल्यामुळे ही आपली मुलगी आहे हे कळत नाही, तो फक्त 2 डान्सर दिसतायत म्हणून आश्चर्य व्यक्त करतो.
आपल्या कोठ्यावर एक शाळेच्या गणावेशातील मुलगी येऊन आपल्या चालू परफॉर्मन्स मध्ये नाचते याचे चमेली बाई ला पण काही वाटत नाही, ती श्री देवीच्या मागे नाचायचा प्रयत्न करते,
शेवटी जेव्हा श्री बापाला पकडून उठवते, तेव्हा मात्र गिर्हाईक जातंय म्हणवून चमेली संतापते, आणि श्री च्या हातची एक थोबाडीत खाते, आणि दूर जाऊन पडते,
मग ती श्री ला हरामजादी म्हणते, श्री संस्कारी असल्याने तिला आई बापाचा अपमान सहन होत नाही, आणि ती एक ठोसा मारते,
आतून एक शाल घेतलेली बाई धावत येते, (ही बाई आणि तिचे वाजंत्री साथीदार गप्प का असतात इतका वेळ नकळे)
आणि चमेलीचा काळा निळा झालेला डोळा पाहून काळजीत पडते, उद्या तर हिला एक पार्टीत नाचायचे होते, आम्ही ऍडव्हान्स घेऊन बसलोय,
ही नाचली नाही, तरपैसे मिळणार नाहीत, आणि उद्याच मला 5 हजार मिलले नाहीत तर माझे ऑपरेशन कसे होणार.
ऑपरेशन चे कारण ऐकल्यावर मूळच्या संस्कारी आणि सद -हृदयी श्री ला पाझर फुटतो, आणि ती त्या पार्टीत नाचायचे कबूल करते,

ती पार्टी म्हणजे मोठ्या मोठ्या समगलर्स चे gtg असते,
आणि gtg च्या अजेंड्यावर चमेली बाई चा मुजरा असा आयटम आलेल्या असल्याने बहुदा तिला कॅम्पलसरी मुजरेवलीचा ड्रेस घालून जावे लागते, तिकडे श्री गाता गाता, सुरात खंड पडू न देता श्लोकांच्या अंगठ्या गिळणे, घड्याळे उडवणे वगैरे प्रकार करते.

सिम्बा Lol

इकडे श्रीदेवी कॅज्युअली आपल्या बापाची चौकशी करते,(हो बाप कुठे गेला ? असेच विचारते) >> स्पेसिफिकली बाप जैसा बाप! इथे दिग्दर्शक श्रीदेवीची परवरीश वाली केस अजून स्ट्राँग करतो.

तर ढोबळ कथानक झाले, कॅरेक्टर्स एस्टॅब्लिश झाली, जमेल तशी डेव्हलपही झाली. राहता राहिले व्हिलन

८) हिरोमध्ये लक्षात राहण्याजोगे क्विर्क्स नसले तरी चालतील व्हिलनमध्ये असलेच पाहिजेत.
गैर कानूनी जरा मार खातो तो व्हिलन्सच्या आघाडीवर! श्रद्धाने लिहिल्याप्रमाणे या व्हिलन्ससमोर फार काही चॉईस नाहीत. त्यांना जगण्याकरिता गैर कानूनी कामे करणे भाग आहे. तर चांगला व्हिलन कसा असावा?

