पुराणासाठी वांगी - (विनोदी धागा)

Submitted by नानाकळा on 26 October, 2017 - 11:13

प्रस्तुत लेखन कोणे एकेकाळी सोमरसाच्या अतिशुद्ध मुग्धतेत रातराणीच्या सुगंधासारखे अवचित अवतरलेले, फार किस पाडू नये. Happy

१. आपली चिंचोके, कवळ्या, काचेचे तुकडे, क्रिकेटरचे फटूवाले कूपन ठेवायची जागा अपोजिट पार्टीला सांगतो म्हणून रावणाने बिबिषणाला ल्हानपणीच पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला होता पण ऐनवेळी आई आल्याने तो वाचला आणि पुढे हा मेला. कुंबकरनाने लय बोर्नव्हीटा एकदम पेली. तर तो एकदम म्होटा झाला. एकदम लय भूक लागली, एकदम जेवला, एकदम लय झोप आली. येकदम झोपला का उटाचं नाव नाय म्हाराज्या. डायरेक दुपारच्या टायमाले भाऊ हिडो गेम खेलते बगून उटून बसला. अन मी बी खेल्तो म्हनून मांगं लागला. पन अपोजिट पार्टीनं लवकर त्याचा गेम केला.

२. कृष्णाने अयोद्धेस सर्वप्रथम राममंदीर बांधले पण बाबर ला तेचे डिजाइन न आवडल्याने त्याने त्याचीच मर्जी पुरी केली. मर्जीचा अपभ्रंश शतकानुशतकांत मर्जी >> मर्जीत > मलजीत > मज्जीत > म्हशीत > मशीद असा झाला. मशीदीच्या भिंतीवर म्हशी शरयुच्या पाण्यात डुंबत असल्याच्या शिल्पाचा फटू गुगल-उत्खननात सापडलेला हाये. त्यावरून शिद्ध होते की तिकडे कसल्यातरी भिंती होत्या.

३. सीतेचं बगून उर्मिलापन लक्ष्मणाला म्हणाली, 'मी बी येते तुमच्यासंगं हनिमूनला', ह्यावर लक्ष्मण म्हणाला, 'प्रिये, तु आई-बाबांची काळजी घे अन उपवास कर. आपल्याकडं पैकं नाय सद्या.' यावर क्रूद्द होउन भरत आजोबांकडे निघून गेला. शत्रूघ्न नंतर खासदार होऊन कुणीच खास नसलेल्या राजवाड्यात खामोश-खामोश करत हिंडत होता. त्याला खानसाम्याने खामोश हे व्यंजन बनवून दिले नव्हते. बंगाली साँदेस सारखे खामोश हे एक उंगाली पदार्थ आहे जो तोंडाजवळ नेताबरोबर त्याचा स्वाद खमंग येतो.

४. भगिरथाला खूप तहान लागल्याने त्याच्या गुरुने त्याला कमंडलूतलं गंगेचं नेचरली प्रीझर्व्ड वॉटर दिलं. त्याला ते भारी आवडलं. त्याने आयडियाने गंगा धरतीवर आणून भगिरथ स्प्रींग वॉटर कंपनी सुरू करायची असे ठरवले. त्यासाठी देवाकडं 'पीतरास मोक्षप्राप्ती का व्हईना, म्हनुनशान वाईच गंगा हिकळं पाटवा मंजे कसं...' असा सांगावा धाडला. त्याच्या कपटाला भुलून देवलोकीची गंगा पुरुथवीतलावर अवतीर्न झाली. त्याच्या आदीच मंत्र्याला धंद्यात परसेंटेज देऊन शंकराने तीला आपल्या बॉटलींग प्लान्ट मधे आणून हिमालयन स्प्रींग वॉटर विकायला सुरुवात केली. पन शेवटी गंगेला धरतीवर आनायची कल्पक उद्योजकता भगिरथाने दाखवल्याबद्दल गंगेचे नाव भगिरथी करून तीला सन्मानित करण्यात आले.

५. गाईचं लेकरू आपल्या पोराच्या रथाखाली मेलं म्हणून आपलं पोरगं गायीच्या रथाखाली मारलं पाहिजे असं येका न्यावप्रीय व गायीला माता माननार्‍या राजास्नी वाटलं. म्हणून त्यानं कसायाकडे चाललेल्या गाईंनी भरलेला रथ पोराच्या अंगावरून जाऊ देल्ला ना बाप्पा. मनून मंतेत की गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू आलं तर आपल्याले तक्लीप होते की नाई. तो गायीचा रथ कुठे गेला हे तो विचारायचं विसरला.

६. आपल्या बापाने फॅमिली प्लाणींग केले असते तर आपल्याला हे एवढं मोठं राज्य आपल्या भावड्यांसाठी राखून ठेवायला इतकं युद्ध करावं लागलं नसतं असं दुर्योधनाने म्हटल्याचं दुर्योधन बत्तीशी या ग्रंथात भीमाने लिहून ठेवले. त्याकाळात लोकसंक्या कंट्रोल करायला युद्ध हाच एकमेव मार्ग आहे असे युधिष्टीरानी सांगीतल्याचं संजय गांधी यांनी धृतराष्ट्राला सांगीतले. आपल्याच गावात येवडी लोकसंक्या असतांना आपल्या भावाने भायेरची पोरगी बायकू म्हनून आनलीच कशी, त्याला आपल्याकडं बाय्कू भेटली नसती काय या गहन विचारात असतांना पुष्पकविमानाचे कंट्रोल्स सुटून त्यांचा त्या अपघातात मृत्यु झाला. त्यांचे पुष्पकविमानाचे मागचे पंख अचानक बिघाड झाल्याने इंडीकेटर तुटल्यासारखे लटकत होते. तेवढ्यात राजेश पायलटची मनस्थिती ठीक नसल्याने गतिज उर्जा कमी पडून विमान क्षितीजाला समांतर र्‍हाण्याऐवजी जमीनीच्या हिरव्या भागाकडे रोख करून वेगात जात होते. अचानक हवेतच स्फोट होवून आकाशात भगवा प्रकाश पसरला आणि विरून गेला. जमिनीवरची हिरवळ वाचली आणि फोफावली.

