मिरची का सालन

Submitted by मेधा on 14 March, 2009 - 15:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ मध्यम फुग्या मिरच्या ( शिमला मिर्च, कॅप्सिकम, बेल पेपर्स, ढब्बू मिरच्या इत्यादी )
१ मध्यम कांदा
१ टे स्पून शेंगदाणे
१ टे स्पून तीळ
२ पाकळ्या लसूण,
अर्धा इंच आल्याचा तुकडा
१ टे स्पून सुक्या खोबर्‍याचा कीस
२ हिरव्या मिरच्या
एका छोट्या लिंबा येवढी चिंच
तेल, तिखट, मीठ

क्रमवार पाककृती: 

फुग्या मिरच्यांचे पाऊण इंचाचे तुकडे करावेत
कांदा बारीक चिरून घ्यावा
चिंचेवर कोमट पाणी घालून ठेवावे
मंद आचेवर तीळ, शेंगदाणे वेगवेगळे, कोरडे, खमंग परतून घ्यावे. सुक्या खोबर्‍याचा कीस पण थोडा परतून घ्यावा. हा लगेच करपतो त्यामुळे मंद आचेवर अन लक्ष ठेवून परतावा लागेल.
थोड्या तेलात हिरव्यामिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत.
एका कढईत थोडे तेल तापवून त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
कांदा, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, तीळ , शेंगदाणे, खोबर्‍याचा कीस सर्व एकत्र करून अगदी बारीक वाटून घ्यावे. लागेल तसे थोडे पाणी घालून वाटावे.
फुग्या मिरच्यांचे तुकडे जरा सढळ हाताने तेल घालून त्यावर परतून घ्यावेत. अगदी पूर्ण शिजू देऊ नयेत.
हे परतलेले तुकडे एखाद्या ताटात काढून, त्याच कढईत ( पाहिजे असल्यास थोडे तेल घालून ) वाटलेला मसाला परतावा. मंद गॅसवर परतला म्हणजे खाली लागणार नाही.

मसाला पाचेक मिनिटं परतून झाला की त्यात चिंचेचा कोळ घालावा. चवीप्रमाणे तिखट व मीठ घालावे व परतत रहावे.

चिंच शिजली की परतलेले फुग्या मिरच्यांचे तुकडे घालावे . अगदी सुके वाटल्यास थोडे पाणी घालून नीट करुन २-३ मिनिटे शिजू द्यावे.

मिरची का सालन तयार.

वाढणी/प्रमाण: 
२-३ लोकांसाठी
अधिक टिपा: 

काही ठिकाणी वाढताना तेलात तळलेल्या सुक्या मिर्च्या वरून घालायची पद्धत आहे म्हणे. मी कधी केले नाही.

माहितीचा स्रोत: 
नवर्‍याने केलेले वर्णन ऐ़कून मी केलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला बरेच दिवसंपासून करुन बघायचे आहे हे. धन्यवाद.

शोनू, माझ्याकडे जे रेसिपीचं पुस्तक आहे त्यात फुग्या,भोपळी मिरच्या न वापरता जाड्या, भज्यांच्या मिरच्या वापरुन केलेला आहे हा प्रकार. हैद्राबादी आहे ना?

हैदराबादी मिर्ची का सालन आणि बिर्याणी.. सॉलिड काँबो !
सायो,
मी पण अत्त पर्यंत नॉर्मल मिरच्या पण ज्या थोड्या जाड आणि नेहेमीच्या मिरच्यां पेक्शा थोड्या कमी तिखट असतात त्या मिरच्यांच खाल्लाय सालन.
शोनु,
तुझी सिमला मिर्ची ची रेसिपि पण yummy लागेल Happy

मी कधी कधी यात हॉट इटालियन पेप्पर्स पण घालते चिरून. मस्त स्वाद येतो.

आमच्याकडे पण दम बिर्यानी, मिरची का सालन अन डबल का मीठा अगदी आवडतं कॉंबो आहे.

शोनु,
दम बिर्याणी ची रेसिपी पण टाक ना प्लिज.

