नदीच्या वाहण्याची गोष्ट!!

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

माझी फिल्म येतेय. त्या प्रवासाबद्दल थोडसं लिहिलं होतं ब्लॉगवर. तर माचकरांनी ते आपल्या पोर्टलसाठी परत आणि तपशिलात लिहून मागितलं. तो परत लिहिलेला लेख अ‍ॅडमिनच्या परवानगीने इथे टाकतेय. हा प्रवास इथे शेअर करताना मला खरंच खूप आनंद होतोय. श्वासच्याही आधीपासून मायबोलीशी माझं नातं आहे. त्यामुळे मायबोलीचे माझ्या आयुष्यात एक स्पेशल स्थान आहे. हे एक कारण आणि दुसरं म्हणजे यातला माझा बराचसा प्रवास चालू होता त्या काळात मी मायबोलीवर भरपूर अ‍ॅक्टिव्ह होते. अनेकांना माझ्या इकडेतिकडे फिरण्याच्या कहाण्याही सांगितल्या आहेत तेव्हा. तर हा लेख.

21441542_10154965990127151_1152969059_o.jpg

'मला नदी, पाणी याबद्दल कराविशी वाटतेय फिल्म!’ 'चालेल. करूया!’ असा एक संवाद आमच्यात घडला तो दिवस. 

’इथे घरात नळाला पाणी येतं आपल्या. ते कुठल्या धरणातून येतं माहितीये पण धरण कुठल्या नदीवर आहे? नदीचं काय झालंय हे कुठे माहितीये आपल्याला? इथे नद्यांची तर परिस्थिती बिकट झालेली आहे. याचा शोध घ्यायला हवा.’ संदीप मनापासून बोलत होता. मलाही पटलंच.

काम सुरू झालं. पाणी, नदी याबद्दलची पुस्तकं जमा होऊ लागली. ती वाचून काही माहिती जमा होऊ लागली. जलतज्ञ माधवराव चितळे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार अश्या दिग्गजांशी संपर्क साधला. त्यांच्या कामाबद्दल समजून घेतले. कधीही विचारांची देवाणघेवाण, चर्चा करायची गरज पडली तर माधवराव चितळे आवर्जून वेळ काढत.


महाराष्ट्राचे जलनायक वाचून मग एक दिवस जागतिक बॅंकेच्या जलस्वराज्य योजनेचे काम समजून घ्यायला आकेरीला डॉ. देवधरांच्या घरी जाऊन पोचलो. जलस्वराज्याचे काम बघितलेच पण भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे काम आणि डॉ. देवधरांचा वेगळा दृष्टिकोनही समजायला लागला. तिथून सुरू झाला संदीपचा नद्यांचा, नद्याकाठच्या गावांचा शोध.  

प्रत्येक दौर्‍यानंतर नदी, नदीकाठची आणि नदीची माणसं फिरून संदीप घरी यायचा तेव्हा त्याच्या सगळ्या असण्याला येणारा जंगलाचा, नदीचा हिरवा वास. त्याच्या बरोबरच्या कुठल्या तरी पिशवीतून निघालेलं एखादं रानफूल, एखादा दगड, मुंढरच्या साळवींच्या शेतातली तवशी आणि माणसांच्या रग्गड कहाण्या. 

यावेळेला धरणामुळे विस्थापित झालेला एकजण भेटला. डोळ्यात पाणी होतं त्याच्या. 

मायनिंगसाठीची जनसुनावणी बघून आलो. खोटेपणाचा कळस. 

एक म्हातारबाबा भेटले होते. आयुष्यभर कष्ट केल्याच्या खुणा होत्या अंगावर. ’आयुष्य खूप सुंदर गेलं!’ म्हणाले.

गोव्यात राजेंद्र केरकर आहेत, त्यांच्या घरी अनेक मुलं शिकायला राहतात. सगळ्यांना जंगल पाठ असतं. त्यांची समृद्धी एवढीश्शी आहे पण कधीही जंगलात नदीवर जायला तयार.

डॉ बापू भोगटेकडे जाऊ एकदा आपण. रानडुकराची शिकार ते कोंबडीपालन सगळ्यामधे एक्स्पर्ट माणूस आहे. 

समीरचं कृषि पर्यटन केंद्र, सचिनचे हळदीचे प्रयोग, पौनीकरांचा वेगळा दृष्टीकोन, हेमंत तांबेच्या टिप्पण्या, नितूची कलिंगडाची शेती, प्रसादचे (डॉ. देवधर) ग्रामविकासासाठीचे प्रयोग आणि बायोगॅस नावाचं त्याचं लाडकं प्रकरण.

