दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१

Submitted by अनया on 6 October, 2017 - 14:59

रोजचं जगणं धोपटमार्गावरून घरंगळत असत. सकाळच्या गजरापासून रात्रीच्या जांभईपर्यंत साधारणपणे सारखंच. ठराविक वयानंतर हे असच असणार, हे आपण कबूलही केलेलं असत. तीच नोकरी, तेच सहकारी, सरावाच झालेलं तेचतेच काम. घरीही तसंच. ठराविक रस्ता, त्यावरचे ठराविक सिग्नल. काही वाईट नसतं ह्यात. असं स्थैर्य मिळावं, म्हणून तर आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय सुरू करतो. कौटुंबिक, आर्थिक स्थैर्य मिळालं, की स्वतःची पाठ थोपटून घेतो.

पण ह्या चौकटीच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल खूपसं कुतूहल, थोडी खोडकर उत्सुकता असतेच की मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेली. थोड्या दिवसांसाठी मुक्त, निर्भर जगावं आणि तरतरीत, चकचकीत होऊन पुन्हा आपल्या उबदार, सुरक्षित घरी परत यावं, अशी काहीशी खट्याळ ओढ लागते. मग कोणी थंड हवेच्या ठिकाणी, कोणी देवदर्शनाला जातं. आमच्यासारखे काही जरा जास्त वेडे ट्रेकिंगला जातात. अशाच एका वेडाच्या झटक्याच्या प्रभावाखाली आम्ही यूथ हॉस्टेल ह्या संस्थेने आयोजित केलेल्या 'कोडाईकॅनाल ते मुन्नार' ह्या सात दिवसांच्या ट्रेकला जायचं ठरवलं. हे 'ठरवणं' म्हणजे शास्त्रीय संगीतातल्या 'बड्या ख्याला' सारखं असत, त्याला वेळ लागतो. भावगीतासारखा चार-पाच मिनिटात आवरणारा हा गायनप्रकार नव्हे.

साधारणपणे ट्रेकिंग म्हणजे हिमालय, हे समीकरण डोक्यात पक्कं असत. हिमालयाची ती जादू असतेही विलक्षण. पण डिसेंबर महिन्यात तिथे चांगलीच थंडी असणार. बर्फवृष्टी झाली, तर चालायला खूप त्रास होईल, अशी भीती वाटली. ट्रेकिंगला आधी बऱ्याच वेळा जाऊन आलो होतो, त्यामुळे आपल्या धाडस करण्याची वरची पातळी किती आहे हे नीटपणे माहिती झालं होत. उत्कृष्ट शारीरिक व मानसिक फिटनेस असलेले लोकं थंडीतही हिमालयात ट्रेकिंगला जातात. पण आम्ही काही फिटनेसच्या त्या गटात मोडत नव्हतो. दुसरं असही होतं, की मागचा ट्रेक करून अडीच वर्षे झाली होती. आपापल्या व्यावसायिक, कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्यांमधून वेळ काढणं नेहमी नेहमी जमत नाही. इतक्या दिवसांनी काही जमतंय, तर हिमालयात जाऊन पंचाईत करून घेण्यापेक्षा दक्षिण भारतात जाऊन नवीन भाग बघावा, असा निर्णय भरपूर चर्चेनंतर सर्वानुमते झाला.

हा आमचा ट्रेक अगदीच कमी दिवसांचा होता. चालायचे दिवस फक्त इनमिन साडेतीन होते. पुणे ते कोडाईकॅनाल आणि मुन्नार ते पुणे ह्या प्रवासाला त्यापेक्षा जास्त वेळ लागणार होता. एक मैत्रीण दिल्लीहून येणार होती. तिचा तर शब्दशः 'आसेतु हिमाचल' प्रवास होणार होता.
एकदा कुठे जायचं, हे ठरल्यावर मग कुठल्या बॅचला जायचं ते ठरलं. जाताना-येतानाची रेल्वे बुकिंग्ज झाली. डळमळीत असलेल्या सदस्यांना जोरदार आग्रह झाला. नवीन बुटांची खरेदी झाली. रोज चालायला जाऊन फिटनेस वाढवण्याचे संकल्प केले गेले आणि प्रथेप्रमाणे मोडलेही गेले! होताहोता आमचा आठ जणांचा ग्रुप फायनल झाला. १६ डिसेंबरच्या पहाटे निघायचं हे नक्की झालं.

