उजळणीशी हातमिळवणी

Submitted by mi_anu on 1 October, 2017 - 09:29

"अमिबा नाही!! मडीबा! म डी बा!! नेल्सन मंडेला ना प्रेमाने मडीबा म्हणत होते.अमिबा वेगळा.तो प्राणी असतो.मडीबा म्हणजे महात्मा सारखं पेट नेम."
सहामाही म्हणजे हाफ इयरली परीक्षा आणि हिंदी, सामुदायिक जीवन(हल्ली याला इ व्ही एस की कायसं म्हणातात) पेपराच्या आधी आलेली सुट्टी यामुळे उजळणी घेणं चालू होतं.

"तुमच्या मुलांबरोबर रोज किमान एक तास बसून अभ्यासात घालवा" अशी प्रेमळ सूचनायुक्त धमकी प्रत्येक मीटिंगला आणि डायरीत लिहिलेली आहे.आजूबाजूला 45 मुलांच्या वर्गाच्या मीटिंग ला आपल्या मुलांच्या उत्तरपत्रिका घेऊन प्रत्येक प्रश्न आणि त्याला मिळालेले मार्क याचा सखोल अभ्यास टीचर बरोबर करणारे सुजाण पालक आहेत.त्यात आपण "उद्या कोणता पेपर आहे, पुस्तक कसं दिसतं,रिव्हिजन शीट कधी दिल्या होत्या" वगैरे येडताक प्रश्न शाळेच्या व्हॉटसप ग्रुप वर विचारू नये यासाठी आपल्या मुलं विषयक ज्ञानाला थोडं तेलपाणी देणं फायदेशीर ठरतं.

पूर्वी कसं होतं ना, बिल्डिंग मध्ये एखाद्याना मुलं आहेत हे ती दहावी किंवा बारावी किंवा आयआयटी ला गेल्यावरच जाणवायचं.त्याच्या आधी ती स्वतः मोठी व्हायची.स्वतः अभ्यास करायची.स्वतः प्रगती पुस्तकं घरी घेऊन यायची आणि त्यावर लोक सह्या करायचे.आता मुलं मोठी होणे हा टप्पा फॉर्म साठीच्या रांगा, दर 3 महिन्याला टीचर बरोबर मीटिंग, आजी डे, आजोबा डे, बाबा डे,आई डे, स्पोर्ट डे,बस कमिटी शी भांडणं, दर अडीच महिन्यांनी परीक्षा असे अनेक उप टप्पे पार करत करत पुढे जातो.

आपण पाचवीत असताना 'दिवाली का चौथा दिन भाई ईज. उसको बहन भाईको आरती ओवालती है" असं दिवाळीच्या निबंधात लिहिल्याने हिंदी च्या बाईंनी वर्गात वाचून दाखवलेला निबंध, भाजीवाल्याशी रोज "पिशवी मत देना, वो छोटा छोटा गाव से आया हूवा गावरान टेढा मेढा ज्वारी देना, गोल गोल बडा बडा सुंदर दिखने वाला ज्वारी बिलकुल मत देना" असं किराणावाल्याला सांगणे, ऑफिसात लिफ्ट मध्ये येताना बिचकणार्या दोघांना "आ जाओ, आप लोग माव जाओगे" अशी हमी देणं या ज्ञानावर आपल्याला हिंदि ची चाळीस पानं उजळणी घ्यायची आहे हे वाचून उजाड मैदान, अथांग आकाश, आणि आकाशाकडे बघत माना फिरवत "का?का?का?का?" विचारणारा सचिन खेडेकर डोळ्यासमोर येतोच.

आपल्या वेळी कोण तो कमल नमन करायचा.अजय फणस बघायचा.आता 'किरन हिरन पकडता है'.(याचा बाप नक्कीच ते 42 किलोमीटर मॅराथॉन वाले महारथी असतात त्यातला असेल.) घोट्या पर्यंत असलेलं स्वच्छ पाणी आत आत जायला लागल्यावर खोल गाळाची दलदल बनावी तसं अ से अनार पासून पुढे 'इ की मात्रा,ई की मात्रा, उ की मात्रा,औ की मात्रा, ऋ के शब्द' येऊन भीती दाखवायला लागतात.चील म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देताना (काय बरं...पक्षी होता ना बहुतेक..की शिकार्याला म्हणतात..गुगल गुगल नवस करते वाट दाखव ) शेजारी बसलेलं "मॉम, चील म्हणजे चील ट्रे मधलं'" म्हटल्यावर आपल्याही मनात मागे "हम भी तेरे अधिक है कभी तू हम से आले मिल..जस्ट चील चील जस्ट चील.." गाणं चालू आहे असा शोध लागतो.त्याच्यापुढे बेल आली की लहानं "म्हणजे आपली डोअरबेल ना?" विचारतं.मग आपण "ते इंग्लिश, हिंदि मध्ये देवाला वाहायचा बेल" सांगतो.थोड्या वेळाने हिंदीत देवाला बेल वाहत नाहीत(नास्तिक कुठले!!!) आणि हा बेल म्हणजे आपला मराठीतला वेल आहे असा शोध लागतो."पुल म्हणजे स्विमिंग पुल ना?" असं विचारल्यावर "तो इंग्लिश पूल.हिंदी पुल म्हणजे ब्रिज.

