x

Submitted by जव्हेरगंज on 30 October, 2017 - 13:48

सुंदर सुंदर सकाळ झाली. सुंदर सुंदर सुर्य उगवला. काळ्या लाल पिसांचा सुंदर कोबडा भल्या सकाळी सुंदर आरवला.

नदी सुंदर दिसत होती. झाडे सुंदर दिसत होती. आभाळही सुंदर दिसत होते. अधूनमधून ढग दिसत होते. तेही तितकेच सुंदर होते. जागोजागी धुके पसरले होते. ते ही तितकेच सुंदर होते. कुठेसा थोडासा हलकासा भुरभुरा पाऊस पडत होता. तो ही तितकाच सुंदर होता.

एका सुंदर झाडाखाली म्हसोबाचे एक सुंदर देऊळ होते. त्याच्या पायऱ्यांवरती फुलांचा सुंदर सडा पडला होता. 'ही पण एक सुंदर दुपारंच म्हणायची' काळ्या पाषाणावर झोपलेल्या वैराग्याने हात वर करून कडकडून आळस देत मनाशीच म्हटले. उठून त्याने कमंडलूतल्या अमृतधारांचा आस्वाद घेतला. माथ्यावर शिकडवा करण्यास ओंजळीत जेव्हा त्याने पाणी घेतले, तेव्हा 'ह्या जलधारेचा एकेक कण जगातल्या प्रत्येक अणूरेणूस जगण्यास प्रवृत्त करतो' ही ओळ आपल्या ग्रंथात नमूद करण्याचे मनात साठवले. मग प्रसन्न मुद्रेने तो उजळून निघाला.

"आहाहा, काय सुंदर दुपार आहे!" वैरागी आंब्याच्या झाडाकडे बघत म्हणाला.
"हो ना. फक्त दुपारंच नाही, ते आंब्याचे झाडसुद्धा किती सुंदर आहे." समोर उभारलेली मंदाकिनी म्हणाली. तिचा आवाज खूप सुंदर होता. पांढऱ्या सुंदर मोगऱ्याचा गजरा तिने आपल्या केसात माळला होता. तिचे मधाळ लाघवी ओठ अगदी लालचुटूक दिसत होते. स्वर्गातून अप्सरा अवतरावी इतकी ती सुंदर होती.
"फक्त झाडंच नाही, ते आंबेसुद्धा किती सुंदर आहेत" वैरागी गर्द झाडीत दडलेल्या लाल कोवळ्या कैऱ्या निरखत म्हणला.
"हे आंबे आणि झाडेच बघायची आहेत तर?" मंदाकिनीने एक विनंतीवजा आर्जवी सवाल केला. "आईसाहेबांची नजर चुकवून आम्ही इथवर आलो आहोत. याचसाठी सांगावा धाडला होतात वाटतं." तिच्या श्वेत वर्णावर आता एक लालसर छटा उमटली.
'नव्हे नव्हे. तसे नव्हे. मंदाकिने, चिडू नकोस. चिडली की तू अजूनच गोजिरी दिसतेस." वैरागी झाडाच्या खोडावरून हात फिरवत म्हणाला. "या रम्य दुपारी एक नितांतसुंदर गोष्ट जी या ह्रदयात आहे. तिच तुला अर्पण करायची आहे." खोडाची साड खरवडून काढत तो म्हणाला.

"बोल वैराग्या, दिलखुलास बोल. तुझ्या ह्रदयातली गोष्ट ऐकण्यास मी आतुर आहे" मंदाकिनीची लालसर छटा आता गुलाबी होऊ लागली होती.

"हे मंदाकिने, फुलांचा सडा जिथे पडतो, ते म्हसोबाचं देऊळ आहे साक्षीला. माझ्या कुटीत आजन्म राहण्याचा पवित्रा घेशील काय. तुला सुखात ठेवण्याचे वचन देतो मी. माझ्याशी गाठ बांधशील का?" सुंदर सुंदर दुपारी सुंदर सुंदर आमराईत वैरागी सुंदर सुंदर हसला. कबूतरांचा एक थवा आकाशात चहूकडे पसरला.

"हे, वैराग्या. तू खूप चांगला आहेस. पण माझ्या मनात अगोदरच कोणीतरी भरले आहे."

आमराईत विंचू असतात. सापही असतात. निसरड्या जागेवरून कोणीही घसरून पडू शकेल अशी शेवाळे असतात. झालंच तर भटकी कुत्री आणि लांडगेही असतात.

"मला माफ कर" आर्त स्वरात ती म्हणाली. वैराग्याने बाभळीच्या झाडाकडे बघितले. नजर जाईल तिकडे काटेच काटे. शेतीला गांडूळखत महत्त्वाचे. तसंही आता तुरीला भाव नाही.

"I am sorry, please" मंदी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

"अच्छा. ओह. वा वा. बरं झालं सांगितलं. मी आपला उगच कायतरी इचारत होतो." विऱ्या आपली धोपटी खांद्यावर घेत कसनुसं हसला. सदा न्हाव्याची चाळीस रुपयाची उधारी बाकी आहे. ती आधी चुकवायला हवी.

"जाते रे. वाईट वाटून घेऊ नकोस. आई वाट बघत असेल. भेटू उद्या कॉलेजवर. " हातात केमिस्ट्रीच्या वह्या घेऊन अखेर त्या बाभळीच्या झाडाखालून मंदी निघाली. "आणि आपण अजूनही दोस्त आहोत हे विसरू नकोस" मध्येच थांबून ती म्हणाली.

उन वखवख करत होतं. दिवस भणाणून आला होता. सुर्य पिसाळला होता. जमीनीला भेगा पडल्या होत्या. कावळे काव काव करत होते. माळावरचा बोडका म्हसोबा आता सुस्तावला होता. धूळदान झाली होती. झाडपाला करपला होता. पंक्चर झालेल्या सायकलला इऱ्या पंप मारत होता.
"काय म्हणली रं?" बबन्या म्हणाला.
"कुटं काय. केमिस्ट्रीच्या वह्या मागत हुती." इऱ्यानं थुका लावून वाल गेलाय का बघितलं.
"तुझ्याकडंच कश्या मागती रं वह्या?"
इऱ्यानं पुढच्या चाकातली हवा चेक केली. ओके होती.
"धोंड्याबर दिसली ब्वॉ मला .जोरात चाललंय त्यांच." बबन्या माव्याची पिचकारी मारत म्हणाला.
दोन रुपये सुट्टे काढून इऱ्यानं त्याला दिले.

आपल्यालापण आसंच दूकान टाकायचंय पंक्चरचं. चांगला धंदा हुतू. यीळाकाठी दहा सायकली जरी आल्या तरी घराबाराचं भागंल. इचार करत इऱ्यानं सायकलवर टांग टाकली.

गटारे तुडुंब भरून वाहत होती. जागोजागी घाणीचे साम्राज्य. डुकरे अस्ताव्यस्त लोळत होती. ड्रेनेजच्या उघड्या भोकात एक कुत्रं अडकलं होतं. दिवेलागणीचा भयाण अंधार चोहीकडे माजला होता. एका टपरीवर इऱ्यानं भुर्जीपाव खाल्ला. दोन कच्च्या मिरच्या खाऊन त्यानं तोंडाची आग केली.
'मादरच्योद. आजचा दिवस किती मादरच्योद आहे' मगातलं मचूळ पाणी तोंडात ओतत त्यानं ती आग शांत करायचा प्रयत्न केला. पण ती अजूनच भडकली.
"खाते पे लिख देना बे" तो थोडा गुर्मीतंच आला.
"परसोका पच्चीस है. और ये दस. पैतीस हुवा जी" भुर्जीवाल्याने हिसाब मांडला.
"तो क्या देगा नै क्या मै? साले रांड की औलाद."
"अरे वैरीभाय. भडकते कायको. आपकाईच गाडा है. आपसे पयसा लेके मरनेका हमको." भुर्जीवाल्याने शेपूट घालून घातले.
"धंदा करो ठिकसे. नही तो जला डालूंगा ये सबकुछ." बुलेटची किक मारत वैरीभाय म्हणाला.

रस्ता अफूची गोळी घेतलेल्या रांडेसारखा निपचित पडून होता. वैरीभायची बुलेट जागोजागी उभ्या असलेल्या छमियांच्या छातीत घुसून धडधड करत असे. हिजडे कधी त्याच्या वाटेला गेले नाहीत. तस्करी करून आणलेल्या मद्यासारखी ही रात्रसुद्धा बेवडी होऊन गेली होती.

"r u angry on me?" सोन्याचं कव्हर घातलेला नोकिया ११०० वैरीभायनं बाहेर काढला तेव्हा हा एसेमेस झळकत होता.

अचानक अख्खी मुंबई भारनियमात गेल्यासारखी शांतता पसरली. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याने खिडक्यांची तावदाने लावली आणि मोबाईलमधला तो एसेमेस वाचत बिछान्यावर लवंडला.

'please reply to me.' असा अजून एक एसएमेस आला. आणि तो मनोमन सुखावला. त्याने कपाट उघडले. आतल्या लॉकरमध्ये लपवलेला गुलाबी बॉक्स बाहेर काढला. त्यातल्या कागदांवर त्याने स्वतः काढलेला वेगवेगळ्या रंगातला, वेगवेगळ्या भाषेतला, वेगवेगळ्या डिझाईनचा 'मंदाकिनी' हा फॉन्ट. तो बघतच राहिला.

मग फोनच वाजला. नकोच उचलायला असे म्हणून त्याने शेवटी तो उचललाच.
"काय प्रॉब्लेम आहे.? एकही फोन नाही केलास.?
"नाही असं काही नाही."
"वीर. मी काही चूक केलीय का?"
"नाही नाही. असंही काही नाही."
"तू नेहमीसारखं बोलत नाही माझ्याशी. काय प्रॉब्लेम काय आहे.?"
"नाही. खरंच तसं काही नाही."
"तू माझा अजूनही मित्र आहेस लक्षात ठेव. आहेस ना?"
"येस.."
"मग असं तुटक तुटक का बोलतोयस?"
"बस... असंच.."
"अरे तो रॉकी खूप चांगला मुलगा आहे. टू बीएचके फ्लॅट आहे त्याचा मुंबईत. मला तोच आवडतो रे. काय करू मी."
"आय नो. प्लीज. डोन्ट वरी. आय एम फाईन.."
"वी वील बी ए गुड फ्रेंड्स. फॉरेवर.."
"नो. वी वील नॉट.."

फोन कट करून त्याने छताकडे पाहिले. त्याला उगाचच रिकामं रिकामं वाटत गेलं. विनाकारण त्याने थोडा एसीही वाढवला. लॅपटॉप बंद करून शेवटी तो विचार करत करत झोपी गेला. रात्री झोपेतल्या गडद अंधारात त्याने नकळतपणे एक फूली मारली. 'x' विथ ब्लॅक बॅकग्राऊंड.

आर्द्रता 75℅ पर्यंत वाढली होती. टेंम्परेचर साधारण 10℃ असावे. प्रिसिपीटेशन 85℅ च्याही पुढे गेले होते. व्हिजिबिलीटी 500m एवढी तटपुंजी होती. इन शॉर्ट ती एक सुंदर सकाळ होती.

मऊ मखमली बिछान्यावर पसरलेल्या विराजने हात वर करून कडकडून आळस दिला.
"ग्रीन टी प्लीज." समोरच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आलेल्या अनेक पेयांमधून त्याला केवळ ग्रीन टीच देण्यात आला.
बाथटबमध्ये सुमारे तासभर घालवल्यानंतर तो तयार झाला. सूट आणि टाय घातल्यानंतर सहजच त्याने आपला आयपॅड चापचला.
57 missed calls from Mandakini.
एक तुच्छ कटाक्ष टाकून तो लिफ्टमध्ये शिरला.
मग त्याच्या फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज आला.
"अरे तो रॉकी खूप नालायक निघाला. आय डोन्ट लाइक हीम. हाऊ कॅन आय डू धीस टू यू. बीग मिस्टेक फ्रॉम मी."
मेहतांची ८५ कोटींची डील फायनल झालीच पाहिजे. बिजनेस टायकूनचा पुरस्कार यावर्षीही आपलाच.
"Fuck you" असा रिप्लाय करून त्याने तळमजल्याचे बटन दाबले.
शिवाय फॉर्म्युला वनमध्येपण गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. ग्रोजरला चिरडला पाहिजे.
"Fuck you too" क्षणार्धात त्याला अजून एक मेसेज आला.
एव्हाना तो लिफ्टमधून बाहेर पडला होता. मेसेज वाचून तो बेरकी हसला. काहितरी आठवल्यासारखे त्याने आजूबाजूला पाहिले.

हाऊ ब्यूटीफूल डे इज धीस! हिल स्टेशनवरचा आल्हाददायक गारवा. दाट धुक्यात हरवलेला. नागमोडी वळणांचा. इथली झाडेसुद्धा लाजरी.

"Now we can be friends forever.." असा रिप्लाय करून पुढच्या महिन्यात येणारे प्रायव्हेट जेट पांढरे की निळे यावर त्याने एक मिटींग घ्यायचे ठरवले.

अँड हाऊ ब्यूटीफूल सन इज धीस! वाळवंटे तप्त करणारा. घामाच्या धारांनी चिंब करणारा. शेवटी, अंटार्क्टिकाला गेल्याशिवाय याची किंमत कळणार नाही.

Group content visibility: 
Use group defaults

लेखनशैली नेहेमीप्रमाणेच भन्नाट पण एका भागातून दुसर्‍या भागातल्या ट्रान्झिशन मध्ये म्हणावी तितकी फ्लुइडिटी जाणवली नाही किंवा मग माझ्या बुद्धीचा दोष Happy

मस्त.

छान आहे. तुमच्या कथांमधे तुम्ही मस्त एक्सपेरिमेन्ट्स करत असता टेक्निक्स चे , ते आवडतं वाचायला.

मस्त झालीय! वैरागी, इऱ्या, वैरीभाय, विराज आणि धोंड्या, रॉकी सगळेच छान पण सगळ्याना मंदाकिनी भारी पडली राव :p

हे काय आहे? आपल्याला नीट कळले आहे कि नाही? माहित नाही. पण जेकाही आहे ते आवडले Lol

> तुमच्या कथांमधे तुम्ही मस्त एक्सपेरिमेन्ट्स करत असता टेक्निक्स चे , ते आवडतं वाचायला. > +१