अ) हिरोचा/हिरवीणीचा वैयक्तिक, त्यातही लहानपणीचा, बदला असेल तर व्हिलनला ट्रॅक करण्याची सोय हवी
हिरो/हिरवीण मोठे झाल्यानंतर बदला घेण्याकरिता ते व्हिलनला शोधणार. आता ही केस बिलिव्हेबली (ओह द आयरनी) वर्क व्हायची असेल तर व्हिलनने काही ना काही धागादोरा मागे सोडणे अनिवार्य आहे (खूनी कितना भी चालाक क्यों न हो, कोई ना कोई सबूत जरूर छोडता हैं - आमचे प्रेरणास्थान एसीपी प्रद्युमन). नेमका हाच नियम गैर कानूनी तोडतो. रणजीत आणि कादर खान रजनीकांत १ ला गाडीने धडक देऊन मारण्याचा प्रयत्न करतात पण तिथे ते फसतात. मग त्याच्या हातचा मार खाल्ल्यानंतर रणजीत चाकूने त्याला भोसकतो. तरीही तो मरत नाही. मग भेलकांडत जाऊन एकदाचा तो स्वतःच विजेच्या खांबाला जाऊन चिकटतो आणि जळून मरतो. (रजनीकांतला कसे मारावे? याची नोंद वाचकांनी घ्यायला हरकत नाही) या घटनेला एकही साक्षीदार नाही. सत्येन कप्पूने स्वतःवर हा इल्जाम घेतलेला. रजनीकांत २ चा शशीवर विश्वास नाही. अशावेळी तो बदला घेणार तर घेणार कसा? अर्थातच दिग्दर्शक याची सोय करतो पण तो या सेक्शनचा विषय नाही. इथे मुख्य मुद्दा असा की मूलभूत नियमांचा भंग केला की कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात.

ब) व्हिलनला स्वतःचे वाक्य हवे/स्वतःची तर्‍हा हवी
हा नियम नसून मार्गदर्शक सूचना आहे. बरं हा प्रकार लॉजिकल सिनेमांमधून आयात केला गेला आहे - उदा. अकिरा कुरोसावा कॅरेक्टर ठसवण्यासाठी स्वतःची अशी एक तर्‍हा ठरवून देत असे (https://youtu.be/doaQC-S8de8?t=2m49s). आता कथानक अतर्क्य असल्याने ती तर्‍हाही अतर्क्य असली पाहिजे इतकाच काय तो फरक! इथे बदला व्हिलन रणजीत असला तरी मुख्य जोडीसोबत अन्याय केलेला व्हिलन कादर खान आहे. त्यामुळे त्याला अशी तर्‍हा असाईन केली आहे. कादर खानला कोणाचे कौतुक करायला, चांगले बोलायला जमत नसते. म्हणून तो कायम त्या जागी विरुद्धार्थी शब्द योजून त्याच्यामागे "कम-" उपसर्ग लावत असतो. म्हणून रणजीत त्याचा "दोस्त" नसून "कम-दुश्मन" असतो. तो लोकांवर "कम-नाराज" होत असतो इ. इ.

क) व्हिलनला मोडस ऑपरंडी हवी
पुन्हा नियम नव्हे, मार्गदर्शक सूचना! इथे फारशी क्लॅरिटी गरजेची नाही, कच्चा आराखडाही चालू शकतो. उदा. कादर खान अंमली पदार्थांची स्मगलिंग करतो. त्यासाठी तो बूटाच्या टाचेखाली पुड्या लपवत असतो आणि ते स्मगल(?) करत असतो. आता तिथून पुढे काय होतं? दलाल ब्रँडचे बूट कोणकोणत्या शोरूम्समध्ये जातात? क्लाएंट कोण, त्यांच्याशी संपर्क कसा होतो? माल भरणार्‍या दोन बायका सोडून त्याच्याकडे इतर माणसे किती? या सर्वांत रणजीतचे योगदान काय? हे असे सर्व प्रश्न गौण आहेत, यांची उत्तरे द्यायची का नाही तो आपला अधिकार असल्याचे लेखकांनी ध्यानात ठेवले पाहिजे.

बाकी मग व्हिलनला अड्डा हवा, क्लायमॅक्सचा किमान काही भाग या अड्ड्यात घडायला हवा असे इतर किरकोळ मुद्दे आहेत ते कॉमन सेन्स वापरला (रिपिट : ओह द आयरनी) तर लगेच कळतील. असे सगळे मुख्य तुकडे तयार झाल्यानंतर ते जुळवायचे तेवढे बाकी राहतात. यासाठी आपल्याकडे तीन प्रकारचे डिंक आहेत - गाणी, फाईट्स आणि मेलोड्रामा! हे उरलेल्या सेक्शन्समध्ये कव्हर करूयात.

