खडी दाल

Submitted by योकु on 27 October, 2017 - 10:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- एक वाटी तूरडाळ
- एक मध्यम कांदा
- एक मध्यम टोमॅटो (वगळला तरी चालेल)
- २/३ हिरव्या मिरच्या (वगळल्या तरी चालतील)
- ३/४ लसूण पाकळ्या
- एक तमालपत्र
- २/३ लवंगा
- एक छोटा दालचीनीचा तुकडा
- ५/७ मिरं दाणे
- ३/४ लाल सुक्या मिरच्या (या ऐवजी चिलीफ्लेक्स/ कूटीलाल पावडर ई. वापरता येईल)
- पाव चमचा हळद
- दोन चिमटी हिंग
- मीठ
- जराशी बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

आज सकाळी पोळ्या करण्यार्‍या तैंनी भिजवलेल्या तयार कणकेच्या होत्या तेव्हढ्याच पोळ्या केल्या. पुन्हा कणिक काही भिजवली नाही. त्या पोळ्या अर्थातच कमी पडल्या असत्या. सकाळी उठून आराम्म्मात चा चा टंपाळ संपवणे, माबो, फेबु, वॉअ‍ॅ इ वर अतीमहत्त्वाची कामे करणे पेपर चा पसारा घालून वाचत बस्णे हे उद्योग नेहेमीप्रमाणे केल्यावर लक्षात आले की आज पोळ्या कमी आहेत. घाईघाईत कुकर चढवला आणि घाईतच तो ३ शिट्या देऊन बंद केला. प्रिणामी डाळ पूर्ण शिजली नाही. मग त्याचीच ही खडी दाल केली. चव फार मस्त होती म्हणून इथे देतो आहे.
तर याकरता जरा ट्सट्सशीत शिजलेली डाळ अपेक्षित आहे (पार मेण झालेली डाळ नकोच)

- कांदा मध्यम बारीक चिरावा (पातळ उभा चिरून पण चालेल)
- टोमॅटो आणि मिरच्या घेतल्या असतील तर बारीक चिरून घ्याव्या
- लाल सुक्या मिरच्या खडखडीत असतील तर मिक्सर मध्ये एकदा फिरवून जाड कूट करून घ्यावं. (मी चिलीफ्लेक्स वापरलं आहे)
- लोखंडी कढई सणसणीत तापू द्यावी
- त्यात २ पळ्या तेल घालून चिमूट चिमूट जिरं आणि मोहोरी आणि हिंग घालावा, वरचा सगळा खडा मसाला (तिखट आणि हळद सोडून) घालावा
- काही सेकंद परतून ठेचलेला लसूण घालावा
- लसूण लाल झाला की कांदा घालून परतावं
- कांदाही लाल झाला की वापरत असाल तर हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालावा
- टोमॅटो पार गळला की मग तिखट आणि हळद घालावं आणि जरा परतूघ्याव,मं
- यात आता डाळ घालावी आणि मीठ घालावं
- हवंच असेल (पार कोरडं असेल) तर पाव/अर्धाकप पाणी घालावं
- एक दणदणीत उकळी आली की आच बंद करून दुसर्‍या एखाद्या भांड्यात काढून घ्याव
- वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमच खायला घ्यायची ही खडी डाळ
- साधी पोळी, पराठा यांबरोबर मस्त लागते

वाढणी/प्रमाण: 
दोन लोकांना पुरावी
अधिक टिपा: 

- सगळा खडा मसाला मिनिटभर मावे मध्ये मिनिटभर गरम करून पूड करूनही वापरता येईल
- संपूर्ण कृतीमध्ये गॅस ची आच दणदणीत हवी म्हणून आधीच सगळी तयारी ठेवावी. सणसणीत तापलेल्या लोखंडी कढईत / जाड बुडाच्या पितळी पातेल्यात एकापाठोपाठ एक जिन्नस फटाफट तळसायचे
- लोखंडी भांड्यात केली तर आठवणीनं दुसर्‍या पातेल्यात/भांड्यात काढायला विसरायचं नाही. नाहीतर मस्त पिवळसर रंग काळपट होईल.
- मुळात आधी जास्तवेळ करून ठेवू नयेच
- गूळ/साखर इ चव म्हणून घालू नये
- यात आलं वापरायचं नाहीये
- फार काही वेगळा प्रकार नाही पण मस्त खमंग आहे चवीला

माहितीचा स्रोत: 
सुचलं तसं करत गेलो
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैचित्र आहे ते .

मला अशी कमी शिजलेली तुरीची डाळ फार आवडते. पण या रेसिपीनं मसुराची खडी दाल जास्त छान लागेल असं वाटतंय.

मस्त रेसिपी.

मी पण करते अशी बोटचेपी शिजवलेली डाळ . भाकरी बरोबर पण क्लासच लागते.

फोटो कुठाय?

तुझी दाल तड्का रेसिपी तर ऑल टाईम फेव्हरिट आहे माझी. आता ही पण करून बघते एकदा

मस्तच. मी करते. धनेजिरे पा वडर घालते. तुपात फोडणी करते आणि खूप सारी कोथिम्बीर ताजी. बरोबर सुरती कोलमचा भात. किंवा जिरा राइस.

नका हो (बनवाबनवीत ला अशोक सराफ style ने) नका अशा आमच्या आवडत्या पण राजेशाही (कांदा टोमॅटो कोथिंबीर Wink ) रेसिपी टाकून काळजाला घरे पाडू... Proud