फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - घाटीच्या वाटेवर...

Submitted by साधना on 23 October, 2017 - 10:35

आधीचा भाग : https://www.maayboli.com/node/64214

दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता दारावर थाप पडली, बेड टी साठी. मी बेडमधूनच ओरडून नको म्हणून सांगितले. उठायचा कंटाळा आलेला पण एकदा जाग आल्यावर उठून बसलेच. साडेसात वाजता निघायचे होते. मी मग गरमागरम पाणी आणून फ्रेश झाले, मुलींना उठवून तयार व्हायला भाग पाडले. हे रोजचे काम लागलेले माझ्या मागे. पोरी ट्रेकला आलेल्या की कुंभकर्णासारखे डाराडूर झोपायला देव जाणे. रोज मला भूपाळ्या गाव्या लागायच्या. तयारी झाल्यावर आम्ही सगळे नाश्ता करून, पॅकेड लंच घेऊन सवासातला खाली गोळा झालो पण गुजराती मंडळाचा पत्ता नव्हता. शेवटी महेश वर जाऊन आल्यावर मंडळ आरामात खाली उतरले.

घाटीला जाणारा रस्ता सँडस्टोन टाकून बनवलेला आहे. रस्ता खूप अरुंद आहे, नीट बांधून काढलेला नाही त्यामुळे तिथे घोड्यांना परवानगी नाही. चालत जायचे नाहीतर पिट्टू, पालखी इत्यादी पर्याय आहेत. पिट्टू म्हणजे खुर्चीत माणसांना वाहून नेणारे नेपाळी पोर्टर . ते माणसाला वेताच्या खुर्चीत बसवून ती खुर्ची पाठीवरून वाहून नेतात. माझ्यासारख्याना हातात काहीही सामान नसताना चालणे कठीण होते तिथे हे लोक पाठीवर 100 किलोचा बोजा लीलया पेलुन नेतात. चालताना एका लयीत चालत राहतात, आपल्यासारखे सुरवातीला सुसाट राजधानी आणि मग कुर्डुवाडी मेल असे चालणे नसते त्यांचे.

आम्ही घाटीला जाणार हे कळताच घोडेवाले बाजूला झाले व पोर्टर जमले. एक दोघांना भाव विचारले. शेवटी एकजण जाऊन येऊन 3,000 म्हणाला. उगीच भाव करत बसणे मला योग्य वाटले नाही. ज्याने हा सौदा ठरवला तो दुसऱ्या पोर्टरला घेऊन आला आणि हा घेऊन जाईल म्हणाला. पण स्वतः तोही बरोबर चालायला लागला. मला पिट्टू करायचा आग्रह करायला लागला. मी त्याला निक्षून नकार दिला तरी त्याने आमची पाठ काही सोडली नाही. मी त्याला जायला सांगितले तरीही हटेना. शेवटी मी म्हटले ये बाबा, सोबत यायचे तर ये, तुझी मर्जी. मी काही ठरल्यापेक्षा जास्त पैसे देणार नाही.

घागरियातून वरच्या दिशेने गेले की पुढे 2 रस्ते लागतात. खालून आला तितकाच मोठा आणि दगडात बांधून काढलेला रस्ता तसाच सरळ वर हेमकुंडला जातो. त्याच रस्त्याला एक डावा फाटा फुटतो जो घाटीत जातो. हा रस्ता खूप चिंचोळा आहे. सुरवातीला तर चालवणार नाही इतके गोल गुळगुळीत लहानमोठे दगड रस्त्यात आहेत. पिठठू पण या रस्त्यावरून सवारी नेत नाहीत. जरी खालूनच पिठठू केला तरी घाटीच्या ऑफिसपर्यंत आपल्याला चालावे लागते या त्यानंतर पिठठूस्वारी. तर त्या रस्ता म्हणता येणार नाही अशा रस्त्यावरून कसेबसे पुढे गेले की घाटीचे ऑफिस लागते. तिथे पास घ्यावा लागतो जो तीन दिवस चालतो. आमचा पास yhai ने काढला पण ऐशूच्या पोर्टरचा पास मला काढावा लागला. हॉटेलमध्येच आम्हाला आमचा गाईड अंशुल भेटलेला. त्याने इथे ऑफिससमोर उभ्या उभ्या आमची मिटिंग घेऊन कुठल्याही फुलाला हात लावू नका, वास घेऊ नका व तोडू नका, फुले विषारी असतात म्हणून सांगितले. अर्थात मी फुले तोडणार नव्हतेच पण सरसकट सगळी फुले विषारी नाहीत हे मला माहित होते.