आता पार्टी, गाणे आणि फाईट सिक्वेन्स,

पार्टीत सगळे लोक सूट टाय लावून आलेत, कादर खान ला ही पार्टी सरप्राईज पार्टी असावी, "ये लोक कोन है" असे तो विचारतो, आणि हे दुनियाभरातील नामचीन समगलर्स आहेत असे उत्तर मिळते,

मग एक रँडम माणूस फोन करून, आज परफॉर्म करणारी मुलगी आम्हाला पाहिजे असे सांगतो, सप्रु त्याला मिळणार नाही सांगतो फोन कॉल संपतो.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे बजेट कमी असल्याने मेल लीड डान्सर चे काम गोविंदा करतो, ओपनिंग शॉट ला एकमेकांना पाहून श्री आणि गो दचकतात, श्री ढापुन आणलेल्या घडाळ्यावर हात ठेवते, कदारखान पण तिला ओळखतो, मग गाण्यातूनच " तुम्ही माझे सिक्रेट ठेवा, मी तुमचे सिक्रेट ठेवते" अशी मांडवली होते.

गाणे चालू असताना श्री एकाची अंगठी चोरते आणि गिळते, पण गाण्यात खंड पडत नाही,
एका कडव्यात दारू पिते, दारू अन्न नलिकेत असतानाच दारू चढल्या सारखा डान्स करते, दुसऱ्या कडव्यात दारू पोटात पोहोचल्यावर नॉर्मल होते.
गाण्याच्या शेवटी तो रँडम गुंड त्याच्या साथीदारांबरोबर येतो आणि लडकिया उठाव म्हणून आदेश देतो, त्याचे साथीदार श्रीदेवी सोडून बाकी सगळ्या लडकिया उचलतात,
मोठे मोठे नामचीन समगलर्स , पळून जातात,

नंतर आत श्रीदेवी आराश्यासामोर उद्या मारताना दाखवली आहे, ती उद्या मारून पोटात गेलेली अंगठी बाहेर काढत असते कथानकातला कुठलाही धागा मोकळा न सुटुदेण्याचे दिग्दर्शकाचे कसब आपल्याला दिसते.
पुढच्या सेकंदाला आरश्यामागून सप्रू येतो आणि श्रीदेवीला चादरीत गिफ्ट रॅप करून कुठेतरी घेऊन जातो.

गाण्याच्या शेवटी

इथे मुख्य मुद्दा असा की मूलभूत नियमांचा भंग केला की कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात.<<<<<
नो वंडर, तिरंगामध्ये प्रलयनाथ गेंडास्वामी पोलीस ऑफिसराला मारायला जाताना घोड्यावरून हेल्मेट घालून जातो आणि फक्त त्याचा मुलगा पाहत असताना हेल्मेटची काच वर करून हॉहॉहॉ करून हसतो. येथे मेहुलकुमारला दाद दिली पाहिजे.

तर पुढची फायटिंग,
फक्त हाईलाईट्स
1 श्रीदेवी किडनॅप होत आहे हे तिला कळूनही तिचे हास्य कायम आहे
2) धुमश्चक्री चालू असताना श्री गाडीत बसते, इग्निशन ला किल्ली असते, पण पळून न जाता शेजारी पडलेली बाटली उघडून ती दारू पित बसते. दारुड्या बापाचा अपत्यांवर होणारा परिणाम इकडे दिसतो
3 गोविंदला रस्सी ने बांधून तुडवत असतात, तेव्हा श्री गाडीत बसल्या बसल्या बाटली फोडते आणि फुटकी काच फेकून गोविंदाची रस्सी कापते
4 नोटांची थप्पी लपवताना ती सवयीने ब्लाउज मध्ये लपवायला जाते, मग मावणार नाही लक्षात आल्यावर दुपट्ट्यात बांधते. ती स्मॉल time चोर आहे, एक वेळी थोडाच माल उडवायची तिला सवय आहे हे दिग्दर्शक असे खुबीने सुचवतो.
5 जीव आणि इज्जत वाचवल्याच्या बदल्यात गोविंदा तिच्या पप्पी मागतो, पण दारू प्यायली असली तरी तिच्यातली संस्कारी नारी शुद्धीत असते, ती लाल तिखट उधळून तिकडून पळून जाते.
या लाल तिखटाचा उपयोग मागेच किडनॅप होताना का करत नाही देव जाणे.

