नातिचरामि

Submitted by स्वप्ना_राज on 30 August, 2017 - 01:55

‘अभिषेक, घरी जातो आहेस ना?’

समीरने खांद्यावर हात ठेवला तेव्हा अभिषेक दचकला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर जवळपास अर्ध ऑफिस रिकामं झालं होतं. उरलेलं जायच्या तयारीत दिसत होतं. गेली दहाएक मिनिटं आपण समोरच्या स्क्रीनकडे नुसतं बघत होतो हे आता कुठे त्याच्या लक्षात आलं.

‘हो रे, निघतोच आहे. एव्हढं प्रेझेन्टेशन कम्प्लीट करायचंय. तेव्हढं करतो आणि निघतो बघ'

‘नक्की?’ समीरने विचारलं. त्याच्या स्वरात काळजी होती.

‘अरे नक्की यार. निघ तू. मनीषा वाट बघत असेल घरी'. अभिषेक बळेबळे हसून म्हणाला.

समीर गेल्यावर त्याने वॉशरुम मध्ये जाऊन तोंडावर गार पाण्याचा एक हबका मारला. मशीनमधून कॉफी घेतली आणि पुन्हा कम्प्युटरसमोर येऊन बसला. समोर प्रेझेन्टेशन आ वासून ओपन होतं. आत्तापर्यंत फक्त एकच स्लाईड बनवून झाली होती. पण काळजी ती नव्हती. काळजी ही होती की आज घरी जायचं की नाही. अर्थात ती आता नेहमीचीच काळजी झाली होती म्हणा. पण म्हणून दर दिवशी ती नव्याने वाटायची नाही असं नाही. उलट दर दिवशी त्याला स्वत:चाच खूप राग यायला लागला होता आता. काहीतरी करायला हवं होतं. पण काय?

त्याने पुन्हा एकदा काम सुरु करायचा यथाशक्ती प्रयत्न केला. पण नाही. डोक्यात पुन्हा तेच तेच विचार यायला लागले. त्याच रस्त्यावरून विचारांची गाडी रोज जायची....एखादं नवं ठिकाण लागेल ह्या अपेक्षेने. पण पोचायची मात्र त्याच ठिकाणी. आज तो रस्ता कायमचा बंद करायचा का? ऑफिसच्या टेरेसवर तो बर्याचदा गेला होता. अगदी आयडियल जागा होती ती उडी टाकायला. फक्त धैर्य गोळा करायला हवं. एखादा क्षण वेदना होईल कदाचित पण मग नंतर सगळं शांत. हमखास मरण येणार हे नक्की. पण मग ऑफिसच्या लोकांच्या मागे चौकशीचं नसतं लचांड लागेल त्याचं काय? तसे त्याच्या ऑफिसमधले लोक चांगले होते. गेले काही महिने तर सगळेच त्याला सांभाळून घेत होते. अगदी किरकिरा वाटणारा नलावडेसुध्दा. आपल्यामुळे त्यांना त्रास होणं चांगलं नाही. ते काही नाही...आपल्याला जीव द्यायचाच असेल तर इथून दूर कुठेतरी जाऊन द्यायचा. आणि नीट लिहून ठेवायचं की माझ्या मृत्युला कोणाला जबाबदार धरण्यात येऊ नये. अर्थात ते खोटं बोलणं होईल म्हणा. एक व्यक्ती त्याच्या आत्महत्येला जबाबदार असेलच. पण ते पत्रात लिहिण्यात काही अर्थ नसणार. उगाच लोक काय काय बोलायचे. अर्थात आपण मेल्यावर ते काही बोलले तरी काय फरक पडतो म्हणा.

विचारांच्या ह्या उलटसुलट चक्राने त्याला एकदम घुसमटल्यासारखं होऊ लागलं. बाहेर, गर्दीत, धक्के खात, वाहनांच्या हॉर्न्सचा, लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकायला हवा असं वाटायला लागलं. आपला आतला आवाज ऐकायचा नसेल तर हा जालीम उपाय आहे. त्याने सगळं आवरलं. बाहेर रिसेप्शनरूममध्ये काशीराम बसला होता.