ऑफिसच्या बाहेर घाटीत कुठल्या महिन्यात कुठली फुले फुलतात याचा बोर्ड लावलेला. बोर्ड थोडा सुस्थितीत व वाचता येईल असा ठेवायला काहीच हरकत नव्हती. ऱ्होडोडेंड्रोन म्हणजे बुरांश, मे मध्ये फुलतात हे वाचून अचानक ट्यूब पेटली. गोविंदघाटातून घागरियाला येताना वाटेत काही झाडे पाहिलेली ज्यांची पाने खूप ओळखीओळखीची वाटत होती पण नाव लक्षात येत नव्हते. ती सगळी ऱ्होडोडेंड्रोन होती. या झाडाची पाने नेहमी आता आपण गळणार की काय या चिंतेत आधीच खाली मान टाकून असतात. एवढी चिंता करूनही पाने गळत नाही ती नाहीच.

हा रस्ताही नेहमीसारखा एक बाजू डोंगर व दुसरी बाजू दरी असा सजला होता. दुतर्फा भरपूर फुले फुललेली होती. आमचा पिठठू आमच्यासोबतच अतिशय हळू हळू पण एका लयीत चढत होता. मध्ये मध्ये उंच बाकासारख्या जागा केलेल्या आहेत, तिथे पाठीवरची सवारी उतरवून थोडा आराम करता येतो.

अवघड रस्त्यावरून जाताना हा दुसरा पोर्टर माझा हात धरून नीट सांभाळून नेत होता. नेपाळची माहिती देत होता. त्याच्या मते नेपाळला इथल्यापेक्षा जास्त सुंदर फुले आहेत पण तिथे जायची, राहायची काहीही सोय नसल्याने पर्यटक त्या फुलांपर्यंत पोचू शकत नाहीत. पोटापुरते धान्य पिकवण्याइतपत शेती त्याच्याकडे होती पण त्याव्यतिरिक्त जगायला जे काही लागते त्यासाठी लागणारा पैसा कमावण्याची फारशी साधने तिथे नसल्याने त्याला भारतात यावे लागत होते. त्याला इथले काहीही आवडत नव्हते, इथली कोंबडीदेखील त्याला उकडलेल्या बटाट्यासारखी लागत होती पण करणार काय? गेली कित्येक वर्षे नेपाळ सरकार झोपेत होते, आताचे सरकार बरे आहे, काहीतरी चांगले होईल यावर त्याचा विश्वास होता.

चालता चालता त्याच्याकडून अजून बरीच माहिती मिळत होती. घाटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांवरच यांचे पोट अवलंबून असते. सिजनमध्ये रोज साधारण किती पर्यटक येतात विचारल्यावर कधी दिवसाचे 200 -300 पर्यटक असतात तर कधी चार पाच सुद्धा नसतात म्हणाला. घाटी खूप उंचीवर असल्यामुळे इथे कधी पाऊस पडेल त्याचा भरोसा नसतो. आम्हालाही दुपारी 2 पर्यंत परतीचा रस्ता धरा म्हणून सांगितलेले कारण त्यानंतर कधीही पाऊस कोसळू शकतो. आमचे नशीब जोरदार असल्याने आम्ही तिथे असताना लख्ख ऊन होते. पाऊस जास्त पडतोय असे वाटले तर घाटी बंद करतात. हेमकुंडला मात्र कितीही पाऊस असला तरी जाता येते. असा पाऊस असला की पोर्टर बसून राहतात. हेमकुंडला जाणारे बहुतेकजण घोड्याचा पर्याय निवडतात.

