मैत्रीकरता रद्दी संकलन १ ऑक्टोबर २०१७

Submitted by हर्पेन on 24 August, 2017 - 22:51

लोकसहभागातून विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन हे ‘मैत्री’ चे वैशिष्ट्य आहे. "रद्दीतून सद्दी" म्हणजे रद्दी जमा करून ती विकून त्यातून मेळघाटसाठी निधी जमवणे. गेल्या बारा वर्षांमध्ये ‘मैत्री’ ने २० लाखाहून अधिक पैसे यातून उभे केले आहेत.

मागच्या वर्षी २ ऑक्टोबर २०१६ या दिवशी "रद्दीतून सद्दी"ची एक मोठीच मोहीम आम्ही केली. त्याच्या तयारीला सुरुवात झाली १५ ऑगस्ट पासून. लोकांनी त्यांची रद्दी “मैत्री” ला देण्यासाठी का तयार व्हावं,ते सहज समजेल असं एक लहानसं पोस्टर तयार केलं. भरपूर गटा-गटांत ही कल्पना बोलली जायला लागली. मैत्री कार्यालयातून संभाव्य संपर्क व्यक्ती आणि सोसायटी अशी एक यादी तयार व्हायला लागली.तेव्हाच गणपती-गौरीची घराघरात गडबड सुरु झाली होती.त्यामुळे रद्दी देऊन टाकू नका, २ ऑक्टोबर पर्यत आमच्यासाठी रद्दी ठेवा असंही एक निवेदन व्हॉटस् अप वर फिरत होतं. स्वयंसेवकांना कार्यालयातून निवेदनाच्या मेलही जात होत्या. अनेक विद्यार्थी,शाळेतील पालक वर्ग,मित्रमंडळी,काही खाजगी कंपन्या,हे देखील या उपक्रमात सहभागी होणार असं दिसायला लागलं.

सोसायट्यांची यादी सतत कमी-जास्त होत होती.काही सोसायट्या अजून बैठक झाली नाही नंतर कळवू असेही सांगत होत्या.मैत्रीचे स्वयंसेवक भरपूर लोकांना भेटत होते,कुठे स्लाइड्स दाखवून कुठे माहिती सांगून काम समजावून सांगत होते. लोकांनी समजून घेउन यात सहभागी व्हावं असं आमचं म्हणणं नेहमीच असतं. एक आठवडा आधी कार्यालयात एक बैठक ठरवली,त्याला फार लोक आले नाहीत पण मोजक्या लोकांचा सहभाग आणि अनेकांचा भक्कम पाठिंबा आहे हे नक्कीच दिसलं.

कामाची व्याप्ती मोठी होती म्हणून वेगवेगळे विभाग केले होते आणि प्रत्येकासाठी एकेक समन्वयक नेमला होता. त्याच्याकडे/ तिच्याकडे त्या विभागात असलेल्या सोसायट्या, सोसायटीमध्ये जबाबदारी घेतलेल्या व्यक्तीचे नाव, फोन नंबर अशी यादी होती. त्या त्या विभागाची जबाबदारी त्याणे घ्यायची. रद्दी जमा होते ना, गठ्ठे नीट बांधले जातात ना, टेम्पो बोलावणे, रद्दी वजन करणे आणि नोंद करणे अशी सर्व कामे समन्वयकाने त्याच्याकडे असलेल्या स्वयंसेवकांच्या मदतीने पार पाडली.

२ ऑक्टोबर ला सकाळी गांधीजयंतीला “मैत्री”चे कोथरूड मधे काम करणारे स्वयंसेवक शिवाजी पुतळ्यापाशी जमले आणि ठरलेल्या सोसायटी मधून रद्दीसाठी पुन्हा लोकांना भेटणे सुरु झाले.नेहमी रद्दी देणारया सोसायटी मधून नेहमीचे टेम्पोवले काका रद्दी घेउन डेपोमध्ये गेले.सोसायटीच्या क्लब हाउसमध्ये कोणी रद्दी जमवली होती तर काही सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षकांनी रद्दी घेउन ठेवण्याची जबाबदारी घेतली होती.काही सोसायट्यांमध्ये पार्कींग च्या मोठया जागेत रद्दीचे गठ्ठे जमत होते.कोथरूड,पौड रोड,कर्वेनगर,सिंहगड रस्ता,धायरी,नांदेड सिटी,सहकारनगर, औंध, पाषाण,बाणेर,बावधन,सांगवी,पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर,अशा अनेक भागातून सुमारे १११ सोसायट्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