‘निघालात साहेब?’ त्याने विचारलं. अर्थात तो आपण निघायचीच वाट बघत असणार हे त्याला माहित होतं. पण म्हटलं ना की ऑफिसमधले सगळे सांभाळून घेत होते.

‘हो रे. उशीर झाला नाही का?’ काशीरामने हसला.

‘गुड नाईट साहेब'

‘गुड नाईट रे'

तो ऑफिसमधून बाहेर पडला. आता कुठे जायचं? लगेच स्टेशन गाठावं असं वाटत नव्हतं. कुठे घाई आहे आपल्याला? मरायची घाई आहे. घरी जायची मात्र नाही. त्याला हसू आलं. काय सालं लाईफ झालंय.

ऑफिसजवळ एक मोठं मॉल. कितीदा तरी गेलाय तो तिथे गेल्या काही महिन्यात. आता सिक्युरिटीचे लोक पण ओळखायला लागले असतील. पण एकदा आत गेलं की वेळ कसा जायचा कळायचं देखील नाही. कुठे नको असलेले कपडे बघ. कुठे पुस्तकं चाळ. होम डेकॉरच्या दुकानातून फिर. भूक नसायची तरी वेळ घालवायला काही खायचं. मग पाय बोलायला लागले की स्टेशनचा रस्ता धरायचा. असं किती दिवस चालणार?

चालता चालता एकदम त्याचे पाय थबकले. समोर एक जोडपं होतं. एकच आईसक्रीम दोघं मिळून खात होते. त्याला एकदम मीनलची आठवण झाली. तिला चॉकलेट फ्लेवर कसला आवडायचा. आणि आपल्याला अजिबात नाही. पण तिच्यासाठी आपण चॉकलेट आईसक्रीमसुध्दा खायचो. कुठे असेल आता मीनल? आपलं लग्न झाल्यावर कधी भेटलीच नाही ती. सहाजिकच आहे म्हणा. तिच्या नवर्याला आवडत असेल का चॉकलेट फ्लेवर? नसेल तरी तिच्यासाठी खात असेल का तो? आपलं तिच्याशी लग्न झालं असतं तर आपण खाल्ला असता का?

‘लग्न'! अभिषेक दचकला. थांबलाच एकदम. घरी चित्रा वाट बघत असेल ना? नाही, नको तो विषय आता. निदान घराच्या दरवाज्यापर्यंत जाईपर्यंत तरी नको. मग तो विचार टाळतो म्हटलं तरी नाही टाळता येणार.

दहा वाजायला आले. आता मॉलमध्ये वेळ काढणं अशक्य होतं. फिरून फिरून त्याचे पाय दुखायला लागले होते. नेहमीप्रमाणेच. आणि थोडा थकवाही जाणवत होता. नेहमीप्रमाणेच. कसातरी पाय ओढत तो बाहेर आला. स्टेशनवर गर्दी नव्हती. एक काळ असा होता कि गर्दी नाही म्हणून त्याला आनंद झाला असता. आता भोवती सदोदित गर्दी असावी असं वाटतं.

लोकल आली. फर्स्टक्लासच्या डब्यात शिरून बसल्यावर त्याला बरं वाटलं. पण क्षणभरच. प्रवास संपला की आपल्याला घरी जायचं आहे हे आठवलं ना. २-३ महिन्यांपूर्वी त्याने न उतरता ट्रेनने दोन्ही टोकाच्या स्टेशनचा प्रवास केला होता. एकदा. दोनदा. अनेकदा. पण शेवटी काय घरीच जायला लागतं. हॉटेलवर राहून पाहिलं. तिथेही परिस्थितीत फरक पडला नव्हताच. जे घरी तेच दारी. आणि हॉटेलमध्ये किती दिवस राहणार? एक महिना? दोन महिने? मग शेवटी काय घरी जायला लागतंच. परिस्थितीतून सुटका नाही हे लक्षात आलं तरी परिस्थिती स्वीकारणं जड जातंच की माणसाला.