ह्या स्टेजपर्यंत सगळं छानच असत. नंतर मात्र हळूहळू काळजी वाटायला लागते. गुढघ्यात, पाठीत येणारी चमक, जिने चढल्यावर वाढलेला श्वासाचा वेग घाबरवायला लागतो. 'आपल्याला जमेल का इतकं चालणं?' टाईप भीती वाटायला लागते. कशाला ह्या भानगडीत पडलो, असही वाटतं. ह्या वेळेला तर निघायच्या थोडंसं आधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता ह्यांच्या आजारपणाच्या बातम्या येऊ लागल्या. काळजीत भरच पडली. त्यानंतर तामिळनाडूवर चक्रीवादळाचे ढग घोंगावायला लागले. सुदैवाने कै.जयललिता ह्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही तामिळनाडू शांत राहिलं, वादळही थंडावलं आणि आम्ही आठ जण सामान, तिकीट, आवश्यक कागदपत्रे,जेवण, औषधे अशा सतराशेसाठ वस्तू घेऊन पुण्याहून निघालो.

पुणे ते कोडाईकॅनाल

आमचा आठ जणांचा ग्रुप नमुनेदार होता. त्यात आम्ही तिघी शाळामैत्रिणी, आई-बाबा-लेक असं एक कुटुंब आणि दोन कॉलेजकन्यका होत्या. थोडक्यात म्हणजे, समाजातल्या बहुतेक सर्व घटकांना ह्यात प्रतिनिधित्व मिळालं होत! कोडाईकॅनालच्या जवळच्या दिंडीगल नावाच्या स्टेशनपर्यंत पोचायला पुण्यापासून साधारण तीस तास प्रवास करायचा होता. रोजच्या धबडग्यात मैत्रिणींशी बोलायला निवांत बोलायला वेळ मिळतोच कुठे? त्यामुळे ती बाकी भरून काढायचं काम आम्ही अगदी मनापासून पार पाडत होतो. एव्हाना मोबाईल नेटवर्कचा लपंडाव सुरू झाला होता. त्यामुळे घर आणि कामाचे फोन येणं बंद झालं होतं. जबाबदाऱ्या मागे टाकून आता पुढचे सहा-सात दिवस मोकळं - हलकं जगायचं ह्या कल्पनेने छान वाटत होत.

गाडी भराभर स्टेशन्स मागे टाकत होती. महाराष्ट्र सोडून आपण लांब आलोय हे जाणवत होत. प्लॅटफॉर्मवर विकायला येणारे पदार्थ बदलले होते. कानांवर वेगळीच भाषा पडत होती. देवनागरी मध्ये लिहिलेल्या पाट्या वाचताना बरंच मनोरंजन होत होतं! चहाच्या आरोळ्यांच्या जागी कॉफीच्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. भाताची हिरवीगार शेतं, नारळाची वाऱ्यावर डोलणारी झाडं, वेगळ्याच रंगसंगतीत रंगलेली घरं डोळ्यांना सुखावत होती.

होता होता आम्ही दिंडीगल स्टेशनवर उतरलो. केळीच्या पानातला चविष्ट दाक्षिणात्य नाश्ता, फिल्टर कॉफी पोटात गेल्यावर पोटालाही दक्षिणेत आल्याची खात्री पटली. नाहीतर ट्रेनमध्ये सगळ्यांनी भरभरून आणलेलं मराठी जेवणच जेवत होतो! रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहान, टुमदार घरं, शेतं, नारळी-सुपाऱ्यांची झाडं होती. जिकडे तिकडे हिरवाई होती. चित्रात शोभून दिसेल अशा रस्त्यावरून, एखाद्या सुरेख, पल्लेदार तानेसारखा रस्ता जात होता. त्यावरून प्रवास करत आम्ही कोडाईकॅनालला पोचलो. कँप शोधला.

