" तात्या "

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 30 October, 2017 - 06:13

तात्या ..

तोंडाचा मोठा आ वासत तात्याने जांभई दिली. अंगावरचे पांघरुण झुगारुन दिले. बेडवर बसल्याबसल्याच आळोखेपिळोखे देत पाठीतून दोनदा कट कट असा आवाज काढला. काय करावे आज? असा विचार करत उठतच होता तितक्यात .. ,” उठलास का रे “? ‘’ आज तरी वेळेवर आंघोळ कर रे बाबा ‘’ असा आईचा आतल्या खोलीतून क्षीण पण करारी आवाज आला. बेडच्या बाजूला पडलेला आणि पोर्‍याने खिडकीतून फेकलेला ‘’ लोकसत्ता’’ उचलत ....’’ उठलोय गं ..... आलोच पाच मिंटात ‘’ असे म्हणून तात्या टॉयलेटात शिरला. दोन मिनिटात मथळे चाळत .... स्वत:शी काहीबाही पुटपुटत पोट मोकळं केलं. आरशावरचा ब्रश उचलला .... कोलगेट कॅल्सीगार्ड ब्रशवर पिळून खसाखसा दातावर फिरवला. गर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गुट असा अगम्य आवाज काढत चूळ भरली. कपडे उतरवले. गीझरचं पाणी बादलीत जमवून भसाभसा दोन तांबे डोक्यावरुन घेतले. दोन तीन ठिकाणी फाटलेल्या टॉवेलने खसाखसा डोकं पुसत तात्या बाहेर आला तेव्हा म्हातारीने अर्धा कप चहा समोर आदळला होता.

‘’ घे.... रात्रीच्या उरलेल्या दुधातनं बनवलाय. .... दूधवाल्याने दूध घातलं नाही आज. म्हणे राहिलेली चार म्हैन्याची उधारी आधी टाका... मग देतो दूध. ‘’

‘’ हं ... बघतो आज काहीतरी त्याच्या पैशांचं’’ .... असं रोजच्यासारखंच वेळ मारुन नेत तात्यानं अर्धा कप चहा इतक्या शिताफीनं फुरकला की क्षणभर कपालाही काय झाल्याचं कळलं नाही.

‘’लाईट बिल भरायचं राहिलंय ...... तळमजल्यावरच्या पेंडशांचं मीटर कापून नेलं काल एमेसीबी वाल्यांनी. पेंडशेंच्या कारट्यानं फारीनातनं पैशे धाडले नाहीत वाटतनीत अजून ‘’

म्हातारी अजून काहीबाही बडबडत पैशाचेच विषय काढेल त्या आधीच निघावं म्हणून तात्याने घाईघाईत पॅंट चढवली. कालच्याच शर्टच्या बाह्यांचा वास घेतला. ठीक आहे असं मनातच म्हणत घातला देखील. ‘’ आलोच गं जाउन ..... चार वाजेपर्यंत येतो ..... दूधवाल्याचे आणि लायटीच्या बिलाचं बघतो आजच. ‘’ असं आश्वासनवजा दोन शब्द फेकून तात्या जिन्यावरन उतरला देखिल.

साला आज काय खरं नाय... आज दोन चार हजार काढलेच पाहिजेत कुठून तरी. नाहीतर उद्या चहासुद्धा नाय भेटायचा आणि काळोखात झोपावं लागेल . झपझप पावले टाकत तात्याचं विचारचक्र फिरत होतं . नाका ओलांडला आणि नव्यानेच झालेली प्रतिभा अ‍ॅव्हेन्यू बिल्डिंग लागली. आयसीआयसीआय बॅंकेची आंबेडकर चौक शाखा तळमजल्यावर दिमाखात विसावली होती. बाजुलाच सदानंद हॉटेल गजबजलं होतं . डोसे, वडे , इडली आणि उपम्याचा दरवळ सुटला होता. चाकरमानी, कॉलेजातले पोट्टे पोट्टी , कसकसले एक्झिक्युटीव्ह पोटपूजा करुन बाहेर पडत होते तर काही लगबगीनं आत शिरत कॉर्नर टेबल खाली आहे का म्हणत कटाक्ष टाकत होते.
तात्याला यात स्वारस्य नव्हतं . त्याच्या द्रुष्टीने महत्वाचा होता हॉटेलबाहेरचा टपरीवाला. वेगवेगळ्या जर्द्याच्या माळा लोंबकळत ठेवलेल्या कळकट दिसणार्‍या पण अत्यंत स्वच्छ असलेल्या टपरीवरच्या मुरुगनला तात्याने हाळी दिली. ‘’ मुरुगन ... निकाल अपना छोटा फोरस्क्वेअर ‘’ …. मुरुगनने पटदिशी सिग्रेट समोर धरताच तात्याने अख्खं पाकिट जवळजवळ हिसकवलंच . ‘’ अरे पाकिट मंगताय रे..... एक से मेरा क्या होगा... आणि आपल्याच जोकवर तात्या “ ह्या ह्या ‘’ असं हसला. मुरुगनच्या नजरेत जाणवलेल्या नाराजीला जाणूनबुजून इग्नोर मारत त्यानं इलेक्ट्रीक लायटरवर सिगरेट शिलगावून दोन जोरकस झुरके मारले. तो कडवट धूर छातीभर भरून घेतला. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या तेव्हा कुठं जिवाला जरा हायसं वाटलं . मुरुगन दुसर्‍या गिर्‍हायकांत रमल्याचे बघून तात्यानं हळूच कल्टी मारली. प्रतिभा अ‍ॅव्हेन्यूच्या जिन्याकडे पावलं टाकत तो निघाला ...... समोरुन मिनिस्कर्ट घालून उतरणार्‍या पोरीकडे अंमळ तिरकस बघत दुसर्‍या मजल्यावर पोचला.

‘’ साईप्रसाद कॉम्प्यु-टेक ‘’ अशा नियॉन साईन लावलेल्या ऑफीसात शिरला. काचेचा दरवाजा ढकलताच आतमधे प्रकाश दिसला. प्रकाश ह्या ऑफीसात आणि बाजुच्या सी ए च्या ऑफीसात असा टु इन वन शिपाई होता. चार वाजेपर्यंत साईप्रसाद आणि चारनंतर ‘’ पी . पी. घैसास इनवेस्टमेंट्स ‘’ ह्या ऑफीसात असं भारीतलं नियोजन होतं त्याचं .
‘’ तात्या ..... तू आज कस्काय आलास? अरे आज सनीसायेब तुझ्या घरी त्यांचा जुना पीसी इनस्टॉल करायला हर्ड्याला पाठवणार आहेत ना ? . इति प्रकाश ...
यातला सनीसायेब म्हणजे ऑफीस ओनर सुनील शिंदे आणि हर्ड्या म्हणजे ऑफीसात कामाला असलेला हार्डवेअर इंजिनिअर . कॉम्प्युटर रिपेअर करणार्‍या पोर्‍याचं काहीही नाव असलं तरी प्रकाश त्याला हर्ड्याच म्हणायचा.

‘’ अरे हो. विसरलोच ‘’ . सालं हे तात्याच्या डोक्यातनंच निघून गेलं होतं . साईप्रसाद कॉम्प्युटेकमध्ये तात्या रोज फुकटात नेट वापरायला येतो आणि एक पीसी अडवून ठेवतो म्हणून सुनीलने त्याचा चांगल्यातला जुना पीसी तात्याला घरी बसवून देण्याचं ठरवलं होतं. सुनीलच्या ऑफीसात पीसी, टॅबलेट , लॅपटॉप रिपेअर, असेम्बल्ड कॉम्प्युटर विक्री याबरोबरच ब्रॉडबॅंड कनेक्शन्ससंदर्भातली कामं चालायची. चार पाच पोरं कामाला होती. प्रकाश शिपायाचं अडेलपडेल ते काम करायचा. तात्या सुनीलच्या बापाचा क्लासमेट . सुनीलचा बाप तिगस्ता साली अ‍ॅक्सीडंटमधे वारला तेव्हा तात्याने सुनीलला फार मदत केली होती. पोलीस पंचनामा , सिव्हिलमधे स्वत: येउन लवकर पीएम करुन घेतलं होतं . तेरावं होईपर्यंत तात्याने सुनीलला अगदी घरातल्या माणसासारखा आधार दिला होता. सुनील म्हणूनच तात्याप्रती आदर बाळगून होता.
पण तात्याची हॉटेलातली पार्टनरशीप तुटल्यापासून आणि पार्टनरने फसवल्यापासून तो अगदी कफल्लक झाला होता. इन्शुरन्सची काही फुटकळ कामे करुन कसाबसा चार रुपड्या पदरात पाडून घ्यायचा आणि महिना ढकलायचा. त्यात हे फेस्बुकचं आणि व्हॉटस अ‍ॅपचं वेड लागलेलं. तात्या 24 तास ऑनलाईन असायचा . त्याच्या लेखणीत जादू होती. रोज दिसणारे / दिसलेली व्यक्तीचित्रं तो समरसून रेखाटायचा . त्याच्या पोस्ट्सवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाउस पडायचा. रोजचा पेपर टाकणारा, भंगार विकत घेणारा , चौथ्या मजल्यावरच्या सरमळकरांकडे येणारी नखरेल मोलकरीण , तळमजल्यावरचे पेंडसेकाका अशा अनेक व्यक्तीरेखा तात्याने जिवंत केल्या होत्या. फेसबुकावर त्याचे 14/15 ग्रुप्स होते . एका ग्रुपवर साहित्यविषयक लिखाण , दुसर्‍या ग्रुपवर दाक्षिणात्य अभिनेते अभिनेत्री यांचे फोटो शेअर करणे , तिसरा शिवसेनेसंबंधी आस्था असलेल्या जुन्या जाणत्या लोकांचा ग्रुप , चौथ्या ठिकाणी लोकल शाखाप्रमुख , नगरसेवक काही पत्रकार आणि काही सो कॉल्ड समाजसेवक अशांचा चालू घडामोडींवर वादविवाद घालणारा ग्रुप अशी निरनिराळ्या ग्रुपांची विभागणी करुन तात्या अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने त्यांचं अ‍ॅडमिनपद चालवत होता. वादविवाद ग्रुपवर तात्याचा शब्द प्रमाण होता. रोज मेंबरं कुण्या एकाला जात/ धर्म/ पक्ष/ भक्त आणि फुरोगामी अशा कुठल्या ना कुठल्या विषयावर उचकून द्यायचे आणि दुसर्‍या बाजूला तात्याला जुंपायचे. सकाळपासून रात्र होईपर्यंत कमेंटवर कमेंटा यायच्या ... कुणी विकिपिडियाचे दाखले द्यायचा तर कुणी कुठलासा व्हिडिओ/ फोटो अपलोड करुन आपण सांगतो ते पुराव्यानिषीशी अशी छाती काढत आपलंच खरं करु पहायचा. पण तात्या या सार्‍यांच्या पुढचा होता. त्याचा युक्तीवाद, त्याची भाषा, त्याचे बर्‍याच राजकारण्यांशी असलेले संबंध याला तोड नव्हती. कित्येक सेलेब्रिटी नट नट्यांसोबतचे त्याचे फोटोज पाहून भलेभले तोंडात बोटे घालत . अचूक वेळी अचूक फोटो टाकत, बारामतीकरांचे , नागपुरकरांचे जुने ऐतिहासिक किस्से सांगत तो पोस्टला असे काही वळण द्यायचा की समोरचा फुरोगामी, धर्ममार्तंड , पत्रकार यांना पळता भुई थोडी व्हायची. वाद सुरु इतरजण करायचे..... पण अंतिम शब्द त्याचाच असायचा.

असेच थोड्याफार फरकाने त्याचे व्हॉट्स अ‍ॅप गृपही होते. तिथेही हाच प्रकार चालायचा. बर्‍याच गृप्स्ना त्याने को अ‍ॅडमिन ठेवले होते. पण तिथेही त्याचा राडा सुरुच असायचा. मग कुणाला गृपमधून नारळ देणे... कुणाला जहाल हब्दात पायरी दाखवणे ह्या बाबी नित्याच्याच होत्या. तात्या नेट्वरच्या आभासी जगाचा एकूणच अनभिषिक्त सम्राट होता. म्हणूनच तात्या येता जाता प्रकाश, मुरुगन सारख्या भाबड्या लोकांकडे बर्‍याचदा कुत्सितपणे पहात ‘’ लेको .... फेसबुकावर या म्हणजे कळेल तुम्हाला ... तात्या क्या चीज है’’ असं पुटपुटायचा. पण ती मुरुगनसारख्याच्या पल्ले पडणारी बाब नव्हती .

अकरा साडेअकराला आलेल्या तात्याचा दिवस जो सुरु व्हायचा तो असाच वादळी पोस्टसनी . मग त्या पोस्टना रीप्लाय देणे, कुणाला कसल्या बातमीची लिंक देणं .... फेसबुकाची नवीन नोटिफिकेशन्स वारंवार चेक करत रहाणं ... मधेच आवडत्या नटाचा एक फोटो पोस्ट करुन त्याचा स्वत:ची संबंधित एखादा किस्सा टाकणं ..... असं करत करत दोन अडीच वाजले की तो उपकार केल्यासारखा लॉगआउट करत उठायचा . खाली येतायेता एक सिग्रेट फुकायचा. नाट्यगृहाच्या गल्लीत भाजीमार्केट मधल्या माथाड्यांच्या स्टॉलकडे वळायचा . येथे वीस रुपयात मूदभर भात आणि त्यावर चमचाभर वरण मिळायचं . भाजी हवी असेल तर पंचवीस आणि सोबत लोणचं पापड पाहिजे असेल तर पस्तीस रुपये असा रेट असायचा. चव अगदी घरगुती असायची . खिशात पैसे असतील त्यानुसार तात्या दुपारचे जेवण आटपायचा . त्रुप्तीचा ढेकर देत बडीशेब चघळत जो निघायचा तो मघाचा अपुरा राहिलेला वाद पुढे चालवायला पुन्हा एकदा ‘’ साईप्रसाद कॉम्प्युटेक’’च्या दिशेला.

आजही झपझप पावले टाकत पीसीजवळ पोचला तेव्हा ऑफीसात सुनील आला होता. ‘’ तात्या, माझा जुना लीनोव्होचा मॉनिटर आणि पीसी पाठवलाय तुमच्या घरी इनस्टॉल करायला. रिझवान गेलाय ... पण त्याचा फोन होता की तुमच्याकडे लाईट नाही म्हणून..... ‘’ सुनील बोलला आणि तात्याच्या मनात पाल चुकचुकली..... ‘’ च्यायला मीटर नेला की काय कापून एमेसीबी वाल्यांनी’’? जाउ दे... घरी गेल्यावर बघू असं म्हणत तात्याने परत फेसबुकला लॉग इन केलं. ‘’ काइंडली सी हीयर’’ असा व्हाट्सअ‍ॅपवरचा मेसेज पाहोन त्याने लगोलग ती पोस्ट उघडली.

फेरीवाल्यांना मारण्यात काय हशील ? अशा तात्याच्या पोस्टला ‘’ फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजेत “ अशा प्रकारच्या कमेंट्स आल्या होत्या. बर्‍याच जणांनी तात्याच्या पोस्टला समर्थन दिलं होतं तर तितक्याच किंबहुना जास्त लोकांनी त्या विरोधात लिहिलं होतं. फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजेत या एकाच्या कमेंटला 34 लाइक आले होते .... आही जणांनी फेरीवाल्यांना चोपत असतानाचे फोटो पोस्टून आनंद घेतला होता आणि बरेच जण फुटपाथ , रेल्वे स्टेशन मोकळे व्हायलाच हवे अशा प्रकारचं ठासून बोलत होती.

तात्याने पवित्रा घेतला. एक दीर्घ पोस्ट टाकण्याइतका मसाला त्याच्याजवळ होताच. फेरीवाले कोण आहेत? ते काय काय वस्तूंची विक्री करतात ? त्यामागचे अर्थकारण अर्थकारण काय ? मध्यमवर्गीय त्या सामानावर कसा अवलंबून आहे ? हेच सामान त्या मॉलमध्ये गेलं तर आपल्याला केवढ्याला पडेल ? पथविक्रेता संरक्षण अधिनियम .... त्या नियमाची व्याप्ती ..... त्या तुलनेने त्यांचे न झालेले सर्वेक्षण ...... दुकान आणि गाळेवाल्यांनी केलेले अतिक्रमण ... त्याकडे कोर्ट, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी केलेले दुर्लक्ष , रोज त्यांचा जप्त होणारा माल , त्यांचे होणारे नुकसान .... काही समर्पक आकडेवारी असा जबरी रिप्लाय तात्याने भराभरा टाईप केला. दोन तीन टायपो लीलया करेक्ट केले.... एक दोनदा वरुन खाली नजर टाकली आणि एंटर मारुन पोस्ट केला.

पोस्ट करायची खोटी ..... काहींनी न वाचताच भराभरा लाइक केले. पाच मिनिटात त्या कमेंटला 34 लाइक झाले. फेरीवाल्यांना चोपून काढले पाहिजे असा सूर असणार्‍यानेही .... ‘’ ह्या बाबी खरंच मला माहीत नव्हत्या ‘’ असे म्हणत .... आपल्या भूमिकेचा लोकांनी पुनर्विचार केला पाहिजे असे मत पोस्ट केले. तात्या तुम्हारा जवाब नही अशा अर्थाच्या ढीगभर कमेंट्स आल्या. आपल्या लेखनशैलीवर तात्या मनोमन सुखावला ..... तात्या नक्की करतोय तरी काय असे नाराजीयुक्त आश्चर्याने पहात सुनीलने चहाचा ग्लास तात्याकडे सरकवला आनी तिकडे पाहण्याचीही तसदी न घेता त्याने उचलून चहा भुरकायला सुरुवात केली.

वाद आता हळूहळू शांत होत होता. विरोध करणार्‍यांचा विरोध तात्याच्या अभ्यासू कमेंटनंतर गळून पडला होता. चित्रपट अभिनेते, काही जुने किस्से , गेल्या वर्षीच्या काही उकरुन काढलेल्या पोस्ट्सला आलेले फुटकळ लाइक्स आदि नोटिफिकेशन्स पहात हळूहळू सात वाजले. च्यायला आज पण नगदनारायणाचा बंदोबस्त झाला नाही असे स्वत:शीच पुटपुटत तात्याने लॉगआउट केले. येतो रे सनी ... असे म्हणत सुनीलचे काय उत्तर येईल याची वाटही न पहाता तात्या भरभर जिने उतरला. उद्या त्या डोंबिवलीकराला 5/10 हजाराची इनवेस्टमेंट करायलाच लावतो असे स्वताशीच म्हणत त्याने नाका पार केला. पेंडशांच्या काळोख झालेल्या फ्लॅटकडे बघत दुडक्या चालीने आपल्या घरात शिरला. काहीसा घाबरतच त्याने प्रवेश केला. लाईटच्या बोर्डवर पेटलेला चूटा रेड बल्ब पाहून त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. चला..... लाइट कापली नाही अजून.... उद्या भरुच कसेही बिल..... खुशीतच त्याने एक जुन्या गाण्याची शीळ घातली. शीळ ऐकून आतमध्ये म्हातारीने हालचाल केली. ‘’ आलास का रे.... जरा आत ये. दुपारी दुसर्‍या मजल्यावरच्या माईने पोहे दिले होते. एक वाटीभर मी खाल्ले .... अजून एक वाटी आहेत. तू खातोस का ? नसेल खायचे तर दे मला.... जरा भूक लागल्यागत वाटतंय बघ. ‘’ म्हातारी बोलली आणि तात्याला गलबलून आलं ..... त्याचा बिझिनेस ऐन बहरात होता तेव्हा जे हवं ते खाणारी म्हातारी आता पोहे खातेय .... त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
‘’ हे घे पोहे’’ म्हणत त्याने सगळे पोहे वाटीत आणून तिच्यासमोर ठेवले. थांब मी तुला चहा करतो फक्कडसा म्हणत तो स्वैंपाकघरात शिरला. ‘’ चहा कसला कपाळ? अरे दूध कुठं टाकलंय आज त्या मेल्याने?” म्हातारी करवादली... ‘’ दूधवाल्याचे पैसे नाही दिले आणि हा कॉम्प्युटर आणला मोठा ‘’ असे म्हणत तिने हॉलमधल्या टेबलवर इनस्टॉल केलेल्या पीसीकडे बोट केले. कसकसल्या वायरी आणि इंटरनेट म्हणे लावून दिले असे तो शिंदेंकडचा पोर्‍या सांगत होता. तात्याने पीसीकडे पाह्यलं जरा हसला आणि पैशाच्या आठवणीनं त्याच्या चेहर्‍यावर परत चिंतेचं जाळं पसरलं .....

काहीशा विमनस्क अवस्थेतच तो बाथरुमात शिरला. नळ सोडून खसाखसा चूळ भरली. थंड पाण्याचे हबकारे चेहर्‍यावर मारले. मघा ओले झालेले डोळे पुन्हा ओले केले. बाजुच्या हॅंडटॉवेलला हात पुसून तोंड बाकी शर्टच्या बाहीनेच पुसत तो बेडजवळ आला. सकाळच्या लोकसत्तेची पुरवणी घेत तो बेडवर पहुडला. खिशात हात घालून पाहिलं.... तर शंभरची एक नोट आणि दहाच्या काही नोटा काही नाणी एवढंच खिशात होतं. तीम महिन्याआधी एक दुकान भाड्याने चढवलं होतं त्याचे दोन महिन्याची दलाली म्हणून तीस हजार मिळाले होते. तेव्हापासून काही पैसा हातात आला नव्हता. काय करावं ..... असं डोकं गच्च धरुन तो नुसताच छतावर गरगर फिरणार्‍या पंख्याकडे बघत राहिला.
बाथरुमात सबण नाही... पेस्ट संपलीये..... वाण्याची, दूधवाल्याची उधारी राहिली आहे. लाईट बिल भागवायचं आहे. पैसे नाही दिले तर पेपेरवाला लोकसत्तासुद्धा बंद करेल दोन चार दिवसांत . विचार करकरुन त्याला ग्लानी आली.

तितक्यात त्याच्या फोनवर ती टिपिकल रिंगटोन वाजली. अंमळ अनिच्छेनेच त्याने फोन उचलला . हॅलो तात्या ..... पलीकडे चिरपरिचित आवाजाचा गोखले होता. गोखले हा तात्याच्या लेखणीचा डाय हार्ड फॅन होता. ‘’ अरे पुन्हा म्हात्रेने कमेंट केलीय ..... आधी तुझ्या मताशी सहमती दाखवून वाद संपवला सुद्धा होता .... पण आता परत त्याने एक फोटो पोस्ट केलाय. काही परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपल्या एका स्थानिक नेत्याचं डोकं फोडलंय म्हणे. तो विचारतोय..... बघ तात्या..... अजून तू फेरीवाल्यांचीच बाजू घेणार का? आता म्हणे आर या पार.... कोणत्याच स्टेशनवर फेरीवाल्यांना बसू देणार नाही असे बोलतोय तो...... प्लीज लिही ना त्यावर ..... मी लिहित होतो.... पण मला कुठं जमणार आहे तुझ्यासारखं लिहायला? तात्या तो तात्याच...... ‘’

इतर कुठला दिवस असता तर तात्याने मोबाईलचा डाटा ऑन करुन हळूच ‘’ यावर उद्या सविस्तर लिहितो’’ अशी कमेंट त्याने केली असती..... पण आज त्याच्या घरी पीसी इनस्टॉल झाला होता. लोकसत्तेची पुरवणी भिरकावून तो उठला आणि पीसीचे बटन ऑन केले. पीसी बूट होईपर्यंत त्याला धीर नव्हता .... एकदाचा बूट झाला आणि शिंदेने जोडलेल्या ब्रॉडबॅंडला ऑटो कनेक्ट झाला. गुगल क्रोमच्या ब्राउझरमध्ये गुगलचे ओपन झालेले होमपेज पाहून त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अ‍ॅड्रेसबार मध्ये फेसबुक.कॉम टाईप करायला हार्डली त्याला दोन सेकंद लागले. युझर आयडी पासवर्ड कधी एकदा टाकतो असे त्याला झाले होते. डु यू वॉंट क्रोम टु रीमेंबर धिस पासवर्डला सराईतपणे येस करुन तो लॉगीन झाला.

फेसबुकची त्याची वॉल आता त्याच्या समोर होती. आलेल्या शंभरेक नोटिफिकेशन्समधली म्हात्रेची ती नोटिफिकेशन त्याने अचूकपणे ओळखली आणि क्लिक केली. स्थानिक नेत्याच्या डोक्याला झालेल्या मारहाणीचा फोटो न्याहाळत त्याने शब्दांची जुळवाजुळव केली आणि आता याला कसे उत्तर द्यायचे याचे आडाखे बांधले. शर्टाच्या बाह्या मागे करत खुर्चीच्या मागे एक उशी ठेवून त्याने कीबोर्ड जवळ ओढला आणि बडवायला सुरुवात केली.

स्वत:च्या आयुष्यातील सार्‍या विवंचना मागे ठेवत जगाच्या विवंचनेवर भाष्य करणारा हा त्याचा प्रवास उद्या पहाटेपर्यंत त्याचा असाच सुरु रहाणार होता......

 डॉ. कैलास गायकवाड

Group content visibility: 
Use group defaults

वा..

त्यात्या हे पात्रं चांगलंच रंगवलंयत डॉक्टर.
आजूबाजूला असे तात्या लोक भरपूर दिसतात.
पण लिखाणातून तो हुबे हुब डोळ्यासमोर आला.

आभारी आहे सर्वांचा .

दक्षिणा, तुझ्या प्रतिसादाने काही काळ जुन्या माबोत गेल्यागत वाटले. :}

छान कथा, आवडली
सुरवातीला एकंदर विवंचना वाचून पुढे जावे की नाही अशा मनस्थितीत होतो, पण तात्यांची दुसरी बाजू पुढे आली तसा अडकत गेलो त्यात Happy

मस्त

सहीये.. एक नंबर !!!
. वाचतानाच एक ओळखीचे चाळीशीतले तात्या डोळ्यासमोर आले.. त्यांना ढकलतो हा लेख