अमॄताहुनी गोड - मँगो मलई डबलडेकर फज - आशिका

Submitted by आशिका on 2 September, 2017 - 00:46

नमस्कार मंडळी. मायबोली २०१७ च्या गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पाककॄती स्पर्धेच्या निमित्ताने यावर्षीच्या नियमांनुसार पाककॄतीचा विचार करत असतांना ही फज बनवण्याची कल्पना सुचली. गोड पदार्थ तर बनवायचाय पण साखर, गुळ यांशिवाय त्यामुळे जरा विचार करावा लागलाच उपलब्ध पर्यायांचा. मध आणि फळांचे रस चालू शकतील हे वाचून जरा हायसे वाटले. मग वाटलं की बाप्पाच्या नैवेद्यासाठी लाडू, पेढे, बर्फी हे नेहमीच केले जाते. तर यावर्षी काही वेगळा पर्याय विचारात घेऊ आणि 'फज'बनवायचे फायनल केले.
ओल्या खोबर्‍याच्या किसापासून आपण जी खुटखुटीत वडी बनवतो तशी न बनवता सॉफ्ट आणि रवाळ असे फजचे टेक्शचर जमून येण्यासाठी खोबर्‍याबरोबरच पनीर वापरायचे ठरवले. गोड चव आणण्यासाठी घरी सालाबादप्रमाणे फ्रीझ करुन ठेवलेला या सिझनच्या शेवटच्या पेटीतील हापूस आंब्याचा रस आणि मध कामी आले.

फायनल प्रॉडक्ट साखरेशिवाय बनवले आहे असे खाणार्‍यांना खरे वाटत नव्हते. (हापूस आंब्याची किमया). चवीला अतिशय स्वादिष्ट आणि रीच असा हा फज लागत होता.

तर आता साहित्य आणि कॄती सांगते.

साहित्य
१. दूध - ३ पेले (हेल्दी डीश बनवायची असल्यामुळे मी गायीचे लो फॅट दूध वापरले आहे).
२.ओल्या खोबर्‍याचा किस/चव - २ पेले
३. आमरस - अर्धा पेला
४. साजूक तूप - २ ते ३ मोठे चमचे
५. मध - २ ते ३ मोठे चमचे
६. केशर काड्या - ६ ते ७
७. पिस्ते (साधे, खारवलेले नाहीत) ७ ते ८
८. व्हाईट व्हिनेगर - दोन चहाचे चमचे
९. वेलची पावडर - एक ते दोन चिमूटभर
faj sahitya.jpg

(टीप - साहित्याचा जो फोटो दिला आहे त्यात वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या/पेले दिसत असले तरी प्रमाण लिहिताना सारे घटक पदार्थ एकाच पेल्याने मोजून त्यानुसार दिले आहे आणि तेच प्रामाण पाककॄतीसाठी वापरले आहे).

क्रमवार कॄती

१.सर्वप्रथम पनीर करुन घ्यावे. त्यासाठी तीन पैकी दोन पेले दूध एका पातेल्यात घेऊन ते उकळावे. दुधाला उकळी आल्यावर त्यावरील साय बाजूला काढून दुधात थोडे थोडे व्हाईट व्हिनेगर, दूध ढवळत मिसळावे. साधारण दोन चहाचे चमचे व्हिनेगर घालतांच दूध फाटते. ते गाळून पनीर गाळणीवर निथळत ठेवावे. एकदा हे पनीर पाण्याखाली धुवून घ्यावे.
दोने पेले दूध वापरुन अर्धा पेला पनीर बनते. ते आता बाजुला ठेवावे.

२. साहित्यातील उरलेले एक पेला दूध एका जाड बुडाच्या पातेल्याला साजुक तुपाचा हात लावून त्यात आटवत ठेवावे. एक उकळी येऊन गेल्यानंतर दुधात कालथा घालून ते दूध अधे मधे ढवळत रहावे म्हणजे तळाला लागणार नाही. दूध आटून निम्मे झाले की गॅस बंद करावा. थंड झाल्यावर हे आटीव दूध त्यावर धरलेल्या सायीसकट एकदा मिक्सरवर फिरवून घ्यावे म्हणजे दाट आणि निघोट होते.

३. कढईत १ ते २ मोठे चमचे साजुक तूप घालून त्यात खोबर्‍याचा किस घालावा आणि मंद आचेवर परतत रहावे. एक - दोन मिनिटे खोबरे परतून झाल्यावर त्यात पनीर कुस्करुन घालावे आणि पुन्हा परतावे. या मिश्रणाला पाणी सुटेल ते आटवावे. मग त्यात निम्मे आटीव दुध घालून पुन्हा चांगले परतावे. मिश्रण मिळून त्याचा गोळा बनू लागला की थांबुन या मिश्रणाचे दोन समान भाग करावेत.एक भाग दुसर्‍या कढईत काढुन घ्यावा.

४. आता पहिल्या कढईतील मिश्रणात अर्धा पेला आमरस घालून ते मिश्रण परत मंद गॅसवर परतत रहावे. नियमांनुसार साखर घालायची नसल्यामुळे आणि चव गोडच हवी असल्यामुळे आमरस जरा जास्त वापरला आहे. अन्यथा पाव पेलाही पुरतो. मिश्रण गोळा होऊ लागले व कडेला चिकटू लागले की चिमुटभर वेलची पूड घालून गॅस बंद करावा.

५. कॄती क्र. ४ व ५ या लिखाणाच्या सोयीसाठी एकामागोमाग एक लिहील्या आहेत. मात्र त्या एका वेळी दोन वेगळ्या कढईत करायच्या आहेत. क्र. ३ मध्ये बाजूला काढलेले अर्धे मिश्रण दुसर्‍या कढईत मंद आचेवर ठेवून त्यात उरलेले आटीव दुध घालून परतावे. या मिश्रणात २ मोठे चमचे मध घालून पुन्हा परतावे. मिश्रण गोळा होऊ लागले की चिमुटभर वेलची पूड घालून गॅस बंद करावा.

६. दोन्ही कढईतील मिश्रण तयार आहे. एका ताटाला साजूक तुपाचा हात लावून त्यावर आधी आंब्याचे मिश्रण ओतून वाटीने थापावे. त्यावर मध घातलेल्या मिश्रणाचा थर ओतून तोही थापून घ्यावा. सुरीने वड्या पाडाव्यात. वरुन केशर काड्या आणि पिस्त्याचे काप लावून सजवावे.
faj steps.jpg

७. थंड झाले की वड्या कापून घ्याव्यात.
faj single.jpg

मँगो - मलई डबलडेकर फज तयार आहे. पिवळा आणि पांढरा असे दोन वेगळे थर फोटोत दिसून येतील. बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि आलेल्या पाहुण्यांना द्यायला ही साखरविरहीत स्वीट डीश हा अतिशय हटके असा हेल्दी पर्याय आहे.
faj ready.jpg

पाककृतीस लागणारा वेळ - ४५ मिनिटे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त रेसिपी.
आशिका, संयोजकांना थोडा वेळ द्या.

__/\__

निघोट - शब्द बर्‍याच दिवसांनी वाचण्यात आला. Happy

Vaah!

Pages