आमावस्येचा चंद्र

Submitted by जव्हेरगंज on 5 November, 2017 - 13:11

एका भिताडावरून उडी हाणताना नेमकं एक भगुणं मधी आलं आणि भुऱ्या सामानासकट खाली कोसळला. चिंचेखालच्या कुत्र्याने कान टवकारले. गडद अंधारात उन्मळून पडलेला भुऱ्या त्याला दिसला आणि ते दबकून गेलं. सवंदडीतली म्हैस बिथरली. हुकल्यासारखा क्षणोक्षणी लागून विझणारा एक जुनाट बल्ब बोचऱ्या थंडीशी लढत होता. मंद हवेची एक झुळूक बाजरीच्या ताटातून सळसळत निघून गेली.
भुऱ्यानं सावध कानोसा घेतला. चप्पल अर्धवट तुटलं होतं. नडगी फुटली होती. हात सालवटून निघाले होते. डोक्याला मुक्का मार बसला होता.
सावकाश उठून त्याने पोत्यातून बाहेर पडवेली कळशी पुन्हा आत घातली. अंधारात चौफेर नजर फिरवून त्यानं ते पोतं पुन्हा खांद्यावर घेतलं. जाता जाता भिताडाच्या कडेचं भगुणंही त्यानं उचललं आणि एवढा वेळ शांत बसलेलं चिंचेच्या झाडाखालचं कुत्रं एकाकी भुकलं. भुऱ्या जागीच थिजला. समोरच्या माळवादी घरात दिवा लागलेला त्याने बघितला. दरवाजा उघडला गेला. आणि "ये चोर ये..." अशी जोरदार हाळी आख्खा वाडीत घुमली.

हातातलं भगुण भिरकावून देत भुऱ्यानं धूम ठोकली. जागोजागचे दगड बोचत होते पायात. निसरड्या गवतात, खाचखळग्यात, डबक्यात तो पळतंच राहिला. जोरजोरात धावून येणारे कुत्र्यांचे आवाज त्याचा पाठलाग करत होते. वाडीत गदारोळ माजला होता. पेटलेल्या मशाली पायवाटेने पुढे सरकायल्या लागल्या.

बधीर. हा अंधारही बधीर आहे. ही थंडीही बधीर आहे. न संपणाऱ्या युगाच्या या जाणिवा. उरात धडकी भरवणाऱ्या. हा मृत्यूचा घनघोर अपमान आहे.

बोरीच्या झाडाखाली तो जरावेळ थांबला. धाप. धाप लागली होती. घाम फुटला होता. घसा कोरडा पडला होता. कंबर तुटायला आली होती. मान कधीचीच अवघडून गेलेली. पोतं उतरवून त्यानं खाली ठेवलं. एकतरी पितळंची घागर घावली पायजे. बधीर झालेला पाय त्यानं दाबून धरला.

रातकिड्यांच्या किर्रर अंधारात स्मशान शांतता पसरली होती. मागून येणारे आवाज आता बंद झाले होते. मशालींचाही कुठे मागमूस नव्हता. आपण किती लांबवर निघून आलो आहोत याचा अंदाज त्याला काही लागेना. सुटकेचा निश्वास टाकून तो जरावेळ पसरला.

सहजच त्याचे उतारावर लक्ष गेले. एक दिवा जळत होता. अगदी हाकेच्या अंतरावर. मग मात्र तो सावध झाला. एक दगड त्याने दिव्याच्या दिशेने भिरकावला. एकही कुत्रं भुंकलं नाही. मग अजून दोनचार भिरकावले. यावेळीही काही नाही. मग मात्र पोतडी उचलून झपाझप तो चालू लागला.

