कसं काय जमतं?

Submitted by विद्या भुतकर on 25 September, 2017 - 23:13

सकाळी शेवटी डॉकटरकडे जाऊन आले. तीन दिवस बिघडलेल्या पोटावर सर्व प्रयोग करून झाल्यावर, नाईलाजाने. अर्थात सर्व शहाण्या भारतीय नागरिकांप्रमाणे मीही दुकानातून औषध आणलं होतं आणि ज्या लोकांना मला बरं वाटत नाहीये माहित होतं त्या सर्वांनी सांगितलेले सर्व घरगुती उपचारही करून झाले होते. डॉक्टरकडे जाणे म्हणजे जणू तुमच्या या सर्व उपचारांची हारच! त्याच हरलेल्या, पडलेल्या मानेने आम्ही गेलो. सुरुवातीचे पैसे वगैरे घेण्यासारखी महत्वाची कामे झाल्यावर तपासण्यासारखी मामुली कामे करायची वाट बघत बसलो. समोर टीव्हीवर ढिगाने चौकोनी बॉक्स दिसत होते. त्यात इतके सगळे ऑप्शन होते की आजारी पडावं तर इथे अमेरिकेतच असा विचारही मनात येऊनगेला.

थोड्या वेळाने छान आवरलेली नर्स आली आणि गोड हसून चेकिंग रूममध्ये घेऊन गेली. निदान आज तिच्यासमोर माझ्या गबाळेपणाचं स्पष्टीकरण द्यायला 'मी आजारी आहे' हे कारण तरी होतं. ते मी स्वतःला पुन्हा एकदा समजावलं आणि चेकिंग रूममध्ये गेले. तिथे तिने मला प्रेमाने प्रश्न विचारले. कधीपासून पोट बिघडले आहे, किती वेळा जाऊन आला, कळ येऊन होतेय का, पातळ-चिकट, लाल काळी वगैरे टेक्शर वाले प्रश्नही तिने विचारले. ताप आहे का पाहिलं आणि बीपीही तपासलं. हे सर्व वर्णन मी सविस्तरपणे सांगताना नवऱ्याचा चेहरा कडू होऊन वाकडा झाला होता.
तर त्या नर्सने त्याला विचारलंही,"तुम्ही ठीक आहे ना?". मग कुठे जरासा तो हसला आणि म्हणाला,"हो हो".

सर्व चौकशा झाल्यावर डॉकटर येतीलच लवकर असे सांगून ती निघून गेली आणि आम्हाला जाणवलं,"बिघडलेलं पोट" या विषयावर बोलतानाही कुणी इतकं हसून आणि प्रेमानं कसं बोलू शकतं?

खरं सांगते, अशा गोष्टींची सवय नाहीये हो? हॉस्पिटल मध्ये जाऊन आजारी माणसापेक्षा बाकी लोकांची तोंड पाहून आजारी पडू असं वातावरण पाहिजे. त्याची सवय आहे. नर्सने केवळ रक्त काढताना नीट शीर तपासून जास्त त्रास न देता रक्त घेतलं तरी आनंद वाटावा याचीही आहे. पण एकतर आजारी माणूस त्यात त्याला हसायला सांगायचं आणि स्वतःही हसतमुख राहायचं? शक्यच नाही. पुढे डॉक्टरही असाच हसमुख ! मग त्याने मी जे काही करत आहे तेच सर्व करत राहा असा 'विकतचा' सल्ला दिला. शिवाय जाताना दोन-चार पाने प्रिंटआऊटही वाचायला. (मी ते वाचणार नव्हते हे सांगायला नकोच !)

तर हे असे अनेक अनुभव आजवर आले. पोरांच्या डिलिव्हरी पासून हातपाय मोडून घेईपर्यंत. प्रत्येकवेळी, समोरचा माणूस रडत असो, टेन्शन मध्ये असो किंवा झोपेत, आपण हसत राहायचं, मुलं असतील तर त्यांच्याशी अजून.... गोड बोलायचं आणि आपलं काम करायचं. कसं करत असतील हे या नर्सेस? दोन्ही पोरांच्या डिलिव्हरी मध्ये सर्वात मोठा त्रास यांचा होता. का? तर इथे समोर आलेल्या पोराचं काय करायचं, झोपायचं कधी, जेवायचं काय असे महत्वाचे प्रश्न समोर असताना मध्यरात्री तीन वाजता आलेली नर्सही छान बोलत राहते. असं वाटायचं की जरा ब्रेक द्याना माझ्या तोंडालाही. किती वेळ हसणार मी हे असं तोंड वासून? त्यातल्या काहीजणी इतक्या पेशन्स वाल्या होत्या. बाळाला फीड कसं करायचं पासून डायपर पर्यंत छान समजावून सांगणाऱ्या.

हे असे अनुभव आले की भारतातल्या सर्व डॉकटर व्हिजिट्स आठवतात आणि त्यात आठवते ती म्हणजे 'लक्षात राहणारी नर्स' नसणं !! शक्य होईल तितका निर्विकार, रुक्ष चेहरा, हातात दिलेलं काम चुकूनही तोंडातून ब्र न काढता करून रुममधून निघून जाणं. चुकून काही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर न देणं किंवा एका शब्दात देणं, वगैरे पाहिलं आहे. समोर माणूस २० तास उभा असला तरी त्याच्याबद्दल कणभर दया न येणाऱ्या अनेक नर्स पाहिल्या. वाटतं, त्यांना कसं जमत असेल असं निर्विकार राहणं, किंवा कणभर रागीटपणाकडेच झुकणारं वागणं? अर्थात त्यात त्यांचे शैक्षिणक, आर्थिक स्तर त्याला कारणीभूत असेल का? त्यात त्यांच्याशी अजूनच तुसडेपणाने बोलणारे डॉक्टरही पाहिलेत. त्यांच्या वागण्याने या अशा शांत राहात असतील का? माहित नाही.

अजून या कामासाठी अयोग्य असूनही नोकरी करणाऱ्या आणि चक्क रुग्णाकडे दुर्लक्ष करणारे महाभाग निराळेच. त्यांना नोकरीवर ठेवणारे बेजबाबदार डॉक्टर तर अजून डेंजर. तो जरा जास्तच गंभीर विषय आहे. असो.

मुलाच्या जन्माच्यावेळी हॅलोविन होता. तेंव्हा रात्री १२ वाजता घाबरवणारा मेकअप करुनही तितक्याच उत्साहाने मदत करणाऱ्या नर्स मी पाहिल्या आहेत. अशा वेळी कितीही नाही म्हटलं तरी तुलना होणं साहजिकच आहे. रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे. नाही का?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आपल्या जागी आणि त्यावरची मतं, प्रतिसाद आपल्या जागी. भारतात किंवा कोणत्याही देशात वैद्यकिय क्षेत्राबद्दलच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातले अनुभव हे वेगळेच असणार. लेखाला दुजोरा मिळावा किंवा त्यावर विरूद्ध मते यावीत म्हणून हा लेख विद्याने लिहिलेला दिसत नाही फक्त आलेला अनुभव लिहिला आहे. माहिती म्हणून नोंद करून घ्यायला हरकत नाही Happy
बाकी टण्याचा प्रतिसाद आवडला...
आत्ताचा अगदी ताजा अनुभव सांगते. माझ्या घराजवळच मी डोळे तपासायला गेले होते. वेटिंग रूम मध्ये बसल्या बसल्या डॉक्टरांचे फोटो पाहिले. नंतर आत गेल्यावर ज्यांनी डोळे तपासले त्यांचा चेहरा काही फोटोतल्या डॉक्टर बरोबर जुळला नाही. बाहेर येऊन रिसेप्शनिस्ट ला विचारले. तर ती म्हणाली हे छोटे डॉक्टर... सरांचे धाकटे भाऊ.
क्लिनिक मध्ये लावलेल्या डिग्र्या, सर्टिफिकिटं, फोटो, पेशंटचे फिडबॅक, इतकंच नव्हे तर प्रिस्क्रिप्शन, केस पेपर सर्व मोठ्या डॉक्टरच्या नावे, पण खुर्चित बसलेला धाकटा निराळाच. बिन्धास्तपणे मोठ्या डॉक्टरच्या नावाने सही करून मला नंबर काढून दिला... बाहेर पडताना मी इतकी विचारात पडले... की ऑथेण्टिक किंवा शास्त्रशुद्ध तपासणी व्हावी म्हणून आपण ऑप्टिशियन कडून नंबर न काढता इथे आलोय, पण ज्याने डोळे तपासले त्याच्याकडे नेमकी कोणती डिग्री आहे हे तपासण्याचा अधिकार नाही. Sad हतबल झाले विचार करून.