डबल का मीठा अगदी आवडतं कॉंबो आहे.
<< अगदी.. काय रॉयल लागत डबल का मीठा ( ज्याला शाही टुकडा पण म्हणतात नॉर्थ इंडियन लोक).
आणि कुबानी का मीठा विथ आइस क्रीम ( जर्दाळु एकजीव झालेली खीर)पण मस्तं लागतं या मेनु बरोबर Happy

डबल का मीठा ( ज्याला शाही टुकडा पण म्हणतात नॉर्थ इंडियन लोक).>>> मी रेसीपी विचारणार होतेच. शाही टुकडा माहितेय. Happy

मीपण बर्‍याचदा जाड मिरच्याचे सालन केलय आता ढब्बूचे एकदा करून बघेन.
--------------
नंदिनी
--------------

शाही टुकडा म्हंजे ब्रेडचे गुलाबजामच ना? की दुसर काही?

तळलेल्या ब्रेड वर रबडी घालून खायचं Happy

शोनू, तु सांगितल तस सिमला मिरचीच सालन करुन पाहिलं गं, मस्त झालेलं. मी नेहेमी, वरती डीजे म्हणते तस जाड मिरच्यांच सालन करायचे, आता अजून एक व्हरायटी Happy थँक्स!

मी गुरुवारला करणार आहे. मग सांगते शूनूला. Happy

शोनू काल केले होते मी. आजपण तेच आहे जेवनात Happy

आज कृतीत नाही पण नावात साल आहे.. कमाल आहे बॉ तुमची.... Proud

शूनू, केले मी हे सालन. मैत्रीणीला अन मला आवडले. पण ती म्हणत होती भाताबरोबर आणखी छान लागते. मी चपातीबरोबर खल्ले, भात वर्ज्य असल्याने. Happy
पण एकदम मस्त! खूप धन्यवाद.

हो, मिर्ची का सालन बिर्याणी बरोबर एकदम काँप्लिमेंटरी आहे , पण पोळी बरोबर सुद्धा छन च लागतं :).

परवा ह्या रेसिपीने मिर्च का सालन करून पाहिलं .. छानच झालं होतं .. Happy

फक्त तेलात मिरच्याचे तुकडे परतून सालन मध्ये घातल्यावर फारच मऊ, पिचपिचीत लागले .. कुठल्या मिरच्या वापरल्या तर त्या स्वतःला होल्ड (?) करू शकतील?

सशल , तेलावर परतताना जास्त शि़जू देऊ नयेत, कुरकुरीत रहायला हव्यात

फुग्या मिरच्यांचे तुकडे जरा सढळ हाताने तेल घालून त्यावर परतून घ्यावेत. अगदी पूर्ण शिजू देऊ नयेत. >> हे लिहिलंय ना

होल्ड??? Wink ज्यास्त प्याल्या असतील म्हणून होल्ड करु शकत नसतील.

(अर्थातच तेल प्याल्या असतील ह्या अर्थाने..)

नको तिथे ईग्रंजी वापर कशाला? कुरकुरीत लिहा ना त्याएवजी. Happy

अहो झंपी, मला जे म्हणायचंय त्याकरता मराठी शब्द आठवला तर नक्कीच लिहीला असता ..

कुरकुरीत हा तो शब्द नाही .. जरी तळून कुरकुरीत केल्या तरी सालन/ग्रेव्ही/रस्सा मध्ये घातल्यावर तो कुरकुरीतपणा रहाणारच नाही (ना?) ..

ह्या रेसिपीने आत्ताच केलं मिरची का सालन. मस्त झालय अगदी. धन्यवाद बर्का Happy मी जरा तिखट असतात त्या मिरच्या घेतल्या. सणसणीत तिखट + आंबट + भाजलेल्या मसाल्याची खरपूस चव असं एकदमच भारी लागत होतं.

फुटवा :
salan.jpg

सिंडीच्या भाजीचा फोटो पाहून प्रेरीत होऊन मी पण केलं (भोपळी) मिरची का सालन. एकदम मस्त झालंय. चवीला सौम्य आणि खमंग!
फक्त त्याचा रंग चिंचेच्या कोळ घातल्यावर चॉकलेटीपणाकडे झुकलाय. सिंडीच्या भाजीसारखा पिवळा रंग कसा आणता येईल?

Pages