Shift Delete

Submitted by सेन्साय on 8 November, 2017 - 14:08

.

.

आनंद, प्रेम, अपयश, नैराश्य, वेदना, दु:ख अश्या विविध मानवी भावनांचे तरंग आपल्या मनात क्षणाक्षणाला उमटत असतात, आणि आपल्यासमोरील परिस्थितीच्या तिव्रतेनुसार त्याचं दृश्य स्वरूप म्हणजेच आपल्याला आयुष्यातील विविध प्रसंगात घ्यायला लागणारे निर्णय. अश्यावेळी वैफल्यातुन नेमके चुकीचे निर्णय घडण्याची शक्यता फार असते. निर्णय घेताना आपल्याला एखादी गोष्ट नकोय तर ती कायमसाठी नको (Shift Del) की आताच्या परिस्थितीनुसार तात्पुरते नको (recycle bin) हे ठरवणे खरंच कठीण असते. प्रत्येक वेळी टोकाचा निर्णय हां कुठल्याही वादाचा शेवट असु नये म्हणून समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला यशस्वीपणे कसे तोंड द्यायचं हे शिकण्याचे काम म्हणजेच यशस्वी संसार.

मी आरसा बनून माझ्याकडे पहाणे, आपल्याच अंतरंगात डोकवणे यातूनच माझ्या आयुष्यातील नाजुक प्रसंगात आततायी निर्णय घेण्याच्या विचारांत परिवर्तन घडून येऊ शकतं. आपल्या दु:खावर हळुवार फुंकर मारली जाते, अडचणींवर मार्ग मिळू शकतो आणि स्वत:चा विकास साधता येतो. हृदयाला हात घालणाऱ्या घटना वाचताना किंवा इतरत्र प्रत्यक्ष पाहताना आपण स्वत:ला त्यात कुठेतरी शोधत राहतो. आणि मग त्या परिस्थितीचे यथायोग्य पृथक्करण आपोआप आपल्या मनात घडत राहते व त्यातूनच मनाची काही ठाम विचारधारा बनते, आपला असा एक विशिष्ट मत प्रवाह आकार घेवू लागतो जो वयाच्या आणि अनुभवाच्या परिपक्वतेनुसार आपली व्याप्ती सतत वाढवत राहतो. कधीकधी तर हां प्रवाह एवढा प्रखर बनतो की १+१ म्हणजे २ हेच उत्तर येवू शकते हे आंधळेपणाने ग्राह्य धरून त्या घटनेचे सारासार विश्लेषणसुद्धा करण्याची गरज नसण्यावर ठाम अडुन बसतो. मग उरतो तो एक यंत्रवत निर्णय घेणारा बुद्धि नावाचा अवयव ज्याला फक्त लॉजिकली समजत असते आणि भाव भावनांची तेथे फारशी दखल घेतली जातच नाही.

जीवन जगताना आपल्या संपर्कात अनेक व्यक्ती येतात त्यातून कोणाला निवडायचं आणि कशामुळे पुढे होऊ शकणारे त्रास टाळायचे हेही मलाच ठरवावं लागते. कारण हे माझं आयुष्य आहे त्याचा गाडा मीच हाकणार आहे. भावनिक गुंतागुंत वाढत जावून जेव्हा मन फार अस्थिर होऊ पाहेल तेव्हा स्वत:ला जिद्दीचे पंख लावून मोठी भरारी घ्यायची की आपल्याच दु:खात बुडून जायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असते.
माझ्या संमतीशिवाय मला कोणीही उद्ध्वस्त करू शकत नाही इतकं रोखठोक मार्मिक सूत्र आयुष्यात एकदा का नीटपणे जोपासले की त्या शिफ्ट डिलीटला नक्कीच पर्याय सापड़तो आणि नात्यांची वीण, नात्यानात्यातलं प्रेम, जिव्हाळा अधीक प्रकर्षांने अनुभवता येवू शकतात. श्वास आणि विश्वास दोन्ही अदृश्य गोष्टी आहेत तरी त्यात एवढी ताकद असते की अशक्य गोष्टीसुद्धा सहज शक्य होवून जातात.... गरज असते ती फक्त आपल्या प्रयासांची !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह आता आला लेख.. मगाशी फक्त तो फोटोच होता Happy
बाकी छान लेख
आजकाल बाकी फार फिलॉसॉफिकल लिहित आहात. Happy

त्या मिस्टर रिसाईकील बिनच्या नादात लागेल पुन्हा कधीतरी आयुष्यात या विचारामुळे आयुष्यात फार भंगारही जमा करू नये.. काढायचे ते वेळीच काढताही यायला हवे.

धन्यवाद ऋ
मघाशी नेटवर्क इश्यु Happy म्हणून पोस्ट होण्यास विलंब झाला