अवकाशस्थानक हॉस्पिटलमधील सूचनावली

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 28 October, 2017 - 03:46

A. तुम्हाला पाणशेत चौकाजवळून जातांना दिसतं की टमाट्याच्या झाडांवर रंगीत किडे रांगत आहेत. तुमच्या अंगात बरेच किडे असल्याने तुम्ही जवळ जाऊन बघता. तोच एक किडा उडत येतो अन पॅंडवर बसतो. तुम्ही त्याला झटकायला जाता, तो तुमच्या हाताचा कडकडून चावा घेतो. थोड्या वेळात ती जागा सूजते, जांभळी पडते.
हॉस्पिटल डाव्या हाताला जवळच आहे. तुम्ही धावत तिथपर्यंत जाता. (कृत्रिम गुरुत्वाकर्षणाची कृपा)
हॉस्पिटलच्या गेटवर एक डिजिटल बोर्ड आहे, त्यावर लिहलंय –
‘शेवटच्या पेशंटचा मृत्यू झालाय : 0 तासांपूर्वी’

तरीपण तुम्ही आत जाणार असाल तर C मध्ये जा, दुसरं हॉस्पिटल शोधायचं असेल तर B मध्ये जा.

B. तुम्ही सध्या युरेनस आणि नेपच्यूनच्या मधल्या अवकाशस्थानकावर आहात. इथलं हे एकमेव हॉस्पिटल आहे. चुपचाप C मध्ये जा.
.
.
अजूनही इथेच आहात ? ? सांगितलं ना C मध्ये जा.
अच्छा… मुळात तुम्हाला हॉस्पिटलमध्येच जायचं नाही का ? मग बाहेर पडा अन तुमच्या क्वार्टर्सवर जा. स्टेशनच्या इंटरनेटवर शोधा की रंगीत किडे चावल्यावर काय करायचं. संगणक सांगेल की एकतर हॉस्पिटलमध्ये जायचं किंवा अंतिम संस्काराच्या तयारीला लागायचं.

C. चला… हॉस्पिटलमध्ये पोहोचलात एकदाचे. कानातला मळ नंतर काढा, आधी अनाऊन्समेंट ऐका :
“स्वागतम. आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. काउंटरवर क्लिपबोर्ड आहे. त्यावर तुमचं नाव टाइप करा आणि थुंकी लावलेला अंगठा टेकवा. ज्या क्रमाने पेशंट येतील त्या क्रमाने तपासले जातील. जर तुमची इमरजंसी केस असेल तर… वाट लागली, कारण सध्याचा वेटिंग टाइम आहे ६ तास.”

हाच मॅसेज डझनभर भाषांमध्ये रिपिट होतोय.

तुम्ही नाव टाइप करायला जाता. पण क्लिपबोर्डला कसलातरी चिक्कट पदार्थ लागलाय. तुम्ही ओळखता की नक्कीच शनीवरचे माकडं येऊन गेले असतील. हे अतिशय उद्धट प्राणी आहेत अन लगेच चिडतात. ते बऱ्याचदा हिरव्या रंगाचं चिक्कट कोल्ड्रिंक पीत असतात. तुम्ही रूमालाने क्लिपबोर्ड पुसता अन तुमचं नाव टाइप करता. अंगठा टेकवताच मंजुळ संगीत लागतं अन आवाज येतो :
“ धन्यवाद. तुमचा नंबर आहे २८७. वाट पाहू शकता किंवा बाहेरून फिरुन येऊ शकता. पण आल्यावर तुम्हाला रांगेच्या शेवटी फेकलं जाईल. जर इतका वेळ बसून राहणं तब्येतीमुळे शक्य नसेल तर आमच्याकडे आरामखोली सुद्धा आहे. तिथे झोपायला बेड आणि आरामदायक सर्व सेवासुवीधा आहेत. तुम्ही वेटींग रूममध्ये वाट बघणार असाल तर D मध्ये जा, आरामखोलीत जायचं असेल… तरी D मध्ये जा.
कारण अशा खोल्या आमच्या पृथ्वीवरच्या शाखेत आहेत.”