नो वंडर, तिरंगामध्ये प्रलयनाथ गेंडास्वामी पोलीस ऑफिसराला मारायला जाताना घोड्यावरून हेल्मेट घालून जातो आणि फक्त त्याचा मुलगा पाहत असताना हेल्मेटची काच वर करून हॉहॉहॉ करून हसतो. येथे मेहुलकुमारला दाद दिली पाहिजे. >> ग्रेमा Lol माझ्याही डोक्यात लिहित असताना हेच उदाहरण आले होते.

कादर खान ला ही पार्टी सरप्राईज पार्टी असावी, "ये लोक कोन है" असे तो विचारतो, आणि हे दुनियाभरातील नामचीन समगलर्स आहेत असे उत्तर मिळते, Happy
खरंच ती अंगठी गिळताना दाखवलीये? कसं शक्यंय?

मोठे मोठे नामचीन स्मगलर्स , पळून जातात,... Biggrin
कोण म्हणे असतात हे लोक? असे ऑफीशिअली गेट टुगेदर करणारे?
इस शहर के सारे के सारे बदमाश तुम्हे यहा मिलेंगे.....!!
पूर्वी पॉकेट बुक्स मिळायची ना ती सुद्धा अशीच अ आणि अ चा कहर असायची..!! काय त्या कथा, आणि अतर्क्य घडामोडी...पण वाचायच्या अफाट भुकेपुढे सगळ्याचाच फडशा पडायचा...

खरंच ती अंगठी गिळताना दाखवलीये? कसं शक्यंय?>>>>>>
अंगठी गिळण्या पेक्षा ती स्पॉट जॉगिंग गेल्या सारखे करून बाहेर काढणे जास्त भारी आहे Lol

साधारण आशा उड्या लहानपणी जोरात "आली" आणि आत कुणी असेल तर आम्ही मारायचो Lol

पायस... व्हिलनला स्वतःचे वाक्य हवे/स्वतःची तर्‍हा हवी..हे वाचून खूपच हसायला आलं!
त्यामुळे त्याला अशी तर्‍हा असाईन केली आहे. ........ हेही वाक्य अफाट.! नव्हे... कम- खराब!!
झाला का रिव्ह्यू? की अजून बाकी आहे? शेवट काय होतो?

मला वाटते की फालतू हिंदी सिनेमातला फालतू रोल करण्याकरता जो पैसा मिळतो तो अभिजात नाटकांच्या प्रयोगाच्या कित्येक पट जास्त असतो. कारण नाटकाच्या कित्येक पट जास्त लोक हिंदी सिनेमा (कितीही फालतू असला तरी) बघतात. त्यामुळे हे सगळे प्रतिभावंत असल्या हिणकस भूमिकेत दिसतात. अर्थस्य पुरुषो दासा: (आणि स्त्रियाही!)>>>>>>>>>> शेवटी कितीही आव आणला तरी उदरनिर्वाहासाठी पैसे लागतातच, नुसती हवा पाणी खाऊन प्रतिभा दाखवता येत नाही.

पायस भाऊ, तेव्हढी ती कथा पूर्ण करायचं मनावर घ्या... >> Happy लिखाण चालू आहे.

