डोळ्यातले मोती

Submitted by मिता on 17 October, 2017 - 06:34

रडणं.. जन्मताच सगळ्यात पहिली जमणारी गोष्ट.. जेव्हा आपण रडतो अन आई हसते असं आपलं एकमेव रडणं.. हळू हळू जरा काही नाही मिळालं कि भोकाड पसरून दंगा करायचा म्हणजे आईची माघार असं समीकरणच बनत.. कितीदा रडतो लहानपणी, गणित नाही.. अन रडून पुन्हा लगेच विसरून जणू काही झालाच नाही असं समजून हसणं बाघडण सुरु.. अल्लड वय ते.. ते रडणं पण डोळे स्वच्छ करण्यापुरतंच.. कधी कधी पडताना लागलंच, तरच मनापासून कळवळून रडणं येत असेल.. पण ते हि क्षणिक.. रडण्याचे सुखाचे दिवस म्हणजे आपलं बालपण..
पण सगळ्याबाबत एक गोष्ट खरी कि बरेचदा आईच आपल्याकडं लक्ष जाऊ देत म्हणून मोठ्यानं रडायचं, जोपर्यंत आई आपली दाखल घेत नाही.. ''काय झालं माझ्या राज्याला " असं म्हणत नाही तोवर बेंबीच्या देठापासून रडायचं.. आई जवळ आली कि सगळंच गायब..

हळू हळू वय वाढतं.. आपण मोठे होतो.. आईचे धपाटे कमी होतात.. आपल्या रडायची कारण पण..

पण तरी असं काहीतरी होत असत, जे सहन करणं मुश्किल असत.. यावेळी शरीराची इजा नसते, मनाची असते... खूप दुःख झालेलं असत, पण तरीही मनातल्या मनात रडतो.. आपण रडलोय हे कुणाला समजू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते.. ओलावलेल्या कडा हलकेच पुसल्या जातात.. स्वतःच्या मनाशीच युद्ध करतो.. स्वतःच स्वतःला समजावतो.. झालेल्या गोष्टीची मीमांसा करतो.. त्या खोल जखमेला स्वतःच फुंकर घालायला बघतो.. अश्रुना बजावतो.. जणू काही त्यांना आपण कैदेत ठेवतो.. अन इथच आपण मोठे होतो..
एका क्षणाला रडून दुसऱ्या क्षणाला इथं पण हसतो, लहानपणासारखं.. पण ते पाक नसत.. कारण आता गोष्टी मनात साठवल्या जातात.. मग मनापासून नाही हसायला जमत.. तरीही असफल असा प्रयत्न केला जातो.. दुःख लपवलं जात.. खोटं हसायला शिकतो.. हिच कदाचित ती maturity..

किती विरुद्ध वागतो लहानपणापेक्षा.. किती ते शहाणपण!! लहानपणी बादलीभर रडणारे आपण, आता आपल्या २-२ अश्रुना पण लपवतो.. ओंजळीत त्यांना सामावून घेतो.. अन स्वतःच ती ओंजळ रीती करतो.. मोठे होत असतो ना.. बरंच काही उमजायला लागतं.. अश्रूंचं पण महत्व कळतं आणि त्या अश्रुंचे मोती होतात, ज्यांना आपण जपायला शिकतो..

''डोळ्यातल्या आसवांची कथा आज न्यारी गं..
मनाच्या उभारीची नवी झालर त्यावरी गं.. "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता गोष्टी मनात साठवल्या जातात.. मग मनापासून नाही हसायला जमत.. तरीही असफल असा प्रयत्न केला जातो.. दुःख लपवलं जात.. खोटं हसायला शिकतो.. हिच कदाचित ती maturity..>>>+++११