साधारण १२ वाजल्यानंतर जमवलेली रद्दी मोजून गठ्ठे बांधून तयार होण्याची सुरुवात होईल असे वाटत होते.पण काही कारणाने रद्दी बांधणे आणि वजन करणे हे काम चक्क रात्रीपर्यंतही पूर्ण होऊ शकले नाही.रद्दीची दुकानं भरून गेली होती,टेम्पोवाले काका, स्वयंसेवक थकले होते,तर काही ठिकाणी घरच्या गाडीतूनच रद्दी घेउन यावी आणि लोकांना मोकळं करावं,असं सुरु होतं.
लोकांचा प्रतिसाद उत्तम असला तरी आम्हांला तसा अनपेक्षित होता. थोडी गैरसोय बरेचजणांना सोसावी लागली.टेम्पो सर्व ठिकाणी वेळेत पोहचू शकले नाहीत.काही ठिकाणी रद्दीच्या गठ्ठ्यांचे वजन नं होता रद्दी घेउन जावी लागली.सोमवारी दुपारी देखील काही ठिकाणी हे काम सुरूच होते.या उपक्रमामध्ये स्वरूपवर्धिनी,फुटबॉल क्लब,अप्रोच हेल्पिंग हेन्द्स चे युवक-युवती,सोसायटीतील लोक,”मैत्री”चे स्वयंसेवक, रद्दी डेपोतील लोक,अनेक टेम्पोवाले काका,या सर्वांनी मोठी मदत केली.घराघरातील, सर्व वयोगटातल्या नागरिकांनी त्यासाठी वेळ दिला आहे याची आम्हांला जाण आहे. महाराष्ट्र दर्पण या वाहिनीने प्रत्यक्ष मोहीम चालू असताना स्वयंसेवकांशी संवाद साधला त्याबद्दल पहा व ऐका - https://youtu.be/3mSlgchWc58

२ ऑक्टोबर या दिवशी २६००० किलो वर्तमानपत्राची रद्दी,११५० किलो इतर रद्दी जमली.सुमारे ५६०० कुटुंबांनी त्यात सहभाग घेतला होता. मुंबईच्या एका मैत्रिणीने गणपती उत्सवाच्या निमित्ताने "उकडीचे मोदक" शिकवण्याच्या कार्यशाळा घेतल्या आणि त्यातून मिळालेले पैसे व त्यामध्ये येणा-या लोकांना माहिती सांगून देणगी गोळा करून व स्वतःची भर घालून ११ हजार रुपये मैत्री ला दिले.

या मोहिमेनंतर काही सोसायटी मधील लोकांनी नियमितपणे असे रद्दी दान देण्याची इच्छा दर्शविली व आम्ही दरमहा त्यांच्याकडून रद्दी गोळा करत आहोत. आज सुमारे १५ सोसायट्या नियमित स्वरूपात आम्हाला रद्दी देत आहेत.

गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी २ ऑक्टोबर २०१७ गांधीजयंती चे औचित्य साधून विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये जावून रद्दी गोळा करायची आहे. गेल्या वर्षी ज्या सोसायट्या सहभागी झाल्या त्यांच्याशी संपर्क करणे सुरु झाले आहे. ज्या भागात समन्वयक मिळतील त्या भागांचे नियोजन चालू केले आहे.
तुम्ही या मोहिमेच्या निमित्ताने तुमच्या सोसायटीत रद्दी जमा करून त्यातून येणारे पैसे "मैत्री" ला द्याल का? या कामासाठी तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही पुढाकार घ्या व आम्हाला कळवा.

१ ऑक्टोबर ला रविवार आहे म्हणून रद्दी जमा करून घेणे व उचलणे या दिवशी होईल. त्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवकांची कुमक लागणार आहे. तुम्ही येऊ शकाल मदतीला? "मैत्री" कार्यालयाशी संपर्क करा.

http://maitripune.org/

गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रद्दीची "धडक मोहीम" यशस्वी करुया. "गणपती बाप्पा मोरया ! "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम !

उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा !

धन्यवाद अतरंगी
लोकहो माबोच्या नवीन सुविधेचा लाभ घ्या आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा