गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)

Submitted by मध्यलोक on 25 September, 2017 - 09:40

https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी

https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)

https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)

====================================================================================================

नारायणगाव, पुण्याजवळ वसलेले छोटेसे गाव. येथून सुमारे १० किमी अंतरावर आहे खोडद, अवकाश संशोधन क्षेत्रात GMRT(जायन्ट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) मुळे आपला ठसा उमटवनारे खेडे. पण खोडदची ही झाली आत्ताची ओळख. खोडद पूर्वी पासून प्रसिद्ध आहे ते येथून जवळच असलेल्या नारायणगड ह्या किल्ल्यामुळे. गडाचीवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. हल्ली किल्ला म्हणजे पर्यटकांचे पर्यटन स्थळ झाले आहे, पण कदाचित मुख्यरांगे पासून थोडासा वेगळा असल्यामुळे व येथून न दिसणाऱ्या दऱ्या, उंच डोंगर आणि नसलेल्या धबधब्या मुळे इकडे येणाऱ्या पर्यटकांचा लोंढा कमी आहे.

परंतु एकल डोंगरावर असलेल्या ह्या किल्ल्यावरून भवतालच्या संपूर्ण परिसराचे नयनरम्य दृश्य दिसते. जुन्नर ते पैठण ह्या ऐतिहासिक व्यापारी मार्गावर ह्या किल्ल्याने टेहळणीचे महत्वाचे काम केले आहे.

किल्ल्याला एक नाही तर दोन अश्या गडदुर्गानी आपले रक्षाकवच दिले आहे. गडाच्या पायथ्याशी आपल्याला दर्शन होते मुकाई देवीचे तर १५ ते २० मिनिटांच्या चढाईने गडमाथ्यावार पोहोचल्यावर दर्शन होते "हस्तमातेचे". चतुर्भुज असलेल्या हस्तमातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिरा समोर भव्य दीपमाळ आहे. गावकरी गडावर रोज पूजाअर्चा करतात तसेच नवरात्रेत गडाच्या पायथ्याला मोठी जत्रा असते.

पूर्व - पश्चिम पसरलेला नारायणगड परिसराच्या वातावरणावर आपली छाप सोडतो. गडावर भर्राट वारा असतो आणि पावसाळ्यात ढग गडमाथ्यावरुन येजा करतात.

पेशवा बाळाजी विश्वनाथांच्या काळात किल्ल्याची पुर्नबांधणी झाली होती आणि हा किल्ला सयाजी पवार ह्यांना सरंजाम म्हणून देण्यात आला होता. गडावर पांच टाके, नारायण टाके (ह्या वरुन किल्ल्याचे नाव आले आहे), येथील शिलालेख, चांभार टाके, उत्तर आणि दक्षिण दिशेला असणारी तटबंदी व बुरुज, जुन्या पायऱ्या, सदरेचे अवशेष विशेष बघण्यासारखे आहेत.

पुण्यापासून जवळ असलेल्या तरीही थोडासा उपेक्षित असणाऱ्या ह्या किल्ल्याला गडप्रेमीनी नक्की भेट द्यावी.

~विराग
हस्तमाता मंदिर
Hastamata.jpegहस्तमाता
Hastmata - 2 .JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users