त्याने डोळे मिटून घेतले. कोणाजवळ मन मोकळं करायचीसुध्दा सोय नाही. समीरला सांगावं असा विचार कितीदा तरी केला होता त्याने. पण त्याची काय प्रतिक्रिया होईल कोणास ठाऊक असं वाटलं त्याला. आई-बाबाना त्यांचे प्रॉब्लेम्स खूप आहेत. आपलं हे व्याह्याचं घोडं त्यांच्या दारात बांधायचा त्याला धीर होत नव्हता. गुंता सुटण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालला होता.

घराचं स्टेशन जवळ आल्यावर त्याला सवयीने जाग आली. तेव्हढ्याश्या डुलकीने सुध्दा त्याला एकदम ताजंतवानं झाल्यासारखं वाटलं. पण हे सगळं घरी जाईतोच टिकणार आहे हेही त्याला माहित होतं.

सोसायटीच्या आवारात आज कोणी नव्हतं. पण तो लिफ्टसाठी उभा असताना लेलेकाका बाहेरून आले.

‘काय अभिषेक कसा आहेस?’ त्यांनी विचारलं.
‘बरा आहे काका. तुम्ही कसे आहात? आणि काकू?’
‘बरे आहोत की दोघे'

लिफ्ट आली. दोघे आत शिरले. लेल्यांना काहीतरी विचारायचं होतं असं वाटलं खरं त्याला. पण कदाचित तो त्याचा भास असेल. कारण त्याला स्वत:ला बर्याचदा वाटलं होतं की ह्यांना आणि काकुंना तरी एकदा सगळं सांगावं. ते त्याला आणि चित्राला ओळखत होते की गेल्या ३-४ वर्षांपासून. पण मग परत विचार केला की उगाच सगळ्या सोसायटीभर झालं तर? तसा लेलेकाकांवर त्याचा विश्वास होता. पण तरी.........

हा 'पण तरी' आपल्याला एक दिवस नक्की महागात लागणार आहे. लेल्यांचं घर दुसर्या मजल्यावर. ‘गुड नाईट' म्हणून ते गेले.

‘साब, टेन्थ फ्लोर आ गया' लिफ्टमन म्हणाला तसा अभिषेक पुन्हा तंद्रीतून बाहेर आला. आजकाल आपलं असं नेहमी होतंय.

त्याने लिफ्टबाहेर पाउल टाकलं. उजवीकडे वळल्यावर १०४ ची पाटी दिसली. चित्रा आणि अभिषेक सरपोतदार. तो दाराबाहेर उभा राहिला. आत जायची इच्छा अजिबात होत नव्हती. पण जाणं भाग होतं. घरात जाणं भाग होतं.

त्याने दरवाजा उघडला.

आत अंधार होता. नेहमीसारखाच.
त्याने लाईट लावला नाही. नेहमीसारखाच.
त्याने बूटही काढले नाहीत. नेहमीसारखेच.
तो दिवाणखान्यात आला. नेहमीसारखाच.

‘आलास अभि? कधीची वाट पहात होते. दमला असशील ना?' चित्राने विचारलं. नेहमीसारखंच.

ती सोफ्यावर बसलेली असणार. नेहमीसारखीच.

त्याने काहीच उत्तर दिलं नाही. बोलण्यासारखं होतंच काय?

'जेवलास ना?’

तो गप्पच. बेडरूममध्ये जाऊन त्याने धाडकन दरवाजा लावून घेतला. ती मागून आली नाही की तिने दरवाजा वाजवला नाही. तिची लक्षमणरेषा ती ओलांडणार नव्हती कधीच.

‘गुड नाईट अभिषेक' एव्हढंच म्हणाली. नेहमीसारखीच.

अभिषेकने दोन्ही कानांवर हातांचे तळवे घट्ट दाबून धरले. हे सगळं सहनशक्तीपलीकडलं होतं.

काय म्हणाली होती ती? ६ महिन्यांपूर्वी ह्याच बेडरूममध्ये. ह्याच बेडवर. काय म्हणाली होती?