७. शंकराचे तिसरे नेत्र हा अक्चुअलमदी सीसीटीवी कॅमेरा असुन आपले हिडु काडून इंद्रीयनेत्र नावाच्या राक्षसाच्या धमन्यांत भरतो. त्यात आपले चांगले फोटू काहून येत नाय म्हणून पारबतीने अग्नीकुंडात उळी मारली. तीला होमातून काळून शंकर लयी गाव हिंडला. ज्याच्या त्याच्या डोक्याले लयी ताण देव लागला. पुळे त्याला लोक 'लय ताण देव राहिला बे' असं बोलू लागले. त्याचा अक्ख्या पंचक्रोषीत नुसता ताण्डव करतो म्हणून नाव खराब झाला. तो इंद्रीयनेत्र आज भयंकर वाड्ला असून अर्द्या पब्लीकले त्यानं बंदी बनोलं हाय. तो मोहीनी अवतार घेऊन माधुरी धकधकशीत आली, पन तेजाबायला, काहीच झाला नाय.

८. कुंतीचे पाचही पुत्र आपल्याला कुरूंसारखा वारसा नाही म्हणून सारखे तळमळत असत. मग त्यांनी धृतराष्ट्राचाच दगडाचा पुतळा बनवला आणि त्येची पुजा करू लागले. तो आपलाच पुर्वज आहे म्हनून सांगू लागले. हे बगून कौरव खवळले. ते म्हनले आम्ही हे राज्य बनवन्यासाठी खूप मेहनत घेतली यावर तुमचा काय हक्क? यावर ते पांडव म्हनायले की आता लोकशाई हाय बाबू, लोक शाई लावून तुमाले घरी पाटोतेत की नायी बग. पन शेवटी विजय लढायीच्या मैदानावरच झाला पाहिजे असं ठरलं, नाहीतर ते कृष्णबाबा आपली मन की बात कुठं सांगतील? इसीलिये मित्रों, मैं केहता हुं की ते अठरा अध्याय सांगन्यासाठीचा माहौल म्हणून ते चाळीस लाख मतदार जमा केले आन मारले. ते प्रवचनानेच मेले म्हनतात. कारण त्या प्रवचनात पाशुपातास्त्र, नारायणास्त्र वैगेरे अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा उल्लेख गिरीधराने केला. ते सर्व खरेच आहे असे वाटून भीतीन गारठून मेले मंतेत लोक.

९. एका धोब्याची बायको प्रियकराबरोबर पळून गेली. मग परत आली. तर तो तीला घरात घेईना. लोक बोल्ले, 'अबे असा काऊन करतं?' तर त्याने म्हटलं 'रामानं घेतली सीतेले घरात म्हणून मी पण घेऊ काय?' तर लोक विचारते झाले 'अरे पन हा राम कोन होय? त्यानं सीतेले काऊन घरात घेतलं?' तेव्हा पासून लोक विचारतात, की 'रामाची सीता कोन?" त्याचं उत्तर देता देता २४,००० श्लोकांचं एक ग्रंत झाला पन थे रामाची सीता कोन व्हय ते काय पत्ता लागत नायीय्ये बॉ. आता तर लोकं धोब्यालेच रामाची कता सांगतेत अन म्हणते बायको गेली तर एकांदं माकळ पाय कुटं भेटते काय ते. त्या धोब्याले गाडवाचा उपेग म्हाईत, हे माकळाचं बायकोशी काय संमंद ते काय त्याच्या डोक्यात घुसंना. त्याचा अर्थ समजून घ्यायाले तो किर्तनात बसू लागला. अन मग लोक अहिल्या प्रकरणावर तावातावाने चर्चा करु लागले. ते माकळाचा प्रश्न इचाराव काय किर्तनकार महाराजले असं म्हणून तो महाराजाकडं गेला. महाराज म्हणले, "डाव्या अंगठयाचा ठसा दे, नाडीभविष्य बघून सांगतो."

या नऊही पदार्थांना निट कुटून शिजवून गरम गरमच संस्कृतीच्या वाटीत वाढा आणि चघळून संपेपर्यंत चर्चेचा चमचा ढवळत राहा. तो आमचा मसाला घालू नका. चव बिघडेल. शाकाहारी लोकांनी अंडं घालून करू नये. इतरांनी घातलीत तेवढी पुरे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. सगळ्याच कथा मस्त आहेत. नेमकी कुठली पुढे न्यायची तेच कळत नाहीय. जबरी!

सगळ्या वाचल्या नाहीत पण जेवढया वाचल्या तेवढया मस्त आहेत.

उर्मिलेला हनिमूनला नेले नाही म्हणून भरत स्वतः आजोळी का गेला ते कळले नाही...भावाची बायको कम त्याची मेव्हणी त्रास देईल ही भीती वाटली का त्याला?

नानाकळा, भारी कथा सगळ्या.
सोमरसाची अतिशुद्ध मुग्धता प्रत्येक कथेत वाक्यावाक्याला दिसली बरं. Happy
संस्कृती नुसती बालगुडतेय आय मीन बागडतेय Happy
आता ह्या वांग्यांचं भरीत कधी व्हायचं?