पहाटेचा गारठा आता चांगलाच वाढला होता. मगाशी बधीर झालेला पाय पुन्हा जागृत झाला. फुटलेली नडगी सणकत होती. पुढच्या अंगठ्यातून रक्त येत असल्याचे त्याला जाणवले. कारण तो ही खूप सलत होता. आख्खा होल दुनियेत आता आपण आणि आपल्या पुढचं हे खोपटं. आपला धारदार चाकू त्याने बाहेर काढला.
पोतडी खाली ठेवली तेव्हा जवळंच त्याला एक मंदीरही दिसले. मग मंदिरात जाऊन त्याने तेथे कोणी आहे का पाहिले. तिथे कोणीही नव्हते. मग पुन्हा तो खोपट्यापाशी आला. आणि दरवाजा ठोठावला.
खापsss खापsss असा आवाज आतून आला आणि बऱ्याच वेळाने दरवाजा उघडला गेला. तरणाबांड वाटावा असा एक म्हातारा आतून डोकावला. त्याच्या अंगात एक चड्डी सोडले तर बाकी काहिही नव्हते.
"नमस्कार. या. कोण आपण?" म्हातारा गोंधळात पडला.
"चोर. अजून कोण!" भुऱ्या त्याला चाकू दाखवत अगदी बेंबीच्या देठापासून फिस्कारत हसला.
"तुझी बायकापोरं कुठायतं? उठव त्यांना" घरात शिरत त्याने म्हाताऱ्याच्या छातीवर एक जोरदार बुक्की हाणली. तसा म्हातारा जमीनीवर कोसळला.
"ते..ते नाहीत. मी एकटाच राहतो.." म्हातारा धपापून म्हणाला.
"साल्या लाज नाही वाटंत? येकटाच राहतो? या जंगलात?" भुऱ्यानं खोलीभर नजर फिरवत विचारलं. बाईचा हात न लागल्यानं ती खोली अगदी बोडकी वाटत होती. एक भयंकर वास चोहीकडे दरवळत होता. बाहेरून खोपटं वाटत असलं तरी आतून तीन चार खोल्यांच ते एक प्रशस्त घर होतं. आणि त्यात एक किचनकट्टाही होता. "च्यायला" भुऱ्या विस्मयाने म्हणाला.
"काय घेणार? चहा की सरबत?" उघडाबंब म्हातारा स्वतःला सावरत म्हणाला.

"तू काय येडाबिडा हाय कारे? एवढ्या थंडीत तू मला सरबत पाजणार! पैशे कुठे ठिवलेत?" भुऱ्यान बोटानं पैसे मोजल्याची नक्कल करत बेरकीपणानं म्हणाला
म्हाताऱ्यानं उठून कपाट उघडलं. आतल्या कप्प्यात ठेवलेले आठशे रूपये त्याच्या हवाली केले. भुऱ्यानं ते शांतपण मोेजून खिशात ठेवले. आणि म्हाताऱ्याच्या कानाखाली एक जोरदार मुस्काडात ठेऊन दिली. म्हातारा पुन्हा कोसळला.
"साल्या बायकापोरं नाहीत म्हणतो. मग त्या साड्या कोणाच्या रे?" भुऱ्यानं त्याला उठवून खुर्चीवर बसवले. "जरीच्या काठाच्या साड्या. येवढ्या भारी साडी घालती का तुझी बायको?" बाजूलाच पडलेल्या धोतराने भुऱ्याने त्याचे हातपाय खुर्चीला घट्ट बांधले. म्हातारा शुद्धीत नसल्यासारखा काहिबाही बरळायचा प्रयत्न करत होता. हातापायाला कापरे सुटले होते. "बाळकृष्णा वाचव रे...." म्हातारा बहुदा शुद्ध हरपत चालला.

भुऱ्यानं दुसरं एक पोतं घरात आणलं. आणि कपाटातल्या सगळ्या साड्या त्यात भरल्या. अगदी खण, पिसे, ओटीचं सामान, बरंच काही. मग आतल्या खोलीतला दिवा लावून तो खोलीत शिरला.

मेंदू बधीर झालेला. बधीर झालेला म्हातारा. बधीर हा मृत्यू केव्हाचा. कवाडे उघडा आता. मी जगण्याचे रणशिंग फुंकतो आहे.

जागोजागी लालेलाल धब्बे पडले आहेत. रक्ताचे? की अजून काही. छे छे. कसं शक्य आहे. भुऱ्या चालत शेवटच्या टोकापर्यंत गेला. हे कसले लगदे. मांसांचे? छे छे. कसं शक्य आहे. मोरीत पडलेले ते मुंडके. कोणाचे बरे. माणसाचे? छे छे. ते तर बाईचे. बापरे!
विनाकारण त्याला खापsss खापsss असा ऐकलेला आवाज आठवला.

"साल्या म्हाताऱ्या.... काय हे???" भुऱ्या किती खच्चून ओरडला याची त्याला जाणीव नाही. तो बाहेरच्या खोलीत कधी आला याचीही त्याला जाणीव नाही. समोरच्या खुर्चीवर म्हातारा नव्हताच. काळजाचा थरकाप उडाला. त्याने बघितले, दरवाजा उघडाच होता.

कवाड उघडले होते. छातीत धडक्या भरत होत्या. संवेदना बधीर होऊन गेलेल्या. आपण कधीपासून पळतोच याची जाणीव भुऱ्या हरवून बसला.

"नीट सांग. नीट सांग काय झालं ते." हायवे पेट्रोलिंगचा अधिकारी म्हणाला. त्यानं थोडं पाणीही दिलं.
"आपण असू भुरटा चोर. पण मर्डर कधी नाय केला" बाटलीतलं पाणी पिऊन भुऱ्या म्हणाला.
"तो म्हातारा, माणसांस्नी मारत सुटलाय नुसता.." एवढ्या दुपारचं थंड पाणी पिऊन त्याला हुशारी आली.
"कधी झालं हे?"
"काल रातच्याला. अहो पहाटंच.."
"कुठे?"

अखेर पेट्रोलिंग कारमध्ये बसून भुऱ्या जंगलाच्या दिशेने निघाला. "बंदूका तयार ठेवा सायेब. लय डेंजर म्हातारा हाय."
कारमधले इतर अधिकारी टेन्शनमध्ये आले.. "एखादं अवार्ड भेटलं पायजे बरं आपल्याला.." भुऱ्या चुळबूळत म्हणाला. शिवाय आजपर्यंत तो ज्यांना घाबरत आला, त्यांच्याबरोबर तो ताठमानेने चालला होता.

"हेच का ते मंदिर?" गाडीतून उतरत अधिकारी म्हणाला.
"आयला हेच. कुठून आणली गाडी. येवढ्या जवळ आसंल वाटलं नव्हतं!" भुऱ्या डोकं खाजवत म्हणाला. "आणि हेच ते झोपडं." बोटाने त्याने इशारा केला. पठारावर वसलेलं ते एकमेव झोपडं होतं. खाली सगळं जंगल. रात्री काही दिसलंच नाही. दुपारी हिरवंगार वाटत होतं.
"बी अलर्ट" अधिकाऱ्याने सर्वांना सावध केले. मग पुढे होऊन दरवाजा ठोठावला.

"नमस्कार" दरवाजा उघडत म्हातारा म्हणाला. त्याने शुभ्र धोतर नेसले होते. पण वरती उघडाबंबच होता. कपाळावर टिळा लावल्याने तो प्रसन्न वाटत होता.
"आजोबा, बाहेर या. जरा काम आहे"
"अरे तुम्ही पोलिस इथे कसे काय? दर्शनाला आलात की काय.."
"नाही नाही. चौकशीला आलो आहोत"
दोघेचौघे पोलिस आत शिरले. घराची झडती घ्यायला त्यांनी प्रारंभ केला. म्हातारा विस्मयीत झाला.