खरंच ती अंगठी गिळताना दाखवलीये? कसं शक्यंय?>> अशा सिनेमातल्या चोरांच्या फॅशनच्या इतिहासानुसार कधी काळी गळ्यात छोटी पिशवी बनवून त्यात शक्यतो हिरा लपवायची फॅशन होती. जर अशी पिशवी बनवली असेल तर अंगठी/हिरा/माणिक गिळल्यानंतर गळ्यावर थापट्या मारून मानेला झटके देऊन, डोळे मिचकावून ते दाखवायची पद्धत आहे. श्रीदेवी हे सर्व करते. पण अंगठी काढताना ती योग्य पद्धतीने काढत नाही. पुन्हा द्वैतवादी दिग्दर्शकामध्ये क्लॅरिटीचा असलेला अभाव दिसून येतो.

आपल्याकडे आता बरेच तुकडे आहेत जे कसेतरी जुळवायचे आहेत. हे थोडेसे केकचे थर रचण्यासारखे आहे, मध्ये मध्ये क्रीमचे लेअर देत एक एक थर रचत जायचा. या रिव्यूत आपण तीनच गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहोत - गाणी, फाईट आणि मेलोड्रामा. मग फक्त चेरी ऑन द टॉप सारखा क्लायमॅक्स उरतो.

९) गाणी
गाणी ही नाचण्यासाठी, कानसेनांनी तल्लीन होण्यासाठी, डोलण्यासाठी किंवा तत्सम गोष्टींसाठी असतात हा समज प्रथम डोक्यातून काढून टाकावा. अतर्क्य पॅराडाईम मध्ये गाणी ही प्रामुख्याने व्हिजुअल अतर्क्यपणा करण्यासाठी वापरली जातात. बहुतांशी वेळा गाणी रुल ऑफ थ्री (https://en.wikipedia.org/wiki/Rule_of_three_(writing)) नुसार जातात. आपण केस स्टडी म्हणून "मन गोरा तन काला" वापरणार आहोत.

