चवळी

Submitted by सायलीमोकाटेजोग on 28 September, 2017 - 00:39

काही दिवसांपूर्वी चवळी काढली आणि लक्षात आलं, चवळीला भुंगा लागलाय. कडधान्यं मी शक्यतो फ्रिजरमध्ये टाकते म्हणजे किडे-भुंग्यांचा त्रास होत नाही. नेमकी ही नवी आणलेली चवळी गडबडीत बाहेर राहून गेली. संपवायच्या दृष्टीने मग मी ती सगळीच भिजवली. ‘रोजच्या व्यस्त वेळापत्रकात विसरघोळ घातला की हे असं पुढे काम वाढतं’… डोक्यातल्या विचार भुंग्यासोबत भिजलेली चवळी पटापट निवडायला घेतली. नेहमीसारखा खराब भाग बाजूला काढून उरलेलं दल घेण्याची काटकसर बाजूला ठेवत मी भुंगा लागलेल्या सगळ्या आख्या चवळ्याच बाजूला काढल्या आणि पुढच्या स्वयंपाकाला लागले.

जलसमाधी मिळालेल्या भुंग्यांना पोटात घेऊन त्या चवळ्या ओल्या कचऱ्याच्या पिशवीशी ३-४ दिवस पडून होत्या. आठवड्याची ओट्याची साफसफाई करताना लक्ष गेलं. चवळ्यांची दलं वेगळी होऊन भुंग्यांची प्रेते बाजूला सारत प्रत्येकीला इंचभर मोड आणि सुंदर पोपटी अंकुर फुटला होता. मला गंमत वाटली. मी लागलीच ती ताटली हातात घेतली आणि बाहेर बागेतल्या कुंड्यांमध्ये जिथे जागा होती तिथे त्या अंकुरलेल्या चवळ्या हळुवार खोचून टाकल्या.

थंडी संपून वसंत ऋतूची चाहूल घेत त्या चवळ्यांची रोपे मस्त तरारली आणि मागच्या दोन पावसात फुलं येऊन शेंगांनी मढलीही! काळीज पोखरणाऱ्या भुंग्यांना हार न मानता जगण्याची केवढी जिद्द दाखवलीत गो… माझं बोलणं जणू काही कळतंय अशा आविर्भावात वाऱ्याच्या मंद झुळूकेवर किंचित डोलत ती रोपं जणू गर्भवतीचा साज लेऊन सस्मित शहारली!!

~ सायली मोकाटे-जोग
http://sayalimokatejog.wordpress.com/2017/09/20/chavali/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> मी लागलीच ती ताटली हातात घेतली <<<
हे वाचल्यावर मी टरकले. मला वाटले, की पुढे लिहिल की चवळीची आमटी भुंग्यामिश्रित करून खाल्ली आणि चवदार वाटली.;)

कृपया आहारशास्त्र व पाककृती विभागात पूर्ण पाककृती मराठीत लिहा. ललितलेखन विभागात फक्त लिंक देऊ नका.>>>
ही पाककला नसून लेख आहे...>>> Lol सॉरी पण मला हसुच आलं

वाऱ्याच्या मंद झुळूकेवर किंचित डोलत ती रोपं जणू गर्भवतीचा साज लेऊन सस्मित शहारली!!
>>>>>
वाह वाह... मस्तच...

छान लेख आहे आवडला Happy

भुंगा काय प्रकार असतो, मला पहिले मुंग्याचे टायपो होत भुंग्या झाले की काय असे वाटलेले. मग कळले की वाळवीसारखा काहीतरी किडीचा प्रकार असावा.. पुढच्यावेळी फोटो नक्की काढा Happy

वाह मस्त लिहिलंय !
आणि तुमच्या निरिक्षणशक्ति तसेच त्या रोपांच्यासुद्धा भावना शब्द बद्ध करण्याच्या कल्पनाशक्तिला मनापासून दाद Happy

लेखाच्या अखेरीस नुसती लिंक देण्यासह सोबत त्या रोपांचा फोटो दिला असता तर अधिक छान झाले असते असे वाटते