हिंदी इंग्लिश वाले मेले एकाच पाणवठयावर पाणी भरायला येऊन एकमेकांची शब्दांची भांडीकुंडी उसनी का घेतात काय माहीत!!त्यात संस्कृत आजी कडून उसनी आणलेली जड भांडी वेगळीच. "तुम्ही जे वेलकम किंवा एंटरटेनमेंट वगैरे वात्रट मुव्हीज चवीने सारखे बघता त्यातली गाणी ऐकून जरा हिंदी शब्द शिका!!" म्हणून मनोरंजनात मल्टी टास्किंग केलं की सोसायटीत 15 ऑगस्ट ला कौतुकाने हातात माईक दिल्यावर हीच महान व्यक्तिमत्वे "इतनी जलदी कायको, तू बन जा मेरी बायको, शादी लंडन मे करेंगे हनिमून दुबई को" गाऊन आपल्याला शहिद करण्याचा धोका असतोच.

मुलांचा अभ्यास हा एक तर "असा सब्जेक्ट कुठे आहे मला?" या नवजात लेव्हल चा किंवा मग आजीला "आजी, तुला माहीत आहे का, आपली गॅलक्सी आणि शेजारची गॅलक्सी ची टक्कर होऊन सगळं डिस्ट्रॉय होणार आहे.त्याच्या आधी आपण केपलर2 नावाच्या गॅलक्सी वर राहायला जाऊ" असं सांगून हादरावायच्या युट्युबिय गुगलीय लेव्हल चा असतो.मधलं अधलं काही नाहीच!! "भैय्या नैय्या लाया" वाचून आपण त्या अगस्ती ऋषी बद्दल बोलत असतील समजावं तर कळतं की मूळ वाक्य भैय्या थैला लाया होतं आणि शेजारी पिशवी चं चित्र पण आहे!!! एक सारखा दिसणारा कोणताही शब्द कुठेही खुपसला आहे, चित्र बघणे, डोकं वापरणे वगैरे शी काही देणं घेणं नाही हे एक सूत्र कळलं की सगळं सोपं होतं.आता पुढे भैय्या नैय्या तैरा नीट वाचून आपल्या वर उपकार केले जातात.एकंदर हिंदी व्याकरण पुस्तिका लिहिणारा एका उसेन बोल्ट चा भाऊ आणि एखाद्या ऑलिम्पिक स्विमर चा मुलगा असावा!!नद्या काय पोहून जातात, हरणं काय पकडतात.आता पुढे ई की मात्रा मध्ये एखादा भैय्या दरिया तैरा आलं की मी सुखाने 4 फूट पाण्यात 1 आडवी लॅप मारून बाहेर यायला मोकळी.

त्यात आणि संस्कृत मधून आलेले शब्द घाबरवत असतात.कृपाण आणि कृषक आणि गृह ला हिंदीत क्रीपाण, क्रिषक आणि ग्रिह उच्चारायचं म्हणे.क्रीपाण चं चित्र छापणार्याने जरा माती खाल्ल्याने "ओह, क्रीपाण म्हणजे थ्रेड अँड निडल" ऐकून कृपाण खुपसून घेण्याची स्टेज मिस नाही करायची.

वाचणं आता चालू झाल्याने "बिझनेस" ला "बसिनेस" "बातो बातो मे " च्या सीडीला "बटन बटन मॅन" वाचणे, बजाज ला त्या लोगो मधल्या स्टॅयलिश अक्षरांमुळे बलाल वाचणे असे माफक अपघात होत राहतात.

मुलांशी इंग्लिश बोलत जा या सल्ल्याचा अवलंब करावा तर ती ते शाळेत कोळून पिऊन "ममा, नॉमेंडीक नाही न्यूमॅडीक म्हणायचं" वगैरे उपदेशामृत पाजतात.तरी बरं मला मॅलिंचोली आणि "रँडेझावस" हे शब्द बोलताना अजून ऐकले नाहीय आणि अजून ते कानावर गेलेले नाहीत."आजपासून मला ममा म्हणून ओळख दाखवू नको" म्हणून फतवा आलाच असता नाहीतर.
"दोन बोटाचं खरकटं धुवायला नळ चालू ठेवून पंचवीस शे लिटर पाणी वाया घालवू नकोस" म्हटलं की "पंचवीस म्हणजे इंग्लिश मध्ये किती" हा प्रश्न मख्ख पणे पाणी चालू ठेवून येतो.हिंदी चांगलं नाही म्हणावं तर चुकून "अपन ये करेंगे" म्हटलं की "तुला किती वेळा सांगायचं, अपन इज बॅड टपोरी लँग्वेज.यु शुड से हम ये करेंगे!" असा ज्ञानोपदेश आलाच.

एकदा या मुलांना अभ्यासात्मक दृष्टीने मेरे मेहबूब किंवा मुघले आझम वगैरे पिक्चर दाखवावे म्हणतेय!!येताय का बरोबर पोरे घेऊन?

अनुराधा कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पैली. मस्त लिहिलंय गं.
एवढं सगळं सांभाळून पोरांचे अभ्यास घेणाऱ्या सगळ्या पालकांना __/\__

याचा बाप नक्कीच ते 42 किलोमीटर मॅराथॉन वाले महारथी असतात त्यातला असेल.
>>> हहपूवा... अक्खा लेख.

बा द वे - .हिंदी पुल म्हणजे ब्रिज... मराठीत पण पूल शब्द आहे ना ब्रिज ला.

मी तर हापिसातल्या एका उत्तर प्रदेश मधून आलेल्या मैत्रिणी ला शरण जाते, हिंदी परीक्षा आली हे ती स्वतः हून ओळखायला लागली आहे...पक्ष्यांची, प्राण्यांची नावे, अनेकवचन, शब्द अर्थ, मुहावरे यासाठी वैताग वैताग होतो..
हिंदी बातम्या वाले चैनल वर सियासत, यातायात आणि तत्सम शब्द ऐकून पण हे लोक इतकं शब्द बंबाळ का करतात असं वाटतं....
लेख मस्त लिहिला आहे, मजा आली आणि खूप गोष्टी तंतोतंत जुळल्या!

मस्त Lol
मी सध्या मुलाच्या शेजारी बसून कन्नड मुळाक्षरं गिरवते. त्यामुळे confusion ला अजून एक dimension आलं आहे Lol
कन्नडमध्ये निघंटु म्हणजे शब्दकोश. हा शब्द मी यापूर्वी फक्त वरकरणी आणि वल्ली मधल्या ' तो' मध्ये वाचला होता. काय अर्थ आहे त्यात त्याचा कुणास ठाऊक!

भारी लेख Lol
बरोबर, डंठल म्हणजे देठच आहे. एका हिंदी मित्राने एकदा गोभी(फ्लॉवर) के डंठल की सब्जी खाई असं सांगितलं. मला डंठल कळता कळेना जेव्हा फोटो बघितला तेव्हा हे असतं होय डंठल असं झालेलं. Lol

आयला,
लोकाना गुगल न करता दोन्ही शब्द माहिती आहेत, धन्य!
मी काल बन्दनवार चा अर्थ लाम्बून 'कश्यात तरी बन्दिस्त' असा सांगून अंग काढून घेतलं
आणि मग सद्सद्विवेक्बुद्धि जागी होऊन गुगल केलं. मला बंदनवार म्हणजे तोरण हे या जन्मात गेस करता आलं नसतं.

आयला,
लोकाना गुगल न करता दोन्ही शब्द माहिती आहेत, धन्य!
मी काल बन्दनवार चा अर्थ लाम्बून 'कश्यात तरी बन्दिस्त' असा सांगून अंग काढून घेतलं
आणि मग सद्सद्विवेक्बुद्धि जागी होऊन गुगल केलं. मला बंदनवार म्हणजे तोरण हे या जन्मात गेस करता आलं नसतं. >>
अस माझ लकडसुंघवा ला झाल होते.....मला कुठल्याही जन्मात त्याचा अर्थ गेस करता आला नसता

लकडसुंघवा म्हणजे सुतार पक्षी का?
अजून गुगल नाही केले.
लकडबघ्घा म्हणजे तरस.

काल भेड चे अपोझिट लिंग सर्व मुलानी भेडी केले होते Happy

हो

लकडसुंघवा म्हणजे किडनॅपर

काही काय Happy
त्याचा आणि लाकडाचा काय संबंध? लडकसुंघवा वगैरे असेल.लहान मुलांच्या वासावर वगैरे Happy

हे असं हिंदी शाळेत शिकवितात? मग मी शाळेत काय शिकले हा मोठाच प्रश्न आहे

लडकसुंघवा वगैरे असेल.लहान मुलांच्या वासावर वगैरे >>>> Lol Lol Lol

Pages