अ) सेटअप
गाण्यात कधीही, चुकूनही डायरेक्ट उडी मारू नये. त्याचा वापर पिलो शॉटसारखा विश्रांती द्यायला करणे अपेक्षित नाही. त्यामुळे गाण्यातून जे दाखवायचे आहे त्याचा सेटअप करून घ्यावा. हे सरिअलिस्टिक असले तरी चालेल. अगदी हिरो-हिरवीणीला "तुम बिन जियूं कैसे" पासून एकमेकांना "हॅपी बर्थडे टू यू" म्हणण्यापर्यंत सगळं चालेल, फक्त ते आधीच्या सीनमध्ये क्लीअर केले पाहिजे. आपल्या केस स्टडीचा हेतु विस्कळीत तुकड्यांना एकत्र आणण्याची प्रोसेस सुरू करण्याचा आहे आणि ते होण्यासाठी काही इंपेटस सेट करणे गरजेचे आहे.
तर गोविंदाशी सूत जुळल्यानंतर (आपके नारायण के तरह मुझे भी एक ओम नारायण मिल गया है) श्रीदेवी एका विष्णू-लक्ष्मी मंदिरात जाऊन आपण सगळे वाईट धंदे बंद करत असल्याचे सांगते आणि लक्ष्मीला मां बनकर आशीर्वाद द्यायची विनंती करते. मॅच कट टू आशालता! या क्लेव्हर एडिटिंग नंतर अत्यंत सोयीस्कररित्या आशालताचे मंगळसूत्र खाली पडते जे श्रीदेवी तिला परत द्यायला तिच्या मागे धावते. आशालता तिला धन्यवाद देत असताना कादर खान येऊन श्रीदेवीवर चोरीचा आळ घेऊन तिला तुरुंगात पाठवतो. मग पुढच्याच सेकंदाला त्याचा चेहरा मुतखडा झाल्यासारखा दुर्मुखतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर त्याला सांगतात की त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. अत्यंत निरागसपणे कादर खान डॉक्टरला स्वतः:ची किडनी आपल्याला द्यायची विनंती करतो पण डॉक्टर ती विनंती धुडकावून लावतो. इथे त्याच वर्षी आलेल्या क्लर्कमधल्या "आजकल के डॉक्टर..." ची आठवण आल्याखेरीज राहत नाही. पॉईंट टू नोट - कादर खानला पैशांची गरज निर्माण झाली आहे.
तिकडे श्रीदेवी बंद असते ती सामान्य कोठडी असलेल्या अतिसामान्य पोलिस स्टेशनमध्ये कमिशनर शशी कपूर घटकाभर टेकायला म्हणून आलेला असतो. बाकी सर्वांना कामे असल्याने मुक्रीची एफआयआर लिहायचा मोठेपणाही तो दाखवतो. मुक्री आणि कंपनीची तक्रार अडीच लाखांचा अल्गोरिदम वापरणार्‍या बाप-लेक जोडीविरुद्ध तक्रार असते. श्रीदेवी आतून म्हणते की मी त्या दोघांना ओळखते. लगेचच शशी मुक्रीचे पुढचे बोलणे ऐकून न घेता, इतर तपास न करता श्रीदेवीची मदत घ्यायची ठरवतो. पॉईंट टू नोट : शशी कपूर, श्रीदेवी, कादर खान, गोविंदा यांना एका दृश्यात आणण्याची संधी प्राप्त झाली आहे.
कादर खान पेपरात बातमी वाचतो - आफ्रिकेतल्या ओसिबिसा देशाची राजकुमारी नवरा शोधायला म्हणून भारतात आलेली आहे आणि ती खूप श्रीमंत आहे. इथे श्रीदेवीने विग घातल्यामुळे ती कादर खानला ओळखू येत नाही. त्याच्यासाठी ती "कडकी के अंधेरे में आफ्रिका के काले सूरज से निकली उम्मीद की किरन" असते. अर्थातच गोविंदाने तिला फसवण्याचे ठरते. पॉईंट टू नोट : एकत्र आणण्याचा बहाणा मिळाला आहे. गाणे सुरू करायला एवढा सेटअप पुरेसा आहे.

ब) इनॅक्ट
सेटअप झालेल्या सिनॅरिओला गाण्यात इनॅक्ट करणे पुढची नैसर्गिक पायरी आहे. त्यानुसार कोण्या एका क्लबमध्ये श्रीदेवी नाचत असते. तिचे वडील आणि लॉर्ड ऑफ ओसिबिसा म्हणून शशी कपूर कुरळ्या केसांचा विग घालून आणि आफ्रिकन दिसावे म्हणून काळा रंग लावून आलेला असतो. काही अनाकलनीय कारणाने गोविंदा आणि कादर खानही आफ्रिकन बनून येतात. मग गोविंदाही नाचायला सुरुवात करतो आणि गाणे सुरु होते.
या इनॅक्टमेंटमध्ये म्युझिक डिपार्टमेंटची साथ मिळणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच काही संगीतकारांवर, गायकांवर अतर्क्य गाण्यांचा शिक्का बसला आहे. त्यांची स्टाईल अशा सिनेमांसाठी सुयोग्य होती तर ते तरी काय करणार? असो तर या गाण्याचे संगीत बप्पीदांनी दिलेले असल्याने साहजिक अंगविक्षेप करायला ट्रिप्पी बीट्स मिळतात. "सारे शहर में एक लडका/लडकी ऽऽऽ मन गोराऽऽऽ तन काऽलाऽऽ" असे शब्द इंदीवरच्या डोक्यातून आले का प्रयाग राजच्या हे कोडे काही सुटले नाही. जानी दुश्मन एक अनोखी कहानीचे "आजा" येईपर्यंत कमीत कमी शब्द असलेले गाणे बहुतेक हे असावे. यातून एक स्पष्ट होते की काळा रंग लावून आले असले तरी गोविंदा आणि श्रीदेवीची मने गोरी (?!) आहेत आणि जे काही घडतंय त्याचे कर्ते करविते कादर खान-शशी कपूर आहेत (!!). आश्चर्याचा धक्का देत कादर खान शशी कपूरकडे हुंडा मागतो, जो सॉलिड मेटा आहे कारण लोकांसाठी कादर खानचा मुलगा तर श्रीदेवी शशी कपूरची मुलगी आहे. त्याहून अँटी-मेटा असा की प्रत्यक्षात कादर खानची मुलगी श्रीदेवी आणि शशी कपूरचा मुलगा गोविंदा, म्हणजे मुलीच्या बापाने मुलाच्या बापाकडे हुंडा मागितला! त्याहूनही आश्चर्यजनकरित्या शशी कपूर ते मान्य करतो. त्याहूनही आश्चर्यजनकरित्या तो हुंडा अमेरिकन डॉलरच्या स्वरुपात असतो - ५ डॉलरची ५ बंडले, १ डॉलरची ४ बंडले, २० डॉलरचे १ बंडल. कादर खान वास घेऊन त्या बंडलांचे परीक्षण करतो. गाण्याच्या शेवटी गोविंदाचा विग निघून येतो, गाणे संपले.

क) रिझोल्युशन
आता सिचुएशन रिझॉल्व्हही केली पाहिजे. स्वप्न असेल तर त्यांना जमिनीवर आणले पाहिजे. थोडक्यात गाणेरुपी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला पाहिजे. यूट्युबवरच्या आवृत्तीत या सीनचा काही भाग कट झाला आहे (जेवढे डायलॉग्ज ऐकायला मिळाले वरून आमचा अंदाज) पण शशी कपूर कादर खानचाच अल्गोरिदम त्याच्यावर वापरतो असे दिसते. मग निष्ठूर पालकत्वाच्या थीमला अनुसरुन कादर खान अल्गोरिदमचे जनकत्व गोविंदावर ढकलून देतो आणि त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतो. मग गोविंदा आळ स्वतःवर घेतो. तो जाता जाता श्रीदेवीला जेलमधून परत आल्यावर शरीफ बनण्याचे वचन देतो - थोडक्यात दोघेही या ना त्या लक्ष्मीला वचन देतात.
याने काय काय साध्य झाले - १) कादर खानची पैशाची चणचण न मिटता अधिकच वाढली. त्याने तो काहीतरी चूक करण्याची शक्यता निर्माण झाली (हर अपराधी पकडे जाने से पहले कोई ना कोई गलती जरूर करता हैं), २) गोविंदा जेलमध्ये गेला जिथे दुसर्‍या एका कारणाने रजनीकांत ऑलरेडी आलेला आहे. दोघांची भेट होण्याचा सेटअप झाला. थोडक्यात कादर खान-शशी कपूर आणि गोविंदा-रजनीकांत या तोवर न झालेल्या इंटरअ‍ॅक्शन्सची सोय या सर्व घटनाक्रमाने झाली, दोन थर जोडले गेले. रिझॉल्व्ह्ड!

विशेष टिप्पणी : ओसिबिसा हा एक प्रसिद्ध ब्रिटिश आफ्रो-रॉक बँड आहे. प्रयाग राजला हे नाव का वापरावेसे वाटले हे माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहे.

पायस एक मिस् केलेत तुम्हि
कादर खानच्या किडनी फेल्युअर चे निदान x ray पाहून होते Happy

एकंदरीतच हा सगळा चित्रपट ५ चौरस मैलात घडतो, कोणतीही व्यक्ती कुठेही भेटू शकते.
देवळात गेलेल्या श्री ला आशालता भेटते,
हॉस्पिटलात गेलेल्या गोविंदाला आशालता आणि किमी आणी श्री तिघेही भेटतात
कमिशनर साहेब अधेमध्ये स्वत: राउंड वर जात असल्याने ते कोणालाही, कुठेही भेटतात Happy

Pages