सल

Submitted by केजो on 6 September, 2017 - 12:53

सल
एक दिवस मुलीला शाळेत सोडताना तिने अचानक विचारलं ,"ममा, what do you mean by सल ?" मी ड्राईव्ह करत असताना अशा गुगली टाकणं तिला छान जमतं . मग नेहमी प्रमाणे आमची प्रश्न-उत्तरं सुरु झाली. मी -"कोणत्या भाषेतला शब्द विचारते आहेस, सायली? आणि कुठे ऐकलास - context काय?" ती म्हणाली, "It is a मराटी word. I heard it sometime back while you were talking to मावशी on the phone." माझी अमेरिकेत जन्मलेली आणि वाढत असलेली मुलगी माझ्यावर नेहमी watch ठेवून असते. माझा भारतात फोन चालू असताना ती आजूबाजूला खेळत असली तरी कान माझ्या बोलण्याकडे असतात आणि मग अचानक कधीतरी असे ऐकलेले शब्द माझ्यासमोर प्रश्न म्हणून येतात. आता तिला कसा समजवावं ह्या विचारात आधी माझ्यातली मराठी अस्मिता जागी झाली. "अगं सायली किती वेळा सांगितलंय, मराटी नाही- म रा ठी ! म्हण बघू .." असं बोलता बोलता शाळा आली सुद्धा. मग मी तिला बाय केलं आणि म्हंटलं घरी आलीस कि संध्याकाळी सांगते हं सल म्हणजे काय ते.." मग ड्राईव्ह करताना तिला काय बरं सांगावं सल म्हणजे काय ते; हा विचार करताना मीच भूतकाळात हरवून गेले.
सल म्हणजे आमच्यासारख्या असंख्य भारतीयांच्या मनात कुठेतरी सतत असलेली टोचणी. दिवाळी-दसरा वीकएंड च्या सोयीने साजरा केला की लहानपणी साजरे केलेले सण-वार डोळ्यासमोर येतात. आणि मग मोजक्या मित्र परिवारासोबत सगळ्यांच्या सोयींनी potluck करताना ह्यात काहीच वावगं नाहीये असं मानून फक्त बॅकयार्ड मधे स्वस्तिकाची रांगोळी काढताना आलेलं हसू म्हणजेही सल!
सगळं घर भरलेलं असतं, मुलं मजेत खेळत असतात; नवरा भांडी घासत असतो आणि स्वतःचाच स्वतःला हेवा वाटत असताना अचानक डोळे भरून येतात की, हे सगळं बघायला आज आई-बाबा इथे नाहीत. हा जीवघेणा क्षणही सल दाखवून जातो. असे किती आणि कुठले-कुठले सल घेऊन आपण सगळे हसत वावरत असतो. कितीवेळा मनात असूनही आता तिकडे रात्र असेल; आता ती ऑफिसला गेली असेल अशा वेळेच्या गणितात न बसल्यानी राहून गेलेला फोन आणि मग त्या आठवणींनी आलेलं हसू आणि कधी-कधी रडूसुद्धा; म्हणजे सुद्धा सल!
आज दिवसभर ऑफीच्या कामातही लक्ष लागलं नाही. कुठले कुठले सल दिवसभर टोचणी देत गेले. संध्याकाळी सायलीला कसं बरं समजावू, सल म्हणजे काय! त्यात माझा इंग्लिशच्या बाबतीत आनंदच! तरीही प्रयत्न केलाच- "REGRETS"! हं सुचला शब्द; अशा आनंदात मुलांना pickup ला गेले. गाडीत बसल्या बसल्या डबे खाल्ले का, दिवस कसा गेला आणि त्यांच्या सगळ्या चिवचिवाटात सायली आणि मी दोघीही विसरून गेलो की आपण आज कशाबद्दल बोलणार होतो. नेहमीसारखंच मुलांना भेटून मनावरचं मळभ दूर झालं. आणि पुन्हा एकदा एक सल विरून गेला आणि मग मला खरा अर्थ कळला- सल म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही तर ठुसठुसणारी एक आठवण!!

Group content visibility: 
Use group defaults

छान !!!