ल्युकेमियाने तिला कायमचं घेऊन जायच्या क्षणभर आधी ....आपले झरणारे डोळे तिच्या कृश झालेल्या हातांनी पुसत, उसनं हसू ओठांवर आणत थरथरत्या स्वरांत काय म्हणाली होती?

धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च.......
.............नातिचरामि

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉलिड आहे ही स्टोरी
बायको आहे.बेडरुम मध्ये यायला काही हरकत नव्हती तिला Happy
(किंवा मी स्टोरी मधलं काही मिस केलं असेल)

छान लिहीली आहेस.. Happy
भूत कशाला?? स्मृती आहेत हो तिच्या त्या भास म्हणजे...

छान आहे कथा. पण एक समजलं नाही त्याच्या बायकोच्या स्मृती आहेत तर तो त्या स्मृतीना इतका का घाबरतो आहे. अगदी जीव देण्याइतका.

Jabaraa ahe. ShevaT agadich predict zala nahi.
Cच्छhalanari bayako asel ase vatalele.

मस्त खुप आवडली शेवट आवडला
(धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च.......
.............नातिचरामि) हा महाभारतातिल् मंत्र् आहे याचा अर्थ् मी नेहमी तुझ्या सोबत राहिन असा आहे असे वाटते

नातिचरामि->>> न इति चरामि म्हणजे तुझ्याशिवाय दुसर्‍याबरोबर रहाणार नाही.म्हणजे मृत चित्राचा आत्मा, वरच्या शपथेला जागून नवर्‍याबरोबर रहात आहे.त्यालाही दुसरीबरोबर राहू द्यायचा विचार नाही.स्वप्ना बरोबर का?

माझा मुद्दा हा होता की आत्म्याला बेडरुम मध्ये यायला काय प्रोब्लेम आहे?ती लक्श्मण रेखा का?बेडरुम मध्ये मोठ्ठा ओम किंवा क्रॉस किंवा अल्ला किंवा गुरु ग्रंथ साहीब आहे का?

माझा मुद्दा हा होता की आत्म्याला बेडरुम मध्ये यायला काय प्रोब्लेम आहे?ती लक्श्मण रेखा का?बेडरुम मध्ये मोठ्ठा ओम किंवा क्रॉस किंवा अल्ला किंवा गुरु ग्रंथ साहीब आहे का? >> Lol

गोष्ट आवडली.

>>माझा मुद्दा हा होता की आत्म्याला बेडरुम मध्ये यायला काय प्रोब्लेम आहे?ती लक्श्मण रेखा का?बेडरुम मध्ये मोठ्ठा ओम किंवा क्रॉस किंवा अल्ला किंवा गुरु ग्रंथ साहीब आहे का?

अहो, प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ तर द्याल की नाही? Uhoh चित्राचा मृत्यू बेडरुममध्ये झालाय. जसं नवर्‍यावरचं प्रेम ती अजून विसरली नाहिये तसंच तिचा म्रुत्यू जिथे झाला ती जागाही. म्हणून ती जागा तिच्या दृष्टीने वर्ज्य आहे.

चांगली जमली आहे कथा.
बेडरुम मध्ये बहुदा एखाद्या बापू किंवा बाबाचा फोटो नजिकच्या काळात लावला गेला असावा. त्या फोटोला बहुतेक ती घाबरत असावी.

>>न इति चरामि म्हणजे तुझ्याशिवाय दुसर्‍याबरोबर रहाणार नाही.म्हणजे मृत चित्राचा आत्मा, वरच्या शपथेला जागून नवर्‍याबरोबर रहात आहे.त्यालाही दुसरीबरोबर राहू द्यायचा विचार नाही.स्वप्ना बरोबर का?

मी नेटवर चेक केलं तेव्हा नातिचरामि चा अर्थ 'मी सदैव तुझ्यासोबत राहीन' असा मिळाला. बहुतेक ही शपथ नवर्‍याने घ्यायची असते. नक्की माहित नाही. पण इथे चित्राचं तिच्या नवर्‍यावरचं, अतिरेकी म्हणू यात हवं तर, प्रेम तिला मुक्ती मिळू देत नाहिये म्हणून ती ही शपथ शब्दशः पाळतेय.

