विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-५

Submitted by अतरंगी on 28 October, 2017 - 04:43

भाग ४:- https://www.maayboli.com/node/64069

हा भाग विवाहोत्सुक तरुणींसाठी समर्पित आहे...

तुमच्यापैकी काही भाग्यवान, पुण्यवान मुली असतील ज्यांच्या नशिबात घरात आईच्या नजरेसमोर वाढलेला, सज्जन, सालस, स्वच्छ, टापटीप नवरा येत असेल. पण काही अभागी भगिनींच्या नशिबात (ज्यांनी मागच्या जन्मात खूप पापे केली आहेत, किंवा श्रावणी सोमवार वगैरे जे काही असते ते केले नाही त्यांच्या नशिबात) एखादा हॉस्टेलवर राहिलेला, असून अडचण आणि नसून खोळंबा, असा नवरा येईल. पण काय करणार! आपलंच नशीब फुटकं, पदरी पडलं आणि पवित्र झालं असं मानून जे भोग नशिबी आले आहेत ते हसतमुखाने भोगायची तयारी करा....

खालचे सर्व नियम अशा अभागी भगिनींसाठी....

१. सर्वात पहिला नियम नवऱ्याच्या मोबाईलला कधीही चुकूनही हात लावायचा नाही. मुलांनापण १८ वर्षांचे झाल्या शिवाय बाबाच्या मोबाइलला हात लावायचा नाही ! हा नियम लहानपणापासून शिकवा.

२. नवऱ्याने साखरपुडा ते लग्न या काळात तुम्हाला इंप्रेस करण्यासाठी सांगितलेल्या किस्यांवर जास्त विश्वास ठेवून, आपला नवरा किती भारी आहे असे वाटून घेऊ नका. सगळेच किस्से त्याचे आहेत किंवा खरे आहेत असे नाही.
हे अमेरिकन pie चित्रपटातल्या rule of one third सारखे आहे. त्याने तुम्हाला सांगितलेले एक तृतीयांश किस्सेच खरे आहेत आणि बाकी सगळे त्याच्या मित्रांचे, मित्रांच्या मित्रांचे किंवा ऐकीव असणार आहेत.
(वि सू :- अमेरिकन pie चे सगळे भाग पाहिले नसतील तर जीव द्या, तुम्ही जगून फार काही फायदा नाही)

३. नवऱ्याला स्वच्छता, नीटनेटकेपणाशी दूरदूर पर्यंत संबंध असलेली कामे कधीही देऊ नका. हॉस्टेल वर राहिलेल्या नवऱ्याला कायम हमालासारखे वागवावे आणि त्याला कायम एका सुपरवायजरची गरज असते हे लक्षात ठेवावे. जरा तुमची नजर हटली तर काय करून ठेवेल सांगता येत नाही.

४. नवऱ्याला कोणतेही काम सांगताना व्यवस्थित सूचना द्याव्या. कोणतीही गोष्ट गृहीत धरू नये.
उदा. एखाद्या मुलीला तुम्ही फक्त मेथीच्या भाजीची तयारी करून ठेव असे सांगू शकाल पण तेच जर एखाद्या हॉस्टेलाईट् ला सांगायचे असेल तर खालीलप्रमाणे सांगावे लागतात... *कंसातली वाक्ये गरजेनुसार ठळक करून वापरावी.

सर्वात महत्वाचे :- आधी तुझे तुझ्या स्वच्छतेच्या व्याख्येनुसार स्वच्छ असलेले हात माझ्या स्वच्छतेच्या व्याख्येनुसार स्वच्छ धू !!! त्यानंतर बाकी सगळं करायला घे.