हे सगळे ऐकून घाटीला जायचा रस्ता नीट का नाही करत? सुरवातीला इतके दगड पडलेत ते नीट करायला काय जाते? रोपवे सुरू करणे शक्य आहे का? वगैरे विचार माझ्या मनात आले. उत्साहाच्या भरात सरकारला दोन चार शिव्या घातल्यानंतर माझा मूर्खपणा माझ्या लक्षात आला. तिथे जाणे जर सोप्पे झाले तर त्याचे कासचे पठार नाही का होणार? माणसाचा पाय जिथे पडतो तिथल्या निसर्गाचा सत्यानाश होतो हा इतिहास नसून वर्तमान आहे. त्यामुळे घाटीला जाणारा रस्ता असा दुर्गम असण्यातच घाटीचे भले आहे.

या रस्त्यावर वाटेत कुठेही चहाची टपरी वगैरे काहीही नाही. असे काही थाटण्याइतपत मोकळी जागा घाटीच्या रस्त्यावर कुठेही नाही.

'कोणीतरी अंगरेज बाई इथे रोज यायची, तिनेच घाटी शोधली' असे बऱ्याच वर्षांपासून ऐकून होते. कालांतराने 'बाईने शोध लावला नसून कोणी बुवा इथे वाट चुकून आला त्यामुळे बाईला कळले' ही भर त्यात पडली. मीही याबाबत फारसे खोलात गेले नव्हते. पण इथे आल्यावर इथला जंगली वृक्षांनी वेढलेला, जरा पाय घसरला तर थेट स्वर्गारोहण घडवणारा रस्ता बघितल्यावर या सगळ्या गावगप्पा असणार असे वाटायला लागले. कोणीही सामान्य बुद्धीचा माणूस या रस्त्यावर चुकून आलाच तर आपण वाट चुकलोय हे तात्काळ त्याच्या लक्षात येईल व तो मागे फिरेल.

म्हणून मग नेटवर शोधाशोध केली तेव्हा कळले की 1931 साली कामेत शिखर सर करून परतणारे तीन ब्रिटीश गिर्यारोहक वाट चुकून घाटीत उतरले व हा फुलांचा खजिना त्यांच्या हाती लागला. म्हणजे ते मी आता जात होते त्या रस्त्याने वर गेले नाहीत तर वर असलेल्या फुलांच्या मोकळ्या पठारावर ते त्याही वरच्या बाजूने उतरले. या पठारावरील पुष्पसंपदेच्या प्रेमात पडून त्यांनी याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नाव दिले. त्या गिर्यारोहकांपैकी एकाने या घाटीवर पुस्तकही लिहिले. 1939 साली इंग्लंडच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनने घाटीवर संशोधन करण्याचे ठरवले. जोन मार्गारेट त्यानिमित्ते इथे आली. घाटीत संशोधन करत असताना पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. तिची बहीण त्यानंतर इथे आली व तिने घाटीत जोन मार्गारेटचे एक स्मारक उभारले. 1939 साली आजच्या मानाने काहीही सुविधा नसताना या दोघी मुली इतक्या प्रतिकूल हवामानात घाटीत जा ये करत होत्या हे वाचून विस्मित व्हायला झाले. कामात रस असला की कुठल्याही अडथळ्यांची क्षिती वाटत नाही हेच खरे!

IMG_20170818_133322851~01.jpg

काल आम्ही घागरियासाठी चढत होतो तेव्हा एक तरुण विदेशी जोडपे आमच्यासोबत चढत होते. या विदेशी लोकांची खरेच कमाल असते. पाठीवरच्या सॅकमध्ये ढिगानी सामान भरून ते आरामात फिरतात. ह्या जोडीला कुठेही जायची घाई नव्हती. घागरियाच्या वाटेवर ते अधून मधून दरीत पाय सोडून निवांत बसलेले पाहिले होते. आताही ते आम्हाला ओलांडून पुढे निघून गेले. 'अब ये सिधे अंगरेज के कबर पे जायेंगे' इति पोर्टर.

