गैर कानूनी धावता संयुक्त रिव्यू : अचाट आणि अतर्क्य कथा कशी लिहावी?

Submitted by पायस on 8 November, 2017 - 15:56

गैर कानूनी अचाट आणि अतर्क्य सिनेमांच्या वाटेतला महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक दशकाची अचाटपणाची आपली वेगळी स्टाईल आहे आणि क्वचितच एखाद्या चित्रपटात एकापेक्षा जास्त स्टाईल्स बघायला मिळतात. गैर कानूनी तो चित्रपट आहे. या विशेषतेमुळे ही अचाट आणि अतर्क्य लेखकांची कार्यशाळा आहे असे म्हणणे योग्य ठरेल. ऐलान-ए-जंगप्रमाणेच हा रिव्यू क्राऊडसोर्स करत आहे. यात तुम्हाला हवी तशी भर घाला.

१) अमूर्त कल्पना आणि मूर्त कथा
अचाट लेखन करताना एक मुख्य अडचण असते की अनेकदा कथेमागची संकल्पना आणि तिचे मूर्त स्वरुप यांचे गुणोत्तर काय असावे? याच्यावर अनेक दिग्गजांनी वेगवेगळी उत्तरे शोधली आहेत पण कोणीही याचे उत्तर १:१ देत नाही. १:क्ष (क्ष > ०) गुणोत्तराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रामसेपट! गैर कानूनी मध्ये सुरुवातीच्या श्रेयनामावलीमध्ये स्टोरी आयडिया श्रीमती पुष्पा राज आणि स्टोरी प्रयाग राज अशी दोन वेगवेगळी नावे वाचून द्वित्त्ववादी कथानक असल्याचे कळते आणि त्यानुसार गुणोत्तर १:१ आहे. थोडक्यात एकही सीन वाया घालवलेला नाही, प्रत्येक सीन कथेला पुढे आणि पुढेच नेण्याकरता वापरला आहे. अचाट कथानक आणि पटकथा हे दोन स्वतंत्र पैलू असल्याचा दिग्दर्शकाचा द्वित्ववादी समज आहे.

२) नात्यांचा ग्राफ कनेक्टेड हवा
ग्राफ थिअरीमध्ये कनेक्टेड ग्राफ अशी एक संकल्पना आहे. कनेक्टेड ग्राफमध्ये कोणत्याही नोडपासून सुरुवात करून कोणत्याही नोडपर्यंत पोचता आले पाहिजे. अशा कनेक्टेड ग्राफचे सर्वोत्तम उदाहरण आपल्याला राज तिलक मध्ये बघायला मिळते पण गैर कानूनीही कमी नाही.

दलाल जूतावाला (कादर खान) आणि रॉबर्ट डिकॉस्टा (रणजीत) एकमेकांचे कम-दुश्मन (हे नंतर समजावले जाईल) आहेत. दलाल नावाप्रमाणेच चपला-बूटांमार्फत गैरकानूनी धंदा करतो आणि डिकॉस्टा गैरकानूनी पद्धतीने कंपाऊंडरचा डॉक्टर झाला आहे. जूतावालाची बायको (आशालता) नुकतीच प्रसूत झाली असून त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. यावर जूतावाला चिडलेला पाहून नर्सला आश्चर्य वाटते. जूतावालाच्या सासर्‍यांनी अट घातलेली असते की जर दलालला मुलगा झाला तरच त्याला इस्टेट मिळेल. आता इथे पहिले अपत्यच मुलगा पाहिजे अशी अट नाही पण जूतावालाचा बहुधा आशालतावर भरवसा नसावा, कदाचित हे ठसवण्यासाठीच तिला प्रसूत झाल्या झाल्या स्ट्रेचरवर कुठे तरी नेले जाते. मग जूतावाला डिकॉस्टाच्या मदतीने मुलांची अदलाबदली करवतो आणि मदत करणार्‍या त्या नर्सला मारतो. बदललेला मुलगा असतो इन्स्पेक्टर कपिल खन्नाचा (शशी कपूर). कपिल खन्नाने आपल्या मुलाला पाहिलेले असते त्यामुळे नर्सच्या चुकून गडबड झाली या बहाण्यावर तो विश्वास ठेवत नाही. पण त्याची बायको (रोहिणी हट्टंगडी) हाय खाऊन वर जाते. हा मुलगा कादर खानकडे ओम नारायण नावाने वाढतो आणि त्याचा गोविंदा होतो.

इकडे कपिलने हार मानलेली नसते. तो डिकॉस्टाविरुद्ध पिंचू कपूर न्यायाधीश असलेल्या कोर्टात जातो. पण सबूत नसल्याने डिकॉस्टा सुटतो. कपिल मग सबूत गोळा करण्यासाठी आझम खान (रजनीकांत) ला जेलमधून बाहेर काढतो. आझम खान तिजोर्‍या उघडण्यात भलताच तरबेज असतो. सबूत घेऊन तो पळणार एवढ्यात दलाल आणि डिकॉस्टा त्याला मारतात. त्याचा मुलगा अकबर खान मोठा होऊन इतर काही होणे शक्य नसल्याने रजनीकांत होतो आणि त्याच्यावर डिकॉस्टाच्या मुलीचा, रिटाचा (किमी काटकर) जीव जडतो.

इथे जूतावालाच्या मुलीचे काय करावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. मग पिंचू कपूर तिला सांभाळण्याची जबाबदारी बंतोवर (अरुणा इराणी) टाकतो आणि त्या बदल्यात कपिलने तिला ₹५००/महिना द्यावे असे सांगतो. बंतोचा नवरा नथुलाल (सत्येन कप्पू) आझम खानच्या खुनाचा आळ स्वतःवर घेतो, त्या बदल्यात त्याला जूतावाला ₹१०००० आगाऊ आणि ₹१०००० सुटल्यानंतर द्यावेत असे ठरते. त्यासोबतच बंतोला ₹५०० ची लॉटरी पण लागते. जिच्यामुळे आपल्याला इतका धनलाभ झाले तिचे नाव लक्ष्मी ठेवावे असा विचार करून ती जूतावालाच्या मुलीचे नाव लक्ष्मी ठेवते. काही अनाकलनीय कारणाने म्हणा वा दैवी हस्तक्षेपामुळे म्हणा, कादर खान व आशालताची मुलगी असूनही मोठी झाल्यावर ती श्रीदेवी होते आणि गोविंदासोबत गाणी म्हणते.

३) रजनीकांतचे सीन्स कसे लिहावेत?
अशा सिनेमात काही हुकमी एक्के असतात. या सिनेमाचा हुकमी एक्का रजनीकांत आहे. बरं एक सोडून दोन रजनीकांत आहेत. पण प्रि-बाबा रजनी असल्याने तो अभेद्य नाही त्यामुळे याचे सीन्स जपून लिहिणे गरजेचे आहे. उदा.

आझम खानची एंट्री
डिकॉस्टा कपिलच्या तोंडावर फिदी फिदी हसून निघून जातो. कपिल आझम खानकडे मदत मागायला जाईल अशी शंका जूतावाला उपस्थित करतो. यावर डिकॉस्टा त्याला सांगतो की आझम खान जेलमध्ये आहे. कट टू जेल. आझम कोठडीच्या आत बसल्या बसल्या कोठडीचे दार उघडून कपिलला आत येण्याची परवानगी देतो.

अकबर खानची एंट्री
जूतावाला आणि डिकॉस्टात झालेल्या किरकोळ वादावादीचे पर्यवसन जूतावालाने डॉ. रिटा डिकॉस्टा (बाप नकली असला तरी पोरगी अस्सल डॉक्टर झालेली दाखवली आहे) च्या मागे गुंड पाठवतो. किमी काटकर नेहमीप्रमाणेच काटकसरी पेहराव करून चाललेली असते जेव्हा ते गुंड तिला गाठतात. तिला धरल्यानंतर हा संवाद

गुंड : घबराओ मत रानी, अरे हम तो तुम्हारे आशिक है
रिटा : तुम मेरे आशिक नही तुम मेरे गुलाम हो
गुंड : गुलाम?
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : गुलाम
किल्वरचा गुलाम हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो आणि गोल चक्कर मारून परत रजनीकांतकडे येतो.
गुंड : गुलाम नही रानी हम तो तुम्हारे बादशहा हैं
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : बादशहा
बदामचा बादशहा हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो आणि गोल चक्कर मारून परत रजनीकांतकडे येतो.
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : और बादशहा के उपर एक्का होता है
इस्पिकचा एक्का हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो, रजनीकांत खदाखदा हसतो.
गुंड : कौन है? बाहर निकल!
एक्का रजनीच्या हातात परत येतो.
रजनीकांत - ये से इक्का और ये से अकबर खान, अभी आता हूं मेरी जान
पुढची धुलाई याची देही याची डोळा बघण्याची गोष्ट आहे - https://youtu.be/lJvOeoF8xro?t=43m41s

इथे माझा अल्पविराम, पुढचा रिव्यू प्रतिसादांत लिहितो

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याचा मुलगा अकबर खान मोठा होऊन इतर काही होणे शक्य नसल्याने रजनीकांत होतो >>>
आझम कोठडीच्या आत बसल्या बसल्या कोठडीचे दार उघडून कपिलला आत येण्याची परवानगी देतो. >>>
Lol

मायकेल जॅक्सन पर्यंत अजून पोहोचलेला दिसत नाहीस. त्याबद्दलही लिही Happy ते ग्रेसलॅण्ड का वेगास मधे एल्विस प्रिस्ली कन्व्हेन्शन भरते तसे वाटले होते ते गाणे पाहून. मायकेल जॅक्सन कन्व्हेन्शन.

मस्त! हे उघडल्याबद्दल आभार. आलोच मी ही लिहायला. Or, as they say in cricket, to join the party!

लिंक पहिली,
अचाट आहे,
विशेषतः चाकू सुदर्शन चक्र सारखा फिरवणे __/\__
पुढच्या प्रसंगात आझम खान पठाण बनून येतो, तेव्हाचे संवाद हाईट आहेत,

याचा मुलगा अकबर खान मोठा होऊन इतर काही होणे शक्य नसल्याने रजनीकांत होतो >>> Lol
काटकसरी ताईंना धरल्यानंतरचा संवाद कहर आहे.
लिहा लोक्स. काहीतरी धम्माल वाचायला मिळेल आता.