D. तुम्ही नोंद न करता घुसलेल्या पेशंटला क्लिपबोर्ड आणून देता. हा टायटनवरच्या हिऱ्यांच्या खाणीत काम करणारा बैलमानव आहे… माणसाचा आणि बैलाचा हायब्रीड. क्लिपबोर्ड देताना तुम्हाला दिसतं की त्यातून पावती बाहेर येतेय. प्रिंटींगच्या आवाजामुळे त्याच्या भक्षक प्रव्रृत्ती जाग्या होतात अन तो क्लिपबोर्ड तुमच्या पावतीसकट खाऊन टाकतो.

“सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, क्लिपबोर्ड नष्ट झाल्यामुळे पावती नंबरवरून तुम्हाला आत पाठवलं जाईल. तुमच्याकडे जर पावती नसेल तर नवीन क्लिपबोर्ड येईपर्यंत वाट पहा.” अशी सूचना ऐकू येते.
वाट पाहणार असाल तर C मध्ये जा. जर तुम्ही हुशार असाल की C मध्ये गेल्याने परत त्याच त्या गोष्टी घडतील आणि कथा पुढे जाणार नाही तर E मध्ये जा.

E. शाब्बास. तुम्ही वेटींग रूममधील गोंधळाचा फायदा घेतला आणि नर्स स्टेशनकडे नेणाऱ्या खोलीत आले. हॉस्पिटलमध्ये दोन नर्सेस आहेत. एक सुक्या बोंबिलसारखी दिसणारी पृथ्वीवरची बाई अन दूसरी युरेनसवरची डूडू.
डूडू तुमच्यापेक्षा आकाराने दुप्पट आहे, तिला एक शिंग आणि तीन डोळे आहेत. त्यांच्या भाषेत फक्त ‘अ, ब, क, ड आणि उ’ हे पाचच शब्द आहेत.

जर तुम्ही मनुष्य नर्स निवडली तर F मध्ये जा, जर युरेनस वरच्या डूडूशी बोलायचं असेल तर G मध्ये जा. उच्चार व्यवस्थित करा, तो Urenus असा शब्द आहे… Your anus नाही.

F. पृथ्वीवरची नर्स हातावरील सूज बघून तुम्हाला घरी जायचा सल्ला देईल. तुम्ही जर हा सल्ला ऐकणार असाल तर बाहेर पडा. ऐकणार नसाल तर एक रोबोट तुम्हाला उचलून हॉस्पिटलबाहेर फेकेल. वाट कसली पाहताय घरी जा. पुढच्या वेळी याल तेव्हा डूडू नर्सची केबिन निवडा.

G. तुम्ही डूडू नर्सच्या केबिनमध्ये येता आणि “अबकड अबकड उ उ ऊ” असं काहीतरी बडबडता. नशीब ती तुमच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही तिला सूज दाखवता. ती तुमच्या मानेवर बुक्की मारते… तुम्ही बेशुद्ध पडता. जाग आल्यावर दिसतं की तुमचा दुखरा हात तोडण्यात आला आहे.
तुम्हाला जर खात्री असेल की आपण बरे झालो तर Y मध्ये जा. जर कृत्रिम हात बसवायचा असेल तर H मध्ये जा.

H. इथे एक वार्डरोबो बसलेला आहे. तुम्ही “मला कृत्रिम हात बसवायचा आहे” असं सांगता. तो तुम्हाला ७० वेगवेगळे फॉर्म्स भरायला देतो. तुमचा लिहता हातच तोडल्यामुळे दुसऱ्या हाताने लिहावं लागणार. तुम्ही जर सगळे फॉर्म भरणार असाल तर I मध्ये जा, जर फक्त वरचा फॉर्म भरून “कुणाला काय कळतं” म्हणणार असाल तरी I मध्ये जा.

“इतक्या फॉर्म्सची काय गरज आहे”, “आजच्या काळात कुणी कागद-पेन वापरतो का“ असं नकारात्मक बोलू नका.
बोलल्यास तो फॉर्म आणि पेन खाऊन टाकतो.

I. इथला वार्डरोबो तुमचे फॉर्म घेतो आणि एका फोल्डरमध्ये ठेवून देतो. नंतर तो तुम्हाला एका अंडरग्राउंड हॉलमध्ये घेऊन जातो. इथे वेगवेगळ्या मशिन्स अन ऑपरेशनची साधनं आहेत. “तुमचे हे कपडे काढा अन मेडिकल गाऊन घाला” असं तो सांगतो. तुम्ही त्याचं ऐकणार असाल तर J मध्ये जा, याच कपड्यांवर वाट पाहणार असाल तर K मध्ये जा.

