आयुष्यातील सौंदर्यस्थळं

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

एखादी व्यक्ती लाम्बून पाहून पाहून बरी वाटते, मग आवडायला लागते. हळू हळू तुम्हाला हे ही कळते की त्या व्यक्तीला पण तुम्ही आवडता बहुधा. कारण ही आवडण्याची प्रक्रिया रस्त्यात मुद्दाम येण्याजाण्याच्या वेळी थाम्बणे, कंपनीच्या बसने एकत्र प्रवास करणे, लिफ्ट मध्ये भेटणे यातून सुरू झालेली असते. एक दिवस कानात हेडफोन लावून आपण गाणं ऐकत असताना अचानक तो समोर येतो, मग पुन्हा कधीतरी तेच 'घुंघट की आड से...' ऐकताना त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. नकळत चेहऱ्यावर स्मितहास्य येते. पण तुमचे हे गुपित फक्त तुम्हालाच माहित असल्याने तुम्ही अजून खूष होता. गाणी वाढत जातात, कधी 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना... तर कधी मेरी सांसो मी बसा ही तेरा ही एक नाम..."
मग एक दिवस तुम्हाला साक्षात्कार होतो की त्याचा आणि तुमचा कुठला तरी एक व्हॉटसअप ग्रुप कॉमन आहे. मग अधून मधून आठवण आली की प्रोफ़ाईल पिक्चर चेक होतेच Happy
ज्या ठिकाणी नॉर्मली तो तुमच्या वाटेत उभा असतो, त्या ठिकाणावरून जाताना तो तिथे असो नसो, हृदयाची स्पंदनं वाढतात.
काल अमुक वाजता लिफ्ट मध्ये भेटला होता, मग आजही भेटेल का? या विचाराने, रेंगाळून तुम्ही ती वेळ गाठून लिफ्ट ला कॉल दिलेला असतो पण तो काही येत नाही. मग पर्स मध्ये काही शोधण्याच्या बहाण्याने अजून वेळ काढत हळूच मागे तो येतोय का हे पाहणं सुरू होतं. मग तो अखेर येतो, बहुधा त्याने पण ही वेळ गाठायचा प्रयत्न केलेला असतोच. बोलत कुणीच नाही कुणाशी पण हृदयाचे ठोके मात्र दुप्पट होतात. लिफ्ट मधल्या इतर लोकांना ते ऐकू जातील की काय इतकी भीती वाटण्या इतपत... धडधड...
दुसरीकडे मनोमन तुम्ही इंटरनेट, फेसबुक चे आभार मानतच असता कारण नकळत तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतात. त्याने टाकलेली एक गुड मॉर्निंग ची पोस्ट पण तुम्हाला उगीचच भलती कियेटीव्ह वाटते.
मनात विचार येतो बरं झालं बाई निदान आपल्या तरूणपणी इंटरनेट इतकं फोफावलं आहे, आई बाबांच्या जमान्यात त्यांनी त्यांची आकर्षणं
कशी handle केली असतील ते त्यांचं त्यांनाच माहिती. आज जग बोटावर आलं आहे. बाकी काही नसलं तरी चालेल, फक्त व्यक्तीचं नाव माहिती असलं की बास, लग्गेच गुगल-ए-आझम व्हायचं आपण, आणि सगळा नकाशा शोधायचा त्या व्यक्तीचा... Happy
हे सगळं गोड वाटणं एक-दीड- दोन वर्ष चालतं.
अशी चालती बोलती आकर्षणं दुरूनच छान वाटतात आणि ती दुरच बरी असतात. अशा आकर्षणाला बळी पडून संवाद, भेटी घडवून आणणं, नात्यात अडकण मग भांडण वाद विवाद अपेक्षा, निराशा ... यात आकर्षण कधी संपत समजत नाही. कारण प्रत्येक आवडणारी व्यक्ती ही आयुष्यभराच्या किंवा काही काळासाठी सुद्धा कोणतंही नातं जोडायला योग्य असेलच असं नाही.
अशी आकर्षणं ही आयुष्यातली सौंदर्य स्थळं असतात ती तशीच जपायची... कायम.. जमतील तितके दिवस, जमतील तितकी वर्व, लिफ्ट मध्ये, सोसायटीत, येता जाता आणि नंतर मनात... Happy

दक्षिणा

प्रकार: 

मस्त लिहिले आहे.

यात आकर्षण कधी संपत समजत नाही. कारण प्रत्येक आवडणारी व्यक्ती ही आयुष्यभराच्या किंवा काही काळासाठी सुद्धा कोणतंही नातं जोडायला योग्य असेलच असं नाही. अशी आकर्षणं ही आयुष्यातली सौंदर्य स्थळं असतात ती तशीच जपायची >>>> हे मात्र मोठे झाल्यावरच कळते Happy

छान लिहिलयं

हे मात्र मोठे झाल्यावरच कळते >>>> +१

ही ही....छान लिहिलंय दक्षिणा....
अशी आकर्षणं ही आयुष्यातली सौंदर्य स्थळं असतात ती तशीच जपायची... कायम.. जमतील तितके दिवस, जमतील तितकी वर्व, लिफ्ट मध्ये, सोसायटीत, येता जाता आणि नंतर मनात >> हे वाक्यं वाचलं आणि अगदी अगदी असं झालं

मस्त!! Happy
अशी चालती बोलती आकर्षणं दुरूनच छान वाटतात आणि ती दुरच बरी असतात. अशा आकर्षणाला बळी पडून संवाद, भेटी घडवून आणणं, नात्यात अडकण मग भांडण वाद विवाद अपेक्षा, निराशा ... यात आकर्षण कधी संपत समजत नाही. कारण प्रत्येक आवडणारी व्यक्ती ही आयुष्यभराच्या किंवा काही काळासाठी सुद्धा कोणतंही नातं जोडायला योग्य असेलच असं नाही.
अशी आकर्षणं ही आयुष्यातली सौंदर्य स्थळं असतात ती तशीच जपायची... कायम.. जमतील तितके दिवस, जमतील तितकी वर्व, लिफ्ट मध्ये, सोसायटीत, येता जाता आणि नंतर मनात... >>> हे खूप आवडलं..

मराठी/भारतीय मध्यमवर्गीय मानसिकता आहे ही.मला एखादी स्त्री आवडली तर लगेच सांगून टाकतो मी.परत वाटायला नको की राहुन गेले.

Happy
आमच्यावेळी सौंदर्यस्थळे होती परंतु व्हॉटसअ‍ॅप नव्हते. तर असे होते -

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.