न इति चरामि असा संधी असता तर शब्द नेतिचरामि असा झाला असता ना? नातिचरामि म्हणजे बहुधा न + अतिचरामि असा असावा असा माझा कयास.

>>प्रेडिक्टेबल... तरीही आवडली!!

ह्म्म्म.....मायबोलीवरच्या जनतेला क्लू लागणार नाही अशी कथा लिहिणं मला जमणार नाही असं दिसतंय. Happy लेलेंनी चित्राबद्दल चौकशी केली नाही ह्यावरून तुम्हाला संशय आला का? पुढल्या कथेच्या दृष्टीने माहित व्हावं म्हणून प्रामाणिकपणे विचारत आहे.

ज्यांनी गंभीरपणे प्रतिसाद दिलेत त्या सर्वांचे आभार. सूचनांचं स्वागतच आहे.

बेडरुम मध्ये बहुदा एखाद्या बापू किंवा बाबाचा फोटो नजिकच्या काळात लावला गेला असावा.
>>> हो आणि आता कोर्ट चे निकाल आले, म्हणून घाबरत असेल बापू आणि बाबां ना...

अंदाज लगेचच नाही आला . आधी वाटले नवरा बायकोचे भांडण वगैरे काहीतरी कारण असावे घरी जावेसे न वाटण्याचे. लेलेकाकांनी इतकी नॉर्मल चौकशी केल्यावर मात्र जरा शंका आली, की प्रॉब्लेम याला एकट्यालाच आहे /दिसतोय असा काहीसा आहे.
गुड वन ओव्हरऑल!!

>>नातिचरामि म्हणजे अतीचरण करणार नाही. म्हणजे ध अ का मो सगळे प्रमाणात करीन .. एक अती , दुसरे कमी असे करणार नाही.

मलाही आधी असाच अर्थ वाटला होता. पण नेटवर वर दिलाय तसा अर्थ मिळाला. नक्की काय आहे कोणास ठाऊक.

ओके ओके, स्वतःच्या मरणाच्या मेमरी मुळे ती जागा अप्रिय हे लक्षातच नाही आले.
मस्त आहे गोष्ट.टचिंग आणि थोडी दचकवणारी पण.

गोष्ट आवडली. मला अजिबात प्रेडिक्टेबाल वाटली नाही. नातीचरामी नाव वाचून एका बाजूला वाटत होते की यांच्या बायकोचे कुठे लफडे तर नाहीय ना म्हणून तिला टाळण्यासाठी हा घरी जात नाहीय, त्याच वेळी याला सगळे का संभाळताहेत हेही कळत नव्हते.

तो हॉटेल मध्ये वगैरे राहिलाय लिहिलेय, जिथे हा त्रास होत नाहीय. मग घर बंद करून सरळ शहरच सोडायचा उपाय एकदा करून पहावा त्याने.

मला सुरुवातीला बायको त्याचा जाच करते असंच वाटलं पण अगदी शेवटी लेले चित्राविषयी विचारत नाहीत आणि घरात आल्यावर ती दमला असशील ना वगैरे विचारते तेव्हा वाटून गेलं की ती मेलेली असणार आणि तिचा आत्मा असणार घरात.
कथा छान फुलवलीय. Happy आवडली.

गोष्ट आवडली.
मला शेवट वाचे पर्यंत उत्कंठा होती. बायको आणि अभिषेक मध्ये वाद/ भांडण/ घटस्फोट/ मुले इत्यादी विचारच डोक्यात होते. घरी आल्यावर याचे आणि बायकोने शांतपणे संभाषण वाचून अंदाज लागला.
हाइंड साईट मध्ये नेहेमीचीच कथा वाटते आहे, पण तुम्ही मांडणी मस्त केली आहे, त्यामुळे शेवट पर्यंत काय होतंय याची उत्सुक्ता होती.
पुलेशु

Pages