घाटीसाठी चढत असताना त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या हेमकुंड साहिबला जाणारा रस्ता दिसत राहतो. 'वो उप्पर गेटजैसा दिख रहा है ना, बस उसके आगे है थोडासा' पोर्टर ने रस्ता दाखवून ज्ञानदान केले. ते बघून उद्याचा दिवस खूप कठीण आहे याची मनाने नोंद केली. तो निसर्गनिर्मित तथाकथित गेट डोंगराच्या टोकाला होता आणि तिथे जाणारा रस्ता V शेपमध्ये दिसत होता. V चे पुढचे तंगडे किती चढाचे आहे दिसते ना डोळ्यांना? बस तो रस्ता तसाच दिसत होता. रस्त्याला कठडे म्हणून पांढऱ्या-लाल पट्ट्या लावलेल्या, त्यामुळे इतक्या लांबूनही रस्ता ओळखू येत होता. उद्या पायी चढाई अशक्य ही खूणगाठ तिथेच मनाशी बांधली.

वाटेत फुलेच फुले जरी असली तरी उंच गगनाला भिडलेली झाडेही भरपूर होती. खरेतर झाडे भरपूर होती असे म्हणणे चूक आहे. आम्ही जंगलातल्या पायवाटेवरून चालत होतो हे म्हणणे जास्त बरोबर आहे. आणि जंगलात झाडे नसली तर ते कसले जंगल? पक्ष्यांचे आवाज भरपूर येत होते पण बुलबुल व दयाळ हे नेहमीचेच आवाज मला ओळखता येत होते. बाकी इतर पक्षी ओळखायचे कान व पहायची दृष्टी मला अजून लाभलेली नाही. शहरात मला पक्षी भेटतात पण जिथे भेटायला हवेय तिथे नाही भेटत.

झाडांमध्ये भूर्जपत्राची म्हणजे इंडियन बर्चची झाडे भरपूर दिसली.

IMG_2858~01.jpg

देवदाराची झाडेही भरपूर दिसली. देवदार इतके उंच वाढतात की बुंध्याला चिकटून वर पाहिले तरी टोक दिसणे अशक्य.

IMG_3452~01.jpg

घाटीतल्या फुलांचे फोटो पाहिलेले तरी घाटी नेमकी कशी दिसते याची मला फारशी कल्पना नव्हती. अजून किती चालायचे आहे म्हणून पोर्टरला अधून मधून विचारत होतेच. चालता चालता त्याने ती बघा घाटी म्हणून एका विस्तीर्ण पठाराकडे काठीने निर्देश केला. समोर खूप लांबवर पूर्ण हिरवेगार पठार दिसत होते.

IMG_20170818_095318513~01.jpg

ये है घाटी?

हा, यहीसे शुरू होती है।

IMG_20170818_100139115~01.jpg

'अरे हे तर हिरवे पठार दिसतेय, फुलांचा मागमूसही दिसत नाहीये, याच्यासाठी का इतकी पायपीट करतेय मी? उगीच हाईप केलीय बहुतेक ही जागा' हे सगळे विचार एका मागोमाग एक मनात येऊन मी बरीचशी निराश झाले.

ह्या पठारावर काय दिसणारे एवढे? उगीच लोक काहीही लिहितात आणि आमच्यासारखे मूर्ख धावत सुटतात... असले काहीबाही मनात येत होते.

IMG_20170818_100132107_HDR~01.jpg

वर जे दिसतेय त्याचा थोडा जवळून फोटो. इथे फुलांची गर्दी होती जी नंतर जवळ गेल्यावर लक्षात आली.

IMG_20170818_100123696~01.jpg

इतनीही है क्या घाटी? म्हटल्यावर तो म्हणाला की खूप मोठी आहे, इथे दिसते ती केवळ सुरवात. पुढे भरपूर मोठी आहे, एका दिवसात बघून होणार नाही.

IMG_20170818_095306146_HDR~01.jpg

बघू आता काय काय दिसते ते म्हणत मी चालत होते.