एक मुलगी आहे. विशीबाविशीची. तिचं नदीशी नातं आहे...  पटकथेने आकार घ्यायला सुरूवात केली.

पटकथेचा आवाका संदीपच्या नजरेत आल्यावर मग मीही त्याच्याबरोबर नद्या फिरायला सुरूवात केली. तिथलं जग, माणसं, निसर्ग सगळं ’बघायचं’ होतं मला आणि योग्य वेळी कॅमेर्‍यासमोर उभंही करायचं होतं. तेव्हा त्या निसर्गाला भिडताना माझ्या शहरी गाभ्याला सुरूवातीला दडपायला झालं. पण त्या दडपणाचं हळूहळू मैत्रीत रूपांतरही झालं. मग खळाळतं, वाहतं पाणी नजरेला, पायाला भिडल्यावर माझी तंद्री लागणंही सुरू झालं. 

पटकथा आकार घेत असतानाच अभिनयाच्या कार्यशाळा आणि स्क्रीनटेस्टसही सुरू झाल्या. त्यात आमची, अंतीची माणसं सापडत गेली. एका ऑडिशनला समोर पूनम मांद्रेकर (आता शेटगावकर) समोर आली. हीच आपली नदीशी नातं असलेली मुलगी. तंतोतंत.

डॉ. हर्षदा देवधरची वीस रूपयाच्या नोटेची कविता. डॉ. प्रसाद देवधरबरोबर फिरताना उमजत गेलेलं कोकण, कोकणातलं गाव, कोकणी माणूस आणि राजकारण. पाण्याचं, जमिनीचं, निसर्गाचं राजकारण.
गोव्याचा श्रीकांत जोशी, त्याचं फार्म आणि तिथे येणारे मोर. आमचं गोव्यातलं घरच असल्यासारखं. असं निघून नसतं जायचं रे श्रीकांत! आता  माझ्या आणि संदीपच्या डोक्यावर हात ठेवून ’सूरज कही भी जाये, तुमपर ना धूप आये!’ कोण म्हणणार?
नदीचे रंग, झाडांचे पोत, ऋतूंची रूपे, माणसांच्या रंगरेषा... ’परीसराची एकेक शीर जाणतेय मी!’ याची अनुभूती मिळेतोपर्यंत सगळा आसमंत हळूहळू आत झिरपू द्यायचा.
एखाद्या गावाचा चेहरा आनंदी दिसला की समजावं इथली नदी वाहती आहे. लोकांची आयुष्यं समृद्ध करतेय. गाव आणि नदीचं हे नातं अप्रूपाचं, सांभाळून ठेवण्याचं.

हे माझे पहिलेच कलादिग्दर्शन. आणि बरोबर कितव्यांदातरी केलेले वेशसंकल्पनही होते.

"कुणी निर्माता आपल्यासाठी उभा राहणार नाहीये. जमवू काहीतरी पैशाचं. आपणच करायला हवं." "तुझं श्रेय तुझंच असायला हवं आता. आपणच करायला हवं." अश्या संवादांचा एक दिवस. निर्माता बनायचं राज्य घेऊन बसलो. मग बाकीच्या कामाबरोबर पैसा उभा राहण्यासाठी प्रयत्न करणे आणि वाट बघणे हे आलंच.

शूटींगपर्यंत पोचलो. पहाटे पहाटे सावंतवाडीत तलावाच्या बाजूला कार्स, व्हॅन्स, ट्रक्स मिळून १५ -१६ गाड्यांचा जथ्था. सगळ्या गाड्या रांगेने लोकेशनवर पोचणार. अगदी कुडाळहून नाश्ता घेऊन आलेला टेम्पोही त्यातच. एकावेळेला १५-१५ दिवस सलग शूटिंग. अर्धे दिवस गोव्याच्या जंगलात अर्धे दिवस सिंधुदुर्गातल्या कानाकोपर्‍यात.

अजून असंख्य बारीक सारीक गोष्टी. या प्रवासाचे साथीदार आणि साक्षीदार असलेले असंख्य मित्र व सहकारी.

 या सगळ्या सगळ्यातून आता फिल्म रिलीज होतेय. नदी वाह्ती होतेय या सप्टेंबरमधे २२ तारखेला. ती वाहती ठेवणं तुमच्या हाती. तिकीट काढून प्रेक्षागृहात जाऊन फिल्म बघा अशी विनंती करून तुमच्या शुभेच्छा गृहित धरते आहे.