४.१. मेथीची पेंडी फ्रीज मध्ये खालच्या कप्प्यात ठेवलेली असते. ती काढून घेऊन बाकी सगळे परत जसं होतं तसं ठेव.
४.२. मेथी फ्रीज मधून काढल्यावर फ्रीज बंद कर. ( लाथेने किंवा कमरेने दरवाजा ढकलू नकोस. हाताने नीट बंद कर)
४.३. मेथी निवडायच्या आधी नीट झटकून घे, भाजी निवडताना खाली पेपर घे. पेपर न घेता भाजी निवडून स्वच्छता करणं तुला या जन्मात अवघड आहे.
४.४. मेथी निवडताना सरसकट पानं एका बाजूला आणि देठ एका बाजूला अशी निवडायची नाही. पिकलेली पाने, किडलेली पाने फेकून दे. ( जर पिकली, चार भोके असली म्हणून काय झाली वगैरे लॉजिक फक्त स्वतःसाठी स्वयंपाक करताना वापर. आम्हीपण जेवणार असू तेव्हा नको.)
४.५. भाजी निवडून झाल्यावर व्यवस्थित धुवून घे.
भाजी धुवायला जे लिक्विड घेणार आहेस ते भाजी धुवायचंच आहे ते कन्फर्म कर. त्याची बाटली हिरवी आहे. पिवळ्या डब्यामध्ये भांडी धुवायचे लिक्विड आहे. भांडी धुवायचे लिक्विड भाजी धुवायला वापरू नकोस.
४.६. हे सगळं झालं की भाजी निथळून झाल्यावर ती कापडात गुंडाळून ठेव, नाहीतर कोमेजून जाते.
(ओट्यावरचे कापड घेऊ नकोस ते ओटा आणि भांडी पुसायला ठेवले आहे. भाजी गुंडाळून ठेवायचे कापड आपण फळे ठेवतो त्याशेजारी ठेवले आहे. तेच ते पांढऱ्या रंगाचे !)
४.७ हे सगळं करून भयानक दमल्याचा आव आणू नकोस. ते भाजीचे उरलेले देठ उचल आणि डस्ट बिन मध्ये टाक. नुसता देठ टाकू नकोस तर तो खाली घेतलेला पेपर पण टाक. ( तुझे रिसायकलिंग आणि रियुजचे फंडे माझ्या किचनच्या बाहेर ठेव)

५. नवऱ्याने प्रथम भेटल्यावर तुम्हाला सांगितलेल्या, मला स्वयंपाक येतो/रूम वर आमचे जेवण आम्हीच बनवितो वगैरे वाक्यांनी हुरळून जाऊ नका. लग्नानंतर तुम्हाला याची काहीएक मदत न होता उलट हॉस्टेल वर लागलेल्या सवयी सुधारण्यात तुमचा वेळ आणि संयम होलसेलमध्ये खर्च होणार आहे.

६. चारचौघात मान खाली घालायची नसेल तर मुलांना जरा बापाच्या आणि त्याच्या मित्रांच्या संगतीत कमीच ठेवा. हे करणे गरजेचे आहे पण तरी जर फार क्रूर वाटले, तर त्याला नवऱ्याच्या ताब्यात दिल्यावर दोघांना अंडर ऑबजर्वेशन ठेवा.

७. आपण कधीही चार दिवस कुठे जाताना घरातल्या श्वानांची (कुत्र्यांची) जशी काळजी करतो तशी नवऱ्याची पण करा. नवऱ्याला घरात कधी एकटे सोडायचे नाही याची तजवीज करा. माहेरी जाताना, ट्रिपला जाताना, ऑफिशियल टूर वर जाताना, मैत्रिणींसोबत चारसहा तास बाहेर जाताना कधी म्हणजे कधी नवऱ्याच्या हातात रिकामे घर देऊ नका.
कधी जर त्याला चुकून माकून एकट्याला घरात ठेवावे लागले तर क्लिनिंग सर्व्हिस वाल्यांकडून घर स्वच्छ करून घ्या. हॉस्टेलाईट् नवऱ्याने घाण केलेले घर स्वच्छ करण्यापेक्षा क्लिनिंग सर्व्हिस वाल्यांना पैसे मोजलेलं परवडतं.

८. बेल किंवा कडी वाजल्यावर दरवाजा उघडण्याच्या आधी नवरा कुठं आणि किती कपड्यांमध्ये पडला आहे ते आधी बघा.

९. नवऱ्याला माहेरपासून जरा लांबच ठेवा. लहान मुलाला दुसऱ्यांच्या घरी नेताना जसे पढवता तसेच नवऱ्याला माहेरी नेताना त्याच्याकडून do's and don't घोकून घ्या. चारचौघात नवऱ्यासोबत असताना पण कधी कधी 'हा गलिच्छ माणूस माझ्यासोबत नाहीच' असं वागावं लागतं याची मनाची तयारी करा आणि ते कसं करायचं ते शिकून घ्या.

१०. शेवटी तुम्ही कितीही काही केलंत तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार.... तसेच तुम्ही नवऱ्याला कितीही सुधारवायचे प्रयत्न केलेत तरी तो फार काही सुधारणार नाही आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला त्याच्या सर्व सवयी आजन्म सहन करायच्या आहेत. त्यामुळे संयम, क्षमाशीलता, रागाला आवर घालणे वगैरे गुण अंगी बाणवून घ्या. योगा/ध्यानधारणा वगैरे करत चला, त्याने फायदा होतो (म्हणे!).

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ नरेन माझे वैयक्तिक मत वेगळे आहे. मुली फक्त सर्वज्ञानी असल्याचा आव आणतात. (इथे महाभारत घडेल आता बहूतेक ) Lol

हे एवढं करण्यापेक्षा श्रावणी सोमवार व इ.उपवास करेन..>>काही उपयोग नाही कउ
तरी पण हेच करावं लागत लग्नानंतर
बाकी लेख मस्तच.
"सर्वात महत्वाचे :- आधी तुझे तुझ्या स्वच्छतेच्या व्याख्येनुसार स्वच्छ असलेले हात माझ्या स्वच्छतेच्या व्याख्येनुसार स्वच्छ धू !!! त्यानंतर बाकी सगळं करायला घे."
मला वाटलं मीच फक्त बोलते की काय हे वाक्य.

Lol कऊ!

दिस इजन्ट फनी एनिमोर. अजिबात हसू आले नाही. ज्याच्याशी लग्न झालंय तो डायरेक्ट हॉस्टेलातच जन्माला आलाय असे काहीसे गृहितक दिसते, अथवा अश्मयुगातून टाइममशीन ने खास जाऊन उचलून आणलेला केव्हमॅन.

मेथी वाल्या इन्स्ट्रक्शन्स आयांनी आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवल्या तर बायकोचं ऐकून घ्याय्ची वेळ येणार नाही.
----------------------
आधी तुझे तुझ्या विनोदाच्या व्याख्येनुसार विनोदी असलेले लेखन माझ्या विनोदाच्या व्याख्येनुसार विनोदी लिही !!! त्यानंतर बाकी सगळं करायला घे."
Happy

आधी तुझे तुझ्या विनोदाच्या व्याख्येनुसार विनोदी असलेले लेखन माझ्या विनोदाच्या व्याख्येनुसार विनोदी लिही !!! त्यानंतर बाकी सगळं करायला घे.>>>>>

नानाकळा,

तुम्ही तुमच्या विनोदाच्या व्याख्येनुसार " लिखानोस्तुक तरुणांसाठी मार्गदर्शिका" लिहायला घ्या. पुढच्यावेळेस लेखन करताना मी नक्की त्यातून मार्गदर्शन घेईन. Wink

सर्वाना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!

दिस इजन्ट फनी एनिमोर. अजिबात हसू आले नाही. ज्याच्याशी लग्न झालंय तो डायरेक्ट हॉस्टेलातच जन्माला आलाय असे काहीसे गृहितक दिसते, अथवा अश्मयुगातून टाइममशीन ने खास जाऊन उचलून आणलेला केव्हमॅन.
मेथी वाल्या इन्स्ट्रक्शन्स आयांनी आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवल्या तर बायकोचं ऐकून घ्याय्ची वेळ येणार नाही. >>>> + 1111111111

नानांचे पटले बहुतांशी, ही सिरीज सुरुवातीला बरी वाटलेली, पण नंतर असे वाटू लागले की खरेच मुले/पुरुष ईतके मूर्ख, आळशी, not at all trustworthy असतात का?????
अर्थात हेमावम

खरेच मुले/पुरुष ईतके मूर्ख, आळशी, not at all trustworthy असतात का?????
-->>>
Trustworthy नक्कीच नसतात. कित्येक बायकांना माहीत नसते बाहेर नवरा काय प्रताप करतो ते. अज्ञानात सुख आहे..

हा ही भाग भन्नाट Biggrin
८ नंबर महान आहे.
एका हॉस्टेलाइट मित्राचा रुममेट नेहमी रुमवर टारझन अवतारातच असायचा. अतिशयोक्ती नाही, पण परवा फेसबुकवर त्याला ओळखताच आलं नाही.. सवय !!!

हॉस्टेलमध्ये राहिलेले मूल /मुली जास्त कामसू आणि चांगलया सवयी असलेले असतात. घरी सतत आईच्या पदराखाली राहणारे जास्त लाडोबा असतात. त्यांनाच ह्या सूचनांची जास्त गरज आहे.

मस्तच!
अतरंगी यांनी विनोदी शैलीने लिहिले आहे. ते तसेच वाचायला हवे.

Pages