घाटी दर आठवड्यात रंग बदलते म्हणे. त्या आठवड्यात घाटीने गुलाबी व पांढऱ्या रंगाची ओढणी ओढलेली ही बातमी आम्हाला खालीच मिळालेली. त्याप्रमाणे अधून
मधून गुलाबी रंग मला लांबून दिसत होता पण बाकी हिरव्या रंगाचेच प्राबल्य दिसत होते.

IMG_20170818_100119946_HDR~01.jpg

जसजशी घाटी जवळ यायला लागली तसा फुलांचा कुंद वास आसमंतात भरलेला जाणवायला लागला. फुलांच्या वासाने मला नेहमीच ताजेतवाने वाटते. अब तो आ गयी घाटी पोर्टर म्हणाला. समोर पाहिले तर लांबवर एक उंच दगड दिसत होता व त्याच्या सावलीत उभी राहून शामली 'आत्या, आत्या' म्हणून हाका मारत होती. ह्या दगडाला पोर्टर घाटीचे गेट म्हणत होते. घाटी इथून सुरू होते.

IMG_20170818_100137212_HDR~01.jpg

आमचा पूर्ण ग्रुप तिथे बसलेला दिसला. आजूबाजूला पोर्टर लोक आराम करत होते. पिट्टू व पालखीतून आलेले लोक तिथे उतरून पुढे घाटी बघायला गेले होते, त्यांचे पोर्टर झोपा काढत होते.

IMG_20170818_133212695~01.jpg

लाल दिसतेय ती पालखी. 1 आकडा लिहिलाय तिथे बसायचे, मागे दोन पोर्टर व पुढे दोन पोर्टर. याचे दिवसाचे भाडे 10,000 पासून पुढे, सवारी किती जड त्याप्रमाणे. बाजूला दिसतोय तो पिट्टू म्हणजे वेताची खुर्ची.

तिथे बसून आम्ही डब्बा खाल्ला. ते काम झाल्यावर महेश व अंशुलने सगळ्यांना एकत्र करून 'ज्यांना नदीकिनारी यायचंय, त्यांनी माझ्यासोबत या' जाहीर केले. महेश गेल्यावर्षी घाटीला येऊन गेलेला, त्याला यंदा नदीकिनारी जाण्यात रस होता. ग्रुप गेला उडत असे बहुतेक मनाशी बोलत तो, अंशुल, शामली, हरयाणवी मित्र, नूपुरा, अशोक वगैरे सगळे भराभर चालत पुढे गेले. आम्हाला त्या वेगाने जाणे जमले नसते व तसेही आरामात चालत जितके दिसेल तितके पहायचे हे उद्दिष्ट मनात आधीच ठरले होते. ग्रुपपैकी गुजराती व बेंगलोरी मंडळे कुठेही दिसली नाहीत. बाकी सगळे दिसले.

ऐशू ज्याच्या पाठीवरून आलेली तो पोर्टर आम्ही पोचल्यावर लगेच जमिनीवर आडवा झाला. खूप दमलाय का म्हणून विचारले तेव्हा त्याला सर्दीने ताप आल्याचे कळले. औषध वगैरे काय घेतले का विचारल्यावर, काही नाही उत्तर मिळाले. त्याला सॅरिडॉनच्या 2 गोळ्या दिल्या. मग आमची स्वारी घाटीकडे वळली.

लांबून पाहिल्यावर हिरवे पठार वाटणारी घाटी जवळून काही वेगळीच दिसत होती. असंख्य फुले फुललेली होती, त्यांचा एकत्रित धुंद वास आसमंतात भरला होता आणि आपण स्वर्गात आहोत असा भास होत होता. याआधी फक्त प्रदर्शनातुन विविध फुले मी एकत्र पाहिली होती. पण नैसर्गिकरित्या फुललेली, तरीही इतके वैविध्य असलेली फुले मी पहिल्यांदाच पाहत होते. दूरवर नजर टाकली तर फुलांच्या भरगच्च ताटव्यातून बांधून काढलेली नागमोडी पायवाट, दुतर्फा मी-मी करत डोके काढणारी गच्च फुलझाडे, अधून मधून वाहता झरा इत्यादी सिनरी दिसत होती. स्वर्गाचे तिकीट मिळालेच तर तिथे काय दिसेल याची झलक मला दिसत होती.

