सेवाभावी संस्थांसाठी मायबोलीची नवीन सुविधा

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीवर हितगुज विभागात वेगळे ग्रूप्स अनेक वर्षांपासून आहेत. काही वर्षांपासून आपण आधारगट ही सुरू केले आहेत. यातलाच एक लोकप्रिय ग्रूप म्हणजे ध्यासपंथी पाऊले. वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, त्यांचे उपक्रम याबद्दल मायबोलीकरांना माहिती होण्यासाठी या ग्रूपने महत्वाचे काम केले आहेत. या ग्रूपवरच्या आवाहनातून अनेक संस्थांनी आर्थिक मदत ही गोळा केली आहे.

या गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर आपण सेवाभावी संस्थाना एक अजून सुविधा उपलब्ध करून देत आहोत. आता ज्या अधिकृत नोंदणी झालेल्या सेवाभावी संस्था आहेत त्याना मायबोलीवर त्यांचा एक स्वतंत्र ग्रूप असेल. हा गृप संस्थेच्या च्या ताब्यात असेल आणि त्याना योग्य वाटेल तेंव्हा त्या ग्रूपमधे त्यांना संस्थेच्या उपक्रमांबद्दल घोषणा करता येतील. ज्या मायबोलीकरांना त्या त्या संस्थांबद्दल विशेष आस्था आहे त्यांच्या ग्रूपचे सभासद होऊन संपर्कात राहणे जास्त सोपे होईल.

बर्‍याच संस्थांची स्वतःची वेबसाईट असते. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर वेगळे ग्रूपही असतात. पण या सगळ्या सोयींचा सुसुत्रप्रमाणे वापर करता येणारी माणसं नसतात किंवा असली तरी ती इतकी व्यस्त असतात की बर्‍याच सोयी वापरल्या जात नाही. मायबोलीवर काही दिवसांपूर्वी सुरु झालेली सोय या संस्थांना खूप उपयोगाची ठरेल अशी आशा आहे. ते इथे मायबोलीवर त्यांच्या घोषणा प्रकाशित करू शकतात आणि एका टिचकी सरशी Facebook, Linkedin, Whatsapp वर शेअर करू शकतात. विशेषतः ज्या संस्थाना जगभरातल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचायचं आहे त्यांच्या साठी ही एक चांगली सोय ठरावी.

ही सोय पूर्णपणे विनामूल्य आहे. या साठी फक्त खालील अटी आहेत.
१. संस्था कुठल्याही देशात असली तरी चालेल. पण ती त्या त्या देशात नोंदणी केलेली असावी.
२. कुणितरी एका मायबोलीकराने/मायबोलीकरणीने या ग्रूपचा अ‍ॅडमीन होण्याची जबाबदारी घ्यावी.

या उपक्रमात तुमच्या माहितीतल्या एखाद्या संस्थेला सामील करून घ्यायचे असेल , तर इथेच या घोषणेखाली प्रतिक्रियेत लिहा.

या उपक्रमात सामील होणारी सगळ्यात पहिली संस्था आहे "मैत्री, पुणे". मैत्रीचा आजपासून मायबोलीवर स्वतंत्र ग्रूप आहे. मायबोलीकर हर्पेन त्याचे अ‍ॅडमीन असतील. मैत्रीच्या उपक्रमांना मायबोलीकरांनी वेळोवेळी भरपूर प्रतिसाद दिला आहे. या पुढेही तो मिळत राहील असा विश्वास आहे.

प्रकार: 

धन्यवाद Admin-Team.

ही सुविधा खरेच अत्यंत उपयोगी ठरू शकते.

तळागाळात अतिशय चांगले काम करणाऱ्या संस्था आहेत. पण इंटरनेट वर प्रेसेन्स नसल्याने त्यांचे काम कधी कधी लोकांपर्यंत पोचत नाही. या साठी काय करता येईल याच्यावर सामाजिक उपक्रमच्या ग्रुप वर बरीच चर्चा झाली. यावर एक पर्याय म्हणजे त्यांना स्पॉन्सर शोधून वेबसाईट बनवून देणे हा होता. वेबसाईट डिजाईन करणारे, होस्ट नेम वगैरे साठी स्पॉन्सर करणारे देणगीदार पण तयार होते.

पण,
पण या सगळ्या सोयींचा सुसुत्रप्रमाणे वापर करता येणारी माणसं नसतात किंवा असली तरी ती इतकी व्यस्त असतात की बर्‍याच सोयी वापरल्या जात नाही. >>>>>
हा एक प्रॉब्लेम शिवाय, वेबसाईट मेंटेन करणं, लायसेन्स रिन्यू करणं हे सगळं कोण आणि कसे करणार हा सुद्धा प्रॉब्लेम.

मग त्यावर अगदी मागच्याच आठवड्यात आम्ही पर्याय काढला होता की आपण या सर्वांची माहिती 'ध्यासपंथी पाऊले' मध्ये मुलाखत अथवा माहिती स्वरूपात दिली तर ते अत्यंत सोयीचे होईल. गुगल वरून सर्च करताना पण माबो वरील माहिती दिसेल. लवकरच या साठी सुरुवात करणार होतो.

तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेक संस्थांची माहिती नेट वर प्रकाशित करता येईल.

अनेक धन्यवाद.

स्तुत्य पाऊल. परवाच यंदाच्या सामाजिक उपक्रम स्वयंसेवक चमूमध्ये याविषयी चर्चा चालू होती.
वेगवेगळ्या नोंदणीकृत, सेवाभावी, कोणताही राजकीय किंवा धार्मिक एजंडा नसलेल्या व तळागाळातील लोकांसाठी चांगले काम करणाऱ्या, ज्यांना जास्त कॉर्पोरेट निधीही नाही अशा अनेक संस्था आंतरजालावर त्यांचे काहीच अस्तित्व नाही किंवा जे अस्तित्व आहे ते अतिशय त्रोटक, मर्यादित किंवा कालबाह्य स्वरुपातील आहे म्हणून मागे पडतात.

सामाजिक उपक्रमातून अशा चांगल्या सेवाभावी संस्था वेचून त्या लोकांसमोर आणायचा नेहमीच प्रयत्न केला जात असतो.
मायबोलीने या प्रयत्नांस कायमच उत्तम साथ दिली असून मायबोलीकरांच्या उदार व तळमळीच्या योगदानामुळे हा उपक्रम येथे चालू राहिला आहे.
या नव्या पावलामुळे आपल्या योगदानात भर पडणार असून वेळोवेळी भरीव काम करणाऱ्यांनाही यामुळे हुरुप येईल यात शंकाच नाही.
मन:पूर्वक शुभेच्छा व धन्यवाद!

उत्तम पाऊल.

- डेटाबेस तयार होईल
- वेगवेगळ्या संस्थांची सरमिसळ होणार नाही
- छोट्या पण कार्याने मोठ्या संस्थांना निधीसाठी platform उपलब्ध होईल.
- मायबोली सदस्यांना जास्त options उपलब्ध होतील
- एखाद्या संस्थेच्या कार्याचा ट्रॅक ठेवता येईल
- फोकस्ड राहाता येईल
- प्रत्येक संस्थेच्या ग्रूपसाठी स्वतंत्र admin असल्याने ध्यासपंथीच्या कार्यकर्त्यांवर जास्त ताण येणार नाही. आजपर्यंत त्यांनी खूप समरसून काम केलं आहे.

धन्यवाद.

धन्यवाद अ‍ॅडमीन टीम, खुप छान सुविधा.
कुणी नाम फाऊंडेशनशी संलग्न असतील तर नवीन गृप चालु करा ना , इथे बर्‍याच जणांना शेतकर्‍यांना मदत करायची असु शकते.

उत्तम घोषणा! फारच स्तुत्य पाऊल आहे हे! यासाठी मायबोली अॅडमिन मंडळाचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!

उत्तम, उपयोगी सुविधा. अ‍ॅडमिन, आधीच्या आहेत त्या पण त्यांचे वेगळे पान करून यात घालणार आहे का की फक्त त्यांचे काही उपक्रम असतील तरच?

ध्यासपंथी पाऊले हा ग्रूप सुरु राहणारच आहे. त्यामुळे संस्थांसाठी सगळ्यात सोपी ही जी सुविधा आहे ती चालूच राहिल. काही संस्थांना हे पुरेसेही असेल. जशा नवीन संस्थांसाठी अ‍ॅडमीन काम करायला स्वयंसेवक मिळतील त्याप्रमाणे त्यांच्याशी चर्चा करून कुठले धागे हलवायचे ते ठरवता येईल. आधीच्या १-२ धाग्यांसाठीच नवीन ग्रूप करणे योग्य होणार नाही.
मायबोली एक विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचा किती वापर करायचा ते त्या संस्थेवर आणि त्याबद्दल आस्था वाटणार्‍या स्वयंसेवकांवर अवलंबून आहे. अनेक मायबोलीकराना संस्थेला मदत करायची इच्छा असते. पण प्रत्यक्षात संस्थेच्या जागेवर जाऊन वेळ देणे नेहमीच शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही मायबोलीवर येताच तर आणखी ५-१० मिनिटे स्वयंसेवी संस्थांचे ऑनलाईन काम करून, संस्थेच्या ग्रूपचा अ‍ॅडमीन होणे ही घरी बसल्या बसल्या ,स्वतःच्या सवडीने केलेली खूप मोठी मदत होऊ शकते. तंत्रज्ञानामुळे घरबसल्या करता येण्याजोगा हा एक नवीन व्यवसाय किंवा स्वयंसेवी कामाचा महत्वाचा पर्याय ठरत चालला आहे.

एकीकडे मायबोलीवरच मला बराच वेळ आहे, काही घरबसल्या काम करायचे आहे असे धागे अधून मधून निघतच असतात. असे प्रत्यक्ष पैसे मिळवणारे काम मिळेपर्यंत तुमचा वेळ या कामासाठी देता येईल.