मुन्नी

Submitted by अतुलअस्मिता on 14 October, 2017 - 21:48

कविता: मुन्नी

माणसाच्या मनातून निघणा-या ज्वालामुखीचा तिरस्कारमय लोळ
तुला अजून स्पर्शायचाय, मुन्नी!

शुभ्र सूर्यप्रकाशाप्रमाणे जीवनात सरपटताना भेटणारी सगळीच
जेव्हा ओकत होती विश्वासघाताची नागेरी गरळ

आणि

माझ्या श्रद्धेच्या समुद्राला रक्तरंजित करणारा कालवा
फसवणुकीच्या तीव्र आसुडांमुळे जेव्हा ओसंडून जात होता

तेव्हा रखरखत्या उन्हात अनवाणी जळालेल्या तळव्यांना
दुधाच्या सायीइतक्या मऊ बर्फाचा थंडावा
मुन्नी, तू कुठून बरे आणलास?

गद्दारीच्या भीषण डंखानी करपण्याची भिती वाटत नाही का ग?

अग, हजार रातराणीच्या झाडांचा उन्मत्त गंध
अप्रामाणिकतेच्या एकाच श्वासात विरघळून जात असेल तर

माझा झेंडा मी या नैतिकतेच्या डोंगरावर कसा ग फडकवू?

तुझे मात्र एक बरे आहे बघ मुन्नी,
भाषेच्या ओघळणाऱ्या मधाळ भावनांमुळे
तुझ्या दुधाची सायही नासत नाही व झाडही करपत नाही

शेवटी आता
पायबांधणीसाठी होणारा दगड मला व्हायचंय,
पण तिथेही मुन्नी,
सिमेंटच्या रुपात तू मला भेटशील ना?

Group content visibility: 
Use group defaults

छान Happy