घाटी पहिल्यांदा पाहिल्यावर मनात आलेल्या विचारांचा आता कुठे मागमूसही उरला नव्हता. नव्या उत्साहाने मी व माझ्यामागून ऐशूने घाटीच्या पायवाटेवर पाऊल टाकले.

IMG_20170818_110823580~01_1.jpg

घाटी:
IMG_20170818_112856538~01.jpg

गच्च गालिचे वाटावेत :

IMG_20170818_112900470~01.jpg

अजून काही फोटो:

हा फोटो मोठा करून पाहिल्यास खाली एक स्त्री दिसेल. तो पॉईंट अतिशय सुरेख होता, मी तिथे अर्धा पाऊण तास बसून पाण्याचा खळखळाट ऐकत होते. याचा विडिओही अशे, तो अपलोड करून खाली लिंक देते. घाटीत असे नयनरम्य नजारे ठिकठिकाणी आहेत. उगीच हावरटासारखे सगळे बघत फिरण्यापेक्षा जागोजागी मन भरेपर्यंत थांबून सगळे डोळे भरून पहाण्याकडे आमचा कल होता. अर्थात त्यामुळे बरेच पाहायचे राहिले पण जे पाहिले ते मनावर कायमचे कोरले गेले. डोळ्यांसमोर आपोआप विडिओ फिरत राहतो.

IMG_20170818_124923667~01.jpg

एका वळणावर गुजराती मंडळातली एकजण दिसली. ट्रेक सुरू झाल्यापासून ती मोबाईल एकतर हातात धरून नाहीतर स्टिकवर चढवून सेल्फी काढण्याच्या पोझमध्ये फिरत असताना दिसायची. तिला सगळ्यांनी सेल्फी क्वीन नाव ठेवलेले. तिला इथे बसून मोबाईल समोर बडबड करताना पाहून अचानक माझी ट्यूब पेटली. ती ट्रॅव्हलॉग रेकॉर्ड करत होती.

IMG_20170818_121344919_HDR~01.jpg

दूरवर दिसणारी बर्फाच्छादित पर्वतशिखरे

IMG_2877~01.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो लवकर टाकले नाहित तर आम्हाला पण "उगीच हाईप केलीय बहुतेक ही जागा' हे सगळे विचार एका मागोमाग एक मनात येऊन मी बरीचशी निराश झाले. ह्या पठारावर काय दिसणारे एवढे? उगीच लोक काहीही लिहितात आणि आमच्यासारखे मूर्ख धावत सुटतात" हे म्हणायची वेळ येईल Happy

वा साधना हाही भाग सुंदर. आता उत्सुकता लागली आहे फुलांचे फोटो पहायला. लवकरच पुढचा भाग येऊदे.

असामी, थोडे फोटो चढवलेत, अजून बरेच आहेत चढवायचे.
साईज कमी करून चढवावे लागतात त्यामुळे वेळ लागतो.

फोटो पाहून तुमची निराशा थोडी दूर होईल ही आशा। Happy Happy

साधना, तुमची लिहिण्याची शैली मस्त आहे.जणू तुमच्याबरोबर आपणही चालत आहोत असे वाटू लागते.इतके डिटेल्स लक्षात ठेऊन लिहिणे ग्रेट आहे.

साधना जबरी लिखाण आहे. मजा आली वाचतांना. वर्णन अतीशय सुरेख आहे मनमोकळे आहे. खालचे वाचुन जाम हसले.