मस्त पंचेस! Lol
या सिनेमाबद्दल मी ऐकलेलंही नाहीये! किती तो मागासलेपणा माझा! आता पाहायलाच हवा. झी सिनेमावर सापडेल बहुतेक.

भारी Proud

कधी ऐकले वाचलेही नव्हते या सिनेमांबद्दल.. कुठल्या दशकात यायचे हे..
बहुतेक यांचा एक टिपिकल प्रेक्षकवर्ग असावा... रजनीकांत, गोविंदा आणि जुम्मा चुम्मा किमी काटकर सारखे अव्वल दर्जाचे कलाकार कादरखानांसारख्यांच्या सोबतीला घेऊन काढलेले चित्रपट.. यांना अगदीच सी ग्रेड चित्रपट तरी कसे म्हणावे

४) गैर कानूनी कृत्ये कशी करावीत?
सिनेमाच्या नावाचा मान राखून लेखकाने सिनेमाभर गैर कानूनी कृत्ये घडताना दाखवली आहेत. इथे दिग्दर्शक आपल्या मधल्या द्वित्ववाद्याला पूर्ण मोकळीक देतो व अचाटपणाच्या विविध स्टाईल्सचे प्रदर्शन करतो. नमुन्यादाखल काही उदाहरणे

अ) बाळांची अदलाबदली कशी करावी?
आमच्या अभ्यासानुसार ही शैली लेट ७०ज-अर्ली ८०ज मध्ये प्रचलित होती. धरम-वीर, राज तिलक ही काही ठळक उदाहरणे; धरम-वीरमध्ये तर दोनदा बदल होऊन डबल निगेशनने ते कॅन्सलही होते. ८९ साल उजाडेपर्यंत या प्रकाराचा अस्त झाला होता. इथे जूतावाला अदलाबदली कशी करतो ते पाहा

नर्स बाळांना बिल्ले लावून रजिस्टरमध्ये एंट्री करायला जाते तेव्हा कादर खान आत येतो. स्वतःच्या मुलीचा १०५ नंबरचा बिल्ला काढतो आणि १०८ नंबरच्या शशी कपूरच्या मुलाच्या बिल्ल्यासोबत एक्स्चेंज करतो. मग अत्यंत मधाळ हसून तो नर्सला सांगतो की तिच्या बॉयफ्रेंडकडे जाण्याचे लंडनचे तिकीट तो तिला देईल जर तिने रजिस्टरमध्ये खोटी एंट्री केली तर. वर पालुपद "अगर तुम वहां नही गयी तो वो दुसरी शादी कर लेगा".

ब) तिजोरी कशी उघडावी?
सिनेमातले दोन्ही रजनीकांत तिजोर्‍या उघडण्यात एक्स्पर्ट असतात. वेल, किमान रणजीतची थर्माकोलची तिजोरी उघडण्यात तरी त्यांचा हात कोणी धरू शकत नसतो. ८०च्या दशकात तिजोर्‍या फोडण्याच्या दोन मुख्य पद्धती - डाकू बनून गोळी घालणे अर्थात शब्दशः फोडणे अन्यथा टकटक करत ते कुलुप उघडणे. इथे दिग्दर्शक अ‍ॅव्हांत-गार्दे स्टाईल वापरतो.

आझम खान
किल्लीसदृश दिसणारी खिट्टी घालून तो नुसतीच फिरवतो आणि मग टीव्ही सुरु करण्यासाठी जसे टीव्हीच्या डोक्यावर आपण ठोसे लगावतो तसा एकच ठोसा तो लगावतो. इथे मला क्षणभर भीति - आधीच थर्माकोलची ती तकलादू तिजोरी, त्यात रजनीकांतचा ठोसा, पण कशीबशी टिकली. ठोसा लगावल्यावर तिजोरी उघडते.

अकबर खान
किमीला वाचवल्याबद्दल रणजीत त्याला इनाम द्यायची इच्छा व्यक्त करतो. यावर "अकबर खान इनाम मांगता नही खुद ब खुद ले लेता है, क्युंकी मांगने वाले को वो भिकारी समझता है" असे उत्तर देऊन रजनीकांत सिगारेट शिलगावतो. अर्थात काडी ओढण्यासाठी किमी काडी हातात धरते आणि रजनीकांत त्यावर काडेपेटी ओढतो. मग तिला "तेरे बाप की तिजोरी खोल दूं?" विचारुन तो तिजोरीपाशी जातो. दोनदा टकटक करतो आणि मग स्वतःचे डोके तिच्यावर आपटतो. इलेक्ट्रोनिक लॉक (तीन आकड्यांचे स्टीकर चिकटवलेले) असुनही डोके आपटताच बरोबर कोड (२३४) एंटर होतो आणि तिजोरी उघडते.

क) भामटेगिरी कशी करावी?
हा एक स्वतंत्र सेक्शनही होऊ शकतो कारण श्रीदेवीचे निम्मे सीन त्यासाठीच आहेत. पण त्याऐवजी श्रीदेवीवर वेगळा सेक्शन काढून इथे ९०ज ची एक स्टाईल सांगणार आहे. कादर खान आणि गोविंदा जोडीचा हा सातवा चित्रपट होता. पण कॉमेडी भामटेगिरी बहुधा यातच पहिल्यांदा केली गेली. ९०ज मध्ये एकच बदल घडला की अनेकदा कादर खान त्या भामटेगिरीचे टार्गेट व्हायचा इथे तो गोविंदाच्या बरोबरीने भामटा दाखवला आहे. तर या शैलीचे वैशिष्ट्य असे की इथे भामटेगिरीचा एक फिक्स अल्गोरिदम असतो आणि तो रिलिजिअसली फॉलो होतो. याचे सर्वोत्तम उदाहरण कुंवारामध्ये गोविंदा वारंवार आसिफ शेखला बुद्धू बनवतो तो अल्गोरिदम!

दीपक दलाल जूतेवाला आणि ओम नारायण फीतेवाला यांचा अल्गोरिदम

मुक्री (किंवा आणि कोणी) आपली मुलगी घेऊन गोविंदाला पाहायला येणार.
कादर खान ५ लाख हुंडा मागणार - अडीच लाख आत्ता, अडीच लाख लग्नानंतर
कादर खान किंवा गोविंदा यापैकी एक कोणीतरी दारुडा असण्याची अ‍ॅक्टिंग करणार आणि समोरच्या पार्टीकडून नकार घेणार.
घेतलेले अडीच लाख परत करणार पण नकली नोटांच्या स्वरुपात. अडीच लाख यांच्या खिशात

बाकीची गैर कानूनी कृत्ये दुसर्‍या कोणत्या तरी सेक्शनमध्ये

पायस Lol

ही कथा घडायला त्याकाळचे निष्ठूर पालक कारणीभूत आहेत. त्या काळचे निष्ठूर पालकः
- कादर खानच्या पालकांनी त्याचे नाव "दलाल" ठेवलेले असते. आडनाव जूतावाला असतेच
- आशालताच्या वडिलांनी ही एक्स्ट्रीम कंडिशन घातलेली असते की तिचे व कादर खानचे अपत्य हे मुलगा असेल तर त्यांच्या बुटांच्या पाच फॅक्टर्‍या ते त्या मुलाच्या नावावर करतील. मुलगी असेल तर त्या सगळ्या ते दान करून टाकतील.
- कादर खान स्वतः त्याला मुलगी झाली आहे हे कळल्यावर तिला पूर्ण डिसओन करतो
- शशी कपूर बायकोची डिलीव्हरी झाल्याचे कळल्यावर तो बेटा बाजूला असूनही पाच मिनीटे बायकोशीच बेटा तिला का त्याला झाला यावर वाद घालत बसतो.

इथे बाळांची अदलाबदल गैर कानूनी पद्धतीने कशी करावी याचा पाठ वरती पायसने दिलेलाच आहे. पण ती इतकी अफलातून आहे की त्याच्या तुलनेत धरमवीर मधली सेल्फ कॅन्सलिंग अदलाबदल जी होती त्याबद्दलची बातमी दुसर्‍या दिवशी "बाळांची अदलाबदल शांततेच्या वातावरणात पार पडली" अशीच आली असती.

पहिले म्हणजे दवाखान्यातील खोल्यांचे क्रमांक "६", "९" वगैरे असताना जर बाळांचे क्रमांक १०८ वगैरे असतील तर रूम-बाळ चार्ट कसा ठेवत असतील? की फक्त ती रोझी लक्षात ठेवते "रूम ९ म्हणजे बाळ १०८", कोणास ठाउक.

एकूणच सर्वांचा ब्रिलियंस पहिल्या १० मिनिटांत दिग्दर्शकाने एस्टॅब्लिश केलेला आहे. तो पाहू.

तर ब्रिलियंस! प्रसूतीगृहातील लोक, पोलिस इन्स्पेक्टर व चोर सगळेच इथे महा ब्रिलियंट आहेत.

एक सीनॅरिओ पाहा: समजा तुमच्या सासर्‍याने ती अपत्य कंडिशन घातलेली आहे. प्रसूतीगृहातील मुख्य डॉ तुमचा मित्र व इतर गैर कानूनी धंद्यातील भागीदार आहे. त्यातही तो डॉ नाहीच हे ही तुम्हाला माहीत आहे. अशा वेळेस फॅक्टर्‍या आपल्या ताब्यात याव्यात हे नक्की करण्याकरता खालील उपाय आहेतः
१. स्वतः डॉक्टरच नसलेली व्यक्ती जे प्रसूतीगृह चालवत आहे त्यात बायकोला अ‍ॅडमिट न करणे. व हा पेच इतर मार्गांनी सोडवणे
२. सासर्‍यांशी स्त्री-पुरूष समानता वगैरे वर बोलून काही होते का पाहणे
३. समजा जरी पहिली मुलगी झालीच, तरी जरा थांबा. पुढे पाहू म्हणून आणखी काही काळ मागून घेणे
४. डिलीव्हरी ही अचानक घडणारी इमर्जन्सी नव्हे. किमान ७-८ महिने प्लॅनिंग ला मिळतात. याचा वापर करून तयारी करावी - जर बाळ एक्स्चेंज करावे लागलेच, तर त्याकरता वेळीच फिल्डिंग लावून त्या त्या आयांना कळूच न देता तो बदल करणे. म्हणजे त्या दिवशी सर्वच डिलीव्हर्‍या ऑपरेशन ने वगैरे करून योग्य बाळ योग्य जागी जाईल याची व्यवस्था करणे
५. डिलीव्हरीच्या दिवशी सकाळी रमतगमत हॉस्पिटल मधे येउन मुलगी झाली आहे हे समजल्यावर तेथे उपलब्ध असलेल्या काही बाळांमधून नेमका पोलिस इन्स्पेटरचा मुलगा पळवणे. ते ही त्यांना मुलगा झालेला आहे हे समजल्यावर.

आता ब्रिलियंट चोर यातले नक्की काय करतील हे तुमच्या लक्षात आले असेलच. तर ब्रिलियण्ट पोलिस मग काय करतात ते पाहू

पायस ने चांगल्या ओपनर प्रमाणे सॉलिड प्लॅटफॉर्म तयार करून मधल्या फळीतल्या अव्वल फलंदाजाची (पक्षी: फारएण्ड), इनिंग बिल्ड करण्याची सोय करून ठेवली आहे. त्यात स्वतः ओपनर अजून नाबाद असल्यामुळे धावांचा डोंगर अपेक्षित आहे. बॅटींग विकेट (पक्षी: हा सिनेमा) आहेच. अजून श्रद्धा वगैरे तगडे फलंदाज पॅव्हेलियन मधे आहेतच. तेव्हा सर्व माबोकरांनी सीझन तिकीटाच्या खुर्च्या धरून ह्या रन-फेस्ट चा आनंद लुटावा.

यातील चोर लोक आपल्यापेक्षा ब्रिलियंट आहेत हे शशी कपूर उर्फ पोलिस इन्स्पेक्टरला कसे चालेल? मग तो ही जरा हुशारी दाखवतो. मुलगा बदलून मुलगी आणली आहे हे समजल्यावर जेथे बाळे ठेवलेली असतात तेथे स्वतः न जाता थेट चीफ डॉक्टर कडे जातो. तेथून नर्स ला शोधतात. तर ती मेलेली सापडते (रणजीत ने तिला कॉफी देताना सॅकरीन म्हणून प्रसूतीगृहातील चीफ डॉ कडे सहज उपलब्ध असणारे विष त्यात घातलेले असते).

हॉस्पिटल मधे बाळे बदलली आहेत. नर्सरीची नर्स मेलेल्या अवस्थेत सापडली आहे. अशा वेळेस एखादा पोलिस इन्स्पेक्टर काय करेल?
१. तो सीन व हॉस्पिटल सील करून आणखी पोलिसांना बोलावून घेवुन सगळी झडती, जबान्या वगैरे घेइल. थोडक्यात पोलिस प्रोसेस चालू करेल.
२. किंवा चीफ डॉ शी "आत्महत्या नाही, हा मर्डर असू शकतो. मी तुला यावेळेस सोडणार नाही" असे तडफदार वक्तव्य करून तेथून निघून जाईल.

येथे चोरांच्या हुशारीशी कॉम्पिटिशन असल्याने साहजिकच तो दुसरा उपाय वापरतो. तेवढ्यात त्याला नर्सने नर्सरीत आता आणखी कोणी बाळ नाही ही माहिती दिलेली असते. हॉस्पिटल व स्टाफ ची विश्वासार्हता तोपर्यंत पक्की झाल्याने तो त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून नर्सरीत स्वतः जाउन पाहात नाही की खरेच तेथे आपले ओरिजिनल बाळ आहे का, किंवा नर्स म्हणते तसे एकही बाळ नाही का.

पण आपल्याला प्रश्न पडतो की ५-१० मिनिटांपूर्वी जेथे किमान ७-८ बाळे होती. ती अचानक कोठे गेली?

नंतर हाच हीरो कोर्टात "उस नर्सने खुदकुशी कर ली. मेरा खयाल है उसका खून हुआ है" असे संदिग्ध सांगतो. म्हणजे खून की आत्महत्त्या हे वकील लोक न ठरवता समोरासमोर उभे असलेले फिर्यादी व आरोपी ठरवतात. प्रसूतीगृहात जनरल पोस्ट मॉर्टेम ही होत असते आणि संशयास्पद मृत्यू तेथेच झाला असला, तरीही तेथेच ते पोस्ट मॉर्टेम ही करू दिले जाते. एका पोलिस इन्स्पेक्टरने चीफ डॉ बद्दल आरोप केलेला असला तरी. त्यात तो पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट लिहीणारा इतका ब्रिलियंट असतो की विष पिउन मेलेली व्यक्ती ही आत्महत्येने की खुनाने मेलेली आहे हे ही त्यातून समजते.

इथेच मग हुशारी मधे आपण पोलिस व चोर दोघांनाही हार जायचे नाही असे न्यायाधीश पिंचू कपूर ठरवतो. कादर खानची मुलगी - जी शशी कपूर कडे आली आहे व शशी ती नाकारत आहे - तिचे काय करायचे? तर त्याकरता जी सिस्टीम असते वगैरे त्यांच्या नादी न लागता या सगळ्याचा इथेच सोक्षमोक्ष लावून टाकू म्हणून तो कोर्टातच निर्णय देतो इथेच कोणी इण्टरेस्टेड असेल तर ही मुलगी सांभाळा खटला सुरू असेपर्यंत. मग इथे हॉस्पिटल मधलीच नर्स अरूणा इराणी म्हणते की मी करते. मग पिंचू कपूरही काही व्हेरिफिकेशन वगैरे न करता तिच्याकडेच द्या म्हणून सांगतो.

त्यावेळेस या खटल्याशी कसलाही संबंध नसलेला कादर खान तेथेच बसलेला असतो. तो आरोपीचा मित्र आहे व योगायोगाने त्याच दिवशी त्याच्याकडे मुलगा जन्माला आलेला आहे. ही बाब संशयास्पद वाटून कोणीतरी काहीतरी रिसर्च करेल? नोप. ब्रिलियंट लोक अशा भानगडीत पडत नाहीत.

पहिले म्हणजे दवाखान्यातील खोल्यांचे क्रमांक "६", "९" वगैरे असताना जर बाळांचे क्रमांक १०८ वगैरे असतील तर रूम-बाळ चार्ट कसा ठेवत असतील? की फक्त ती रोझी लक्षात ठेवते "रूम ९ म्हणजे बाळ १०८", कोणास ठाउक.<<<<<<
मुळात धरम वीरसारख्या सिनेमांनी बाळ अदलाबदल प्रकरणाची जनतेला इतकी दहशत बसवली की बाळं सहजासहजी बदलली जाऊ नयेत, म्हणूनच अतिशय किचकट बाळ-रूम चार्ट्स अस्तित्वात आले असावेत. त्यामुळे अदलाबदल करायची झाली तर ती थ्रू प्रॉपर चॅनल (पक्षी : नर्स) व्हावी लागेल. व्हेरी लॉजिकल!

वर पालुपद "अगर तुम वहां नही गयी तो वो दुसरी शादी कर लेगा".<<<<
म्हणजे जूतावालाचे त्याच दिवशी पहिल्यांदा भेटलेल्या नर्सच्या न पाहिलेल्या बॉयफ्रेंडच्या भावी वर्तणुकीचे ऍनालिसिस किती पक्के असते पहा. खरंतर एवढा व्यवहारचतुर जावई पाहून सासऱ्याने कसल्याही अटी न घालता फॅक्टऱ्या नावावर करून द्यायला हवा होत्या. ते त्याने केले नाही. आडनाव 'जूतावाला' असल्याने बिचाऱ्याच्या इतर काही कामधंदा करायच्या वाटासुद्धा बंद! मग गैर कानूनी कृत्ये करायची नाहीत तर जगावे कसे माणसाने?

फारएण्ड, श्रद्धा Lol

रणजीत ने तिला कॉफी देताना सॅकरीन म्हणून प्रसूतीगृहातील चीफ डॉ कडे सहज उपलब्ध असणारे विष त्यात घातलेले असते >> इथेही द्वित्ववादाचा परिचय आहे. ते विष पंचसुधारक वटी किंवा खोगोच्या गोळ्यांची बाटली मिळते तसल्या बाटलीत ठेवलेल्या साबुदाण्या एवढ्या गोळ्या असतात. ८० च्या शैलीत त्यावर पॉयजन आणि कवटी व दोन हाडे असे लेबल लावणे बंधनकारक आहे. तसेच अशा गोळ्यांचा वापर फक्त झोपेच्या गोळ्या म्हणून करण्यास परवानगी आहे. ९० च्या शैलीत ही रिस्ट्रिक्शन्स काढून टाकली आहेत.

पोस्ट मॉर्टेम >> त्या काळात साळुंकेसारखे हुशार डॉक्टर नसल्याने अनेक व्हिलनचे फावले आहे हेच खरे! Proud

मग गैर कानूनी कृत्ये करायची नाहीत तर जगावे कसे माणसाने? >> श्रने थेट सिनेमाच्या मूळ प्रश्नालाच हात घातला Lol

पहिले म्हणजे दवाखान्यातील खोल्यांचे क्रमांक "६", "९" वगैरे असताना जर बाळांचे क्रमांक १०८ वगैरे असतील तर रूम-बाळ चार्ट कसा ठेवत असतील? की फक्त ती रोझी लक्षात ठेवते "रूम ९ म्हणजे बाळ १०८", कोणास ठाउक. >>
रोझीची सिस्टिम अशी काहीतरी असावी.
कादर खान-आशालता जोडी - खोली क्रमांक ६ - बाळ क्रमांक १०५ - १ + ० + ५ = ६
शशी कपूर-रोहिणी हट्टंगडी जोडी - खोली क्रमांक ९ - बाळ क्रमांक १०८ - १ + ० + ८ = ९

श्रने थेट सिनेमाच्या मूळ प्रश्नालाच हात घातला <<<<
मुंबईत 'सोडाबॉटलओपनरवाला' आहे. म्हणजे त्याला बिझनेसचे किमान तीन ऑप्शन्स झाले की नाही? जूतावाला म्हणजे फार स्पेसिफिक होते. He did not have a choice.

रोझीची सिस्टिम अशी काहीतरी असावी.
कादर खान-आशालता जोडी - खोली क्रमांक ६ - बाळ क्रमांक १०५ - १ + ० + ५ = ६
शशी कपूर-रोहिणी हट्टंगडी जोडी - खोली क्रमांक ९ - बाळ क्रमांक १०८ - १ + ० + ८ = ९
<<<<< महान! हे पु लं नी पूर्वरंग मध्ये लिहिलेल्या 'महेशा यक्षा विवरा जन्मा = 1951' पेक्षाही कॉम्प्लेक्स आहे. नर्सला लाच न देता बाळं अदलाबदल या कॉम्प्लेक्स पद्धतीमुळे केवळ अशक्यप्राय आहे.

हो टोटली Lol

त्या हॉस्पिटल मधल्या नर्स लोकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप मधे "आपल्या हॉस्पिटलची सिस्टीम आपल्या जुन्या लोकांनी कित्ती चांगली करून ठेवली आहे" हे सांगायला हे उदाहरण वापरत असतील

बाय द वे निर्मात्याने पैसे वाचवायला एकाच खोलीत दोन्ही रूम्स चे शूटिंग करून वरचा नंबर एकदा ९ व नंतर उलटा करून ६ केलेला असावा.

आणखी एक लक्षात आले. धरमवीर मधे सगळी अदलाबदल ही जीवन ने आपल्या मुलाला राजपद मिळावे या पालकसुलभ इच्छेने केलेली असते. तर इथे कादर खान ला स्वतःच्याच मुलीबद्दल काहीच प्रेम नसते. त्यामुळे गैर कानूनी लेव्हलमधे हे जास्त भारी आहे.

रोझीची सिस्टिम अशी काहीतरी असावी.
कादर खान-आशालता जोडी - खोली क्रमांक ६ - बाळ क्रमांक १०५ - १ + ० + ५ = ६
शशी कपूर-रोहिणी हट्टंगडी जोडी - खोली क्रमांक ९ - बाळ क्रमांक १०८ - १ + ० + ८ = ९
>>>> पायस _/\_ Rofl

मस्त चाललाय गैर कानूनी Proud एकूणच त्या काळात मुलांची अदलाबदल ही नॉर्मल गोष्ट असणार. म्हणजे एखाद्याला स्वतःचंच मूल वाढवायला मिळालं तर त्याला कॉम्प्लेक्स वगैरे येत असावा बहुधा Wink वर या अदलाबदलीत सल्तनत सारखी व्हरायटी पण असायची हे ही नजरेआड करून चालणार नाही Proud

कादर खान-आशालता जोडी - खोली क्रमांक ६ - बाळ क्रमांक १०५ - १ + ० + ५ = ६
शशी कपूर-रोहिणी हट्टंगडी जोडी - खोली क्रमांक ९ - बाळ क्रमांक १०८ - १ + ० + ८ = ९ >> Lol

मला "ये से इक्का, ये से अकबर खान..." ह्या डायलॉग वरून हा चित्रपट लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर दूरदर्शन वाहिनीवर पाहिल्याचे आठवलं... (ऐकून die होऊ शकतो अशा संवादांना डायलॉग म्हणत असावेत अशा सिनेमांत...)
येऊ द्यात अजून चिरफाड...

पायस, फारएण्ड, श्रद्धा धन्य आहात तुम्ही लोक!

या अफाट प्रकारानंतर पुढचा सिनेमा म्हणून 'जलजला' रेकमेंड करत आहे.
https://www.youtube.com/watch?v=J_a1kPZsARw

शंकराने तिसरा डोळा उघडल्यावर चराचराचा नाश होतो हे लहानपणापासून ऐकलं आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये तो तिसरा डोळा इतके वेळा उघडला गेला आहे की सर्व सूर्यमालिकेचा नाश कसा झाला नाही अजून हेच आश्चर्य आहे.

बाय द वे,
एकेकाळी मत्स्यगंधा सारख्या नाटकातून 'गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी' आणि 'अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा' अशी अप्रतिम गाणी गाणार्‍या आशालताने हिंदी सिनेमात असले भुक्कड रोल का केले?

एकेकाळी मत्स्यगंधा सारख्या नाटकातून 'गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी' आणि 'अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा' अशी अप्रतिम गाणी गाणार्‍या आशालताने हिंदी सिनेमात असले भुक्कड रोल का केले?>>>>

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, मोहन जोशी, सुहास जोशी ( लव्ह नावाच्या सलमाननीय भंपकपटात ह्या अतिशय उत्तम अभिनेत्रीने अती दयनीय भूमिका केली आहे.)... यादी बरीच मोठी आहे. त्यातल्या त्यात रीमा लागूंनाच जरा बरे रोल्स मिळाले.

मला वाटते की फालतू हिंदी सिनेमातला फालतू रोल करण्याकरता जो पैसा मिळतो तो अभिजात नाटकांच्या प्रयोगाच्या कित्येक पट जास्त असतो. कारण नाटकाच्या कित्येक पट जास्त लोक हिंदी सिनेमा (कितीही फालतू असला तरी) बघतात. त्यामुळे हे सगळे प्रतिभावंत असल्या हिणकस भूमिकेत दिसतात. अर्थस्य पुरुषो दासा: (आणि स्त्रियाही!)

काय काय पिच्चर बघतात ना अभ्यासू लोक >> मी पण त्यावेळी असे पिक्चर आनंदाने, चवीचवीने बघायचे Biggrin

वतन के रखवाले, जमाईराजा, जलजला, नाचे नागिन गली गली यादी अजून बरीच मोठी आहे.

५) कॅरेक्टरचे आपले गाणे असावे
सर्वसाधारणपणे अशा कथांमध्ये कॅरेक्टर डेव्हलपमेंट, भूमिका की गहराई वगैरे गोष्टी करायला फार वाव नसतो कारण इथे मसाला सीन्सना प्राधान्य असते. अशावेळी या मसाला सीन्समधूनच हे सर्व प्रकार करावे लागतात. याच्यासाठी दिग्दर्शकाकडे काही ठराविक टॅक्टिक्स आहेत, त्यातील एक म्हणजे कॅरेक्टरचे नाव गुंफलेले गाणे. यासाठी अभिनेता/अभिनेत्रीला नृत्य करता यावे अशी अजिबात अट नाही, अंग हलवता आले तरी पुरे! इथे ही स्ट्रॅटेजी श्रीदेवीसाठी वापरली आहे.
गाण्याच्या सुरुवातीला लक्ष्मीदेवीचा वेष धारण करून लक्ष्मी (श्रीदेवी) कोण्या एका मंदिराच्या गाभार्‍यात बसली आहे. मागून "जय लक्ष्मी जय लक्ष्मी, जय जय बोलो जय लक्ष्मी" चा जयघोष चालला आहे. इतका वेळ कोणालाही समोर दिसणारी मूर्ती नसून जिवंत व्यक्ती आहे अशी किंचितही शंका आलेली नाही. अगदी टेट गॅलरीसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी लिव्हिंग स्टॅच्यू म्हणून बसणार्‍या लोकांनाही जे जमणे कठीण ते लाईव्ह मॉबसमोर करून दाखवून लक्ष्मीच्या अंगातले कलागुण(?) दाखवले आहेत. इथे अगदी इन्स्पेक्टर विजू खोटेही जवळपास फसतो. मग थोड्या वेळाने पूजा झाली म्हणून पुजारी गाभार्‍यावर पडदा सारतो - मंदिराची परिस्थिती फारशी चांगली नसावी, पुजारी बहुधा दर रात्री गात असावा "देवी तुझ्या गाभार्‍याला दरूजाच न्हाई"
लक्ष्मी याचा फायदा घेऊन देवीला म्हणून वाहिलेले सर्व पैसे गोळा करून पसार होते. इथे मोठ्या चतुराईने फक्त विजू खोटेनी वाहिलेली नोट मागे राहते आणि फक्त त्यालाच काहीतरी गडबड आहे अशी शंका आलेली असते. थोडक्यात गैर कानूनीच्या वर्ल्ड सेटिंगमध्ये जो बेसावध राहिला त्याचा खेळ संपला हेच अधोरेखित केले आहे. हे झाल्यावर एकदाचे अ‍ॅक्चुअल गाणे सुरु होते.
श्रीदेवी एका जत्रेत नाचताना दिसते. आधी चोरलेले पैसे गोरगरिबांत वाटताना दाखवून ही गैरकानूनी कामे करत असली तरी बापाचे लोभीपणाचे दुर्गुण हिच्यात उतरले नाहीत हे कळून चुकते. तसेच तिला क्षणार्धात वेषांतर करण्याची कला अवगत असल्याचेही आपल्याला कळते. उदा. ती कोणाचे तरी पाकिट मारते पण मागून विजू खोटे येऊन ते पाकिट जप्त करतो. मोठ्या उत्साहात तो किती पैसे मिळाले आहेत हे मोजत असताना जेमतेम दोन सेकंदात श्रीदेवी अंगात पोलिसाचा गणवेश, डोळ्यांवर गॉगल आणि तोंडात पान कोंबून ते पैसे परत घ्यायला येते. हे वेषांतर इतके बेमालूम असते की तिने गॉगल काढून विजू खोटेकडे डोळे वटारून बघितल्यावरही ती त्याला ओळखू येत नाही.
(अ) चौथी भिंत
या गाण्यात एक मायनर फोर्थ वॉल ब्रेक (चौथी भिंत फोडणे) आहे. मध्येच सर्वजण गाण्यात दांडिया सुरु करतात आणि एक शेटजी येऊन मध्ये ठेवलेल्या चांदीच्या मूर्तीला शंभरच्या नोटांच्या थप्प्या अर्पण करतो. हे बघताच श्रीदेवीच्या गळ्यातून आशा भोसले गाऊ लागतात - "देवी तू देवी तू, हरीभरी श्रीदेवी तू". सहसा या गाण्यांत फोर्थ वॉल ब्रेक्स बघायला मिळत नाहीत. हिंदी सिनेमात नोटिसेबल फोर्थ वॉल ब्रेक्स ९०ज मध्ये बघायला मिळतात (कोणत्या सिनेमात हे सूज्ञांस सांगणे न लगे). याने फार काही साध्य होत नसल्याने फोर्थ वॉल ब्रेक्सविषयी का सावध राहिले पाहिजे हे कळते.
यानंतर दांडियात फुगडी घालून श्रीदेवी तेही पैसे चोरते, विजू खोटेच्या डोळ्यांदेखत, हे वेगळे सांगणे न लगे! (गाणे संपले)

विशेष टिप्पणी : एका गाण्यात एकच शब्द रिपीट होण्याचा record काय आहे कोणास ठाऊक, पण हे गाणं त्या रेकॉर्डच्या बरंच जवळ असणार. "लक्ष्मी" शब्द गाण्यात तब्बल 92 वेळा येतो.

Pages