“कपडे कुणी पळवणार तर नाही न ?” , “गाऊन नाही सापडला तर मी नागड्याने फिरायचे का ?” असे पुणेरी प्रश्न विचारू नका.
विचारल्यास तो कपडे फाडतो.

J. हॉलमधलं वातावरण खूप थंड आहे अन तुमचा गाऊन पातळ, शिवाय तोकडा. पांघरायला काही मिळेल का हे बघायला तुम्ही मागे वळता. तिथे एक टेबल आहे, त्यावर कव्हर आहे ज्यावर रंगीत किडे रांगत आहेत… टमाट्यांच्या झाडांवर दिसले होते अगदी तसेच. तुम्ही घाबरुन खुर्चीवरून उठता. हालचालीमुळे तुमच्या गाऊनमध्ये घुसलेला किडा घाबरतो अन कडकडुन चावे घेत सुटतो.
तुम्ही किंचाळता.

किड्याला झटकून तिथून पळणार असाल तर L मध्ये जा.

K. तीन तासांनी डॉक्टरीणबाई येतात. तुम्ही तिला विचारता की कृत्रिम हात बसवून मिळेल का. ती “काही गरज नाही हो” असं काहीतरी पुटपुटते अन निघून जाते.
जर तुम्हाला तिचा नकार मान्य असेल आणि स्वतःला बरं झालेलं समजत असाल तर Y मध्ये जा, जर तिच्यामागे “ओ मॅडम, शुक शुक, ऐका ना” असं ओरडत जाणार असाल तर L मध्ये जा.

L. तुमचा आरडाओरडा ऐकून सिक्युरिटी ऑफिसर धावत येईल. हा सिक्युरिटी आठ फूट उंच बैलमानव आहे अन त्याच्या हातात भलीमोठी बंदूक आहे.

जर पळणार असाल तर M मध्ये जा, जर तुम्ही सिक्रेट कमांडो किंवा फाइट मास्टर असाल तर त्याच्याशी लढायला N मध्ये जा. तुम्हाला विश्वास असेल की तो काहीच करणार नाही तर शांततेत O मध्ये जा.

M. पळाल्यामुळे त्याच्या भक्षक प्रव्रृत्ती जाग्या होतात. Z मध्ये जा.

N. तुम्ही तुमच्याकडे असेल नसेल तेवढ्या पूर्ण ताकदीने लढता अन त्याच्याच बंदुकीने त्याच्यावर गोळी झाडता. पण तुमच्या खूप उशीरा लक्षात येतं की…

ही दोन्ही बाजूंनी गोळ्या सुटणारी बंदूक आहे.

O. खोली अंधारलेली आहे. तुम्ही एका कोपऱ्यात जाता अन छोटे दगड बाजूला सारून खाली बसता. बैलमानव खोलीत न येता बाहेरूनच हंबरत निघून जातो. तुम्ही हुश्श करता. काहीतरी हालचाल जाणवल्याने बाजूला बघता... दगडं तुमच्याकडे वेगाने येत असतात.
चावे घेतल्यावर तुम्हाला कळतं की ते दगड नसून टमाट्याच्या झाडांवरचे किडे आहेत.

उठा आणि P मध्ये जा.

P. हॉस्पिटलमध्ये थांबण्यात काही अर्थ नाही असं वाटत असल्यास R मध्ये जा, अलमाऱ्या उघडायची हौस असेल तर S मध्ये जा.

Q. इथे येण्यासाठी कथेत कुठेच रस्ता दिलेला नाही. इथे पोहोचलात याचा अर्थ तुम्ही सूचना पाळत नाही आहात. सरळ Z मध्ये जा, नाहीतर कुठेही बोंबलत फिरा.