<<<<<<<<कोणीतरी अंगरेज बाई इथे रोज यायची, तिनेच घाटी शोधली' असे बऱ्याच वर्षांपासून ऐकून होते. कालांतराने 'बाईने शोध लावला नसून कोणी बुवा इथे वाट चुकून आला त्यामुळे बाईला कळले' ही भर त्यात पडली. >>>>>>

<<<<<<< सगळे ऐकून घाटीला जायचा रस्ता नीट का नाही करत? सुरवातीला इतके दगड पडलेत ते नीट करायला काय जाते? रोपवे सुरू करणे शक्य आहे का? वगैरे विचार माझ्या मनात आले. उत्साहाच्या भरात सरकारला दोन चार शिव्या घातल्यानंतर माझा मूर्खपणा माझ्या लक्षात आला. तिथे जाणे जर सोप्पे झाले तर त्याचे कासचे पठार नाही का होणार? माणसाचा पाय जिथे पडतो तिथल्या निसर्गाचा सत्यानाश होतो हा इतिहास नसून वर्तमान आहे. त्यामुळे घाटीला जाणारा रस्ता असा दुर्गम असण्यातच घाटीचे भले आहे>>>>>>>>+१२३४५६७८९

भारतीय पर्यटक फार नालायक. जिथे जातील तिथे घाण करतात. साधना, तुझा व तुझ्या गृपचा तसेच मायबोलीकरांचा अपवाद आहे याबाबतीत. निदान आपण सुज्ञ झालोत/ आहोत. बाकी काय करतात ते जगाला माहीत आहेच. फोटो मस्त आलेत. अजून असतील तर टाक.

एक नंबर चाललीये मालिका, मज्जा येतीये वाचायला
तुमच्या सोबत आम्हीही हा ट्रेक करतोय असे वाटत आहे.
घाटीचा लांबून फोटो पाहून मलाही अरर झालं, पण मग जवळ गेल्यावर भारी वाटले.

बेजबाबदार पर्यटकांच्या मुद्द्याला +१०००

छान! साधना, तुझी लिहीण्याची स्टाईल मस्त आहे.

पण प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आतापर्यंत जे जे फोटो बघितले आहेत व्हॅली ऑफ फ्लॉवर्स त्याने अजिबात इम्प्रेस झालेले नाही. हे तुझ्या किंवा कोणाच्या फोटोग्राफी स्किल्स बद्दल नाही तर खरंच जेव्हढं हाईप ऐकलं आहे तेव्हढं फोटोंमधून पोचलेलं नाही. हिमालय खूपच सुंदर आहे आणि ते डिफॉल्ट्/बेसलाईन सौंदर्य अर्थातच दिसतं पण फूलांचं एक्स्ट्रॉ अजून दिसलेलं नाही Happy

मी ही वरचे घाटीचे फोटो बघून अजून इंप्रेस झाले नाहीये. किंवा तुझ्याबरोबर इतकी तंगडतोड करुन गेल्यावर ‘हे काय?‘ असं वाटलं ते फोटो बघून. कदाचित पुढे अजून छान फोटो येतील.
बाकी लिखाण मस्त.

हा भाग पन खुप मस्त जमलाय साधना..
ब्रावो..
प्रचिपन छानच.. आता मला पन जायची खुमखुमी आलीए..
तयारी सुरु करावी म्हणते..
खालचा पर्वतांचा फोटो मला 'विंटर इज कमींग' ची आठवण देऊन गेला.. जीओटी फिवर बाकी काय नाय..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. एकसाथ दोन भाग वाचुन काढले..

सशल, हे सौंदर्य बघायला तिथेच जायला हवं. हिमालय ही अनुभवण्याची चीज आहे. ती मजा घरबसल्या कळणं शक्यच नाही आणि अगं तू म्हणतेस तसे फोटो काढणार्‍याच्या स्कीलवर आणि खूपसं कॅमेर्‍यावर पण अवलंबून आहे नां?

तसं नव्हे आऊटडोअर्स. हा वरचा बर्फाच्छादीत पर्वतशिखरांचा फोटो बघ किंवा लेह लदाख चे फोटो किंवा कैलाश/मान सरोवराचे फोटो. ह्या सर्व ठिकाणचे अत्यंत सामान्य दर्जाचे (कॅमेरा, स्किल) फोटो बघून सुद्धा ह्या जागा प्रत्यक्षात किती सुंदर असतील ते कळतं. मी आतापर्यंत व्हॅली ऑफ फ्लॉवर्स चे अनेक फोटो बघितले आहेत. पण त्यातलं सौंदर्य म्हणावं तसं उठावदार वाटलेलं नाही अजून. साधनाने लिहीलं आहे तसा एक प्रकारचा कुंद वास, पावसाळी वातावरण, हिरवा गालिचा आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर दिसणारी फुलं हा कदाचित खरंच सुरेख अनुभव असेल पण ते अजून पर्यंत तरी कुठल्या कॅमेर्‍याने पकडलेलं नाही एव्हढंच म्हणणं आहे.