नदी वाहते चे दोन टिझर्स प्रसिद्ध झाले आहेत त्यांचे दुवे इथे देते आहे.
पहिला टिझर

दुसरा टिझर

- नी

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन नीरजा. काल तुम्ही आणी संदिप सावंत चला हवा येऊ द्या मध्ये पण दिसलात. हा विषय त्यामुळे नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचेल, कारण मायबोली तशी मर्यादीत आहे. चला हवा येऊ द्या आणी टिझरच्या मधून विषयाची छान ओळख झाली. सिनेमा नक्कीच पहाणार. तुम्हाला आणी तुमच्या टिमला खूप शुभेच्छा. टिझर छान आहे आणी दुसरा तर फार आवडला.

थँक्यू अदिजो, प्राजक्ता आणि रश्मी.
पर्वा आयबीएन लोकमतवरही दिग्दर्शकाचा लाइव्ह इंटरव्ह्यू झाला. युट्यूबवर आहे.
एकुणात सगळीकडून रिस्पॉन्स खूप चांगला आहे. बघूया कसे कसे होतेय ते.

नदी वाहते च्या टिम ला पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा!
मला माझं इथे एक प्रामाणिक मत या निमित्ताने नोंदवायचं आहे. मत चित्रपटाविषयी नसून 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाबद्दल आहे. मी खूप उत्साहाने चित्रपटाबद्दल अधिक माहिती ते पण त्याच्या,निर्माती, दिग्दर्शक, कलाकारांकडून थेट ऐकायला मिळणार, त्यातून निर्माती मैत्रिण असल्याने उत्सुकता अधिकच होती. पण निलेश साबळे आणि टिम ने खरोखरी निराशा केली. कार्यक्रमाची रूपरेषा थोडी सुधारायला हवी असं मला वाटतं.
नदी वाहते आणि बापजन्म हे दोन इतके चांगले येऊ घातलेले चित्रपट आहेत, इतके दिग्गज मंचावर उपस्थित असताना त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकावेत, चित्रपटाविषयी अधिक खोलवर जाऊन चर्चा करावी... त्यांच्या एकूण प्रवासाची चर्चा करावी असे त्यांना का वाटले नसावे? त्या ऐवजी ते पांचट बेटा सिनेमावर आधारीत नाटक, ती लोणच्याची जाहिरात, मध्येच ते पत्र वाचन इ. नी वात आणला.
चर्चा म्हणावी तितक्या लाम्बीची, सुरस झाली नाही. कोणत्याही कलाकृतीला बनवताना अपार मेहनत लागते. चहयेद्या हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे त्यातून हाच असं नव्हे पण असे अनेक उत्तम चित्रपट लोकांपर्यंत अधिक पोहोचायला हवे असतील तर त्यांनी या गोष्टीचा सिरियसली विचार करायला हवा असं मला वाटतं.
मी वैयक्तिकरित्या नदी वाहते चा टिझर पाहिलाय, सिनेमा बघणार आहे हे मी ठरवून ठेवलं आहे आणि हे पाहणं न पाहणं हे माझं काही चहयेद्या वर अवलंबून नाही. पण आपल्या देशात कित्येक पट जनता कदाचित कपिल शर्मा आणि निलेश साबळेचा प्रोग्रॅम पाहून चित्रपट पहायचा की नाही ते ठरवत असण्याची शक्यता आहे. मग त्यांच्यापर्यंत सिनेमाचा कन्टेन्ट अधिक अधिक पोहोचायला हवा असं नाही का वाटत?

प्रतिसाद अवांतर वाटल्यास क्षमस्व, उडवून टाकेन. __/\__

त्यातून निर्माती मैत्रिण असल्याने उत्सुकता अधिकच होती. पण निलेश साबळे आणि टिम ने खरोखरी निराशा केली. कार्यक्रमाची रूपरेषा थोडी सुधारायला हवी असं मला वाटतं. >>> एकदम योग्य लिहिलस दक्षिणा. मलाही असच वाटल. त्यांनी चित्रपटाशी संबधित लोकांशी जास्त संवाद साधला पाहिजे.

नदी वाहते बद्दल खूप उत्सूकता आहे.

दक्षे गुड पोस्ट. बऱ्याचदा मला वाटत रहाते की फालतू स्कीटस कमी करून, जे पाहुणे आलेत त्यांना जास्त बोलायला दिलं तर बरं होईल. नदी वाहतेचे दिग्दर्शक संदीप सावंत फार छान बोलत होते, माझा नवराही म्हणाला की अजून त्यांना बोलायला द्यायला हवं होतं. नीधप कडून पण जास्त ऐकायला आवडलं असते पण ह्या लोकांचा format असाच असतो असं दिसतं एकंदरीत. पण हा कार्यक्रम बघितला जातो खूप त्यामुळे चित्रपट सगळीकडे पोचायला मदत होते.

