सख्या,कसे?कुठून रोज,आणतोस चांदणे?

Submitted by सत्यजित... on 4 October, 2017 - 07:07

हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे...
सख्या,कसे? कुठून रोज,आणतोस चांदणे?

अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे?
किती अरे,उरात खोल पेरतोस चांदणे!

बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू...
विचारताच,चोर कोण?सांगतोस..चांदणे!

उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर
पहाट-वेळचे..टिपूर मागतोस चांदणे!

नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा
मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे!

रसाळ चांद,वितळतो..मधाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह वाह! क्या बात है!

बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू...
विचारताच,चोर कोण?सांगतोस..चांदणे!> मस्त!

रसाळ चांद,वितळतो..मधाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे!>> सुंदर! हे फारच आवडले...:)

एकेक शेर अप्रतिम आहे.. जियो!

स्मिताजी,पंडितजी,कावेरीजी,सायलीजी,निलेशजी,अंबज्ञजी, राहुल...सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
माउ,विलासरावजी,दत्तात्रयजी...मनापासून आभार आपणा सर्वांचे!

सगळेच अप्रतिम आहे, त्यातही

रसाळ चांद,वितळतो..मधाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे!

हे फार आवडले!