हिमालयात मी स्वतः एक ट्रेक केलेला आहे आणि बाकी टुरिस्टी जागांनां जाऊन आलेली आहे. थोडक्यात "हिमालय अनुभवलेला" आहे थोड्याफार प्रमाणात. पण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये तो हिमालय दुर्दैवाने मला अजून सापडलेला नाही Happy

साधना, विषयांतराबद्दल क्षमस्व. तुझी लेखमाला मस्त सुरू आहे आणि वाचायला खूप आवडत आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे Happy

सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आभार..

सशल, तुझा मुद्दा बरोबर आहे. लेहच्या पॅनगोंग, मोरीरी लेकचे सौंदर्य फोटोत टिपता येते, लेक कितीही मोठा असला तरी त्याची बरीच मोठी बाजू कॅमेऱ्यात येते. आकाशी टेकणारे हिमालयीन पर्वत कॅमेऱ्यात पकडता येतात. मैलोनमैल पसरलेले बर्फही कॅमेऱ्यात धरता येते ताजमहालही कॅमेऱ्यात पकडता येतो. कारण ही सगळी स्थळे एक विशिष्ट आकार धरून आहेत, तुम्ही विविध कोनांतून त्यांचे सौंदर्य टिपू शकता. पण व्हॅली अजिबात येत नाही तुमच्या कॅमेऱ्यात.

प्रत्यक्ष पाहायला मिळालेली व्हॅली व फोटोत दिसणारी व्हॅली यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. व्हॅलीतली फुले खास फ्लॉवरबेड करून राखलेली नाहीत. व्हॅली हे फुलांचे एक नैसर्गिक जंगल आहे ज्यात वेगवेगळ्या उंचीची व प्रकारची झाडे एकमेकात गच्च दाटलीत. फुलतानाही ती एकमेकांत मिसळुन फुलतात. त्यामुळे होते काय की तुम्ही व्हॅलीचा लूक पकडायला गेलात तर हिरवे आडवेतिडवे वाढलेले बुटके जंगल फोटोत येते, जे अजिबात आकर्षक वाटत नाही. त्याचवेळी एखाद्या फुलाचे सौंदर्य जवळून पकडायचा प्रयत्न केलात तर त्यात व्हॅली दिसत नाही. तो क्लोजप व्हॅलीमधला असू शकतो तसाच कुठल्या प्रदर्शनातलाही असू शकतो.

व्हॅलीत चालण्यासाठी केलेल्या पायवाटांवरूनच जावे लागते. दोन्ही बाजूला दोन तीन फूट उंच फुलांचे जंगल असते. या जंगलाचे फोटो कितीही नयनरम्य काढायचे म्हटले तरीही ते शक्य नाही. ते सौंदर्य फक्त डोळ्यांनी पाहायचे, बस्स!!!

खूप छान चालली आहे ही मालिका. ४-५ वर्षापूर्वी आई & बहिणीने हा ट्रेक केला होता. उत्सुकता वाढत चालली आहे तिथे जायची.. मेरा नं. कब आयेगा?? Uhoh

व्हॅलीत चालण्यासाठी केलेल्या पायवाटांवरूनच जावे लागते. दोन्ही बाजूला दोन तीन फूट उंच फुलांचे जंगल असते. या जंगलाचे फोटो कितीही नयनरम्य काढायचे म्हटले तरीही ते शक्य नाही. ते सौंदर्य फक्त डोळ्यांनी पाहायचे, बस्स!!! >> +१

IMG_7629.JPG

साधना, अतिशय खुसखुशीत लिखाण आहे. आणखी वाचावसं वाटत आहे.
आधीच्या भागांवर अभिप्राय लिहू म्हणता म्हणता राहून गेलं.

Pages