हळूहळू सहट्रेकर येऊन पोचत होते. सगळ्यांच्या राहण्याची सोय करणे, कागदपत्रे जमा करून घेणे अशी धावपळ चालू होती. रोजची एक अशा एकूण दहा बॅचेस होत्या. आमची पहिलीच बॅच होती. त्यामुळे पुढच्या कँपच्या सेटअपसाठी आवश्यक असलेल्या सामानाचे ट्रक भरून जात होते. ती गडबड होतीच. त्यात ट्रेन लेट झाल्यामुळे ह्या कँपवरचे स्वैपाकी अजून कोडाईकॅनालमध्ये पोचलेच नव्हते. पाहुण्यांनी गच्च भरलेल्या लग्नघराचा चार्ज आदल्या दिवशीच लग्न करून आलेल्या नव्या सूनबाईच्या हातात देऊन सासूबाई पसार झाल्या, तर ज्या प्रकारचा गोंधळ होईल, तसा गोंधळ चालू होता. आमची बॅच पहिलीच आणि सगळ्यात मोठी म्हणजे पन्नास लोकांची होती. १२ महिला आणि ३८ पुरुष. इतक्या सगळ्यांची व्यवस्था लावणे आणि सगळ्यांच्या असंख्य शंकांना उत्तरे देता देता यूथ हॉस्टेल च्या लोकांची दमछाक होत होती.

आमच्या खोलीच्या अगदी समोर कँप लीडर सरांचं ऑफिस होतं. पुढच्या कँपच्या स्वैपाक्यांबरोबर रोजच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा मेन्यू ठरवण्यासाठी चाललेल्या त्यांच्या वाटाघाटी आम्हाला ऐकायला येत होत्या. आम्हाला चौघींना हे काम करण्याचा मजबूत अनुभव होता. सगळ्यांना संसार सुरू करून वीस वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या आवडीनिवडी आणि आपली पाकमर्यादा लक्षात घेऊन पदार्थ ठरवणे, ही लढाई काही नवीन नव्हती. कँप लीडर सरांनी आमच्या हातात हे काम दिल असतं, तर दहा मिनिटात नक्की उरकलं असत!

पण त्या गडबडीतही कामं पार पडली. सगळ्यांना सॅक मिळाल्या. जास्तीच सामान जमा झालं. सर्वांना ओळखपत्रे मिळाली. ट्रेकच्या दिनक्रमाची रूपरेखा कळली. अंघोळीला गरम पाणी मिळालं. कल्याण येथून आलेल्या श्री.किरण आपटे ह्याची ग्रुपलीडर म्हणून नेमणूक झाली.

उद्यापासून चालायला सुरवात करायची होती. प्रवास-खाणे-गप्पा-टप्पा-हास्य-विनोदात मी 'काळजी' ह्या सखीला विसरले होते. रात्री आडवं होताच तिचं अस्तित्व जाणवलं! आता हिची सोबत मुन्नारला पोचेपर्यंत असणार, हे नक्की.

Group content visibility: 
Use group defaults

वा! झकास सुरूवात!

प्लॅटफॉर्मवर विकायला येणारे पदार्थ बदलले, चहाच्या जागी कॉफीच्या आरोळ्या >>> हे जाम आवडलं.

गाडी भराभर स्टेशन्स मागे टाकत होती. महाराष्ट्र सोडून आपण लांब आलोय हे जाणवत होत. प्लॅटफॉर्मवर विकायला येणारे पदार्थ बदलले होते. कानांवर वेगळीच भाषा पडत होती. देवनागरी मध्ये लिहिलेल्या पाट्या वाचताना बरंच मनोरंजन होत होतं! चहाच्या आरोळ्यांच्या जागी कॉफीच्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. भाताची हिरवीगार शेतं, नारळाची वाऱ्यावर डोलणारी झाडं, वेगळ्याच रंगसंगतीत रंगलेली घरं डोळ्यांना सुखावत होती.
........... सर्व मस्त ...पुढे चे वाचायची उत्सुकता वाढलीय __/\__

प्रवास-खाणे-गप्पा-टप्पा-हास्य-विनोदात मी 'काळजी' ह्या सखीला विसरले होते. >> खुप छान.. पुढचं वाचायची उत्कंठा वाढली Happy

Mast!

सर्व प्रतिक्रिया देणाऱ्यांचे मनापासून आभार.
सध्या गुगल ड्राईव्हवरून फोटो अपलोड करण्याशी झगडते आहे. ते झालं की पुढचा भाग लगेच पोस्ट करते. लिहून तयार आहे.