"ओळखता का आपण याला?" बाहेर उभारलेल्या अधिकाऱ्याने त्याला विचारले.
"अरे तुच की काय तो चोर? अरे तुझी दोन गाठोडी तू इथेच ठेऊन गेलास.." म्हातारा उत्साहात म्हणाला. "पण तू मला मारहाण केली ती खूप त्रासदायक होती रे." सुजलेल्या गालावरून हात फिरवत तो बोलला.
"तुमच्या मोरीत म्हणे याला एक मानवी मुंडकं सापडलं.." अधिकाऱ्याने कुतूहलाने विचारले.
"अच्छा ते होय... " म्हातारा प्रसन्न हसत म्हणाला. "त्याच्याही असा फायदा झाला तर... अहो मी मुर्तीकार आहे. वेगवेगळ्या मुर्त्या बनवून मी बाजारात विकतो. त्याच्याच रंगाला बघून हा घाबरला असावा. मोरीत एका देवीचा मुखवटा होता. यालाच हा फसला... हा हा हा..." आपल्याला आनंद भेटेल ते ते त्याने करावे. हे जगाचे तत्वच आहे.

"च्यायला. आसंय का ते?" डोक्यावर हात ठेवत भुऱ्या म्हणाला.
" आत काही संशयास्पद सापडलं नाही. क्लियर आहे" चौघे पोलिस बऱ्याच वेळाने बाहेर येत म्हणाले.

"चलरे भुरट्या... आता दाखवतोच तुला" एक पोलिस भुऱ्याची कॉलर पकडत म्हणाला. तसं भुऱ्याला साक्षात तुरूंग पुढे दिसला.
"नाही नाही. माझी याच्याबद्दल काहीच तक्रार नाही. चुकतात वाट काहीजण. सोडून द्या त्याला." म्हातारा दयाळूपणे म्हणाला.

"सायेब तुमी जावा. मी तडीपार होतो इथूनच. रिक्वेस्ट हाय." भुऱ्या हात जोडत म्हणाला तशी पेट्रोलिंग कार निघून गेली.

देवळावर झेंडा फडकत होता. गाभाऱ्यात समई जळत होती. उदबत्यांचा सुगंध दरवळत होता. देवळापासून अगदी अडीचशे पावलांच ते खोपटं. मोठं विचित्र दिसत होतं. कित्येक वर्षांचं गबाळ सांभाळत होतं. कोणास माहीत.

"पुजारीबुवा, तुमी लय चांगलं निघाला. आपल्याकडून सॉरी बरंका.." भुऱ्या आपलं पोतं कुठं दिसतंय का बघत म्हणाला. "हे आसं संन्याशी राहायला मजा येत आसंल नाय?"

"काय घेणार. चहा की सरबत" म्हाताऱ्याने दरवाजा उघडत विचारले.

"च्यायला आता सरबतंच द्या. लय दुपार झालीय.." खोपट्यात शिरत भुऱ्या म्हणाला. "एकडाव मोरी बघून येऊ का तुमची?" भुऱ्या घाबरतंच म्हणाला.
"अरे अवश्य अवश्य. चल मीच दाखवतो तुला." म्हातारा त्याला आत घेऊन गेला.

जरावेळाने खापsss खापsss असा आवाज त्या खोपट्यात घुमला. तो ऐकायला मात्र तेथे कोणीही नव्हते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरनाक !
प्रेडिक्टेबल होती शेवटी शेवटी, तरी मजा आली वाचायला..
पुलेशु...

खुप छान Happy

>>>> हा अंधारही बधीर आहे. ही थंडीही बधीर आहे. न संपणाऱ्या युगाच्या या जाणिवा. उरात धडकी भरवणाऱ्या. हा मृत्यूचा घनघोर अपमान आहे.<<<<

ह्या वाक्यांवरून एक कविता सुचली.
https://www.maayboli.com/node/64402

मस्तेय,

शेवटाचा थोडा अंदाज आला होता, तरी मज्जा आली

>>>>>>जरावेळाने खापsss खापsss असा आवाज त्या खोपट्यात घुमला. तो ऐकायला मात्र तेथे कोणीही नव्हते.<<<<<<
मस्त.

सॉलिड आहे!!
मि कास्टिंग पण चालू केलं मनात

सही आहे.
डरना मना है, डरना जरुरीहै ची आठवण आली.

तुमची ही कथा फेसबुक वर ' भुतांची पवित्र स्मशानभुमी ' हया ग्रुपवर (मिलींद दांडेकर ) नावाने पोस्ट केली आहे.