R. इथून हॉस्पिटलबाहेर पडणारा रस्ता दिसतोय. सरळ क्वार्टर्सवर जा. स्टेशनच्या डेटाबेसमध्ये शोधा की हात अॅम्प्युट केल्याने फायदा होईल का ? संगणक सांगेल की दुखरा अवयव तोडून टाकल्याने काही नशीबवान पेशंट्सना फायदा झालाय. पण तुमचा पार्श्वभाग तुम्ही घरी कापू शकत नाही. आता हॉस्पिटलमध्ये परतूनही फायदा नाही कारण उशीर झालाय. जर तुम्हाला उत्सुकता असेल की दुसरा पर्याय निवडला असता तर काय झालं असतं तर S मध्ये जा. पण लक्षात घ्या, तुम्ही फक्त बघायला जाताय… तुमच्या नशिबात Z आहे.

S. इथे खूप सारी कपाटं आहेत, कुलुप कशालाच नाही. तुम्ही एकेक करून सगळे कप्पे उघडता. आतमध्ये मलमाच्या भरपूर बॉटल्स आहेत, प्रत्येकीवर बारीक अक्षरांत सूचना मांडलेल्या आहेत. सूचना वाचायच्या असतील तर T मध्ये जा, जर अंदाजे कोणताही मलम चोपडणार असाल तर T मध्ये जा, जर यापैकी काहीच करणार नसाल तर…..
T मध्ये जा.

T. इथल्या भिंगासमोर बॉटल धरून तुम्ही सूचना वाचता. तुमच्या दुखण्यावर अगदी रामबाण इलाज आहे हा. तुम्ही बॉटल उघडणार तेवढ्यात डूडू नर्स येतांना दिसते. तिच्या शिंगांना पॉलिश केलेली आहे.

पळून जाणार असाल तर W मध्ये जा. तिथेच काम करणारे आहात असं दाखवणार असाल तर U मध्ये जा, तिला मदत मागणार असाल तर V मध्ये जा.

U. तुम्ही काहीही केलं तरी ती तुम्हाला ओळखणारच आहे. खोटं बोललेलं तिला अजिबात आवडत नाही. लवकर पळा आणि W मध्ये जा.

V. युरेनसवरची डूडू नर्स ( तुम्ही KG मध्ये आहात का ? एकदा सांगितलं न ते Urenus आहे, Your anus नाही ) तुम्हाला उचलून ऑपरेशन टेबलवर मांडेल. तुम्ही तिला कितीही विरोध केला, अबकडउ भाषेत “ओ काकू, उ उ ऊ” असं काहीही ओरडलात, हातातली बॉटल दाखवली तरी ती ऐकणार नाही. तुमचा क्षतिग्रस्त भाग कापलाच जाईल.

तुम्हाला ‘आपण बरे झालो’ असं वाटत असल्यास X मध्ये जा, अन्यथा Z मध्ये जा.

W. तुम्ही प्रचंड जोरात धावता, धोक्याच्या कक्षेतून बाहेर पडता. पण… ऐनवेळी कशावरतरी पाय घसरून पडता. हे शनीवरच्या माकडांचं हिरवट चिक्कट कोल्ड्रिंक आहे. तुम्ही घसरत जाता आणि भिंतीवर आदळता. उठून उभे राहणार तेवढ्यात नर्स तुम्हाला पकडते अन उचलून V मध्ये घेऊन जाते. तिथे काय होणार तुम्हाला माहीत आहेच.

X. तुमच्या वाटण्याला काही अर्थ नाही. एक मुंडकं आणि अर्ध धड घेऊन तुम्ही काय करणार. Z मध्ये जा.

Y. अभिनंदन ! तुम्ही जिवंत राहण्यात यश मिळवलंय. आता फक्त डिस्चार्ज पेपर भरा म्हणजे तुम्ही घरी जायला मोकळे. फॉर्म भरत असतांना तुमचं लक्ष शेजारी बसलेल्या माकडावर जातं. हे शनीवरचं तेच माकड आहे ज्याने तुमचा क्लिपबोर्ड अन पावती खाल्ली होती. तुम्ही चेहरा हसरा ठेवून त्याला हिब्रूत शिव्या देता. Educational Videos मध्ये तुम्ही पाहिलंय की ते बिनडोक असतात.

पण दुर्दैवाने ही माकडं तुम्ही समजता तेवढे मूर्ख नाहीत.
तुम्ही शिव्या दिल्या त्याला बऱ्याच भाषा येतात… हिब्रूसुद्धा.

Z. हे शवागार आहे. तुमच्यासाठी एक पलंग रिकामा आहे.

-----------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users