नदी वाहतेला परत एकदा खूप खूप शुभेच्छा.

ह्म्म दक्षे. तो त्यांचा फॉर्मॅट असतो. पण अशी फिल्म येते आहे हे पोचणे त्याने सोपे होते. हे महत्वाचे.

'नदी वाहते'चं वेळापत्रक -

१. मुंबई

सिटीलाईट (माटुंगा) सायं. ५.३०
सनसिटी (पार्ले) - दु. १
सिनेपोलिस विवियाना (ठाणे) - दु. १.४०
पीव्हीआर (डोंबिवली) - दु. १२.३०
पीव्हीआर (पनवेल) - सायं. ५.३०

२. पुणे

सिटीप्राईड (कोथरुड ) - दु. १.१५
अभिरुची सिटीप्राईड - रा. ८.१५
पीव्हीआर पॅव्हेलियन - दु. १२.४५

३. नाशिक

सिनेमॅक्स द झोन - दु. २.१५

आयबीएन लोकमतवर दिग्दर्शक संदिप सावंत यांची मुलाखत पाहिली ,ती मुलाखत पाहून चित्रपटाविषयी बरीच माहिती मिळाली , आजच अभिरुचीला पाहणार होते पण bookmyshow वर तिकीट मिळाल नाही पण उद्या नक्की पाहणार आहे ,आईला चित्रपटाचा टिझर अतिशय आवडलाय

दक्षिणाच्या पोस्टला अनुमोदन! संदीप सावंत खरंच खूप छान बोलत होते. त्यांच्याकडून व नीधपकडून अजून माहिती काढून घ्यायला हवी होती साबळेनी.

टवणे सर??? म्हणजे टण्या??

भेटला तुमचा दोस्त Happy

सगळ्यांना थँक्यू. कालच्या सगळ्या गोंधळातून वाचलो आहोत. आज सर्व शोज ठरल्याप्रमाणे आहेत. आमच्या फेबु पेजवर आहेतच आणि उद्यापासून पेपर अ‍ॅड ही असेल. बुकमायशो वर दिसले नाही तरी शोज पेजवर/ अ‍ॅडमधे येतील त्याप्रमाणे नक्की आहेत. आणि थिएटरला काऊंटरला मिळतील तिकिटे.

काल पाहिला सिनेमा ... नदी वाहते.
खूपच छान ... सर्वाधिक लक्षवेधी आहेत त्या फ्रेम... त्यातही रात्रीचा कोकण... निव्वळ भन्नाट.
अजूनही बरंच काही आहे... थोडा वेळ काढून लिहावं लागेल.

थँक्स सनव. नक्की बघा. याच आठवड्यात जास्तीत जास्त लोकांनी बघा.

संदीप आहेर, थँक्स. जरूर लिहा.

नदी वाचवण्यासंदर्भातील विधायक कृती लक्षात घेण्यासाठी १४ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या निमित्ताने आज लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमधे नदी वाहते बद्दल आम्ही दोघांनी लिहिले आहे. या लेखांच्या लिंक्स.

नदी वाहते, अस्वस्थ करते - संदीप सावंत

नदी वाचवताना - नीरजा पटवर्धन

नदी वाहते हा सिनेमा अर्धा पाहिला होता. पण नावं वाचताना लक्ष दिले नाही कि काय कळत नाही. आत्ता हा लेख वर आलाय म्हणून समजलं...

सिनेमा पूर्ण बघून झालेला नाही. त्यावर बोलत नाही. पण हा लेख वाचनाता आला ते बरंच झालं.
बरीच मेहनत आहे...!!

फक्त 3 थेटरात का प्रदर्शित केला गेला. वितरक नव्हते का.
मला माहित पण नव्हते असा चित्रपट येऊन गेला, मार्केटिंग अजून करायला हवी होती. कंमेंट्स वरून वाटतंय की चांगला मुवि आहे, लोकांपर्यंत पोचला नाही तर फायदा काय.

कालच्या ठाण्यातल्या कार्यक्रमात नदी वाहतेचे स्क्रीनिंग झाले तेव्हां काही मित्रांनी पाहिला सिनेमा. खूप प्रभावित झाले. ब-याच जणांपर्यंत सिनेमा पोहोचलेला नाही.प्राईम, नेटफ्लिक्स किंवा कुठेही उपलब्ध करून देता येईल का प्लीज ?

पर्यावरण जागृतीबाबत उत्तम काम आहे तुमचे. पुण्यात कार्यक्रम असेल तेव्हां कळवा प्लीज.

Pages