पण ज्याने डोळे तपासले त्याच्याकडे नेमकी कोणती डिग्री आहे हे तपासण्याचा अधिकार नाही.>> अधिकार आहे! पण आपणच आपला अधिकार योग्य रितीने वापरत नाही.

तुझा प्रतिसाद सगळ्यात भारी आहे.>> हाहाहा हो न दक्षे एकदा त्याच्या पेडिट्रिशिअन ला हा किस्सा सांगितला की लूप पूर्ण होईल.

विद्या, अवांतर प्रतिसाद दिला म्हणून माफी मागते.

नेहमी प्रमणेच हाही लेख छान आहे. पण या वरील प्रतिसाद बघता काय बोलावे ते कळेना. तुम्ही हा लेख केवळ तुमचा एक अनुभव म्हणून लिहिला आहे. पण ईथे काही प्रतिसादात असे आढळे की त्यांनी हा केवळ अनुभव आहे हे न समजता दोन ठिकाणांत झालेली तूलना वाटत आहे. खरं तर दोन वेगळ्या ठिकाणांची तूलना एक मेकांबरोबर होऊच शकत नाही. प्रत्येकाच काही न काही वेगळेपण असत.

ओ निर्झराताई, शेवटून तिसरा परिच्छेद वाचता का? त्यात जे लिहिले आहे त्याला तुलना म्हणतात ना?

माझे लेखिकेने तुलना करावी का नाही याबद्दल काहिही म्हणणे नाहिये. तो त्यांचा हक्क आहे. फक्त तुलना केली असेल तर पोस्टवर येणार्‍या प्रतिक्रियासुद्धा तद्नुषंगाने असतील हेदेखील ध्यानात घेतले पाहिजे.

>>
गरीबांना मरायला टेकल्याशिवाय वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. >> हे प्रचंड ब्लँकेट आणि अतिरंजित विधान आहे.
हॉस्पिटल मधल्या डॉ. आणि नर्सेसचे कामाचे तास (ग्रेज अ‍ॅनेटॉमी बघुन आणि डॉ गवांदे यांची पुस्तके वाचुन) कमी असतील असं वाटत नाही.
>>
@अमितव, हॉस्पिटलमधले कामाचे तास व त्राण याबाबतची तुलना मी स्वतः पाहिलेल्या उदाहरणांवरून केली आहे. तो डेटा सेट फार मोठा व कॉम्प्रिहेन्सिव आहे असे माझे म्हणणे नाही. भारतात व अमेरिकेत दोन्ही ठिकाणी प्रामुख्याने मेडिकल सेंटर असलेल्या दोन गावात राहण्याची संधी व या व्यवसायाशी संबंधित (डॉक्टर, नर्स व या व्यवसायाला सप्लाय करणारे सप्लायर्स) लोकांशी असलेली वैयक्तिक ओळख यावरून हे विधान केले आहे. अमेरिकेतला विद्यार्थी/फेलो हे मजबूत राबतात. डॉक्टरदेखील भरपूर काम करतात. पण भारताच्या तुलनेत ते किती रुग्ण तपासतात, किती वेळ डिक्टेशन करणे, वाचन/रिसर्च यावर जातो ही तुलना जास्त उपयोगी ठरेल हसतमूख असण्यासंदर्भात.
तसेच हॉस्पिटलमधले काउन्सेलिंग यात पण दोन्ही देशात खूप फरक आहे.

गरीबांना मिळणारी वैद्यकीय सेवा : विधान अतिरंजीत असले तरी समाजशास्त्राशी संबंधित असलेली नॉन-फिक्शन पुस्तके (निकेल्स अँड डाइम्ड सारखी) वाचून केले आहे. चुकीचे असेल तर तुम्ही ते चुकीचे का आहे ते सांगू शकता.

Pages