कायप्पापुरीतील ओव्या

Submitted by शंतनू on 1 November, 2017 - 23:28

(कायप्पा (WhatsApp) वरून आलेल्या एका चित्रावरून रचलेल्या ओव्या. त्यात गर्दी मध्ये एक जण पुस्तक वाचत आहे आणि असा दुर्मिळ प्राणी बघून इतर सर्व त्याच्यासोबत सेल्फी काढत आहेत असा देखावा होता. मूळ चित्रकार माहित नसल्याने प्रताधिकार कारणास्तव ते चित्र इथे डकवले नाही.)

इये थोपु आजि। कायप्पा नगरी।
महारम्यपुरी। व्हर्चुअल।।

व्हर्चुअलामाजी। रमती हो प्राणी।
व्हर्चुअल वाणी। वदती ते।।

धुंडोनी कॉन्टॅक्ट। वदती एकाशी।
किंवा समूहाशी। अहर्निश।।

अहर्निश तैसे। कला नि साहित्य।
करी फक्त नित्य। फॉरवर्ड।।

फॉरवर्ड लोक। फॉरवर्ड ब्लॉक।
फॉरवर्ड क्लॉक। होत असे।।

ऐशा प्राणियांच्या। वदू काय कळा।
वाचक विरळा। परि तेथ।।

वाचक दिसता। प्राणी होती गोळा।
आश्चर्यसोहळा। आत्यंतिक।।

शंत्या म्हणे द्यावे। हेचि दान देवा।
वाचनाचा व्हावा। ना विसर।।

- शंतनू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा Proud
अर्थात, संदेशही सुंदरच Happy

व्वा!
हे पण आता कायप्पावर फिरेल... Lol
संदेश छान Happy

Happy आवडले

लै भारी.... Happy

राहुल.... >>> +१११ Happy Wink